प्रवेश (Pravesh)




पुस्तक : प्रवेश (Pravesh)
लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा  : मराठी (Marathi)
पाने : १८९ 
ISBN : दिलेला नाही

मंगला गोडबोले या प्रसिद्ध मराठी कथालेखिकेचा हा कथा संग्रह आहे. मध्यावर्गीय कुटुंबात घडणाऱ्या प्रसंगांवर आधारित या गोष्टी आहेत. सगळ्या कथा फारच छान आहेत. आपल्या नेहमीच्या आयुष्यातूनच काहितरी शिकवणाऱ्या; त्या अनुभवांकडे पोक्तपणे बघण्याची दृष्टी देणाऱ्या या गोष्टी आहेत. 

प्रत्येक कथेबद्दल थोडसं.
प्रवेश : पतीच्या निधनामुळे अस्वस्थ झालेल्या, घरी एकट्याच असणाऱ्या एका मध्यमवयीन स्त्रीच्या या नव्या आयुष्यात होणारा प्रवेश आणि त्याच वेळी तिला सावअणाऱ्या त्यांच्या शेजारणीची लहानग्या नातीचा शाळाप्रवेश.

कळत कसं नाही : घर आणि करियर संभाळणाऱ्या स्त्रीला करावी लागणारी तारेवरची कसरत, तिची होणारी घुसमट मांडणारी कथा.

जवळची माणसं : कथा नायिका महिला आपल्या नातेवाईकांना भेटायला अमेरिकेत जाते. तिची मैत्रीण तिला तिच्या मुलाला -राकेशला भेटून लग्नाला तयार करायला सांगते. जवळचं माणूस असणाऱ्या आईला जो मुलगा आपल्या भावना सांगत नाही तो तिऱ्हाईत व्यक्तीकडे आपलं मन कसं मोकळं करेल? खरंच मग जवळची माणसं म्हणजे काय ? असा प्रश्न पाडणारी कथा.

डाग : श्वेतकुष्ठाचे पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील मुलीच्या लग्नाच्या वेळी येणाऱ्या अडचणी.

एका स्वप्नाचा प्रवास : हौशी कथा लेखकाला पहिलं बक्षिस मिळतं तेव्हा काय होतं. 



हात : बेताच्या परिस्थितीत राहणाऱ्या जोडपं कष्ट आणि काटकसर करून मुलांना मोठं करतं. मुलगाही कर्तृत्त्वान निघतो. यशस्वी आणि श्रीमंत होतो. आणि स्वतंत्रही. लहानपणीचे आपल्यावर अवलंबून असणारे मूल आणि आता स्वतःच्या पायावर उभा असणारा तरूण मुलगा या बदलेल्या भूमिका स्वीकारताना बापाची होणारी अभिमान-कातरता अशी संमिश्र भावना.



पुढची पावलं : एका गरीब मुलीची मैत्रीण श्रीमंत आणि सुंदर असते. साहजिकच शिक्षण, प्रेम, लग्न अशा प्रत्येक बाबतीत ती मैत्रिण नशीबवान ठरत असते. जणू त्या गरीब मुलीच्या एक पाऊल पुढे. या वास्तवाशी ती गरीब मुलगी कशी जमवून घ्यायचा प्रयत्न करते आणि पुढे काय होतं.

ऐलपैल : एका कर्तृत्त्ववान माणसाची दिसायला-वागायला अगदीच बेताची, बुद्धीने थोडी मंद अशी बायको. परिस्थितीमुळे नाईलाजाने झालेलं लग्न. घरात म्हटलं तर स्थान आहे पण मान नाही. अश्या बाईच्या आयुष्यातला एक दिवस

रक्त : सावत्र आईचा जाच, गरीबीमुळे सव्यंग मुलाशी झालेलं लग्न यातून जिद्दीने सावरलेली आणि परिस्थितीचा सूड वेगळ्याच पद्धतीने घेणाऱ्या बाईची गोष्ट.

समीकरण : विक्षिप्त नवऱ्याला सांभाळून घेणारी समंजस बायको.

मागचं बाक : शाळेतल्या आवडत्या बाईंची पंच्याहत्तरी सादर करण्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनी दोन वर्गमैत्रिणी एकत्र भेटतात, जुन्या आठवणी ताज्या होतात, शाळेसाठी काहितरी करायचं ठरवतात. या गप्पा गोष्टींतून त्यांच्या त्यांच्या संसाराच्या तऱ्हा आणि करावी लागणारी तडजोडही एकेमेकींना समजते.

लक्षात आलं असेलच की प्रसंग अगदी आपल्या आजूबाजूला घडणारे आहेत. पण प्रसंग तेच असले तरी ते मांडायच्या शैलीमुळे तोच तो पणा एकाही कथेत येत नाही. ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यातल्या प्रमुख पात्रंच्या भावभावनांशी आपण समरस होतो. ही व्यक्तिचित्रं नसली तरी प्रमुख पात्रांची व्यक्तीरेखा आपल्या डोळ्यासमोर अशी उभी राहते की त्याच प्रकारचं व्यक्तिमत्व असणाऱ्या आपल्या ओळखीच्या कोणालातरी आपण तिथे बघतो. आणि विचार करतो की खरंच त्याच्या बाबतीतही असंच घडत असेल तेव्हा त्याला खरंच कसं वाटलं असेल. 
उदा. कथेतल्या या वृद्ध शिक्षिकेशी त्यांच्या माजी विद्यार्थिनींचा संपर्क बघून तुम्हालाही तुमच्या अशा सोज्वळ, विद्यार्थिप्रिय शिक्षकाची आठवण येईल.



श्री. दिवाण या विक्षिप्त माणसाचे प्रसंग वाचताना डोक्यात रख घालून वावरणारी तुमच्या ओळखीची माणसं तुम्हाला दिसतील.


तुमच्या घरातल्या लहानग्यांचे शाळेतले पहिले काही दिवस, त्यांचं ते रडणं यांची आठवण करून देणारा हा प्रसंग

मंगेश पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे "मला माणूस समजून घ्यायचाय" असं ज्याला वाटतं, त्याला असे कथासंग्रह म्हणजे मेजवानीच आहे. 

मंगलाताईंची त्यांची भाषा शैली मला विशेष भावते. काही विस्मृतीत जाणाऱ्या तर काही नव्या घडवलेल्या वाक्प्रचारांचा वापर, चपखल शब्द योजना, खटकेदार संवाद यातून रोजची भाषासुद्धा किती गोड, अर्थवाही, ताकदीची असू शकते हे जाणवतं. सध्याच्या भाषा भेसळीच्या युगात असे सकस संवाद वाचायला मिळणं हा भाषाप्रेमींच्या दृष्टीने अजून एक आनंददायी विषय आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...