जगाच्या पाठीवर (Jagachya Pathivar)








पुस्तक : जगाच्या पाठीवर (Jagachya Pathivar) 
लेखक : सुधीर फडके (Sudhir Phadke)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २२४
ISBN : 81-7434-258-3


श्रेष्ठ मराठी गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचे हे आत्मचरित्र आहे. "किर्लोस्कर" मासिकातून लेखमालेच्या स्वरूपात हे प्रसारित झाले होते. त्या लेखमालेत केवळ १५च भाग बाबूजी लिहू शकले. नंतर सावरकरांवरच्या चित्रपटाचा ध्यास त्यांनी घेतल्यामुळे ही लेखमाला बंद झाली. त्यामुळे हे अपूर्ण आत्मचरित्र आहे. 


त्यांच्या बालपणापासून त्यांचे पहिले गाणे ध्वनिमुद्रित झाले तिथपर्यंतचा प्रवास यात येतो. सुधीर फडके नावारूपाला येण्याआधी त्यांनी काय संघर्ष केला होता ते आपल्याला यातून दिसतं. घरच्या गरीबीमुळे नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधारावर जगायला लागलं. उपासमार सहन करावी लागली. उधार-उसनवार करून गाण्याच्या जिवावर आयुष्य सावरायचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. प्रत्येकवेळी नियती मात्र आशा-निराशा, यश-अपमान असे हेलेकावे देत होती. हे वाचून अंगावर काटा येतो. 
बाबूजींना एकेकाळी फूटपाथवर राहून दिअस काढावे लागले असतील ही कल्पनाच करवत नाही. त्याबद्दल पुस्तकातले ही पाने वाचा.

(फोटोवर क्लिक करून झूमकरून वाचा)



त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध कोल्हापुरात आला. त्या ओळखीतूनच ते मुंबईला आले. संघ कार्यालयातच राहायचे. संघकार्य आणि गाण्याचे शिक्षण घेणे-देणे त्यांनी सुरू केले. पोटसाठी काही मिळवण्याचा झगडा चालू असतानाही संघकार्यात योगदान ते देत होते. पण पुढे संघातील तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने त्यांना संघकार्यालयातून सामानासकट बाहेर काधलं गेलं. आणि त्यांची पुन्हा भटकंती सुरू झाली. संघातील ओळखीच्या आधारे गावोगाव फिरून गाणयाचे कार्यक्रम करणे, थोडेफार पैसे जमवणे आणि पुढचा प्रवास. काही गावांमध्ये कार्यक्रम होत काही ठिकाणी कोणीच कार्यक्रम करत नसत. कधी सामान्य माणसंही बऱ्यापैकी वर्गणी जमाकरत तर राजे-संस्थानिक-जमीनदार मात्र तुटपुंज्या पैशात बोळवण करीत. हा विरोधाभासही त्यांना अनेकदा अनुभवायला मिळाला आहे. यामुळे वेड लागण्याची पाळी त्यांच्यावर आली तर कधी आत्महत्या करून सगळ्यातून सुटावं असं वाटू लागलं. या भटकंतीचे, त्यात झालेल्या मान-अपमानांचे, फसवणुकीचे, मदत केलेल्या माणसांचे सविस्तर वर्णन पुस्तकात केले आहे.

"मी भिकारी का होतो" असं शीर्षक दिलेला हा परिच्छेद वाचा.



गाण्याची "रेकॉर्ड" ध्वनिमुद्रित होण्याची संधीही कितीदा समोर आली आणि हाता तोंडाशी आलेला घास नियतीने वेळोवेळी कसा हिरावून घेतला असे प्रसंगही पुन्हापुन्हा घडले आहेत. भटकंतीत ते कलकत्त्याला  राहिले होते. आता इथेच स्थिरस्थावर होता येईल असा विचार करत होते. भावांना भेटायला कोल्हापुरला आले असता योगायोगानेच त्यांचा गदिमांशी तिथे दौऱ्यावर आलेल्या "एचएमव्ही" शी संपर्क आला आणि गंगेत घोडं न्हालं. तो प्रसंग वाचताना आपल्यालाही आनंद होतो. एखाद्या चित्रपटात नायकाने अटीतटीच्या द्वन्द्वयुद्धात रक्तबंबाळ अवस्थेत शेवटी एक फटका असा द्यावा की प्रतिस्पर्धी कायमचा गारद व्हावा आणि प्रेक्षकांचा एकच जल्लोश व्हावा; तसं आपलं वाचताना होतं.

इथपासून पुढचे सुधीर फडके कदाचित आणि कुणाच्या लेखनातून अर्धेमुर्धे का होईना पुढे आले असतील, येतील. पण या प्रसंगापर्यंतचा संघर्ष त्यांच्याशिवाय इतरांना नीट सांगता येणं अशक्यच आहे. तो भागतरी ते लिहू शकले हे खरंच बरं झालं. पुढच्या आयुष्यातला गीतरामान्याणाची निर्मिती, इतर विषेश गाण्यांचे व संगीत दिग्दर्शनाचे अनुभव, सावरकर चित्रपट निर्मिती आणि गोवा-दादरा-नगरहवेली मुक्ती संग्रामातला थरार हेदेखील त्यांच्या लेखणीतून वाचणं म्हणजे अवर्णनीय ठरलं असतं. या विषयीच्या काही आठवणी त्यांच्या पत्नीने या पुस्तकात लिहिल्या आहेत. 

प्रकतीच्या अडचणींवर मात करत गीतरामायणाचे कार्यक्रम ते सादर करत त्याची ही आठवण.





प्रसिद्ध संगीतकार आणि गायक म्हणून बाबूजींचं हे पुस्तक वाचनीय आहेच पण त्याहून जास्त सामाजिक पैलू याला आहे असं मला वाटतं. 

रा.स्व.संघाच्या विचारांचा जोर सध्या देशात असताना संघाच्या सुरुवातीच्या काळात (आणि आजही) स्वयंसेवक कसे त्याग करून संघ वाढवत होते हे आपल्याला दिसतं. 

सध्याच्या वातावरणातला दुसरा बहुचर्चित मुद्दा आरक्षणाचा. जातीय आरक्षणाची मागणी वाढते आहे आणि त्यातून काहीवेळा ब्राह्मणद्वेषाचा सूर निघतो. पण या पुस्तकातून हे जाणवेल की ब्राह्मणांतही गरीबी सर्वदूर पसरलेली होती, त्यांनाही हाल अपेष्टा, अपमान-धक्के सहन करूनच पुढे यावं लागलं. ज्याला खरंच समाजाचं भलं करायचं आहे त्याने जातीय चष्मे न लावता खऱ्या गरजवंतांची व गुणवंतांची पारख करणं आवश्यक आहे हे या पुस्तकातून जाणवेल. हे अनुभव वाचताना ह.मो. मराठेंच्या "बालकांड" आणि "पोहरा" या पुस्तकांची त्यामुळेच आठवण येते. 

तिसरं म्हणजे आजकाल कलाकारांच्या मुलाखतीतून "स्ट्रगल" हा शब्द फार ऐकू येतो. एखाददुसरी मालिका केलेला अभिनेता; एकदोन गाणी गाजलेली गायिका सुद्धा आपण कसा "स्ट्रगल" केला ते सांगायला लागते. छोटी छोटी कामं करत शिकणं, हळूहळू मोठं होणं या उमेदवारीलाच लोक स्ट्रगल म्हणू लागलेत. अशा लोकांनी सद्गुणराशी असणाऱ्या बाबूजींचा खरा "स्ट्रगल" वाचायलाच हवा आणि आपण त्यामानाने खूपच सुस्थितीत आहोत यासाठी देवाचे आभारच मानायला हवेत.

पुस्तकात फोटोही भरपूर आहेत.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

तुका’राम’दास (Tuka'Ram'das)




पुस्तक : तुका’राम’दास (Tuka'Ram'das)
लेखक : तुलसी आंंबिले आणि समर्थ साधक (Tulasi Ambile & Samarth Sadhak)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २०६ 
ISBN : 978-93-86401-00-7


तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींवर लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.  तुकाराम महाराजांवर २६ आणि रामदास स्वामींवर २१ लेख आहेत.




तुकारामांवरच्या लेखात त्यांचे चरित्र मांडले आहे. त्यांच्या वेळची सामाजिक स्थिती, मुसलमानी आक्रमणाचा वरवंटा, जातिभेदात दुभंगलेला आणि कर्मकांडात गुरफटलेला समाज कसा होता याचे वर्णन आहे. या परिस्थितीला धक्का देण्याचे काम, समाजप्रबोधनाचं काम त्यांनी कसं केलं हे विशद केलं आहे. त्यावेळच्या सनातन्यांनी आणि इतर जातीतल्या धर्माभिमान्यांनी त्यांना त्रास दिला त्याचे ऊहापोह आहे. "गाथा तरल्या" आणि "सदेह वैकुंठगमन" हे तुकारामांबद्दलचे दोन प्रसिद्ध चमत्कार. ते चमत्कार का भाकडकथा ? याची चर्चा आहे. बऱ्याच लेखांत इतर संशोधकांची मते, अस्सल कागदपत्रे काय म्हणतात, तत्कालीन संत उदा. बहिणाबाई, त्यांचे बंधू कान्होबा हे आपल्या अभंगातून त्या त्या प्रसंगांचे वर्णन कसे करतात या आधारे तर्कशुद्ध मांडणी करायचा प्रयत्न केला आहे. तुकारामांची रूढ प्रतिमा म्हणजे भोळसट, व्यवहारात कच्चा, देवभक्त वाणी अशी असते. प्रत्यक्षात ते प्रपंचदक्ष होते आणि परिस्थिती विरुद्ध बंडखोरी करणारे कसे होते हे या उदाहरणांतून मांडायचा प्रयत्न केला आहे. 

उदाहरणासाठी काही पाने. 
कर्मकांड, चमत्कार करून लोकांना भुलवणारे, हिंसा-मदिरा-मैथुन यांना उपासनेत स्थान देणऱ्या उपासना पद्ध्तीवर ते कसा प्रहार करतात आणि त्यामगची पार्श्वभूमी पण लेखक समजावून सांगतो.



त्यांच्या छळाबद्दल महाराज आपल्या अभंगात लिहितात त्याबद्दल



रामदास स्वामींवरचे लेख हे चरित्रात्मक नसून त्यांच्या वाङ्‍मयावर आधारित आहेत. एकात त्यातही त्यांची भक्ती, अध्यात्म, धार्मिकता यापेक्षा सर्वसामान्य जीवनाबद्दल त्यांनी केलेला उपदेश यावर भर आहे. आजच्या काळातही तो उपदेश किती चपखल लागू पडतो ते मांडलं. आहे. दुसऱ्या प्रकारच्या लेखांत त्यांच्या साहित्याचे रसग्रहण आहे. रामदासांचे "मनाचे श्लोक" आणि "दासबोध" प्रसिद्ध आहेतच पण त्याबरोबरच त्यांनी अभंग, डफगाणी, दंडीगाणी इतकंच काय लावण्याही लिहिल्या आहेत हा फारसा प्रचलित पैलू नसलेला आपल्यासमोर आणला आहे. रामदास स्वामींनी दख्खनी उर्दू,हिंदी कानडी इ. भाषांतही त्यांनी रचना केली आहे, ही माहिती माझ्यासाठी नवीनच होती. एक कवी म्हणून त्यांनी वेगवेगळी वृत्ते, छंद यांमध्ये यांचा वापर कसा केला आहे; "भीमरूपी महारुद्रा.." सारखी अजून १३ स्तोत्रे त्यांनी रचली आहेत त्याच्यातही रचना वैविध्य आहे. हे पण मला नवीन होतं.

उदा. प्रपंच करणऱ्यांना कमी लेखण्याची गरज नाही असे स्वामी सांगतात. पण या प्रपंच करणऱ्याने आळशी असून उपयोगाचे नाही असा उपदेश ते करतात

काव्यप्रतिभेबद्दल:

वेगवेगळ्या वृत्तांमधील मारुती स्त्रोत्रांबद्दल



दख्खनी उर्दू मधल्या रचनांची झलक

एकूणच रामदासस्वामींवरचा पुस्तकाचा भाग म्हणजे एक स्वमदत पुस्तक , काव्यरसग्रहण आणि अपरिचित पैलूंशी ओळख अशी तिहेरी मेजवानी आहे.


मी ही लेखमाला लोकसत्तेत वाचली नव्हती त्यामुळे पुस्तकाच्या नावावरून मला असे वाटले होते की या दोन संतांच्या शिकवणीचा, विचारसरणीचा तौलनिक अभ्यास यात असेल. दोघे समकालीन असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क झाला होता का;  एकमेकांवर काही प्रभाव पडला होता का किंवा एकाच घटनेकडे दोघांनी कशा पद्धतीने बघितले होते अशी काही चर्चा असेल. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. त्यामुळे नाव थोडे दिशाभूल करणारे आहे. ही दोन स्वतंत्र पुस्तके एकत्र प्रकाशित केली आहेत असं म्हणून शकतो. 

लेखकांनी टोपणनाव घेऊन लेख लिहिले आहेत. प्रस्तावनेत म्हटले आहे की,"एकदा का एखादे सदर लोकप्रिय झाले, की संबंधित लेखकाचा लेखकराव होतो... उभय लेखकांच्या टोपण नावाच्या आग्रहाने तो धोका आणि महाराष्ट्राला नवे निरूपणकार मिळणे टाळता आले". म्हणजे काय? मला कळले नाही. पण किमान पुस्तकरूपाने लेखसंग्रह प्रकाशित करताना लेखकांची नावे उघड करायला हवी होती. त्यांचा या क्षेत्रातला अभ्यास आणि अधिकार स्पष्ट करायला हवा होता. असं मला वाटतं. 

दोन्ही संतांची भाषा चारशे वर्षं जुनी असल्याने सगळेच शब्द नीट कळत नाही. मराठी असूनही काही वेळा दुर्बोध वाटते. लेखांमध्ये या अभंगांचे, ओव्यांचे मराठीत शब्दशः भाषांतर द्यायला हवे होते.म्हणजे त्याच्या आजुबाजूचे विवरण अजून चांगलं समजलं असतं. वृत्तपत्रातल्या शब्दमर्यादेमुळे तेव्हा ते शक्य झाले नसेल पण पुस्तकात तसे देणे जमले असते. तळटीपांच्या स्वरुपात दिले असते तर लेखाचा ओघही बिघडला नसता.  

पुस्तक तुकोबांची जास्त खरी ओळख करून देते. रामदास स्वामींची अध्यात्मापलिकडची(किंवा अलिकडची -ऐहिक) बिहेवियरल/मॅनेजमेंट गुरू अशी ओळख करू देते आणि अपरिचित पैलूंची झलक दाखवते. ज्यांनी या संतांचं लिखण स्वतः वाचेलेलं नाही अशांसाठी ही ओळख आवश्यकच आहे. त्यांचं साहित्य अजून वाचावं, मूळ साहित्य वाचावं असं नक्की वाटेल. पुस्तकाच्या शेवटीही हाच भाव प्रकट केला आहे.




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------

The complete Yes Minister (द कंप्लीट येस मिनिस्टर)



पुस्तक : The complete Yes Minister (द कंप्लीट येस मिनिस्टर)
लेखक : Jonathan Lynn & Antony Jay (जोनॅथन लिन आणि अ‍ॅन्टोनी जे)
भाषा : English इंग्रजी
पाने : ५१४
ISBN-10 :0-563-20665-9
ISBN-13 : 978-0-563-20665-1

"मी वैज्ञानिक झालो तर..", "मी पंतप्रधान झालो तर.." अशा विषयांवर शाळा-कॉलेजात आपण निबंध लिहिले असतात. आणि आपल्या कल्पनारंजनात आपण देशाची परिस्थिती कशी पालटू हे लिहिलं असतं. पण खरंच पंतप्रधान किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री होणं म्हणजे काय ?  त्यांचा दिवस कसा असतो ? मंत्री खरंच कसे निर्णय घेतो ? काही मंत्री धडाकेबाज निर्णय घेतात पण काही मंत्री मात्र कधी चर्चेत येत नाहीत, त्यांचा प्रभाव दिसत नाही; असं का ? खात्याचा मंत्री म्हणजे त्या खात्याचा सर्वाधिकारी अशी आपली कल्पना असते. पण खरी सत्ता असते ती प्रशासकीय अधिकाऱ्यांची. "येस मिनिस्टर" हे पुस्तक आपल्याला या जगात डोकवायची, जवळून बघायची संधी देतं. त्यातही मंत्री आणि त्याचा खात्याचे सचिव आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातले संबंध यावर जास्त प्रकाश टाकतं. तेही विनोदी शैलीत खुसखुशीत संवादातून. 

पुस्तकाची नेपथ्यरचना अशी आहे... ब्रिटनमध्ये नुकत्याच निवडणूका झाल्या आहेत. अनेक वर्षांनी सत्तांतर झाल्याने बहुतेक खासदारांना पहिल्यांदाच मंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. श्री. हॅकर हे त्यातलेच एक नवीन मंत्री. राजकारणात खूप वर्षे काढली तरी मंत्री असणं म्हणजे काय, खात्याचं कामकाज;अर्थात, विचारार्थ येणारे विषय, त्यावर तयार केलेल्या माहितीचा-अहवालांच्या फायलींचा ढिगारा, कितीतरी लोकांशी रोज बैठका, भाषणं, औपचारिक जेवणं, टीव्ही-रेडियोवर मुलाखती, संसदेत भाषणं, संसदेतल्या प्रश्नांना उत्तरं देणं इ. ते आता शिकू लागले आहेत. खात्यातले सचिव, स्वीय सहाय्यक आणि प्रशासकीय अधिकारी (सिव्हिल सर्व्हंट्स) हेच कुठल्याही मंत्र्याला या सगळ्यात मार्गदर्शन करत असतात. हे अधिकारी अहवाल बनवतात, मंत्र्याला माहिती देतात, "ब्रीफ" करतात, नियम काय आहे सांगतात. त्यांचा दिवसभराचा आणि येणऱ्या दिवसांचा कार्यक्रम ठरवतात. थोडक्यात कुठलाही मंत्री हा प्रशासनावर, सचिवांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. आणि त्यातून ज्या गमती जमती घडतात त्याचं खूप मजेशीर चित्रण या पुस्तकात आहे.

उदा. हे अधिकारी मंत्र्याला हवी तेवढी माहिती - म्हणजे त्यांना हवी तेवढीच माहिती - देतात. आणि त्यातून कधी संसदेत चुकीची माहिती देणं घडतं. मग मंत्री-सचिवात हा गमतीदार संवाद घडतो.

मंत्री : या प्रश्नाची मला माहिती का दिली नाही ?
सचिव: ही माहिती दिली नाही असं नाही; तर ती दिली पाहिजे असं कोणाला वाटलं नाही.
मंत्री : पण ही माहिती द्यावी असं का वाटलं नाही.
सचिव : हीच माहिती द्यावी असं वाटलं नाही असं नाही, तर कुठलीच माहिती मंत्र्याला द्यायची नाही हीच प्रशासनाची पद्धत आहे जो पर्यंत ती माहिती खूप महत्त्वाची नाही.
मंत्री: आणि माहिती महत्त्वाची आहे का नाही कोण ठरवतं ?
सचिव : आम्हीच !!



एका प्रसंगात मंत्र्याकडे खूप काम येतं. खूप फायली त्याच्या "इन" बॉक्स मध्ये असतात. सचिव त्याला घाबरवतो की या सगळ्या फायली वाचून उद्या सकाळपर्यंत उत्तरं पाहिजेत. तेव्हाच्या एका संवादाची छोटी झलक.

मंत्री : इतकं सगळं वाचणं कसं शक्य आहे ?
सचिव : पण वाचावं तर लागेलच.
मंत्री : पण खरंच हे शक्य नाही.
सचिव : मी पण खरं सांगू का? हे सगळं वाचायची खरंच आवश्यकताही नाही.
मंत्री: मग ?
सचिव: तुम्ही फक्त फायली "इन" ट्रे मधून "आउट" ट्रे मध्ये ठेवा. आणि कोणी विचारलं तर तुमच्या वतीने आम्ही उत्तर देऊ "Matter is under consideration" कोणी फारच जास्त चौकशी केली तर उत्तर देऊ, "Matter is under active consideration".
मंत्री: दोन्हीत काय फरक आहे
सचिव : "Matter is under consideration" म्हणजे फाईल गहाळ झाली आहे आणि "Matter is under active consideration" म्हणजे फाईल गहाळ झालीये, पण ती शोधायचा आम्ही प्रयत्न करत आहोत !!



हे सचिव मंत्र्याला कधी कधी अडचणीतूनही सोडवतात. एकदा कसले तरी आरोप होतात तेव्हा च्या प्रसंगाची झलक

मंत्री : आपण चौकशी समिती नेमू. पण समितीवरच्या माणसाने आपल्या मनासारखा अहवाल दिला नाही तर.
सचिव: आपण एखाद्या समजूतदार माणसाला नेमू.
मंत्री : समजूतदार म्हणजे एखादा शिक्षणतज्ञ किंवा राजकारणी ?
सचिव : ते कुठे समजूतदार? सममजूतदार म्हणजे निवृत्त प्रशासकीय अधिकारी ज्याला सगळ्या गोष्टी "व्यवस्थित" समजतात.
मंत्री: पण त्याने खोटा रिपोर्ट द्यायचा ?
सचिव: अजिबात नाही, आरोप खोटे आहेत असं म्हणायचं नाही. त्याने असं फक्त म्हणयचं की सर्व चौकशी करूनही आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरेसे पुरावे सापडले नाहीत. आरोप खोटे आहेत असंही नाही, खरे आहेत असंही नाही.


हे सगळं तुम्हाला मराठीतून सांगायचा प्रयत्न केला पण मूळ इंग्लिशची मजा माझ्या भाषांतरात येणार नाही. म्हणून एकदोन पाने तुमच्या साठी.

मंत्र्याकडे एकदा स्थानिक स्वराज्य संस्था (लोकल बॉडीज) ची जबाबदारी येते. आपल्या मंत्र्याने त्यात काही ढवळाढवळ करू नये. पूर्वीच्या योजना - ज्या प्रशसनाने राबवू दिल्या नाहीत ते रिपोर्ट वाचून उगाच कामाला लावू नये, म्हणून मंत्र्याला घोळत घेण्याचा श्री. हंफ्री आणि श्री. बर्नार्ड यांचा हा प्रयत्न बघा.






युरोपियन युनिअन मध्ये ब्रिटन स्वतःच्या स्वार्थासाठी घुसले आहे, युरोपियन देशांत एकवाक्यता नसावी यातच आपलं हीत कसं आहे हे हंफ्री मंत्र्याला पटवून सांगतो. ब्रेक्झिट ची बीजे इथे आपल्याला दिसतात.

पत्रकारांना बातम्या कशा "लीक" होताता आणि स्वतः मंत्री किंवा साचिवच ते कसं करतात, संसदेच्या लाॅबी मध्ये बातम्या कशा पेरल्या जातात याचे पण गमतीदार प्रसंग आहेत.

या सचिवाची वन-लायनर्स जरा वाचून बघा.



पुस्तकात २१ प्रकरणं आहेत थोडक्यात वेगवेगळे २१ घटनाक्रम आहेत. ही बीबीसी टीव्हीवर १९८०च्या दशकात मालिका होती
(https://en.wikipedia.org/wiki/Yes_Minister). तिचे हे पुस्तक रूपांतर आहे.  मंत्री, त्यांचे सचिव यांच्या डायरी आणि मेमो च्या रूपात ते आहे. मालिका यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यांच्या डायरीतले वर्णन, संवादापेक्षा वेगळं त्यांच्या डोक्यात चालणारे विचार आपल्याला वाचायला पुस्तकात मिळतात तर व्हिडिओ बघताना अभिनयाची जोड मिळते. म्हणून मी पुस्तकातले प्रकरण वाचले आणि मग व्हिडिओ बघितले तर काही वेळा आधी व्हिडिओ बघितला आणि मग प्रकरण वाचले. म्हणजे मालिका बघताना मजा येतेच तितकीच मजा वाचताना येते.

हे पुस्तक भाषिक विनोदाचा उत्तम नमुना आहे. सध्या विनोद म्हणजे कंबरेखालचे संवाद आणि ओंगळवाणे प्रकार असा समज असताना असे विनोद खरंच निखळ आनंददायी ठरतात. विषय १९८० मधले असले तरी विषय अजून तितकेच ताजे आहेत. काही विषय तिथे तेव्हा चर्चिले गेले ते आपल्याकडे आत्ता चर्चिले जातायत उदा. तिकडचं नॅशनल डेटाबेस म्हणजे आपलं "आधार" आणि अशा व्यवस्थेतून सरकारी हुकूमशाही तर तयार होणार नाही ना ही भीती इ.

लिहिता लिहिता खूप लिहिलं, तरी या पुस्तकातली अजून खूपशी धमाल तुमच्यापर्यंत पोचवली नाही असंच वाटतंय. तुम्ही एखादा यूट्युब व्हिडिओ तरी बघा मग तुम्ही बाकीच्या व्हिडिओच्या आणि पुस्तकाच्या मागेच लागाल.

प्रत्येक निवडणुकीत जनता वेगवेगळ्या पक्षांना संधी देऊन प्रयोग करून बघत असते पण बदल काही घडताना दिसत नाही. ज्या प्रमाणावरआणि ज्या वेगाने परिस्थिती बदलेल, व्यवस्था सुधरेल अशी आपली स्वप्नं असतात, ती तशी पूर्ण होत नाहीत. याचं कारण सरकारी व्यवस्था. सरकारी व्यवस्थेला हलवायचा कोणी प्रयत्न केला तरी ती ढिम्म् हलत नाही फारफारतर एखाद्या अजगराला काडी टोचल्यावर तो थोडीशी हालचाल केल्यासारखं करेल आणि पुन्हा तसाच सुस्त पडून राहील तसंच या यंत्रणेचं आहे; याचीच खात्री आपल्याला पटते. आमचं सरकार आलं की आम्ही आमूलाग्र बदल करू हे आश्वासन किती तकलादू आहे हे समजायला आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे.आणि गंमत म्हणजे हे फक्त भारतातच नाही तर आपण लोकशाही व्यवस्था व प्रशासकीय यंत्रणा जिथून घेतली त्या ब्रिटन मध्येही हेच आहे !

म्हणून हे पुस्तक सामान्य मतदाराने वाचलं पाहिजे, होतकरू राजकारण्यांनी वाचलं पाहिजे, पत्रकारांनी वाचलं पाहिजे, शासनातल्या अधिकाऱ्यांनी वाचलं पाहिजे, भाषाप्रेमींनी वाचलं पाहिजे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...