मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice) , मॅकबेथ (Macbeth)








१) पुस्तक - मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice)
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Shasrabuddhe)
भाषा - मराठी 
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी 
पाने - १२७
प्रकाशन - वैशाली प्रकाशन. एप्रिल २०२६
ISBN 978-93-48129-53-6
छापील किंमत - रु. ३००/-

२) पुस्तक - मॅकबेथ (Macbeth) 
लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare)
अनुवादक - सुरश्री जोशी (Surashri Joshi)
भाषा - मराठी 
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी 
पाने - ११०
प्रकाशन - वैशाली प्रकाशन. एप्रिल २०२६
ISBN 978-93-48129-71-0
छापील किंमत - रु. ३००/-

शेक्सपियर हा इंग्रजीतला विख्यात नाटककार. जगप्रसिद्ध नाटककार. सोळाव्या शतकात हा नाटककार होऊन गेला असला तरी त्याच्या नाटकांची मोहिनी अजूनही जगभरातल्या नाट्यप्रेमींवर, साहित्यप्रेमींवर, भाषाप्रेमींवर आहे. त्या नाटकांचे प्रयोग अजूनही होतात. त्या नाटकांची जगभरातल्या भाषांमध्ये भाषांतरे होतात. रूपांतरे होतात. मूळ नाटकातली भाषा पाचशे वर्षांपूर्वीची जुनी इंग्रजी असल्यामुळे ती जुनी नाटकं जशीच्या तशी वाचायला घेतल्यावर प्रत्येकालाच समजतील असं नाही. पण त्या नाटकांच्या कथानकांबाबत उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. अशावेळी या नाटकांचे मराठीमध्ये असलेले भाषांतर नक्की उपयोगी पडतं.

मराठी भाषेतही वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कालखंडात ही नाटके भाषांतरित केलेली आहेत. पण आता त्या भाषांतरित पुस्तकांमधली मराठी भाषा सुद्धा थोडी जुन्या वळणाची, कदाचित क्लिष्ट वाटू शकेल. त्यामुळे आजच्या मराठीत, सोप्या मराठीत शेक्सपियरचे साहित्य भाषांतरित झाले तर ती मराठी वाचकांसाठी आनंदाची बाबच आहे.

२३ एप्रिल हा शेक्सपियर चा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस. म्हणूनच तो जागतिक पुस्तक दिवस म्हणूनही साजरा केला जातो. यावर्षी(२०२६) मध्ये २३ एप्रिल च्या मुहूर्तावर वैशाली प्रकाशनने शेक्सपियरच्या सहा नाटकांची आजच्या आणि सोप्या मराठीत नव्याने भाषांतरे प्रकाशित केली आहेत. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि तेव्हा ती सहाही पुस्तके विकत घेतली. त्यातली दोन वाचून झाली. त्याबद्दल आता लिहितो. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की, नेहमीप्रमाणे हे माझे पुस्तक परीक्षण नाही; तर नव्याने आलेल्या पुस्तकांची माहिती आणि मी ती वाचली याची वाचन नोंद आहे.

"मर्चंट ऑफ व्हेनिस" या नाटकात एक ज्यू सावकार, एक ख्रिश्चन व्यापारी, व्यापाऱ्याचा मित्र आणि मित्राची प्रेयसी अशी पात्रे आहेत. ज्यू सावकार - शायलॉक - आपल्या धंद्यात पक्का आहे. दिलेले कर्ज वसूल करण्यात तो वाकबगार आहे. कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडून कसंही करून तो पैसा मिळवतोच. त्यामुळे लोकांचं त्याच्याबद्दलचं मत, तो एक दुष्ट,लोभी, पाषाणहृदयी माणूस आहे, असं झालं तर नवल नाही.

या उलट ख्रिश्चन व्यापारी - अँटोनियो - लोकांना बिनव्याजी कर्ज देतो. सावकाराची कर्ज फेडायला मदत करत असतो. त्यामुळे शायलॉक अँटोनीयोवर डूख धरून आहे.

पुढे परिस्थिती अशी होते की अँटोनियो मित्रासाठी शायलॉक कडून कर्ज घेतो. कर्ज फेडलं नाही तर अँटोनियोला भयंकर शिक्षा होईल अशा शर्ती ठरतात. मित्राला ते कर्ज फेडणं का शक्य होत नाही, त्या भयानक अटी काय असतात आणि त्या भयानक अटींपासून त्याची सुटका कशी होते हे सगळं नाट्य म्हणजे "मर्चंट ऑफ व्हेनिस".

काही पाने उदाहरणादाखल

मित्राची प्रेयसी पोर्शिया या पात्राच्या स्वयंवराच्या वेळचा पण आणि मोरोक्कोच्या राजपुत्राचा त्याला प्रतिसाद.


कर्ज वेळेत फेडू न शकल्याने ठरवलेली जीवघेणी शिक्षा अँटोनियोला मिळालीच पाहिजे यासाठी हट्टाला पेटलेल्या शायलॉकचे संवाद.



दुसरं नाटक मी वाचलं ते "मॅकबेथ". स्कॉटिश राजा डंकनचा सरदार मॅकबेथ. मॅकबेज अतिशय शूरवीर धडाडीचा आणि डंकनचा विश्वासू सरदार. पण आपल्या बायकोच्या हट्टाला बळी पडून तो डंकनचा स्वतःच्या घरी खून करतो. स्वतः राजा बनतो. डंकनची मुले परागंदा होतात. इतर सरदारांचेही खून घडवले जातात. राज्यात असंतोषाचे वातावरण पसरतं. अराजक निर्माण होतं. मॅकबेथ आणि त्याची पत्नी कपटाने मिळवलेलं यश मनापासून उपभोग होऊ शकत नाहीत. आपल्या अपराधाची टोचणी त्यांच्या मनात सतत सलत असते. जुन्या राजाशी प्रामाणिक सरदार मॅकबेथविरुद्ध उठाव करायचं ठरवतात. शौर्य, विश्वासघात, पश्चाताप, महत्वकांक्षा, बंड, राजनिष्ठा या सगळ्याचं नाट्य म्हणजे "मॅकबेथ".

काही पाने उदाहरणादाखल.
मॅकबेथ नाटकातल्या प्रसिद्ध चेटकिणींची गुरु हेकेट चा संवाद


खून केल्यानंतर मॅकबेथ आणि त्याच्या बायको मधला संवाद




वरच्या दोन परिच्छेदात मी थोडक्यात कथानक सांगितले आहे. पण या ढोबळ कथानका पलीकडे प्रत्येक पात्र, त्याची वैचारिक व मानसिक भूमिका, त्यांचे संघर्ष हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. गेली चारशे वर्ष हजारोंनी साहित्यप्रेमी साहित्यअभ्यासक शेक्सपियरच्या साहित्याचा अभ्यास करतायत, प्रबंध लिहितायत, पीएचडी करतायत. त्यामुळे मी त्यावर नव्याने स्वतंत्रपणे काही लिहावं इतका माझा अभ्यास नाही.

पण ह्या पुस्तकांमुळे मराठीत ही नाटके वाचायला मिळाली, त्याचं कथानक समजलं, त्यातली गुंतागुंत थोडक्यात लक्षात आली हेही नसे थोडके.

दोन्ही अनुवादकांनी उत्तम अनुवाद केला आहे. मुळातच ही नाटके आहेत त्यामुळे भाषा थोडी नाटकी असणारच. तिचं मराठीकरण करताना तो नाटकीपणा, औपचारिकपणा मराठीत येणं ही स्वाभाविक आहे. मूळ नाटकातली भाषा पद्य स्वरूपाकडे झुकणारी आहे. पण इथे तसा तंतोतंत अनुवाद, यमक जुळवत पद्य स्वरूपातला अनुवाद न करता थेट गद्य स्वरूपातच संवाद आहेत. त्यामुळेच ते वाचायला आणि कथानक समजून घ्यायला सोपं आहे.
दोन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनेत अनुवादक शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी नाटकातल्या प्रतिमा, पत्रांच्या वर्तनातले ताणेबाणे, शेक्सपियरची शैली याबद्दल थोडक्यात निरीक्षणे मांडली आहेत. त्या दोन्ही प्रस्तावना वाचनीय आहेत.

शेक्सपियरच्या साहित्याबद्दल उत्सुकता असणाऱ्या पण मूळ इंग्रजी वाचू न शकणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने अवश्य वाचावं अशी ही दोन पुस्तके आहेत.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice) , मॅकबेथ (Macbeth)

१) पुस्तक - मर्चंट ऑफ व्हेनिस (Merchant of Venice) लेखक - विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) अनुवादक - शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Shasra...