डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar)




पुस्तक :- डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar)
लेखक :- ना.ह.पालकर (N.H.Palkar)

भाषा :- मराठी (Marathi)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे हे चरित्र. 

रा.स्व. संघ ही अतिशय प्रसिद्ध संघटना आहे. ती जितकी लोकप्रिय आहे तितकीच तितकीच टीका झेलणारी ही आहे. विशेषतः सध्या संघापरिवारातील भा.ज.प. पक्षाचे पूर्ण बहुमतातील सरकार असल्याने रा.स्व.संघ हा बऱ्याच वेळा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळेच संघ काय आहे, त्याची सुरुवात का आणि कशी झाली, त्याचे स्वरूप कसे घडत गेले हे समजून घेणे औत्सुक्याचे ठरते. 

ना.ह.पालकरांसारख्या ज्येष्ठ स्वयंसेवक आणि समाजसेवकाने हे चरित्र लिहिले आहे तर दुसरे सरसंघचालक गोळवलकर श्रीगुरुजी यांची याला प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत गुरुजींनी या चरित्रलेखनामागचे लेखकाचे कष्ट विशद केले आहेत. डॉक्टारांची प्रसिद्धी परांगमुखता आणि क्रांतिकार्यातल्या सहभागामुळे स्वतःबद्दल पाळावी लागलेली गुप्तता ही त्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे संदर्भ कागदपत्रे आणि डॉक्टरांना भेटलेल्या व्यक्तींची भेट घेण्यासाठी लेखकाला खूप भटकंती आणि प्रचंड मेहनत करावी लागली आहे. 

कुठल्याही इतर चरीत्रानुरूप चरित्रानायकाचा अर्थात डॉक्टरांचा पूर्ण जीवनक्रम -बालपण, जडणघडण, कार्य, विशेष घडामोडी , समस्या आणि जीवनाखेर - यात मांडला आहे. संदर्भासाठी डॉक्टरांचा पत्रव्यवहार, तत्कालीन वृत्तपत्रांतले लेख, भाषणाची प्रतिवृत्ते, लोकांनी सांगितलेल्या आठवणी या सगळ्याचा समावेश आणि उल्लेख यात असल्याने हे चरित्र एक महत्त्वाचा दस्तैवज ठरतो. 
लेखकाची शैली साधी, सरळ, पल्लेदार वाक्य टाळणारी आहे. तसंच नुसते प्रसंगामागून प्रसंग न सांगता लेखकाने वेगवेगळ्या घटनांमध्ये दिसणारी डॉक्टरांची स्वभाववैशिष्ट्ये आणखीन उलगडून दाखवली आहेत. त्यामुळे लेखक आपल्यालाशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे असा भास होतो. चरित्र वाचन त्यामुळे नीरस होत नाही. 

संघावरचा एक आक्षेप असतो की संघाने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला नाही. संघ कॉंग्रेसविरोधी आहे. पण प्रत्यक्ष डॉक्टर तेव्हाच्या कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते होते, तत्कालीन मध्यप्रांतातले एक लोकप्रिय पदाधिकारी होते. इतकंच काय त्यांनी स्वतः क्रांतिकार्यातही भाग घेतला होता ही बाब अनेकांना माहीत नसेल. जी या चरित्रातून नीट समजते. 
डॉक्टरांनी कॉंग्रेस अंतर्गतच एक स्वयंसेवक दल उभारायचा व त्याला लष्करी पद्धतीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. पण तत्कालीन अहिंसेच्या बाजूला असणाऱ्यांना ही बाब फारच हिंसक वाटल्यामुळे ते शक्य झाले नाही. 
संघ स्थापनेनंतरही त्यांनी कायदेभंग चळवळीशी संबंधित जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला होता. तुरुंगवास भोगला होता.

तेव्हा मध्यप्रांतात आणि देशभर वारंवार मुस्लीम-हिंदू दंगली होत असत. मुस्लीम समाजातील समाजकंटक प्रवृत्ती वाद उकरून हिंदू समाजाला त्रास देण्याचा, खिजवण्याचा प्रयत्न करत असत. ब्रिटिश सरकारचे त्याला छुपे अनुमोदनच असे. असंघटीत आणि अंतर्गत भेदाभेदांनी ग्रस्त हिंदू समाज या दंडेलशाही ला प्रत्युत्तर द्यायला कमी पडत असे. बहुसंख्य असूनही भीतीच्या सावटात वावरण्याची वेळ हिंदू समाजावर येत होती. याची अनेक उदाहरणं या चरीत्रात आढळतील. यावेळी डॉक्टरांनी हिंदू समाजाला कसा धीर दिला, एकत्र केले, तात्पुरत्या संरक्षणाची व्यवस्था निर्माण केली आणि प्रसंगी स्वतः वरच्या जीवघेण्या हल्ल्याची पर्वा न करता पुढे होऊन नेतृत्त्व केले.
संघ स्थापनेमागची कारणे समजण्यासाठी ही तत्कालीक परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे ठरते. 

संघाचे बीजारोपण झाल्यावर डॉक्टरांच्या अविश्रांत परीश्रमाला सीमाच राहिली नाही. डॉक्टरांची गुणग्राहकता, व्यक्तीची पारख, लोकसंग्रह हे गुण उजळून दिसतात. डॉक्टरांनी केवळ संघटनेसाठी लोकांची मनं जिंकण्यासाठी आणि मनं राखण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या तब्येतीची काळजीही केली नाही. आणि मदतीला, प्रत्यक्ष सहभागाला कधी कांकू केली नाही. चरीत्रात हे प्रसंग वारंवार आढळतील. 

त्यावेळी संघ प्रचारासाठी सिंध, लाहोर, मुलतान पर्यंत त्यांचे दौरे होत असत. आणि आत्ता पाकिस्तानात गेलेल्या भागातही संघ शाखांची सुरुवात झाली होती. संघाची प्रार्थना आणि आज्ञा आधी मराठी व संस्कृत अशा मिश्र होत्या. पण संघ मराठी मुलुखाबाहेर पसरू लागल्यावर त्या सगळ्यांना सन्मान्य होतील अशा पद्धतीने संस्कृत मध्ये करण्यात आल्या.

भागानगर (हैद्राबाद) मध्ये तेव्हा सुरू असलेल्या मुस्लिम अतिरेकाविरुद्धच्या लढ्यात संघाने भाग घेतला नव्हता. पण असंख्य स्वयंसेवकांनी त्यात भाग घेतला होता. संघाच्या हिन्दुत्त्ववादी विचारांनी संस्कारीत होऊनच ते सहभागी झाले होते. पण तरीही संघ त्यात उतरला नाही. संघ प्रत्यक्ष आंदोलनात न उतरल्याची अशी अजूनही काही उदाहरणं आहेत. प्रत्येकवेळी संघाला जबरदस्त टीकेला तोंड द्यावं लागलं. यावेळी डॉक्टरांच्या "संघशः सहभाग" आणि "व्यक्तिशः सहभाग" या कल्पनांची ओळखही आपल्याला होते. संघाचे काम हे दीर्घकाळ चालणारे, अनेक पिढ्या घडवण्याचे आहे. हे "नित्य" काम आहे तर अशी आंदोलने ही "नैमित्तिक" कामं आहेत. नैमित्तिक कामांमध्ये सुसंस्कारीत स्व्ययंसेवक सहभाग घेतल्याशिवाय राहणारच नाहीत. पण "नैमित्तिक" कामाच्या गोंधळात "नित्य" कामावर परीणाम होऊ नये या साठी "संघशः सहभाग" आणि "व्यक्तिशः सहभाग" हा भेद ठेवण्याची डॉक्टरांची दीर्घकालीन दृष्टी होती. संघ विरोधकांनाही वादात हरवून त्यांना दुरावण्यपेक्षा त्यांची टीका सहन करून, प्रत्यक्ष वाढलेल्या कामातूनच त्यांना उत्तर द्यायचे असा त्यांचा स्वभाव होता. 

या चरित्रात आपल्या डोळ्यासमोर हेडगेवार-गांधीजी, हेडगेवार-सुभाषबाबू, हेडगेवार-सावरकर बंधू (तात्याराव, बाबाराव),हेडगेवार-लोकनायक अणे, हेडगेवार-श्यामाप्रसाद मुखर्जी ई. अनेक महानायकांच्या भेटी, पत्रव्यवहार, विचारविनिमय असे ऐतिहासिक प्रसंग आपल्यासमोर उभे राहतात. 

पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात लेखकाने डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचा ऊहापोह केला आहे. डॉक्टरांची कौटुंबिक गरीबी असूनही इतरांसाठी सतत देता हात, मित्र जोडण्याची हातोटी, राजकीय विरोधकांशीही सौहार्दाचे संबंध, समोरच्याला न दुखावता त्याची चूक त्याला समजवून देण्याचे कसब, थट्टामस्करी करत वातावरण हलकेफुलके ठेवण्याचा कसब, हिन्दुत्त्वावरील अविचल निष्ठा, कमालीचा स्वार्थत्याग असे असंख्य पैलू ! 
या पाचशे पानी पुस्तकात हेडगेवारांची दुर्मिळ छायाचित्रेही आहेत.

म्हणूनच संघाच्या स्वयंसेवकांनी, संघाशी जवळीक असणाऱ्यांनी आणि संघाच्या कट्टर विरोधकांनीही हे चरित्र अवश्य वाचलेच पाहिजे. संघाविशयी असलेले काही गैरसमज दूर व्ह्यायला मदत होईल तर काही समज अधिक द्रुढ होतील. या महत्त्वाच्या संघटनेचे आणि तिच्या जनकाचे केवळ अज्ञाना पोटी लंगडे समर्थन किंवा विरोध दोन्ही टाळण्यासाठी हे चरित्र वाचाच.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...