तुका’राम’दास (Tuka'Ram'das)




पुस्तक : तुका’राम’दास (Tuka'Ram'das)
लेखक : तुलसी आंंबिले आणि समर्थ साधक (Tulasi Ambile & Samarth Sadhak)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २०६ 
ISBN : 978-93-86401-00-7


तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींवर लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.  तुकाराम महाराजांवर २६ आणि रामदास स्वामींवर २१ लेख आहेत.




तुकारामांवरच्या लेखात त्यांचे चरित्र मांडले आहे. त्यांच्या वेळची सामाजिक स्थिती, मुसलमानी आक्रमणाचा वरवंटा, जातिभेदात दुभंगलेला आणि कर्मकांडात गुरफटलेला समाज कसा होता याचे वर्णन आहे. या परिस्थितीला धक्का देण्याचे काम, समाजप्रबोधनाचं काम त्यांनी कसं केलं हे विशद केलं आहे. त्यावेळच्या सनातन्यांनी आणि इतर जातीतल्या धर्माभिमान्यांनी त्यांना त्रास दिला त्याचे ऊहापोह आहे. "गाथा तरल्या" आणि "सदेह वैकुंठगमन" हे तुकारामांबद्दलचे दोन प्रसिद्ध चमत्कार. ते चमत्कार का भाकडकथा ? याची चर्चा आहे. बऱ्याच लेखांत इतर संशोधकांची मते, अस्सल कागदपत्रे काय म्हणतात, तत्कालीन संत उदा. बहिणाबाई, त्यांचे बंधू कान्होबा हे आपल्या अभंगातून त्या त्या प्रसंगांचे वर्णन कसे करतात या आधारे तर्कशुद्ध मांडणी करायचा प्रयत्न केला आहे. तुकारामांची रूढ प्रतिमा म्हणजे भोळसट, व्यवहारात कच्चा, देवभक्त वाणी अशी असते. प्रत्यक्षात ते प्रपंचदक्ष होते आणि परिस्थिती विरुद्ध बंडखोरी करणारे कसे होते हे या उदाहरणांतून मांडायचा प्रयत्न केला आहे. 

उदाहरणासाठी काही पाने. 
कर्मकांड, चमत्कार करून लोकांना भुलवणारे, हिंसा-मदिरा-मैथुन यांना उपासनेत स्थान देणऱ्या उपासना पद्ध्तीवर ते कसा प्रहार करतात आणि त्यामगची पार्श्वभूमी पण लेखक समजावून सांगतो.



त्यांच्या छळाबद्दल महाराज आपल्या अभंगात लिहितात त्याबद्दल



रामदास स्वामींवरचे लेख हे चरित्रात्मक नसून त्यांच्या वाङ्‍मयावर आधारित आहेत. एकात त्यातही त्यांची भक्ती, अध्यात्म, धार्मिकता यापेक्षा सर्वसामान्य जीवनाबद्दल त्यांनी केलेला उपदेश यावर भर आहे. आजच्या काळातही तो उपदेश किती चपखल लागू पडतो ते मांडलं. आहे. दुसऱ्या प्रकारच्या लेखांत त्यांच्या साहित्याचे रसग्रहण आहे. रामदासांचे "मनाचे श्लोक" आणि "दासबोध" प्रसिद्ध आहेतच पण त्याबरोबरच त्यांनी अभंग, डफगाणी, दंडीगाणी इतकंच काय लावण्याही लिहिल्या आहेत हा फारसा प्रचलित पैलू नसलेला आपल्यासमोर आणला आहे. रामदास स्वामींनी दख्खनी उर्दू,हिंदी कानडी इ. भाषांतही त्यांनी रचना केली आहे, ही माहिती माझ्यासाठी नवीनच होती. एक कवी म्हणून त्यांनी वेगवेगळी वृत्ते, छंद यांमध्ये यांचा वापर कसा केला आहे; "भीमरूपी महारुद्रा.." सारखी अजून १३ स्तोत्रे त्यांनी रचली आहेत त्याच्यातही रचना वैविध्य आहे. हे पण मला नवीन होतं.

उदा. प्रपंच करणऱ्यांना कमी लेखण्याची गरज नाही असे स्वामी सांगतात. पण या प्रपंच करणऱ्याने आळशी असून उपयोगाचे नाही असा उपदेश ते करतात

काव्यप्रतिभेबद्दल:

वेगवेगळ्या वृत्तांमधील मारुती स्त्रोत्रांबद्दल



दख्खनी उर्दू मधल्या रचनांची झलक

एकूणच रामदासस्वामींवरचा पुस्तकाचा भाग म्हणजे एक स्वमदत पुस्तक , काव्यरसग्रहण आणि अपरिचित पैलूंशी ओळख अशी तिहेरी मेजवानी आहे.


मी ही लेखमाला लोकसत्तेत वाचली नव्हती त्यामुळे पुस्तकाच्या नावावरून मला असे वाटले होते की या दोन संतांच्या शिकवणीचा, विचारसरणीचा तौलनिक अभ्यास यात असेल. दोघे समकालीन असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क झाला होता का;  एकमेकांवर काही प्रभाव पडला होता का किंवा एकाच घटनेकडे दोघांनी कशा पद्धतीने बघितले होते अशी काही चर्चा असेल. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. त्यामुळे नाव थोडे दिशाभूल करणारे आहे. ही दोन स्वतंत्र पुस्तके एकत्र प्रकाशित केली आहेत असं म्हणून शकतो. 

लेखकांनी टोपणनाव घेऊन लेख लिहिले आहेत. प्रस्तावनेत म्हटले आहे की,"एकदा का एखादे सदर लोकप्रिय झाले, की संबंधित लेखकाचा लेखकराव होतो... उभय लेखकांच्या टोपण नावाच्या आग्रहाने तो धोका आणि महाराष्ट्राला नवे निरूपणकार मिळणे टाळता आले". म्हणजे काय? मला कळले नाही. पण किमान पुस्तकरूपाने लेखसंग्रह प्रकाशित करताना लेखकांची नावे उघड करायला हवी होती. त्यांचा या क्षेत्रातला अभ्यास आणि अधिकार स्पष्ट करायला हवा होता. असं मला वाटतं. 

दोन्ही संतांची भाषा चारशे वर्षं जुनी असल्याने सगळेच शब्द नीट कळत नाही. मराठी असूनही काही वेळा दुर्बोध वाटते. लेखांमध्ये या अभंगांचे, ओव्यांचे मराठीत शब्दशः भाषांतर द्यायला हवे होते.म्हणजे त्याच्या आजुबाजूचे विवरण अजून चांगलं समजलं असतं. वृत्तपत्रातल्या शब्दमर्यादेमुळे तेव्हा ते शक्य झाले नसेल पण पुस्तकात तसे देणे जमले असते. तळटीपांच्या स्वरुपात दिले असते तर लेखाचा ओघही बिघडला नसता.  

पुस्तक तुकोबांची जास्त खरी ओळख करून देते. रामदास स्वामींची अध्यात्मापलिकडची(किंवा अलिकडची -ऐहिक) बिहेवियरल/मॅनेजमेंट गुरू अशी ओळख करू देते आणि अपरिचित पैलूंची झलक दाखवते. ज्यांनी या संतांचं लिखण स्वतः वाचेलेलं नाही अशांसाठी ही ओळख आवश्यकच आहे. त्यांचं साहित्य अजून वाचावं, मूळ साहित्य वाचावं असं नक्की वाटेल. पुस्तकाच्या शेवटीही हाच भाव प्रकट केला आहे.




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. हो विकत घेऊन संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक वाटतें

    ReplyDelete

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...