माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)




पुस्तक :- माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)
भाषा :- मराठी (Marathi)
लेखक :- जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni) 


जी.ए. कुलकर्णी हे मराठी साहित्यविश्वातील मान्यवर नाव. जी.एंच्या निधनापश्चात प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे. यात जी.एंनी त्यांच्या लहानपणी त्यांचा ज्यांच्याशी संबंध आला अशा व्यक्तींचं व्यक्तिचित्रण रेखाटलं आहे. 
(पण या त्यांच्या खऱ्या आठवणी आहेत का लेखक एका काल्पनिक निवेदकाच्या भूमिकेत आहे हे कळत नाही.)
पुस्तकात त्यांचे शाळा मास्तर, शाळू सोबती, आजोबा, आजोबांचे मित्र, स्थानिक जहागिरदार, गावातल्या काही व्यक्ती इ. आपल्याला भेटतात. काही चिल्लर काही आरभाट. 

पुस्तकात लेखकानेच लिहिले आहे की - "आरभाट हा एक गुणी कानडी शब्द आहे. आरभाट म्हणजे खानदानी, भव्य, थाटामाटाचा. जेवण कसे होते? आरभाट, मन्सूरांचे गाणे कसे झाले? आरभाट, हृशिकेशला गंगा कशी आहे, तर आरभाट"

पुस्तकात प्रत्येक व्यक्तीवर स्वतंत्र कथा/लघुनिबंध नाहीत तर पूर्ण पुस्तक हेच एक सलग वर्णन आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीने आपल्या लहानपणच्या आठवणी गप्पा मारताना सांगाव्यात तसा एकूण निवेदनाचा बाज आहे. बोलण्याच्या/लिहिण्याच्या ओघात जशी माणसं आठवतात, जे प्रसंग येतात तसे ते आपल्याला सांगत जातात. कधी एखाद्या व्यक्तीवर काही ओळीच येतात तर काही व्यक्तींची भेट प्रसंगोपात पुन्हा पुन्हा होते आणि त्यांचं व्यक्तीचित्र जास्त स्पष्ट होतं. 

उदा. दातार मास्तर - नेमस्त स्वभाव, गडकऱ्यांच्या साहित्यावर मनापासून प्रेम करणारे, क्रिकेटमधल्या सी.के. नायडूंचे भक्त, गरीबीतही तत्त्वांशी तडजोड न करणारे - असे पैलू आपल्याला दिसतात. 

तर दुसरं व्यक्तिचित्र म्हणजे विट्ठल याचं. हा विठ्ठल लेखकाच्या आजोबांच्या मित्राकडे आश्रित म्हणून राहणारा मुलगा. मित्राचं निधन झाल्यावर पुन्हा एकदा निराश्रित होतो. आश्रयदात्याने ठेवालेली पुंजी घेऊन जगण्यासाठी शहरात येतो, पडेल ती कामं करतो, डॉक्टर होतो पण परिस्थितीशी झगडा संपत नाही. अनेक वर्षांनी तो लेखकाला पुन्हा भेटतो आणि लेखकाने गाव सोडल्यानंतर गावात कायकाय घाडलं, दातार मास्तरांच्या आणि विठ्ठलच्या आयुष्यात कायकाय घाडलं ते समजतं.

दातार मास्तर, विठ्ठल या दोन व्यक्ती सोडल्या तर बाकी व्यक्ती खास लक्षात राहत नाहीत. बहुतेक जीएंनाही बाकी व्यक्ती "चिल्लर" वर्गवारीत टाकलं असावं. वेगवेगळ्या मास्तरांच्या लकबी, शिकवण्याच्या-मारण्याच्या-ओरडण्याच्या पद्धती; शाळूसोबत्यांच्या खोड्यांचे किस्से मजेदार आहेत. मनोरंजक आहेत. 
पुस्तकातील वर्णनाप्रमाणे लेखकाचे लहानपण चांगलं, सुखासमाधानात गेल्यासारखं वाटतं पण लेखक मात्र मोठेपणच्या आठवणी सांगताना गावापासून दूर जायचा, तिथल्या व्यक्तींपासून संबंध विसरायच्या प्रयत्नात दिसतो. जणू काही त्याला आयुष्यातला एखादा कटू/अपमानास्पद कालखंड विसरायचा आहे. ते का? हे समजत नाही. विचित्र वाटतं.

शेवटची साताठ पाने लेखकाने परमेश्वर, नियती, माणसाचे अपूर्णत्त्व इ. वर मुक्त चिंतन आहे. त्यातली काहीकाही वाक्ये फार छान आहेत.
"सत्याचा नेहमी विजय होतो- आज ना उद्या ! हे सूत्र कधीच खोटे ठरवता येत नाही, कारण त्यातील मेख अशी आहे ती आज ना उद्या या शब्दांत ! माणसाचे आयुष्य टिचभर आणि काळ अनंत आहे. शतकानुशतके गेली तरी पुन्हा कोडगेपणाने हसत ’आज ना उद्या’ असे म्हणत स्वतःचा आब राखता येतो. पण तेवढ्यात सत्याच्या विजयाची आशाळभूतपणे वाट पाहणऱ्या माणासाची माती देखील नष्ठ होऊन जाते आणि तो सत्याचा विजय पराभवापलीकडे गेलेला आसतो. हे म्हाणजे एखाद्या दरिद्री माणसाच्या हातावर कागदाचा तुकडा ठेवून त्यावर यावर लिहिलेली प्रचंड रक्कम दोनशे लक्ष वर्षे आठ महिने एकोणतीस दिवसांनंतर मिळून तुझे दारिद्र्य नष्ट होईल" असे सांगण्यासारखे आहे"

"उपरवाले के घर में देर है, लेकिन अंधेर नही" वा, काय सुरेख अनुप्रास जोडले आहेत! पण देर तरी का असावा? ते घर म्हणजे आम्ही रोज पाहतो तसली एखादी कचेरी आहे की काय ? अंधार नाही , प्रकाश आहे का? चंगली गोष्ट आहे. पण केवळ दिवे जळत आहेत म्हणून काम चालू आहे असा अर्थ होत नाही."

विचारंचं प्रचंड वादळ त्याच्या डोक्यात उठलं आहे आहे आणि त्या वादळात, कल्लोळात लेखक भराभर शब्द उतरवत गेला आहे असं वाटतं असे तुटक तुटक परिच्छेद आहेत.

एकूण जी.एंचं पुस्तक म्हणून ज्या अपेक्षेने मी पुस्तक वाचायला घेतलं तितकं ते "अरभाट" वाटलं नाही पण वाचनातून "चिल्लर" विरंगुळा-टाईमपासच झाला.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. Aapli Vathinavathi Darjya Dileli Pustak Parikshane ithe Devun Aapan Kay Sadhya Karta Aaaht ? Phukat Lekhakachi aani Aapli Swata:chi Karit Aahat Ase Aapnas Nahika Vatat ?

    ReplyDelete
    Replies
    1. पुस्तक वाचले की ते कसे वाटले हे मला सांगवेसे वाटते. मला ते वाठीनावाठी वाटले तरी दुसऱ्याला ते "आवर्जून वाचावे" असे वाटू शकते. म्हणून पुस्तकाची ओळख इतरांना करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

      Delete

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...