डॉ. केतकर (Dr.Ketkar)पुस्तक :  डॉ. केतकर (Dr.Ketkar)
लेखक : द. न. गोखले (D.N. Gokhale) 
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३३९
ISBN : दिलेला नाही

ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे हे चरित्र आहे. "ज्ञानकोश" म्हणजे मराठीत सांगायचं तर "एनसाक्लोपिडिया" हं :). "एनसाक्लोपिडिया ब्रिटानिका" हे नाव नाव तुम्ही ऐकलं असेल. ऑनलाईन "विकिपिडिया" हे संकेतस्थळ वापरले असेल. विविध भाषांमधील छापिल ज्ञानकोशांची परंपरा बरीच जुनी आहे. त्याच प्रकारचा ज्ञानकोश मराठीत १९२० च्या दशकातच प्रकाशित झाला होता. हा पूर्ण ज्ञानकोश आता ऑनलाईन वाचायला उपलब्ध आहे: http://ketkardnyankosh.com/ 
२३ खंडांचा हजारो पानांचा हा ज्ञानकोश बनवण्याचं मुख्य श्रेय जातं डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांना. 


कुशाग्र बुद्धिमत्तेच्या डॉ. केतकरांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलं होतं. तिथे समाजशास्त्रिय अभ्यास केला होता. या संशोधनातून त्यांच्या प्रतिभेला वैश्विक सामजिक सत्य आणि भारताच्या उन्नतीचे मार्ग सापडले. भारतात परत येऊन लोकांना त्यानुसार मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यांचं ठाम मत असं होतं की देशी भाषांचा विकास होणं राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. मराठी ज्ञानभाषा व्ह्यायची असेल तर जागातलं उत्तमोत्तम ज्ञान मराठीत उपलब्ध असलं पाहिजे. त्यासाठी मराठीतही ज्ञानकोश असला पाहिजे. "हे असलं पाहिजे; कुणितरी काहितरी करायला पाहिजे" असं म्हणत वाट बघत बसणारं व्यक्तिमत्त्व ते नव्हतं. त्यांनी हे काम स्वतःच करायचं ठरवलं. १९१६ ते १९२८ इतका काळ ह्या कामाला वाहून २३ खंडांचं काम पूर्ण केलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी दळणवळणाची, संपर्काची साधनं कमी असताना त्यांनी इतकी माहिती जमवली. अनेक मोठ्या विद्वानांनी वेगवेगळी कारणं देऊन मदत करायचं नाकारलं. टिळकांसारख्या व्यक्तीने लिहायची दाखवली पण लिहिण्याआधीच त्यांचं निधन झालं. ज्ञानकोश कुणा संस्थानिकाच्या, धनिकाच्या देणगीवर नको; इतकंच काय लोकांच्या दानदक्षिणेतूनही नको असा विचार पुढे करत त्यांनी "लिमिटेड कंपनी" स्थापन केली आणि त्याद्वारे भागधारकांकडून (शेअर होल्डर्सकडून) पैसे उभारून काम सुरू केलं. हुशार लेखनिक, संपादक जमवले आणि काम सुरू केलं. त्यांनी पगारावर लोक ठेवले. ज्ञानाची उपासना म्हणजे पदरमोड करून, उपाशीपोटी करायची गोष्ट अशी कल्पना असणाऱ्या समाजात संशोधनासाठी पगार, "लिमिटेड कंपनी" या कल्पना अभिनव होत्या. आजुबाजुच्या समाजाच्या कितितरी पुढे त्यांचे विचार होते; कल्पना खूप पुढच्या होत्या.

काम सुरू झालं म्हणून ते सुरळीत पार पडलं असं नव्हे. व्यवस्थापकीय मंडळातले हेवेदावे, छपखान्यांची दिरंगाई, श्रेयाची लढाई या सगळ्यातून त्यांना जावं लागलं. ज्ञानकोश प्रसिद्ध झाल्यावर त्या प्रती खपवणं, ज्ञानपराङमुख समाजाला त्याची आवश्यकता पटवून पैसे खर्चायला लावणं हे देखील दिव्य होतं. त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून ते स्वतः देखील ऊनपावसात घरोघरी हिंडून ज्ञानकोशाची विक्री करत होते. ज्ञानकोशात वेगवेगळ्या जातींबद्दल, धर्मगुरूंबद्दल संशोधनाअंती त्यांनी लिहिलं होतं. असं सत्य ज्यांच्या स्वाभिमानाआड आलं त्यांच्याशीही त्यांचे वाद झाले. पण तेव्हा वादाचं नियतकालिकांमध्ये लेख लिहिणे, निषेध पत्र पाठवणे, कायदेशीर लढाई लढणे असं होतं. आजच्या सारखं आक्रस्ताळं नव्हतं. नाही म्हणायला मुस्लिम समाजाने तेव्हाही आपले बाहुबल दाखवत त्यांना जिवे मारायची धमकी दिली होती आणि शेवटी महंमद पैगंबरांबद्दलचा भाग गाळायला लावला होता. 

ज्ञानकोशाची निर्मितीप्रक्रिया आणि त्यातला केतकरांचा सिंहाचा वाटा हा या पुस्तकाचा मुख्य गाभा. या कामाला सुरुवात होण्या आधीचा आणि नंतरचा या दोन्ही काळाबद्दलही लेखकाने सविस्तर लिहिलं आहे. बालपण, तेव्हाचा स्वभाग, संस्कार, अमेरिकेतील शिक्षण, तिथे मिळालेली विद्वद्जनांची मान्यता, भारतात परत आल्यावर "राष्ट्रगुरू"च्या भूमिकेतून देशभर लोकांना मार्गदर्शन, ज्ञानकोशानंतर इतर संशोधन; कथा, कादंबऱ्या, राजकीय लेख यांचं लेखन; भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले वेगेवेगळे प्रयोग, इतर भाषांमध्ये ज्ञानकोश तयार करण्यासाठी घेतलेला पुढाकार हे सगळं आहे.

डॉक्टरांच्या च्या पत्नी श्री. शीलवती केतकर या मूळच्या जर्मन-ज्यू मिस. कोहेन. त्या केतकरांना इंग्लंडमध्ये भेटल्या आणि त्यांचा स्नेह जुळला. पण देशभक्ती करू इच्छिणाऱ्याने या बंधनात अडकणं इष्ट नाही म्हणुन ते त्यांचा स्वीकार करत नव्हते. स्वतःची जाज्वल्य हिन्दुत्ववादी भूमिकाही त्यांना परधर्मिय युवतीशी लग्न करायला मागे ओढत होती. ते तसेच भारतात आले. ७-८ वर्षं गेली तरी त्यांच्या प्रेयसीने मात्र त्यांच्यावर पत्राद्वारे प्रेम जागेच ठेवले. आणि बरेच वर्षांनी हो-नाही करता केतकर लग्नाला तयार झाले. मिस. कोहेन या आधी हिंदू झाल्या आणि मग त्या दोघांचे लग्न झाले. कोहेनबाईंना हिंदू करून घेण्यासाठी स्वतःच्या वैदिक अभ्यासातून "व्रात्यस्तोम" नावाचा वैदिक विधी त्यासाठी त्यांनी पुन्हा उजेडात आणला. सहाजिकच सनातनी मंडळींना ही बाब रुचली नाही. केतकरांचा हा आणि या पुढचा वैयक्तिक प्रवासही लेखकाने आपल्यासमोर दाखवला आहे. 

पुस्तक साधारण ६० वर्षांपूर्वीचं असल्यामुळे पुस्तकाची भाषा त्यावेळची, औपचारिक, बरीचशी संस्कृतप्रचुर, जरा जड आहे. काही जुनी छायचित्रे आहेत. हे चरित्र म्हणजे कादंबरी नाही तर लेखकाने निवेदकाची भूमिका घेऊन चरित्र उलगडले आहे. केतकरांनी ज्या भूमिका घेतल्या, विचार मांडले, कृती केल्या त्याचं सडेतोड विश्लेषणही जागोजागी आहे. केतकरांनी केलेल्या चुका, बुद्धिमत्तेच्या अहंकारातून आलेला दडपेपणा, अचाट कल्पनाशक्तीचा अतिरेक होऊन कधिकधी त्याचा संशोधनावर झालेला परिणाम, वागण्यातला विक्षिप्तपणा हे सगळंही निःसंकोचपणे मांडलं आहे.

त्यामुळे हे चरित्र नुसत्ती घटनांची जंत्री न होता जिवंत चरित्र होते. राजकारणी, उद्योजक, कलाकार यांचा संघर्ष आपल्या वाचनात येतो. पण बौद्धिक संशोधकालाही संघर्ष करावा लागतो; व्यवहारात लक्ष दिलं तरच काम पूर्णत्वाला जातं; काम कितीही चांगलं असलं आणि आपण निस्वार्थभावनेने काम करत असलो तरी क्षुद्र्भावनेच्या व्यक्तींचा सामना करावाच लागतो हेही आपल्याला मार्गदर्शक ठरेल.  पुस्तकाची भाषा आणि त्यातल्या तपशीलांमुळे सर्वसामान्य वाचकाला पूर्ण चरित्र वाचणं जरा जड वाटू शकतं. पण  मराठीला ज्ञानभाषा बनवायला एका महान व्यक्तीने आयुष्य अर्पण केलं या कृतज्ञतेतून ज्ञानकोशाच्या निर्मितीचा भाग तरी मराठीप्रेमींनी वाचायलाच हवा.


------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
पुस्तकाची अनुक्रमणिका :
No comments:

Post a Comment

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...