पुस्तक : Why I am a Hindu (व्हाय आय अॅम अ हिंदू)
लेखक : Shashi Tharoor (शशी थरूर)
भाषा : English इंग्रजी
पाने : ३०२
ISBN : 978-93-86021-10-6
काँग्रेसचे खासदार, विद्वान आणि वादग्रस्त नेते शशी थरूर यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व यावर या पुस्तकातून भाष्य केले आहे.
शशी थरूर यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :
पुस्तकाचे दोन भाग आहेत पहिला भाग हिंदूधर्म किंवा हिंदू संस्कृती यांना वाहिलेला आहे; तर दुसऱ्या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपप्रणित हिंदुत्वाच्या राजकारणाचा विचार केलेला आहे.
अनुक्रमणिका:
लेखक पुस्तकाची सुरुवात "मी हिंदू का आहे" या प्रश्नापासून करतो. त्याचे उत्तर "तो हिंदू कुटुंबात जन्माला आला म्हणून तो हिंदू आहे" असे आहे. त्याला लहानपणी धर्माची ओळख कशी झाली; त्यांच्या घरात खुलं वातावरण कसं होतं; तीर्थयात्रा-देवपुजा हे सगळं चालू असतानाही प्रथापरंपरांबद्दल खुलेपणा कसा होता; त्यामुळे धर्माकडे बघण्याची मोकळी दृष्टी, चिकित्सक वृत्ती त्याच्यात आली हे त्याने सांगितलं आहे.
मग तो हिंदू आहे म्हणजे नक्की काय? किंवा इतर कुठलीही व्यक्ती स्वतःला हिंदू म्हणते म्हणजे काय? या प्रश्नावर प्रदीर्घ चिंतन सुरू होतं. हिंदू धर्माचा एकच एक प्रेषित नाही, संस्थापक नाही. हिंदू धर्माचा एकच एक सर्वमान्य ग्रंथ नाही की एकच एक देवता नाही. एकच एक उपासनापद्धती नाही. त्यामुळे हिंदू असणाची व्याख्या करणे कसं कठीण आहे हे लेखकाने सुस्पष्ट केलेलं आहे. हिंदु धर्माच्या प्रत्येक अंगाचा सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. हिंदूंमध्ये वेगवेगळ्या देवता आहेत पण तरीही हिंदू धर्मीय एकाच एक परमेश्वराला असे मानतात आणि त्या अर्थी ते एकेश्वरवादी कसे आहेत हे तथ्य विशद केलं आहे.
हिंदूंचा उपासना पद्धती किती वेगवेगळ्या आहेत, किती परस्परविरोधी आहेत आणि त्यामुळे ते सर्वसमावेशक आहेत हे मांडले. हिंदू धर्माचा विस्तार होताना स्थानिक आदिवासी प्रथांचाही त्यात सहज समावेश झाला. त्याभोवती आवश्यक ती कथा-संकल्पना यांची मांडणी करून हिंदू संस्कृतीशी समरस झाल्या. वेद, उपनिषदे, रामायण-महाभारत, भगवद्गीता या ग्रंथांमध्ये श्रुती-स्मृती-पुराण-इतिहास हे चार प्रकार कसे केले जातात; धार्मिक निवाडा करताना त्यांचे प्रमाण कसे मानले जाते; काही स्मृती परस्परविरोधी कशा आहेत आणि स्मृती मधल्या नियमांमध्ये वेळोवेळी कसे बदल केले गेले हा इतिहास सुद्धा सांगितला आहे. हिंदू धर्माच्या रूढी-परंपरांवर प्रश्न विचारणारे त्यात बदल घडवू पाहणारे बौद्ध, जैन तत्वज्ञान आणि त्याचा झालेला परिणाम याचा गोषवारा आहे.
उदा. धर्मग्रंथांकडे बघण्याचा हिंदूंचा दृष्टिकोन या बद्दल
जेव्हा मुसलमानी आक्रमणाच्या वेळी देवळांचा विध्वंसक काही प्रमाणात झाला, खुलेपणाने धर्माचरण करणं कठीण झालं अशावेळी भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून कर्मकांड विरहित धर्मपद्धती कशी मांडली गेली आणि त्यातून हिंदू धर्म कसा टिकला याचे सुंदर विश्लेषण केलेला आहे.
लेखकाने हिंदू धर्मातल्या जातिव्यवस्थेवर काही विचार मांडले आहेत. त्याचं असं म्हणणं आहे की ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी या समाजाला कप्प्यांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातून जातीव्यवस्था आज दिसते तशी रूढ झाली. त्याआधी ती तशी नव्हती. लेखकाच्या दुसर्या एका पुस्तकात त्यावर त्यांनी सविस्तर लिहिले आहे.
जन्म-मृत्यू पुनर्जन्म, मागच्या जन्मातल्या पापपुण्यामुळे या जन्मात मिळणारी सुखदुःखे याच्यामागे काय तर्क असेल? ते खरंच ऋषींनी मांडलेलं तत्त्वज्ञान असेल का उच्चवर्णीयांनी मांडलेलं तत्त्वज्ञान असेल याबद्दल थोडी चर्चा आहे.
ज्यांनी हिंदू धर्मावरती मोठा प्रभाव टाकला; हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे काम केलं असे आदिशंकराचार्य, संत रामानुज, आधुनिक सुधारक राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची चांगली ओळख करून दिली आहे. महात्मा गांधींचा धर्मविचार, गोहत्येला विरोध असूनही गोहत्याबंदी लादण्याला विरोध हे समजावून सांगितले आहे.
एकूणच पुस्तकाच्या पहिल्या भागात हिंदू तत्वज्ञान हिंदू संस्कृती यांचं मोठेपण सर्वसमावेशकता यांचा गौरव सप्रमाण आणि सोदाहरण केलेला आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग हिंदुत्व आणि त्यावर आधारित रा. स्व. संघ, जनसंघ आणि भाजप यांचे राजकारण राजकारण यांचे विश्लेषण करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाची काय संकल्पना मांडली; त्या कल्पनेत अंतर्विरोध कसे आहेत याबद्दल लेखकाने मतप्रदर्शन केले आहे. पुढे गोळवलकर गुरुजींच्या भाषणातून पुस्तकातून त्यांनी - हिंदू या देशाचे प्रथम नागरिक आणि बाकीचे दुय्यम नागरिक - ही भूमिका कशी मांडली हे समजावून दाखवून दिलं आहे. कुठलीही उपासनापद्धती गौण न मानणारा, सर्वांना सामावून घेणारा हिंदूधर्म आणि हिंदुत्व किती वेगळं आहे हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या उदाहरणातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.
भारतीय जनता पक्ष ज्यांना अतिशय आदराचे स्थान देतो असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जो "एकात्म मानववादाचा" सिद्धांत मांडला. त्यात ते खूप आदर्शवादी भूमिका घेतात कारण त्यावेळी जनसंघाला राजकीय स्थान नसल्यामुळे या कल्पना सत्यात उतरवण्याची जबाबदारी त्यांची नव्हती असं लेखकाचं मत पडतं. असा सिद्धांत मांडणारे उपाध्यायसुद्धा हिंद्वेतर लोकांनी हिंदू संस्कृतीशी, हिंदू जीवनपद्धतीशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे, मिसळून घेतले पाहिजे, त्याप्रमाणे वागले पाहिजे असाच आग्रह करतात असे त्याचे निरीक्षण आहे.
भारतीय जनता पक्ष ज्यांना अतिशय आदराचे स्थान देतो असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जो "एकात्म मानववादाचा" सिद्धांत मांडला. त्यात ते खूप आदर्शवादी भूमिका घेतात कारण त्यावेळी जनसंघाला राजकीय स्थान नसल्यामुळे या कल्पना सत्यात उतरवण्याची जबाबदारी त्यांची नव्हती असं लेखकाचं मत पडतं. असा सिद्धांत मांडणारे उपाध्यायसुद्धा हिंद्वेतर लोकांनी हिंदू संस्कृतीशी, हिंदू जीवनपद्धतीशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे, मिसळून घेतले पाहिजे, त्याप्रमाणे वागले पाहिजे असाच आग्रह करतात असे त्याचे निरीक्षण आहे.
उपाध्यायांवरचे एक पान :
गोहत्या केल्याच्या संशयावरून व्यक्तींना झालेल्या मारहाणीच्या घटनांतून आक्रमक हिंदुत्व कसं पसरत आहे हे दाखवलं आहे. कुठलाही नवीन वैज्ञानिक शोध पुढे आला की हे ज्ञान आमच्या वेदांमध्ये आधीच आहे, आमच्या जुन्या ग्रंथांमध्ये आधीच आहे, असं सांगण्याचा काही लोक पाळतात ते कसं मूर्खपणाचं आहे. पूर्वी आपल्याकडे भरपूर ज्ञान होतं याबद्दल लेखकाचे ही दुमत नाही. त्याने स्वतःच तशी उदाहरणे दिली आहेत. पण आपल्या ज्ञानावर अधिक मेहनत न घेता केवळ वरवरचे पूर्वजांचे गोडवे गाण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे.
भारतावर मुसलमानी राजवट होती, ब्रिटिश राजवट होती हे खरे आणि त्यांनी अन्याय अत्याचार केले हे देखील खरे. बाबर बाहेरून भारतात आला पण पुढच्या सगळ्या पिढ्या इथेच जन्माला आल्या आणि मेल्या. इथल्याच झाल्या. त्यांनी लुटलूट केली असेल तरी इथेच खर्च केली. आधिच्या आक्रमकांप्रमाणे आणि ब्रिटिशांप्रमाणे ती मायदेशी नेली नाही. त्यामुळे मुघल राजवटीला भारतीय राजवटच समजलं पाहिजे. असा थरूर यांचा तर्क आहे. औरंगजेबाने "काही" देवळे पाडली असतील तर ती राजकारणासाठी. बाकी अनेक देवळांना त्याने मदत केली आणि अनेक देवळे शाबूत राहिली. सामुहिक धर्मांतर फार मोठ्या प्रमाणावर झालं नाही. बहुतांश देश हिंदूच राहिला असे त्याचे निरीक्षण आहे. हिंदुत्ववादी राजकारणी त्याचे खूप आक्रस्ताळेपणाने, अतिरंजित चित्र रंगवतात असं त्याचं म्हणणं आहे.
औरंगजेबाबद्दलचे तर्कशास्त्र :
त्यामुळे पुस्तक वाचल्यावर पहिल्या भागात हिंदुधर्माच्या सर्व चांगल्या सकारात्मक बाजू आणि दुसर्या भागात हिंदुत्ववादाच्या फक्त नकारात्मक बाजू लेखकाने मांडले आहेत असं वाटतं. या दोन गोष्टींमधली महत्त्वाची कडी, महत्त्वाचा दुवा पुस्तकात राहून गेला असं वाटतं. जर हिंदू धर्म धर्मातल्या जाती व्यवस्था हा प्रकार सोडला तर त्यातल्या कमतरता वा कच्चे दुवे लेखकाने फार लक्षात घेतलेले नाहीत. स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूकीबद्दल फार चर्चा नाही. हिंदू धर्मानुयायी इतके परिपक्व होते तर शतकानुशतके परकीय आक्रमण आणि गुलामी आपल्याला का झेलावी लागली यावर चर्चा नाही. हिंदू धर्म महान आहे हे तो पुन्हा पुन्हा सांगतो. तर मग इतर मंडळी धर्मप्रसार करतात त्याप्रमाणे हिंदू धर्माचा प्रसार करायला कोणी का जाऊ नये? त्याला लेखकाचा विरोध का? असा प्रश्न आपल्याला पडतो.
तसेच दुसऱ्या भागात हिंदुत्ववाद्यांच्या फक्त नकारात्मक बाजू वर चर्चा आहे. संघ परिवारातले असंख्य स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि कितीतरी संस्था वर्षानुवर्षे शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, दारिद्र्य निर्मूलन अशा नाना क्षेत्रात काम करत आहेत. त्याची पुसटशी दखल लेखकाने घेतलेली नाही. हिंदुत्ववाद्यांना तो आक्रमक म्हणतो. पण असा आक्रमकपणा आणला पाहिजे असं सावरकर, गोळवलकर, हेडगेवार इत्यादींना का वाटलं असेल हे तो मांडत नाही. ज्या ज्या वेळी हिंदू धर्मावर दुसऱ्या तत्त्वज्ञानाचं किंवा परकीय आक्रमणाचं वादळ आलं तेव्हा हिंदू धर्माने स्वतः योग्य बदल घडवत स्वतःचं अस्तित्व टिकलं अशी संगती त्याने लावली आहे. मग त्याच न्यायाने धर्माच्या आधारावर देशाची फाळणी, स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेसच्या राजकारणाचा परिणामस्वरूप हिंदू समाजाने हे आक्रमक स्वरूप धारण केलं असेल का? हा प्रश्न तो स्वतःला, स्वतःच्या पक्षाला विचारत नाही. काही दंगलींचा पुस्तकात उल्लेख आहे त्यात तो भाजप नेत्यांची नावे अवश्य घेतो पण शिखांच्या दंगलीच्या वेळी मात्र "काँग्रेसशी संबंधित काही लोक" असा मोघम उल्लेख का?
शशी थरूर यांची राजकीय आणि वैयक्तिक मत बाजूला ठेवली तरी त्यांचा या विषयातला अभ्यास आणि व्यासंग नाकारण्यासारखा नाही. त्यांनी दिलेली माहिती, भारताच्या इतिहासात-तत्वज्ञानात झालेले बदल याची माहिती बहुतांश हिंदू धर्मियांनाही नसते. "हिंदू म्हणजे काय" याचं उत्तर देणं सर्वसामान्यांसाठी कठीण आहेच. इतकंच काय हे उत्तर का कठीण आहे हेसुद्धा अनेकांना सांगता येणार नाही. त्यामुळे पुस्तकातून प्रत्येकाला काहीना काहीतरी नवीन माहिती मिळेल.
हिंदुत्ववाद्यांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे कारण त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचा सकारात्मक विचार करून स्वतःत योग्य बदल घडवणे हेच त्या विचारधारेसाठी आणि भारतासाठी ही आवश्यक आहे.
हिंदुत्ववादाचा आंधळा विरोध करणाऱ्यांनी सुद्धा आधी हिंदू धर्म समजून घेतला पाहिजे. त्यासाठी हे पुस्तक चांगली सुरुवात ठरेल.
इतर धर्मीय लोक हिंदूंना आपल्या धर्मात घेण्यासाठी येनकेनप्रकारेण प्रयास करतात त्यांनीही हे पुस्तक वाचलं तर आपणच काय चूक करत आहोत हे त्यांना लक्षात येईल.
जाता जाता पुस्तकाच्या भाषेवर एक टिप्पणी. शशी थरूर हे खूप उच्च दर्जाचं इंग्रजी बोलण्याबद्दल, लिहिण्याबद्दल व खूप कठीण, अपरिचित शब्द वापरण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. एखादं साधं वाक्यसुद्धा ते किती क्लिष्ट पद्धतीने लिहू शकतात याचे विनोद नेहमी फिरत असतात. पण पुस्तक वाचताना फार कमीवेळा अशी विनाकारण क्लिष्टता दिसली. बरेच नवीन इंग्रजी शब्द कळले. पण कुठलंही इंग्रजी पुस्तक वाचताना ते होतंच. त्यामुळे थरूरांच्या भाषेला घाबरून कोणी हे पुस्तक न वाचायचं ठरवलं असेल तर निर्णय बदला.
म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे आपले ज्ञान वाढवावे. हे पुस्तक वाचन हा एक चांगला बौद्धिक व्यायाम आहे.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------