मनोवेधस (Manovedhas)




पुस्तक - मनोवेधस (Manovedhas)
लेखक - चंद्रशेखर गोखले (Chandrashekhar Gokhale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ४३६
प्रकाशक - उमा गोखले. जानेवारी २०२२
ISBN - दिलेला नाही

ही एक काल्पनिक कथेवर आधारित कादंबरी आहे. बेलगिरी नावाच्या खेड्यात शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात घडते आहे असं वर्णन आहे. ह्या गावातल्या "दाणी" नावाच्या सुखवस्तू घरात एक श्रीरामाची लाकडाची मूर्ती आहे. गावातल्या लोकांचं श्रद्धास्थान. जागृत देवस्थान असल्याप्रमाणे तिचे सर्व पूजाविधी आणि कर्मकांड पिढ्यानपिढ्या चालू आहेत. ह्या कुटुंबातली मुख्य वृद्ध स्त्री माताजी आहे. तिला मुलगा, सून आणि दोन नाती आहेत. त्यातली सुधा ही मुकी आहे. पण ते तिला कधी मुकी म्हणून दुय्यम वागणूक देत नाहीत. दुसऱ्यांनाही देऊ देत नाहीत. मुकी असली तरी खाणाखुणा करून आणि डोळे मिचकावून ती सगळ्यांशी अगदी सहज संवाद साधते. ह्या माताजींना आपल्या नातीची काळजी तशीच घरातल्या रामाला शोभेल अशी सीता पण हवी होती. अशी एक काळजी.

पुढे कर्मधर्म संयोगाने गावात एक शिल्पकार- जगदीश राहायला येतो. तो अशी जानकीची मूर्ती घडवायचं ठरवतो. त्याची सुधाशी सुद्धा ओळख होते. आणि जानकी अशीच - सुधासारखीच- असली पाहिजे हे मनोमन ठरवतो. सुधाच्या शालीन अबोल सहवासात तो तिच्या प्रेमात पडतो. पण सगळं लक्ष कामावर केंद्रित ठेवून. त्याच्या बरोबर शहरातून आलेली माणसे सुद्धा ह्या गावात रुळतात. आणि मूर्तीचं काम सुरू होतं.

ही मूर्ती घडेल का? त्यांची प्रेमकथा फुलेल का? 
हे सांगून मी रसभंग करत नाही.

काही पानं उदाहरणादाखल वाचा म्हणजे लेखकाच्या वर्णनशैलीची कल्पना येईल.

गावाचं, दाणी कुटुंबाचं आणि रामाच्या मूर्तीच्या महत्त्वाचं वर्णन



सुधाच्या आईला तिचे आणि शिल्पकार जगदीशची मैत्री आणि वाढणारी जवळीक आवडत नाही त्याविषयीचा प्रसंग


जानकीची मूर्ती घडवणं हे अलौकिक काम आहे असं माताजी जगदीशला सांगतात तो प्रसंग




कादंबरीची सुरुवात खूप आकर्षक झाली आहे. गावाचं, रामाचं त्याच्या भोवतीचं कर्मकांड ह्याचं खूप सविस्तर पण मोहक वर्णन आहे. जानकीची मूर्ती घडण्यामागे काहितरी रहस्य आहे असा पट उभा राहतो. पण जानकीची मूर्ती हा त्या माताजींचा ध्यास आहे तर आत्तापर्यंत त्यांनी मूर्ती घडवण्याचे काय प्रयत्न केले; ते अपयशी किंवा अपुरे ठरले का हे काहीच येत नाही. सुधा म्हणजे सुंदर, शालीन, सर्वगुणसंपन्न अशी एक साचेबद्ध नायिका. पण तिचे असे खास गुण दाखवणारे प्रसंग नाहीतच. ती आहे दैवी असं आपण स्वीकारायचं. जगदीश बरोबर आलेली पात्र आपलं घरदार सोडून तीनचार वर्ष इथेच राहतात. मध्येच कोणाला पूर्वजन्मीचं काहीतरी आठवतं. पण आजूबाजूचा कोणीही कुतूहल दाखवत नाही. हा काय प्रकार आहे ह्याबद्दल शोध घेत नाही. असं तर होतच असतं इतक्या सहजपणे तो बदल सगळे स्वीकारतात. मृत व्यक्ती स्वप्नांत येतांत. जणू ह्या सगळ्यांचा पूर्वजन्मीचा ऋणानुबंध आहे. पण हे सगळं रहस्य अखेरपर्यंत उलगडत नाही. त्यामुळे अशी अनेक कथासूत्र विस्कळीत आणि अर्धवट सोडलेली आहेत.

दोन व्यक्तींमधला संवाद असेल तेव्हा पात्रांची वाक्य आळीपाळीने दिली जातात. पण पुस्तकात एकाच पात्राची वाक्य वेगवेगळ्या ओळींवर तोडून तोडून दिली आहेत त्यामुळे वाचताना सारखा खडा लागल्यासारखं होतं. भाषा खूप पल्लेदार नाही साधीच आहे. आणि खास लक्षात राहतील अशी वाक्य, संवाद नाहीत. 

सुरुवात चांगली झाली. पण "जानकीची मूर्ती", "अलौकिक काम", "सुधा म्हणजे जणू जनकीच", "कधी पूर्ण होणार हे काम" हेच मुद्दे पुन्हा पुन्हा येऊन मध्यापासून
 ती रटाळ झाली आहे. शेवट काय होईल हा अंदाज सुरुवातीलाच येतो. त्यामुळे मी मधली पानं पटापट वाचली. पण ज्या "अलौकिक" किंवा "अतिमानवी" सृष्टीची सुरुवात लेखकाने केली तिला न्याय द्यायला, तिचं पूर्ण चित्र उभं करायला लेखक अपुरा पडला आहे. त्यामुळे एका प्रेमकथा+fantasy(कल्पनारम्यता) अशी छान सुरुवात असलेली कादंबरी. एक साचेबद्ध - उदात्त प्रेम वगैरे - दाखवणारी म्हणून उरते. त्यासाठी ४३० पानं खूपच झाली. शंभरेक पानांत पूर्ण संपवता आली असती. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...