दुस्तर हा घाट आणि थांग (Dustar ha ghat ani thang)


पुस्तक - दुस्तर हा घाट आणि थांग (Dustar ha ghat ani thang)
लेखिका - 
गौरी देशपांडे (Gauri Deshpande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६४
ISBN - दिलेला नाही
प्रकाशन वर्ष - १९८९


"गौरी देशपांडे" हे नाव खूप वेळा ऐकलं होतं म्हणून त्यांचं लेखन वाचायची बरेच दिवस इच्छा होती. या वेळी वाचनालयात त्यांची पुस्तके दिसली. सदर पुस्तकात त्यांच्या दोन कादंबऱ्या आहेत. "दुस्तर हा घाट" आणि "थांग".

"दुस्तर हा घाट" ची कथा साधारण अशी - नमू ही मध्यमवर्गीय घरात आईवडिलांशीवाय नातेवाईकांकडे वाढलेली मुलगी. इंग्रजीत हुशार. त्यामुळे कॉलेजच्या इंग्रजाच्या प्राध्यापकांची लाडकी. प्राध्यापकांच्या घरी येण्याजण्यातून त्यांच्या मुलाशी ओळख होते. त्याला ती आवडते आणि त्यांचं लग्न होतं. मोठ्या बँकेत मोठ्या हुद्द्यावर असतो. सतत फिरती, कॉन्फरन्स मुळे बाहेर देशात जाणं येणं, परदेशी मित्र मैत्रिणी. त्यात तो हुशार, देखणा, सगळ्या कलांमध्ये रस घेणारा, मुलींवर आपल्या बोलण्याने छाप पाडणारा (टिपिकल हिरो). त्याची बाहेर लफडी आहेत हे नमुला लग्नानंतर कळतं. त्याला सोडून जायचं कुठे ? असं तिला वाटतं. त्याच्यापासून दूर गावाला जाऊन राहायचा प्रयत्न करते. तेव्हा त्याच्या पूर्वायुष्यातील काही दुर्दैवी घटना तिला सासाऱ्यांकडून कळतात. शेवटी ती शरीराने मनाने त्याची बायकोच राहते. थोडीफार दुखावलेली.

एकूण ह्या कथेत काही नाट्य नाही. काही काही भावनांचे चढ उतार आहेत असं नाही. नुसते प्रसंग घडत जातात. सपकपणे. त्यात तोंडी लावायला शेक्सपिअर वगैरे उल्लेख आहेत आणि वातावरणनिर्मितीचा प्रयत्न म्हणून; परदेशी कलाकारांचं संगीत वाजतंय आणि नायक-नायिकेच्या राग लोभ अश्या भावना साथीला आहे असलं बेगडी वर्णन आहे. 

नमूला तिच्या नवऱ्याबद्दल त्याच्या मित्राच्या बायकोकडून कळतं तो प्रसंग


वनमाळीचं व्यक्तिमत्त्व असं की जणू त्याची लफडी असणं ह्यात काही विशेष नाही. त्याची बायको हे कसं सांभाळेल ही त्याच्या स्त्री सहकाऱ्यांना काळजी. त्याची असिस्टंट "जरु" आणि नमू मधला एक संवाद.थांग - ही कादंबरी दुसरं टोक मांडणारी. म्हणजे बाईची लफडी.
पुन्हा तेच. सर्वगुणसंपन्न नायक. त्याची साधी बायको. श्रीमंत वर्तुळात परदेशात स्थायिक. त्याचे सहकारी परदेशी, आकर्षक व्यक्तीमत्वांचे. 
पुस्तक वाचताना असं जाणवतं की मोठ्या पदावर असले तरी जॉब हे जणू त्याचं दुय्यम काम आहे. मुख्य काम म्हणजे पार्ट्या करणं आणि त्यात दुसऱ्यांच्या बायकांवर लाईन मारणं. गोडगोड बोलून शरीरसंबंध साधणं. नायिकेला पण हे सगळं आवडतं. लगेच पडली एक दोघांच्या प्रेमात. केली मजा. मग अचानक तिला वाटायला लागतं की नवऱ्याच्या आयुष्यात आपल्याला विशेष स्थान नाही, आपलं स्वतंत्र अस्तित्व नाही.

नायिकेचे आणि परदेशी माणसाचे संबंध यांना लेखिकेने त्याला भावनेची गुंतवणूक वगैरे मुलामा द्यायचा प्रयत्न केलाय. पण तो सपशेल फसलेला आहे. एकदोन प्रसंगांतच नायिका पाघळून जाते असं दिसतं. एकूण ना धड नवरा-बायकोच्या संबंधामधले ताणेबाणे दिसत, ना त्या परदेशी माणसांची छाप पाडण्याची कौशल्य ना नायिकेची वासनांध वृत्ती.

एका पार्टीतला लाईन मारण्याचा प्रसंग


नवऱ्याच्या आजारी मित्राला (म्हणजे आपल्या याराला) भेटायला जाते तो प्रसंग.

एकूण दोन्ही कादंबऱ्या मधली पात्र पटत नाहीत. प्रसंगांमधला तात्त्विक भाग म्हणजे; पुस्तक अगदीच शृंगारकथा नको वाटायला म्हणून ह्यासाठी घातलेला उसना माल वाटतो. खास असं कथाबीज नसल्यामुळे प्रसंग विनाकारण ताणलेले वाटतात. कंटाळवाण्या पद्धतीने संपवलं पुस्तक. 

केवळ स्त्रीचे विवाहबाह्य संबंध किंवा परपुरुषांबरोबर मैत्री दाखवली आहे म्हणून ह्या कादंबऱ्या तेव्हा बोल्ड, स्त्रीवादी म्हणून गाजल्या होत्या का तेव्हा? मग आजकालच्या हिंदी मराठी मालिकांना, वेबसीरिजना नावं ठेवायला नको. बहुतांश मालिकांमध्ये हेच दिसतंय.

एकाच पुस्तकावरून गौरी देशपांडे यांच्या लेखनाबद्दल मत बनवणं योग्य नाही. त्यांची ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची पुस्तकं असतील तर नक्की सुचवा. 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...