मुळारंभ (mularambh)






पुस्तक :- मुळारंभ  (mularambh)
लेखक :- डॉ. आशुतोष जावडेकर  (Dr. Ashutosh Javadekar) 
भाषा :- मराठी (Marathi)

"कॉलेजचे दिवस" म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ? कुणाच्या डोळ्यासमोर खूप अभ्यास, कंटाळवाणी सबमिशन्स येतील; कुणा गरीब विद्यार्थ्याला परिस्थितीशी झगडत-नोकरी करत पूर्ण केलेलं शिक्षण आठवेल; कुणाला मित्र मंडळींबरोबर केलेली धमाल आठवेल, कुणाला पहिलं वहिलं प्रेम आठवेल; कुणाला व्यसनाची पहिली ओळख आठवेल. बहुतांश बॉलीवूड चित्रपटांमध्ये कॉलेज म्हणजे "रोमिओ-ज्युलियेट"चा अभ्यास आणि स्वतः "रोमिओ-ज्युलियेट" बनणं. साधारण याच पठडीतलं कॉलेजलईफ चितारणारं हे पुस्तक आहे. 

ओम जोशी हा सुखवस्तू, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरातला मुलगा. अभ्यासू, समंजस, विचारी आणि विचारांत रमणारा. तो डेंटल कॉलेजला जातो आणि "कॉलेज लाईफ"शी त्याची ओळख होते. रॅगिंगचा अनुभव त्याला येतो आणि त्यापासून दूर पळायचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे सुरुवातीला एकटा एकटा राहणरा ओम हळूहळू इतरांच्यात मिसळायला लागतो. तो अणि दुसऱ्या राज्यातून आलेले सहाध्यायी असा पाच सहा जणांचा ग्रूप जमतो. मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. पहिल्यावहिल्या चुंबनाची हुरहूर अनुभवण्या पर्यंत जवळीक होते.

मित्रांमित्रांमध्ये पण गप्पा-गोष्टी, थट्टामस्करी तर कधी गैरसमजातून दुरावा निर्माण होतो आणि हा ग्रूप तुटतोय की काय असं वाटू लागतं. पण सगळे एकमेकांना समजून घेतात, पुन्हा एकत्र येतात. कॉलेज फंक्शनच्या स्पर्धा, चॉकलेट डे सारखे दिवस ही एन्जॉय करतात.

या सगळ्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीला सबमिशनचं टेन्शन, प्रॅक्टिकल्सची धावपळ, परीक्षेच्या तयारीचं ओझं,शिक्षकांचे वेगवेगळे नमुने हे सुद्धा सगळं त्यात आहे.

थोडक्या कॉलेज म्हाटल्यावर जे आपण अनुभवलं आहे किंवा इतरांचे अनुभव ऐकले असतील ते बरचसं या पुस्तकात येतं. आणि फक्त प्रसंगच नाहीत तर त्या पात्रांच्या मनातले विचार पण आपल्या समोर येतात. कधी प्रगल्भ विचार करणारे तर कधी भावनातिरेक. हाडामासाच्या माणसांमध्ये दिसणारे सगळे गुण. आपण प्रेमात आहोत की नाही आपलं खरं नातं काय याची ओम आणि त्याच्या मैत्रिणीच्या मनातली चलबिचल, त्यांच्या हे घरच्यांना जाणवल्यावर त्यांची संयत, काळजीवाहू प्रतिक्रिया .

त्यामुळेच ही कादंबरी हिन्दी चित्रपटापेक्षा जास्त वास्तवाच्या जवळ जाणारी आहे; तरीही रुक्ष किंवा उदासवाणी नाही. ताजीतवानी आणि वाचकाला ताजीतवानी करणारी छान विरंगुळा कादंबरी आहे. हलकंफुलकं वाचायचं असेल तेव्हा वाचायला छान आहे.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025)

पुस्तक - हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025) संकल्पना व प्रकाशक - पुंडलिक पै. पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवली (Pundalik Pai. F...