"दृष्टी श्रुती" दिवाळी अंक २०१९ Drushti Shruti Diwali Special Edition 2019



दिवाळी अंक - दृष्टी श्रुती (२०१९) Drushti Shruti Diwali Special Edition 2019
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २८९
ISBN - दिलेला नाही.

PDF स्वरूपात उपलब्ध. डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सपवर एक पीडीएफ (PDF file) आली. तिच्या चित्रावरून आणि फाईलच्या नावावरून ती एका दिवाळी अंकाची पीडीएफ आहे हे कळत होतं. पुस्तकांच्या बेकायदेशीर पीडीएफ प्रमाणे कोणीतरी या दिवाळी अंकाची फाईल बनवलेली दिसते आहे असा विचार मनात आला. कुठल्या लेखक-प्रकाशकाच्या पोटावर/लेखणीवर पाय आणलाय हे बघायला फाईल उघडून वाचायला लागलो. मंगला गोडबोले हे प्रथितयश नाव संपादिका म्हणून दिसलं. आणि त्यांच्या मनोगतातला हा परिच्छेद वाचून हा काहितरी वेगळा प्रकार आहे हे जाणवलं.

"... आता आम्ही दृष्टी श्रुतीवाले म्हणजे कोण तर माध्यमांशी जवळून दुरून संबंध असलेल्या सुमारे पन्नास सजग-तरल-संवेदनाक्षम-हाडाच्या रसिक खेळाडूंचा एक व्हाट्सअप ग्रुप... यांच्यामध्ये वयोमान, आकारमान, जीवनमान, सांस्कृतिक भान वगैरेंमध्ये साम्य असो नसो; सर्वांच्या दृष्टीच्या श्रुतींच्या, अन्यही सर्व संवेदनांच्या अँटेना उंच उंच उभारलेल्या आहेत. नव्वदच्या दशकाचे कोणते सिग्नल त्यांनी पकडले, कोणते स्मरले, गौरवले, स्वीकारले, नाकारले त्याचा लेखाजोखा म्हणजे हा दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक"

दुसरं नाव दिसलं - "संकल्पना - श्रीपाद ब्रह्मे". त्यांचं फेसबुक पेज आहे का हे बघितलं. त्यांच्या फेसबुक वॉलवर या अंकाच्या प्रकाशनाच्या आणि त्यात सहभागी झालेल्या टीमचा फोटो आणि अशी पोस्ट होती.
"दृष्टी श्रुती या आमच्या WhatsApp group चा डिजिटल दिवाळी अंक प्रकाशित झाला....
या group मध्ये अनेक क्षेत्रातले जाणकार आहेत. आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून इतर अनेक सर्जनशील गोष्टी करत आहेत. आवड आणि passion म्हणून अनेक छंद जोपासत आहेत. हा group तयार झाल्यावर आम्ही अनेकदा भेटतो. एकमेकांच्या कार्यक्रमांना, उपक्रमांना आवर्जून जातो. Get togethers ना अनेक विषयांवर चर्चा होतात. मनसोक्त गप्पा रंगतात...
."
कमेंट मध्ये दिसत होतं कि ते लोकांना ते पीडीएफ व्हॉट्सपवर पाठवत होते. त्यामुळे हा बेकायदेशीर प्रकार नाहीये याची खात्री पटली आणि व्हॉट्सपवर एकत्र येऊन मग प्रत्यक्ष एकत्र येऊन तयार केलेला कदाचित पहिलाच दिवाळी अंक असलेल्या या अंकाबद्दल उत्सुकता आणखी वाढली.

नव्वदी अर्थात 90 चे दशक ही या अंकाची मुख्य संकल्पना आहे नव्वदच्या दशकात झालेले आर्थिक उदारीकरण, त्यानंतर भारतात आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, नवमध्यमवर्गाचाचा उदय, नवीन सुखसोयी इत्यादी अनेक गोष्टींमुळे या दशकात खूप मोठी स्थित्यंतरे घडली. या स्थित्यंतराचा वेध घेणारे लेख या अंकात आहेत.

अनुक्रमणिका.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)



सामाजिक स्थित्यंतराची आठवण करून देणारे लेख आहेत; तसेच काही विशिष्ट पैलूंच्या आठवणी जागवणारे लेखही आहेत. उदाहरणार्थ
"नव्वदीतील लता" मध्ये या दशकात लता मंगेशकर यांनी गायलेली प्रमुख गाणी हा विषय आहे. "नव्वदीतील रशिया" मध्ये सोवियत युनियन कोसळल्यावर रशिया केलेल्या प्रवासाची माहिती आहे. त्यावेळी जे टीनेजर्स होते त्यांच्याबद्दलचा "९०’ज किड्स" लेख आहे.


नव्या पेटंट कायद्यामुळे औषधनिर्मिती व्यवसायामध्ये झालेल्या बदलाची "औषधांच्या पेटंटची कडू-गोड कहाणीआहे.
अहमदनगर, सातारा, सोलापूर या लहान शहरांमध्ये बदल कसा जाणवला, या शहरांतून पुण्या-मुंबईत आल्यावर काय फरक अनुभवायला मिळाला त्याबद्दल लेख आहेत.
इ.


या मूळ संकल्पनेव्यतिरिक्त लेख आहेत, ९०शिवायच्या जुन्या आठवणी आहेत. 
ऋषीकेश जोशी याच्या "संचित" या लेखात त्याने आपल्या कलागुरु - निभा जोशी -यांच्या आठवणी, त्यांची शिकवण्याची पद्धत, त्याचा आयुष्यभर पुरणारा प्रभाव याबद्दल कथन केले आहे. 
"सातासमुद्रा पलीकडून" लेखात सुनीला गोंधळेकर यांनी परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवतानाचे अनुभव शेअर केले आहेत.
"पुकारनारी बाई" मध्ये स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालिका किंवा निवेदिका म्हणून आलेल्या गमतीदार अनुभवांचे वर्णन केले आहे.
इ.
माधवी वैद्य यांच्या दोन कथा आहेत.



प्रत्येक वाचकाला ९०च्या दशकाचा अनुभव त्याच्या त्याच्या वयाप्रमाणे वेगळा आला असेल. या अंकातले लेख वाचताना आपले ते दिवस, आपल्या गावचे ते दिवस आठवून स्मृती रंजनाचा आनंद घेता येईल. त्यामुळे हा अंक वाचायला छानसा, हलकाफुलका आहे. दिसायला साधा तरी देखणा आहे. त्याहून विशेष म्हणजे मराठीमध्ये असा उपक्रम करणाऱ्या या चमूचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या कामावर अभिप्राय देण्यासाठी हा दिवाळी अंक वाचा.

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

Adiyogi (आदियोगी)



पुस्तक : Adiyogi (आदियोगी )
लेखक : Sadhguru & Arundhati Subramaniam ( सद्गुरू आणि अरुंधती सुब्रमण्यम)
भाषा : English इंग्रजी 
पाने : २१९
ISBN : P 978-93-5264-392-9
E 978-93-5264-392-6

वेद, उपनिषदे, पुराणे आणि रामायण-महाभारतासारख्या ग्रंथातून भारतीय संस्कृतीचे, तत्वज्ञानाचे मार्गदर्शन आणि संवर्धन हजारो वर्षे झाले आहे. पुराणात हजारो गोष्टी आहेत, नानविध चमत्कार आहेत, रूपक कथा आहेत ज्या आपल्यापर्यंत परंपरेने कौटुंबिक वारसा म्हणून पोचतात. या कथा चमत्कार खरंच घडले का ? घडले तर कधी ? का त्या फक्त काल्पनिक कथा आहेत ? का ती फक्त रूपके आहेत ज्यामुळे केलेला उपदेश लक्षात ठेवायला सोपा जाईल? या कथांचे नाना मते मांडता येतील. असेच मत "सद्गुरू" यांनी या कथांमधल्या "महादेव शंकर" या भारतीय देवतेबद्दल मांडले आहे. त्यांच्या मते सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वी कैलासात एक प्रत्यक्ष मानव अवतरला. ज्याने ध्यान-धारणा-योग यांचा शोध लावला आणि त्याचा जगात प्रसार केला. म्हणून तो पहिला योगी "आदियोगी" गणला जातो. उदा.



पुस्तकात महादेवाच्या प्रसिद्ध असणाऱ्या कथा दिल्या आहेत. काही कथा या रूपक कथा मानून त्यांचा अर्थ दिलाय. पुराणातल्या काही कथांची सुसंगती आदियोगी माणूस होता हे गृहितक धरून लावली आहे. भारतीय तत्त्वज्ञानातली "माया", "शून्य", "शि-व"(जे नाही ते) इ. संकल्पना समजावून द्यायचा प्रयत्न केला आहे. 




पण एकूणच हे पुस्तक खूप गोंधळलेले आहे. आदियोगी हा परमेश्वर नाही तर माणूस होता हे मान्य करण्यासाठी पुरावे काय? १५ हजार वर्षेंच कशावरून ? प्रजापतीचा यज्ञ आणि सतीचे यज्ञात उडी घेणं ही कथा सांगताना, यज्ञ हे भारतात वाढणाऱ्या नव्या आर्य संस्कृतीचं प्रतीक तर शंकर हे अनार्य लोकांच दैवत असा ओझरता उल्लेख केलाय. हे कशावरून? त्याच कथेत आधी जेव्हा लोक ब्रह्मा-विष्णू या देवांची आराधना करतात ते देव आर्य की अनार्य? आणि लोकांना देव असे भेटत होते का? याचे काही उत्तर नाही. 


दक्षिणेतल्या एका मुलीचे आदियोगी वर प्रेम बसले. तिच्या बरोबर लग्नासाठी आदियोगी दक्षिणेला निघाला. त्या मुलीच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी छलकपट करून हे लग्न होऊन दिलं नाही. ती मुलगी कुमारीच राहिली. तीच देवी कन्याकुमारी. अशी आख्यायिका दिली आहे. पण इतक्या सामर्थ्यशाली आदियोग्याला हे छलकपट का समजू नये. बरं आधी नाही समजलं तरी जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याने जाऊन मुलीची समजूत का नाही काढली. घरच्यांना शिक्षा का नाही केली? एकदा "आदियोग्याला’ माणूस म्हटलं की हे माणसांसारखी वर्तणूक अपेक्षित नाही का ? पण सद्गुरूंनी त्यांच्या कल्पना सांगाव्यात आणि आपण त्या फक्त ऐकाव्यात अशी पुस्तकाची धारणा असावी.

भारतीय तत्त्वज्ञात ज्या अमूर्त संकल्पना सांगितल्या आहेत त्या हळूहळू नव्या विज्ञानालाही मान्य कराव्या लागत आहेत अशी विधाने करताना उत्क्रांतीवाद, क्वांटम फिजिक्स इ.चा मोघम संदर्भ येतो. पण त्याचीही सखोल चर्चा होत नाही.

फार माहिती आणि नवी दृष्टी न मिळाल्याने पुस्तक कंटाळवाणे होते. मी ते पूर्ण वाचू शकलो नाही. अर्धं वाचलं आणि मग चाळून पूर्ण केले.

थोडक्यात या पुस्तकात आदियोग्याचे माणूसपण, "महादेव" या देवतेच्या पुराणकथा", आणि शिव म्हणजे सर्वव्यापी चिद्‌ तत्त्व ही तात्त्विक संकल्पना यात हव्यातश्या कोलांटी उड्या मारल्या आहेत. जिथे जो सोयीस्कर तो अर्थ घेतला आहे. त्यामुळे रा.चिं.ढेरे किंवा दुर्गाबाई भागवतांच्या लेखना प्रमाणे हे ऐतिहासिक संशोधन वाटत नाही, पुराणातल्या गोड अणि बोधपर गोष्टींचं पुस्तक होत नाही, तत्त्वबोध वाटत नाही आणि आधुनिक विज्ञान व भारतीय तत्त्वज्ञान यांचा तौलनिक अभ्यासग्रंथसुद्धा नाही.




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

प्रवेश (Pravesh)




पुस्तक : प्रवेश (Pravesh)
लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा  : मराठी (Marathi)
पाने : १८९ 
ISBN : दिलेला नाही

मंगला गोडबोले या प्रसिद्ध मराठी कथालेखिकेचा हा कथा संग्रह आहे. मध्यावर्गीय कुटुंबात घडणाऱ्या प्रसंगांवर आधारित या गोष्टी आहेत. सगळ्या कथा फारच छान आहेत. आपल्या नेहमीच्या आयुष्यातूनच काहितरी शिकवणाऱ्या; त्या अनुभवांकडे पोक्तपणे बघण्याची दृष्टी देणाऱ्या या गोष्टी आहेत. 

प्रत्येक कथेबद्दल थोडसं.
प्रवेश : पतीच्या निधनामुळे अस्वस्थ झालेल्या, घरी एकट्याच असणाऱ्या एका मध्यमवयीन स्त्रीच्या या नव्या आयुष्यात होणारा प्रवेश आणि त्याच वेळी तिला सावअणाऱ्या त्यांच्या शेजारणीची लहानग्या नातीचा शाळाप्रवेश.

कळत कसं नाही : घर आणि करियर संभाळणाऱ्या स्त्रीला करावी लागणारी तारेवरची कसरत, तिची होणारी घुसमट मांडणारी कथा.

जवळची माणसं : कथा नायिका महिला आपल्या नातेवाईकांना भेटायला अमेरिकेत जाते. तिची मैत्रीण तिला तिच्या मुलाला -राकेशला भेटून लग्नाला तयार करायला सांगते. जवळचं माणूस असणाऱ्या आईला जो मुलगा आपल्या भावना सांगत नाही तो तिऱ्हाईत व्यक्तीकडे आपलं मन कसं मोकळं करेल? खरंच मग जवळची माणसं म्हणजे काय ? असा प्रश्न पाडणारी कथा.

डाग : श्वेतकुष्ठाचे पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील मुलीच्या लग्नाच्या वेळी येणाऱ्या अडचणी.

एका स्वप्नाचा प्रवास : हौशी कथा लेखकाला पहिलं बक्षिस मिळतं तेव्हा काय होतं. 



हात : बेताच्या परिस्थितीत राहणाऱ्या जोडपं कष्ट आणि काटकसर करून मुलांना मोठं करतं. मुलगाही कर्तृत्त्वान निघतो. यशस्वी आणि श्रीमंत होतो. आणि स्वतंत्रही. लहानपणीचे आपल्यावर अवलंबून असणारे मूल आणि आता स्वतःच्या पायावर उभा असणारा तरूण मुलगा या बदलेल्या भूमिका स्वीकारताना बापाची होणारी अभिमान-कातरता अशी संमिश्र भावना.



पुढची पावलं : एका गरीब मुलीची मैत्रीण श्रीमंत आणि सुंदर असते. साहजिकच शिक्षण, प्रेम, लग्न अशा प्रत्येक बाबतीत ती मैत्रिण नशीबवान ठरत असते. जणू त्या गरीब मुलीच्या एक पाऊल पुढे. या वास्तवाशी ती गरीब मुलगी कशी जमवून घ्यायचा प्रयत्न करते आणि पुढे काय होतं.

ऐलपैल : एका कर्तृत्त्ववान माणसाची दिसायला-वागायला अगदीच बेताची, बुद्धीने थोडी मंद अशी बायको. परिस्थितीमुळे नाईलाजाने झालेलं लग्न. घरात म्हटलं तर स्थान आहे पण मान नाही. अश्या बाईच्या आयुष्यातला एक दिवस

रक्त : सावत्र आईचा जाच, गरीबीमुळे सव्यंग मुलाशी झालेलं लग्न यातून जिद्दीने सावरलेली आणि परिस्थितीचा सूड वेगळ्याच पद्धतीने घेणाऱ्या बाईची गोष्ट.

समीकरण : विक्षिप्त नवऱ्याला सांभाळून घेणारी समंजस बायको.

मागचं बाक : शाळेतल्या आवडत्या बाईंची पंच्याहत्तरी सादर करण्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनी दोन वर्गमैत्रिणी एकत्र भेटतात, जुन्या आठवणी ताज्या होतात, शाळेसाठी काहितरी करायचं ठरवतात. या गप्पा गोष्टींतून त्यांच्या त्यांच्या संसाराच्या तऱ्हा आणि करावी लागणारी तडजोडही एकेमेकींना समजते.

लक्षात आलं असेलच की प्रसंग अगदी आपल्या आजूबाजूला घडणारे आहेत. पण प्रसंग तेच असले तरी ते मांडायच्या शैलीमुळे तोच तो पणा एकाही कथेत येत नाही. ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यातल्या प्रमुख पात्रंच्या भावभावनांशी आपण समरस होतो. ही व्यक्तिचित्रं नसली तरी प्रमुख पात्रांची व्यक्तीरेखा आपल्या डोळ्यासमोर अशी उभी राहते की त्याच प्रकारचं व्यक्तिमत्व असणाऱ्या आपल्या ओळखीच्या कोणालातरी आपण तिथे बघतो. आणि विचार करतो की खरंच त्याच्या बाबतीतही असंच घडत असेल तेव्हा त्याला खरंच कसं वाटलं असेल. 
उदा. कथेतल्या या वृद्ध शिक्षिकेशी त्यांच्या माजी विद्यार्थिनींचा संपर्क बघून तुम्हालाही तुमच्या अशा सोज्वळ, विद्यार्थिप्रिय शिक्षकाची आठवण येईल.



श्री. दिवाण या विक्षिप्त माणसाचे प्रसंग वाचताना डोक्यात रख घालून वावरणारी तुमच्या ओळखीची माणसं तुम्हाला दिसतील.


तुमच्या घरातल्या लहानग्यांचे शाळेतले पहिले काही दिवस, त्यांचं ते रडणं यांची आठवण करून देणारा हा प्रसंग

मंगेश पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे "मला माणूस समजून घ्यायचाय" असं ज्याला वाटतं, त्याला असे कथासंग्रह म्हणजे मेजवानीच आहे. 

मंगलाताईंची त्यांची भाषा शैली मला विशेष भावते. काही विस्मृतीत जाणाऱ्या तर काही नव्या घडवलेल्या वाक्प्रचारांचा वापर, चपखल शब्द योजना, खटकेदार संवाद यातून रोजची भाषासुद्धा किती गोड, अर्थवाही, ताकदीची असू शकते हे जाणवतं. सध्याच्या भाषा भेसळीच्या युगात असे सकस संवाद वाचायला मिळणं हा भाषाप्रेमींच्या दृष्टीने अजून एक आनंददायी विषय आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



आचार्य द्रोण (Acharya Dron)

पुस्तक : आचार्य द्रोण  (Acharya Dron)
लेखक : अनंत तिबिले (Anant Tibile)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३८४ 
ISBN : दिलेला नाही

हे पुस्तक महाभारतातील द्रोण या व्यक्तिरेखेची चरित्रात्मक कादंबरी आहे. द्रोणांचं चरित्र बहुतेक सगळ्यांना माहिती असेलच. थोडक्यात त्यांचा जीवनक्रम असा आहे :

भरद्वाज ऋषी घृता नवाच्या अप्सरेच्या प्रेमात पडतात आणि त्यांचा मुलगा होतो तो म्हणजे द्रोण. अप्सरा असल्यामुळे घृताला पृथ्वीलोकावर फार काळ रहणं शक्य नसतं. म्हणून द्रोणाचा जन्म झाल्याझाल्या ती त्याला आश्रमात सोडून निघून जाते. मातृसुखाला पारख्या झालेल्या द्रोणाचा संभाळ त्याचे वडील प्रेमाने करतात. त्यांच्या आश्रमातच द्रोण आणि पांचाल देशाचा राजकुमार द्रुपद यांची मैत्री होते. पुढे मोठे झाल्यावर द्रुपद राजा होतो तर द्रोण आपल्या वडिलांप्रमाणे गुरुकुल चालवणारा अध्यापक ऋषी. स्वतःच्या संन्यन्स्त आणि निरिच्छ वृतीमुळे ते गरीबीतच जगतात. पण पत्नी आणि मुलाला होणार त्रास बघून ते द्रुपदाची मदत घेण्यासाठी जातात. तेव्हा द्रुपद त्यांना मित्र म्हणून स्वीकारत तर नाहीच उलट निर्धन, लोचट ब्राह्मण म्हणून अपमानित करतो. द्रुपदाला धडा शिकवण्यासाठी, त्याचा संपत्तीचा गर्व हरण्यासाठी आपल्या शिष्यांकरवी त्याचा पराभव करतात. त्यामुळे द्रुपद अजूनच चिडतो आणि द्रोणांना मारण्यासाठी यज्ञ करून एका पुत्राची प्राप्ती करतो - तो म्हणजे धृष्टद्युम्न. तरी मैत्रीचं नाटक करून द्रुपद द्रोणांनाच त्याचा गुरू बनवतो. शेवटी महाभारत युद्धात धृष्टद्युम्न द्रोणांचा वध करतो. 

द्रोणपुत्र अश्वत्थाम्याला द्रोणांच्या गरिबीमुळे पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून प्यावं लगलं, द्रोणांचा शिष्योत्तम अर्जुन धनुर्विद्येच्या परीक्षेत "मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो" म्हणाला, द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून अंगठा मागून घेतला, युद्धाच्या वेळी युधिष्ठिराने "अश्वत्थामा मेला; "नरो वा कुंजरो" असं सांगितल्यामुळे द्रोणांनी आपला मुलगा मेला असं समजून शस्त्र खाली ठेवली इ. नेहमी उद्धृत होणाऱ्या गोष्टी आहेतच.

एकूणच "द्रोण" या व्यक्तिरेखेवरची कादंबरी वाचायला हातात घेताना हा सगळा माहितीचा भागच पुन्हा वाचायला लागेल; कदाचित दोन-तीन न महितीची उपकथानकं, चमत्कार वगैरे अजून समजतील असं मनाशी धरलंच होतं. त्यामुळे द्रोणांच्या चरित्राच्या माहितीपेक्षा ही पात्रं कशी रंगवली आहेत, त्यांचे राग-लोभ-द्वेष-शक्ती-भक्ती यांचे ताणेबाणे कसे विणले आहेत, नाट्य डोळ्यासमोर कसं उभं रहतं याचा अनुभव घेणं याची जास्त उत्सुकता होती. पण या बाबतीत ही कादंबरी पूर्णपणे अपयशी ठरते.

त्रयस्थ निवेदकाच्या निवेदनातून कथानक पुढे सरकलं तरी द्रोण या पात्राशिवाय कुठल्याच महत्त्वाच्या पात्राच्या मनात शिरून त्यांची भूमिका मांडली जात नाही. द्रोणाचे मनोव्यापार मांडताना सुद्धा; मी दुर्दैवी आहे, माझा मित्र द्रुपद मला नकारतो आहे, मी निरीच्छ वृत्ती स्वीकारल्यामुळे माझ्या बायको-मुलाला गरिबीत जगावं लागतं हेच पुन्हा पुन्हा लिहिण्यात पानंच्या पानं घालवली आहेत. अश्वत्थामा, दृपद, धृष्टद्युम्न हे या कथानकातले प्रतिनायक. ते तसे का वागले याचं काहीच चित्रण नाही.

एकलव्याचा अंगठा मगितला, "नरो वा कुंजरो वा"चा प्रसंग, द्रोणाने कौरवंना साथ केली असले प्रसंग अगदीच कोरडेपणे, "जताजाता सांगून जातो" थाटात मांडले आहेत. द्रोणपत्नीच्या तोंडी तर "मी हिंदू स्त्री; पतिच्या सुखात सुख मानणारी .." प्रकारची वक्य. "हिंदू" शब्द महाभारतकालीन आहे ? निर्धन म्हणून आजूबाजूच्या धनिक व्यक्तींनी त्यांचा अपमान केला असा उल्लेख कादंबरीत सारखा येतो. पण कोणी आणि का अपमान केला तो प्रसंग येत नाही. ज्याकाळात तपस्वी, मुनी, संन्यासी हा प्रकार समाजात सतत दिसतो तिथे धनिक लोकांन द्रोण हे का गरीब अहेत हे ठवूक असणार. जगविख्यात गुरू अहेत हे ठावूक असणारच न? मग ते अपमान कशाला करतील? हा प्रश्न पडतो. 

उदाहरणादाखल ही दोन पाने वाचा. 

एकलव्याच्या अंगठ्याचा प्रसंग. अंगठ्यामागचा काहीतरी भलताच तर्क अर्धवट दिला आहे.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)



अश्वत्थामा म्हणे द्रोणाचार्यांशी सख्य ठेवून नव्हता. त्याबद्दल हे एवढेच:


नरो-वा-कुंजरो वा


कौरव-पांडवांच्या कथेमध्ये द्रोणाचं पात्र मध्यवर्ती नाही तरीही ते सतत आहे. त्यामुळे द्रोण मध्यवर्ती असणाऱ्या या कादंबरीत महाभारतातले इतर प्रसंग ओझरते येतात पण त्यामुळे चरित्रातली सलगता जाऊन या प्रसम्गातून त्या प्रसंगात उड्या मारणं होतं आणि मजा जाते. कृष्णासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीरेखेचा उल्लेख जेमतेम एखाददा येतो. द्रोणांशी तर त्याचा कही संबंधच येत नाही.

थोडक्यात, जर द्रोणांबद्दल, महाभारताबद्दल प्राथमिक माहिती असेल तर ही कादंबरी वाचायची गरज नाही. आणि माहिती नसेल तरी इतकं मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा या विषयावरचं दुसरं पुस्तकं वाचणं श्रेयस्कर.
दिलेला नाही.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


Thick as thieves (थिक अ‍ॅज थीव्ज)




पुस्तक : Thick as thieves (थिक अ‍ॅज थीव्ज)
लेखक : Ruskin Bond (रस्किन बॉंड)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २०८
ISBN : 9780143332480

रस्किन बॉंड या ब्रिटिश वंशाच्या पण भारतात जन्मून इथेच आयुष्य घालवणाऱ्या लेखकाचे हे पुस्तक आहे. या लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.




अनुक्रमणिका:


हे पुस्तक लेखकाच्या आठवणी रूप गोष्टींचं आहे. बहुतेक आठवणी त्याच्या लहानपणाच्या आहेत. एका इंग्रज मुलाचं भारतातील बालपण त्याच्या नजरेतून बघता येईल अशा अपेक्षेने मी हे पुस्तक विकत घेतलं होतं. पण कथांमधला मुलगा इंग्रज आहे म्हणून भारतीय मुलांमध्ये वावरताना फार फरक पडतो असं वाटत नाही. गावात वाढलेल्या कोणच्याही लहानपणच्या आठवणी अशाच असतील. मुलं मुलं एकत्र येऊन होळी-रंग खेळलो, मित्राच्या वडिलांच्या बदलीमुळे मित्र गाव सोडून गेला, बालपणीचा मित्र खूप वर्षं भेटला नाही आणि काही वर्षांपूर्वीच तो वारल्याचं कळलं इ. प्रसंग येतात. त्यात वेगळेपणा काही नाही, प्रसंग रंगवलेत असं नाही, व्यक्तिचित्रणही खास नाही की परिसरवर्णनही. त्यामुळे पुस्तक कंटाळावाणं होतं. मी काही पूर्ण वाचू शकलो नाही.

उदा. लेखक तरूणपणी काही वर्षं इंग्लंडला गेला. तिकडे तो एकटा खोलीत राहायचा. त्याच्या खोलीत उंदीर येऊ लागले. एकटेपणा घालवण्यासाठी तो त्यांना खायला घालायला लागला. ते पण खायला येऊ लागले. काही दिवसांनी त्याने खोली सोडली. अशा आशयाची ही गोष्ट वाचा.



आता यात लिहिण्यासारखं काय होतं मला कळलं नाही. असलं स्वान्त:सुखाय लेखन हल्ली ब्लॉग, फेसुक स्टेटस, व्हॉटसप-लेख वरसुद्धा फार कोणी फॉरवर्ड करणार नाही. इथे तर पुस्तक छापून प्रकाशित केलं आहे. पुलंच्या एका कथनातलं एक वाक्य आठवलं "मोठे लोकही काही वेगळं सांगतात असं नाही. पण ते मोठे असतात हे महत्त्वाचं".

हे पुस्तक वाचताना त्यामुळे रुड्यार्ड किपलिंग ह्यांच्या "किम" कादंबरीची आठवण झाली. ब्रिटिश मुलाचं भारतातलं बालपण, १०० वर्षांपूर्वीचा भारत आणि त्या मुलाचा साहसी प्रवास अनुभवायचा असेल तर "किम" ही कादंबरी उत्कृष्ट आहे. 

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...