संपूर्ण बाळकराम (Sampurna Balakram )




पुस्तक :- संपूर्ण बाळकराम (Sampurna Balakram )
लेखक :- राम गणेश गडकरी (Ram Ganesh Gadakari)
भाषा :-  
मराठी (Marathi)

मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार, विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांच्या विनोदी लेखांचा हा संग्रह आहे. गडकऱ्यांचं नाव सहित्यकारांत मानाचे आहेच तसेच "बाळकराम"ही प्रसिद्ध आहे, किमान सध्याची तरूण पिढी सोडल्यास मागील पिढ्यांमध्ये.  

"बाळकराम" य टोपण नावाने एका सवर्ण समाजातील मध्यमवर्गीय प्रौढाच्या भूमिकेतून हे लेख लिहिले आहेत. वेगवेगळ्या विषयांवर अतिशयोक्ती, विडंबन, उपमा यांचा आधार घेत छान विनोद साधले आहेत. 
लेखांचे विषय वेगवेगळे आहेत - मुलीचे लग्न जमवण्याची खटपट, खाण्याचे पदार्थ आणि खऱ्या आयुष्यातील प्रसंग, ओढूनताणून कविता करणाऱ्या कवींच्या तऱ्हा, नाटकाची फुकट तिकिटे मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग, पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यात घडणारे प्रकार ई.

सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा (१९०० च्या आसपासचा)समाज आपल्याला यात दिसतो. तेव्हाच्या हुंडा पद्धतीने वरपिता कसा गांजला जाई आणि वरपिता कसा आढ्यतापूर्वक वागे याची जाणीव आपल्याला होते. 
स्वातंत्र्यचळवळीतले वेगवेगळे प्रवाह आणि त्यातल्या हौश्या-नवश्यांचे प्रयत्न हे पण गडकऱ्यांच्या विनोदी शैलीतून आपल्याला दिसतात.

उदा. लग्नासाठी आपल्या मुलीचे स्थळ घेऊन गेलेल्या वधूपित्याबरोबर मुलाकडच्या मंडळींचे वर्णन करताना गडकरी लिहितात
या सुमारास प्रत्येक 'नवरबापा'चे मन म्हणजे थोरथोर ऐतिहासिक पुरुषांच्या गुणविशेषांचे प्रदर्शनच बनून जाते, असे म्हणण्यास हरकत नाही. महंमद गिजनीच्या धनलोभाने तो स्वार्थपरायण होतो, नेपोलियनच्या महत्त्वाकांक्षेने तो आपल्या मुलाकडे पाहतो, नाना फडणिसाच्या व्यवहारकौशल्याने तो मुलाची किंमत ठरवितो, शिवछत्रपतींच्या धाडसाने वाटेल त्या विजापुरकरावर तो त्या रकमेचा मारा करतो, आणि नादिरशहाच्या क्रूरपणाने ही रक्कम वसूल करून घेतो. त्या एकाच हृदयात रजपुतांचा शिपाईबाणा आणि मराठयांचा गनिमी कावा हे एकाच वेळी उचंबळत असतात. अष्टवसूंच्या अंशांपासून उत्पन्न झालेल्या भीष्माचार्याप्रमाणे, अनेक ऐतिहासिक पुरुषांचा हा मानसपुत्रही, मुलाचा अव्वाच्या सव्वा हुंडा घेण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो, आणि तितक्याच नेटाने ती तडीसही नेतो. स्वत: नवरामुलगा तर हरभर्‍याच्या झाडावर रात्रंदिवस मुक्काम करून 'बापसे बेटा सवाई' ही म्हण वाजवीपेक्षा फाजील खरी करून दाखवीत असतो. आपल्या अंगच्या लोकोत्तर गुणांनी अनेक म्हणींची नायिका होऊन बसलेली वरमाई तर- परंतु 'अनिर्वर्णनीयं नाम परकलत्रम्!'

तर नाटकाची फुकट तिकिटे मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग विनोदी शैलीने सांगताना तत्कालीन कॉंग्रेसच्या मवाळंच्या बोटचेप्या धोरणावर शालजोडीतील प्रहार करतात

स्वराज्याचा हक्क देणारे सरकार आणि नाटक पाहण्याची परवानगी देणारी नाटक मंडळी यांचे कितीतरी साधर्म्य आहे. स्वराज्याचा हक्क मागणाऱ्या लोकांचे त्यांच्या शक्तीप्रमाणे निरनिराळे भेद पाडता येतात. कमीपणापासून सुरुवात केली तर राष्ट्रसभेसारख्या लौकिक सभांच्याद्वारे मिठ्ठास भाषेचे अर्ज व विनंती करणारे राजकीय भिकारी पहिल्याने पुढे येतात. .. नाटकी मवाळांना स्वराज्याचा हक्क अर्थातच फार जपून मागावा लागतो. नाटकगृहात फारशी गर्दी नाही, मॅनेजरसाहेबांची मर्जी सुप्रसन्न आहे, वगैरे वगैरे गोष्टींची तरतूद लक्षात घेऊन हे नाटकी मवाळ आपल्या मागणीचा अर्ज अत्यंत नम्र भाषेने, परिणत अंगाने, हसतमुद्रेने मॅनेजरपुढे टाकतात. राजकीय मवाळांना सरकार एखादे वेळी स्थानिक स्वराज्य, कौन्सिलात मुकाटयाने बसण्याचा हक्क वगैरे फोलपटे देण्याची मेहेरबानी करते, त्याप्रमाणे नाटक सरकारसुध्दा आपल्या मवाळांना कधी 'पिट'मध्ये बसण्याचा, कधी पडदे ओढण्याच्या माडीत बसण्याचा, तर कधी दरवाजातच बसून खेळ पाहण्याचा हक्क देत असते. दरवाज्यावरील व्यवस्थापकांना माळयाकडून येणारे फुलांचे गजरे, चहावाल्याकडून मिळणारा चहा, विडीवाल्याने दिलेल्या पानाच्या पट्टया, या गोष्टी हिशेबात घेतल्या म्हणजे मवाळ लोकांकडून अधिकारी साहेबांना होणाऱ्या 'टी' पाटर्या, पानसुपाऱ्या यांची उणीव भरून येणार आहे. या नाटकी मवाळांची नम्र भाषा, कितीही वेळा हाकून दिले तरी पुन: पुन्हा येण्याचा लोचटपणा, कठीण शब्दांच्या मारालाही दाद न देणारा मोंडपणा, नाटक 'खलास' होण्याची वेळ झाली तरी चिकाटी धरून बसलेला आशावादीपणा या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे राष्ट्रीय सभेत बसल्याचा भास झाल्यावाचून राहात नाही. .."


हे पुस्तक विनोदी लेखांचे आहे ..पण.. १०० वर्षांपूर्वी हे पुस्तक जितके विनोदी वाटले असेल तितके आज वाटेलच असे नाही.
तेव्हा ज्या गोष्टी नवलाईच्या वाटायच्या त्या गोष्टींचं आता काही विशेष वाटत नाही तर त्या काळच्या काही रूढी आता अजिबात दिसत नाहीत.
तसंच सध्या आपली अभिरुची खूप बदलली आहे. कंबरेखालचे विनोद आणि आचरट अंगविक्षेप अशा विनोदांची सध्या चलती आहे. त्या तुलनेत हे विनोद खूपच सपक वाटतील. "या हसण्यासारखं काय आहे?" असंही बरेच वेळा वाटेल.
दुसरी गोष्ट म्हणजे भाषा. शंभर वर्षांत भाषा इतकी बदलली आहे की, गडकऱ्यांची भाषा ओघवती न वाटता फार बोजड, विनाकारण पल्लेदार वाटते. मराठी मातृभाषा, मराठी माध्यमातून शिक्षण आणि प्रमाण मराठीचं चांगलं ज्ञान असेल तरच हे पुस्तक पचनी पडेल. अन्यथा "इट्स ऑल ग्रीक टू मी" असं वाटल्यास नवल नाही. 
तिसरं म्हणजे अतिशयोक्ती ची अतिशयोक्ती बऱ्याच ठिकाणी झाली आहे. 

म्हणून हे पुस्तक वाचताना "चाला काहितरी खळखळून हसवणारे विनोदी वाचू",या भावनेने वाचायला न घेता त्यावेळचे साधे विनोद, त्यावेळचा समाज आणि आज झालेले बरेवाईट बदल हे समजण्यासाठी वाचले पाहिजे.

हे परीक्षण लिहित असतानाच मला समजले की गडकऱ्यांचे समग्र साहित्य ऑनलाईन उपलब्ध आहे. "संपूर्ण बाळकराम" आपण या दुव्यावर वाचू शकता
http://ramganeshgadkari.com/egadlari/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=103&Itemid=268

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- 
जवा ( जमल्यास वाचा )

------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. माझ्याकडे आहे हे पुस्तक. Review चांगला आहे

    ReplyDelete

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...