भावगंध (Bhavagandh)




पुस्तक :-भावगंध (Bhavagandh)
भाषा :- मराठी(Marathi)
लेखक :- पु.ल.देशपांडे (P.L. Deshpande)


महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांचं "भावगंध" हे पुस्तक नुकतंच वाचलं. पु.लंनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणपरत्वे लिहिलेल्या लेखांचा समावेश या पुस्तकात आहे. ज्यांनी पुलंचं फक्त विनोदी लिखाणच वाचलं आहे अशा नवख्या वाचकांना हे जाणवेल की पु.ल. फक्त विनोदी लेखक नव्हते तर अतिशय गंभीर विषयांवर चिंतनात्मक लेखनसुद्धा ते करत. ही चिंतनाची बैठक, चांगल्याची आवड आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा निर्भेळपणा हीच त्यांच्या खुसखुशीत विनोदामागची ताकद आहे. 

या लेखांमधले बरेच लेख हे एकेका व्यक्तीबद्दल लिहिलेले आहेत - कोणाला श्रद्धांजली वाहताना तर कोणाच्या सत्काराप्रित्यर्थ. उदा.  गदिमांविषयी "लोकशाहीर माडगुळकर" , निळू लिमये यांच्याविषयी "आपले निळूभाऊ", ज्येष्ठ नर्तिका रोहिणी भाटेंबद्दल "बेबी भाटे आणि तिचे वेड", बाबूजी-गदिमा जोडीबद्दल "स्वरदाता सुखीभव","मोठा कलावंत" - जितेंद्र अभिषेकी, गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर "गोयकरी वैशिष्ट्याचे मनोज्ञ व्यक्तिमत्त्व","गाणं ऐकणारा ऑडिटर" - श्रीराम पुजारी, "हरण्याचा हक्क" - अरविंद देशपांडे, "जीवनाध्वरी पडे आज पूर्णाहुती"- आचार्य अत्रे इ.

पुलं स्वतः या सर्वांच्या सहवासत आले होते. या लेखांमधून पुलंनी त्यांच्या या व्यक्तींसमवेतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. तसंच या मतब्बरांच्या व्यक्तिमत्त्वांचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवले आहेत.
रुग्णसेवेचं, रक्तदानाबद्दल  जागृती करण्याचं व्रत मनोभावे पाळाणाऱ्या लीलाबाई मुळगावकरांबद्दल ते लिहितात "लीलाबाईंनी ही सारी कंटाळवाणी कामं तितक्याच आस्थेने केली. मनात व्रताची भावना असली, तर दैनंदिन कंटाळवाण्या कामंतूनही आनंदच मिळतो. रोजची स्वयंपाकाची भांडी देखील पूजेची उपकरणी घासल्याच्या भावनेने घासणऱ्या आज्यापणज्या संसारदेखील व्रत म्हणून करीत असत आणि आनंदाचे मळे फुलवीत. व्रताचा फायदा एकच. व्रत केल्याचा आनंद....
लीलाबाईंचा नाईलाजच आहे, आपल्या गोजिरवाण्या नातीला खेळवताना औषधावाचून तडफडणारे नाती-नातू त्यांना दिसतात. ते स्मरण त्यांना केवळ सुखात रमू देत नाही. हादेखील एक रक्तदोषच आहे"

लेखांचे विषय गंभीर असले तरी त्यांची लेखनशैली हलकीफुलकी सहज गप्पा मारल्यासारखी आहे. त्यामुळे लेख वाचताना खूप मजाही येते आणि मौलिक माहिती, विचारही मिळतात. संगीत शिक्षणाबद्दल एका लेखात ते म्हणतात "रागाची ओळख नोटेशनने करून दिल्यामुळे रागाचे स्वरूप नीट ध्यानातच येत नाही. घोड्याची व्याख्या जर ’मागे पुच्छ विशाल ज्यास असुनी  ते सारखे हालते’ अशी केली आणि घोडा आणि श्वान यांच्यात गल्लत झाली तर दोष कुणाचा ?... रागाचा साक्षात्कार व्हावा लागतो. प्रत्येक रागाला निराळा भावबंध आहे. केवळ हा स्वर वर्ज्य आणि तो स्वर वादी एवढ्यावरून राग समजला असता, तर रेल्वेचं टाईमटेबल वाचून तीर्थयात्रा घडल्याचा आनंद मिळवता आला असता ..."

गंभीर लेखन कंटाळवाणं असण्याची गरज नाही हे कदाचित ते अत्र्यांकडून शिकले असावेत. कारण त्यांच्या बद्दल ते लिहितात "व्याख्यानाला तासन्‌ तास हसत राहणरा श्रोतृसमुदाय ही महाराष्ट्रातल्या जीवनातील अत्र्यंची निर्मिती आहे. त्यापूर्वीची व्याख्याने म्हणजे एक तर देशभक्तीपर उपदेश किंवा सार्वजनिक काडेचिराईत प्राशन असे. अत्र्यांनी "व्याख्यान" नामक गोष्टीचा बाजच बदलला. हसतखेळत हे फक्त पोरांनाच नव्हे तर थोरांनाही शिकवावे लागते हे शिक्षणाचे महान सूत्र या जन्मजात शिक्षकाने दाखवून दिले. त्यांच्यातल्या असामान्य विनोदबुद्धीने खरे पांडित्य आणि नुसतीच पगडी ह्यातला फरक लोकांना त्या काळी दाखवला".

पुलंना माणसं प्रिय होती आणि त्यांचातल्या दोषांपेक्षा त्यांच्या गुणांवर ते अधिक प्रेम करत होते, त्याला अधिक गौरवित करत होते. त्यामुळेच हे सर्व लेख वक्ती"गौरव" पर आहेत. या व्यक्तींच्या चुकांबद्दल, अप्रिय बाजू बद्दल ते ओझरता उल्लेख करून जातात. किंवा त्या नकारात्मक गोष्टीही सकारत्मक रितीने बघतात. अत्र्यांबद्दल ते लिहितात - "त्यांनी अनेक मित्र जोडले आणि शत्रूही केले. आत्यंतिकता हा स्थायिभाव दोषास्पद खरा, पण केवळ दोषास्पद नव्हे! ह्या रानफुलांचा रंगही भडकच होता, पण वास नाजूक होता. अत्र्यांचा हा रासवटपणा अनेकांच्या अंगचोरपणापेक्षा सुसह्य होता. शेवटी अत्रेही माणूसच होते. धिप्पाड व्यक्तिमत्त्वाच्या चुकाही धिप्पाड".

"मुंबईनी काय दिलं- व्यापक दृष्टी दिली" या लेखात त्यांच्या वेळच्या मुंबईबद्दल लिहिलं आहे. त्यांच्या लहानपणी मुंबई किती रमाणीय होती आणि पर्ल्यासारखं उपनगर इतकं हिरवंगार होतं, शेतमळे असणारं होतं हे वाचून आज आश्चर्यच वाटतं.

"प्रत्येक ’चिंधी’नी मला खूप काही दिलं" या लेखात चित्रपट व्यवसायात आलेल्या बऱ्यावाईट अनुभवाबद्दल आपलं मन मोकळं केलं आहे. ते लिहितात "..पण चित्रपटांच्या आर्थिक बाजूचा माझा अनुभव फार वाईट निघाला. प्रत्येक चित्रपटात किती मिळाले या पेक्षा किती बुडाले त्याची संख्या जास्त असायची. मला कोणी विचारले कि,"तुम्ही चित्रपट का सोडला" तर मी सांगतो की, "मी नाही सोडला; चित्रपटधंद्यानं मला सोडलं. मला त्यात राहणं शयच नव्हतं." 'गुळाचा गणपती'चं लेखन, दिग्दर्शन, त्यातल्या भूमिका, संगीत हे सगळं मी केलं,त्यासाठी एकही पैसा मला मिळाला नाही".

या पुस्तकात पुलंच्या दोन तीन लघुकथाही आहेत. पुलंचं साहित्य हे बहुतेकसं "काल्पनिक" नसतं. "असा मी असा मी" असो किंवा "व्यक्ती आणि वल्ली" यांना "काल्पनिक कथा"-फिक्शन म्हणावसं वाटत नाही. खऱ्याच घटना नावं बदलून आपल्यापुढे येतात असं वाटतं. म्हणून पुलंच्या "कथा" वाचताना अप्रूप वाटलं. कथांचे विषय पुलंच्या आवडीचे, जिव्हाळ्याचे आहेत - संगीत, नाटक. संगीतातल्या बुजुर्गाची व्यथा मांडणारी "उरलेला घास"ही गोष्ट आहे. नाटकातल्या पैसा-प्रसिद्धीच्या मागे येणारी व्यसनाधीनता कशी लाचार बनवते याचं चित्रण "राघव आणि तारका स्वर्गीच्या"त आहे. अनेक वर्षं नाटककंपनीत कपडेपड सांभाळणऱ्या एका म्हाताऱ्या सेवकाची नाटक कंपनी बंद होताना, विशेषतः ज्या कपड्यांना जिवापाड जपलं त्यांची होऊ घातलेली हेळसांड बघून होणारी तगमग "शेवटचा प्रयोग" या कथेत आहेत. अशाच अजून दोन-तीन कथा आहेत.

१९४८ साली पुलंनी लिहिलेले "संगीत बिचारे सौभद्र" हे लहानसे विडंबनपर नाटक पण पुस्तकात आहे. संगीत नाटक न पाहिलेल्या आणि न झेपणऱ्या मला या विडंबनाशी तितकसं "रिलेट" करता आलं नाही म्हणून हे नाटकुलं तितकसं मजेशीर वाटलं नाही.

पु.ल. राहत असलेल्या वरळी भागात भिन्न मातृभाषा असणरी मुलं तिथल्या मैदानात ज्या "इंग्लिश" भाषेत बोलत त्या भाषेत पुलंनी त्यांच्या नात्यातल्या एका लहान मुलीला १०वी उत्तीर्ण झाल्याबद्दल लिहिलेलं पत्र खूपच गमतीदार आहे. पुलंची भाषा-बोली उचलण्याची प्रतिभा (जी "म्हैस" कथेतून दिसते) ती इथेही जाणवते. आणि मुलात मूल होऊन त्याला लिहिताना त्यांच्यातलं खोडकर मूलही सारखं बाहेर डोकावतं. उदा. "All you Thakur-lok Mathswala you see. Dadarwala Bhaikaka get 90%, Mohankaka  91%, your father 92%. Chandukaka lost his 93% by only 60% but now he is highest because always in the airplane. What good joke no? ...
Umesh as you know has joined Indian Air force. When sardarji join Air Force it is Hair Force and when Umesh joins Air Force it is Air Farce...."

तर पुस्तकाचं नाव आणि लेखक सांगितल्यावर "पुस्तक नक्की वाचा" हे वेगळं सांगायची गरज नाहीच. तरीही इतकं लिहिलंय म्हणून एक "फॉर्मलिटी" म्हणून सांगतो पुस्तक आवर्जून वाचा



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...