पुस्तक :- लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०१६) Lokamat Deepotsav Diwali edition 2016
पृष्ठ संख्या :- २५६
किंमत :- रु. २००/-
पुस्तक परीक्षणाच्या ब्लॉग मध्ये दिवाळी अंकाचं परीक्षण कसं आलं असं तुम्हाला वाटू शकेल. पण हा दिवाळी अंक चांगला मोठा २५६ पानांचा आहे. त्यातली शंभर जाहिरातींची सोडली तरी हे दीडेकशे पानांचं पुस्तक - लेखसंग्रहच आहे. म्हणूनच या अंकाचं हे परीक्षण या ब्लॉगवर टाकत आहे.
या अंकात कुठले लेख आहेत ते वर दिलेल्या अनुक्रमणिकेत दिसतंय पण नावावरून लेखाचा विषय लक्षात येईलच असं नाही. म्हणून या लेखांबद्दल थोडंसं.
हे लेख एखाद-दोन पानी छोटे लेख नाहीत तर सात-आठ पानांपासून पंचवीस-तीस पानी दीर्घ लेख आहेत.
"एनएच ४४" हा सगळ्यात मोठा आणि विशेष लेख आहे. लोकमतच्या टीमने एका गाडीने कन्याकुमारीपासून श्रीनगर पर्यंत राष्ट्रीय महामार्ग एनएच ४४ ने ३७४५ किमी चा प्रवास केला. ३५ दिवस ३५ रात्री. या भारत भ्रमणात त्यांना जसा भारत दिसला, जाणवला ते ते अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. ते वाचताना जणू आपणही त्यांच्या बरोबर प्रवास करतो. भारताच्या विविधतेचा अनुभव घेतो. किती तरी वेगवेगळी माणसं भेटतात. स्वतःच्या जगण्याला आकार देण्यासाठी धाडपडणारी, गरीबी झेलणारी, शहरी करणाचे फायदे-तोटे भोगणारी... रस्ता पुढे जातो तशी राज्यं बदलतात, हवा बदलते, भाषा बदलते, विचार करण्याची पद्धत बदलते. दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडे जाताना हा बदल जाणावतो विकास-आधुनिकता-व्यक्तीगतप्रगती यात होणारी कमी जाणवते. काश्मीर मध्ये तर सध्याच्या धुमसत्या परीस्थितीत या कलंदरांना कर्फ्यू, दगडफेक, भारतविरोधी घोषणा, पॅलेट गन्स हे सगळं अनुभवायला मिळतं. आणि त्यांच्या लेखातून आपल्यालाही.
इतकं वाचल्यावरच या दीर्घलेखासाठी तुम्ही दिवाळी अंकावर उडी घेणार हे निश्चित. पण इथेच या अंकातला वाचनीय भाग सपंत नाही. अजून बरंच काही वाचायचंय तुम्हाला.
रतन टाटा यांनी भारतात रुजू पाहणाऱ्या स्टार्टप कंपनी संस्कृती बद्दल त्यांची मतं आणि भावना एका लेखात मांडल्या आहेत.फेसबुक निर्माता आणि अतिश्रीमंत अशा मार्क झुकेर्बर्गची पत्नी प्रिसिला चान-झुकेर्बर्ग हिचा एक लेख आहे. तिचं आयुष्य आणि ती मार्कसह काय समाजपयोगी कामं करत्ये या बद्दलचा हा लेख आहे. तिचं कुटुंब हे चिनी निर्वासित कुटुंब. त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. अशा कुटंबात जन्म घेऊन वाढताना केलेला संघर्ष, मार्कशी ओळख आणि संबंध, स्वतःचा विकास आणि गरीब समाजातल्या (हो अमेरिकेतही गरीबी, झोपडी, गलिच्छ वस्ती आहे) मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचं कार्य याबद्दल माहिती आहे.
"कांझा जावेद" या पाकिस्तानी लेखिकेने पाकिस्तानी मुलांच्या मनात भारता बद्दल काय भावना आहेत - तिरस्कार, द्वेश भीती - आणि त्या कशा निर्माण होतात; निर्माण केल्या जातात हे मांडणारा लेख लिहिला आहे. तर "टेकचंद सोनावणे" यांनी त्यांना दिसलेला चीन आपल्याला दखवला आहे. पत्रकारितेनिमित्त ते चीन मध्ये राहत असल्यामुळे त्यांना अतिशय जवळून चीन बघता आला आहे. चिनीची शिस्त, आदरातिथ्य, प्रगती, समाजावरची नियंत्रणे, एक-मूल-योजनेचे दुष्परिणाम त्यांना जाणवले. चीनी माणसांमध्ये भारतीय कुटुंबव्यवस्था, चित्रपट, पेहराव या बद्दल आकर्षण आहे. पण भारतातला भ्रष्टाचार, स्त्रीयांवरचे अत्याचार यामुळे एक अढीही आहे. चीनमधल्या नियंत्रित लोकशाहीमुळे त्यांना भारतातली आंदोलने म्हणजे अराजकता वाटते. असे चिनी प्रगतीचे, विचार पद्धतीचे आणि भारताबद्दलच्या मतांचे वेगवेगळे पदर आपल्याला वाचायला मिळतील.
"फिक्सर्स" हा देखील वेगळाच, एका आगळ्या वेगळ्या पेशाबद्दल माहिती सांगणारा लेख आहे. अनेक परदेशी प्रवासी मुंबईत येतात. त्यांना नेहमीचं पर्यटन करायचं नसतं. त्यांच्या वाटा जरा अनपेक्षितच असतात. मुन्नाभाई मध्ये दाखवलंय तसं - "पुअर पीपल हंग्री पीपल" बघायचे असतात. धारावी बघायची असते, इथला वेश्या व्यवसाय बघायचा असतो. कुणाला इथलं रस्त्यावरचं खाद्यजीवन अनुभवायचं असतं. या पर्यटकांसारखे हल्ली हॉलिवूडचे निर्माते-दिग्दर्शकही शूटिंगसाठी इथे येतात आपल्या अनोख्या कल्पना घेऊन. या सगळ्यांच्या या गरजा पूर्ण करण्याचं काम असतं मुंबईतल्या काही हरहुन्नरी तरुणांचं. ज्यांना म्हणतात "फिक्सर्स". धारावीत फिरवणं, एखाद्या ठिकाणी शूटींगसाठी परवानग्या मिळवणं, नुस्तं सरकारीच नाही तर वेळ पडल्यास स्थानिक गुंडाला मॅनेज करणं, शूटिंगसाठी आवश्यक स्थानिक कलाकार शोधणं, दुभाषे मिळवणं, एखाद्या स्थानिक व्यक्तीची भेट ठरवणं असं जे-काही-लागेल-ते-पडेल-ते सहाय्य उपलब्ध करून देणं हे "फिक्सर्स"चं आयुष्य. अशा दोन "फिक्सर्स"शी या लेखातून आपण गप्पा मारतो. त्यांचे अनुभव ते आपल्याला सांगतात. ते अनुभव रोचक आणि रोमांचक आहेत. तसंच धारावीत फक्त गरीबी नाही तर जगण्यासाठीचा सकारात्मक संघर्ष कसा आहे, परदेशांत परदेशी म्हणून विकला जाणारा माल इथे कसा तयार होतो ही नवी दृष्टीही आपल्याला मिळते.
युरोपातल्या निर्वासितांच्या समस्येचा ऊहापोह करणारा "रानोमाळ" हा लेख आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा, ब्रिटिश भारतीय लेखक रस्किन बॉंड, ज्येष्ठ गायिका गिरिजा देवी, घटम् वादक विक्कू विनायकराम यांच्या बद्दलचे दीर्घ लेख आहेत. त्यांच्या क्षेत्रातल्या त्यांच्या अनुभवांची भ्रमंती निःसंशय वाचनीय.
थोडक्यात कुठलंही पान वाचण्यातून वगळावं असं नाहीच. मासिकाच्या सुरुवातीला विजय दर्डा यांनी त्यांच्या मनोगतात लिहिलं आहे की या अंकाच्या दोन लक्ष प्रतींची नोंदणी प्रसिद्धी आधीच केली गेली आहे. हा अंक या सर्व नोंदणीदारंचा विश्वास सार्थ ठरवतो यात शंकाच नाही. तुम्हीही हा अंक विकत घ्या किंवा तुमच्या दिवाळी अंकांच्या वाचनालयातून नक्की आणा.
या अंकाची ऑनलाईन खरेदी, ई-उक, अधिक छायाचित्रे आणि व्हिडिओजसाठी त्याचं संकेतस्थळ आहे
http://www.deepotsav.lokmat.com
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
उपयुक्त review ����
ReplyDeleteधन्यवाद निलेशजी...जमल्यास हे परीक्षण तुमच्या मित्रमंडळी-नातेवाईकांशी शेअर करा.
Delete-कौशिक
वा....दिवाळी अंकाला...विशेष प्रयत्न करून प्रकाशित केलेल्या अंकाला ग्रंथाचा दर्जा देत आपण हे केलंत यासाठी विशेष अभिनंदन.
Deleteधन्यवाद प्रमोदजी
Delete-कौशिक