गरिबीचे अर्थकारण (Garibeeche arthakaran)

 
पुस्तक - गरिबीचे अर्थकारण (Garibeeche arthakaran)
लेखक - अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो  (Abhijit V. Banerjee & Ester Duflo)
भाषा - मराठी (Marathi)
अनुवाद - अतुल कहाते (Atul Kahate)
पाने - ३३४
मूळ पुस्तक - Poor Economics (पुअर इकॉनॉमिक्स )
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी
ISBN - 978-81-952350-9-4

माझं २००वे पुस्तक परीक्षण आपल्यासमोर सादर करताना मला आनंद होत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादामुळे, प्रोत्साहनामुळे परीक्षण लिहिण्याचा हुरूप कायम राहिला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.

आत्तापर्यंत कथा, कादंबऱ्या, सामाजिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक अशी वेगवेगळी पुस्तकं मी वाचली आहेत. या बहुतेक पुस्तकांमध्ये मानवी सुखदुःखांची मांडणी केलेली होती. सामाजिक प्रश्न, गरिबी आणि अत्याचार आणि त्याला तोंड देणाऱ्या त्यातून मार्ग काढणार या लोकांच्या कहाण्या वाचल्या होत्या. पण ह्या प्रश्नांचा अर्थशास्त्रीय मार्गाने मागोवा घेणारं वैचारिक पुस्तक वाचलं नव्हतं. दोनशेवं परीक्षण लिहिण्यासाठी काहीतरी वेगळ्या पुस्तकाच्या शोधात मी असताना वाचनालयात नव्याने दाखल झालेलं, अगदी २ महिन्यांपूर्वी (जून २०२१) प्रकाशित झालेलं हे पुस्तक हाती आलं. पुस्तकाचे लेखक नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी असल्यामुळे पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढली. आणि या पुस्तकात वाचनातून एक वेगळ्या प्रकारचं वैचारिक खाद्य मिळालं मला पुस्तक कसं वाटलं हे आता मी तुमच्या समोर मांडतो.

गरीब लोकांची गरीबी वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या तशीच कायम राहण्यामागची कारणं, सरकारी धोरणं आणि उपाय, स्वयंसेवी संस्था चालवत असलेले उपक्रम आणि स्वतः गरीब लोक करत असलेले प्रयत्न यांचा उहापोह करणारे हे पुस्तक आहे. काही उपक्रम किंवा काही धोरणं का लागू पडतात तर काही का लागू पडत नाहीत ? एखादा उपक्रम/धोरण एखाद्या देशात किंवा एखाद्या समाजासाठी उपयुक्त ठरतं तेच दुसऱ्या समाजासाठी उपयुक्त ठरत नाही हे वेगवेगळ्या उदाहरणातून दाखवून दिले आहे. लेखकाने स्वतः वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांशी, गरीब लोकां
शी संवाद साधला आहे. निरनिराळ्या संस्थांनी केलेली सर्वेक्षणे आणि मांडलेले अहवाल यात आधारभूत घेतले आहेत. तसंच या आधी ज्या प्रथितयश अर्थतज्ज्ञांनी काही सिद्धांत/संकल्पना मांडल्या आहेत त्यांचाही विचार केला आहे. त्यावर लेखकाला ती पटतात की नाही हे सांगितलं आहे.

लेखकांची पुस्तकात दिलेली माहिती 
अनुक्रमणिका 


आता पुस्तकातली काही उदाहरणे बघूया. पुस्तकाच्या प्रस्तावनेत गरीब म्हणजे काय; किती उत्पन्न असेल तर त्याला गरीब धरायचं याबद्दल माहिती दिली आहे.गरिबीचं दुष्टचक्र म्हणजे काय ? ते तसं खरंच असतं का ? गरीब माणूस पैशाच्या अभावामुळे किंवा संधीच्या अभावामुळे गरीबच राहील अशीच खरच स्थिती आहे काय? याबद्दल सांगणारी ही काही पानं गरिबांचे कल्याण करायचं तर गरिबाला मदत केली पाहिजे म्हणजे त्याला पैसे किंवा काही वस्तू दान दिल्या पाहिजेत. मग असं दान एखाद दुसरा माणूस किंवा संस्था किंवा सरकार देईल. पण प्रत्येक वेळी फुकट मिळणाऱ्या वस्तू किंवा सेवा यातून गरिबांना खरंच लाभ होतो का? फुकट मिळणाऱ्या सोयी कडे गरीब कसं बघतात ? ते त्याचा खरच वापर करतात का ? आणि दुसरी बाजू म्हणजे, अशा फुकट दिल्या गेलेल्या सेवांकडे तो सेवा पुरवठादार गांभीर्याने बघतो का ? उदाहरणार्थ सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये मिळणारी सुविधा खात्रीलायक असेलच असं नाही. त्यामुळे तिच्याकडे बघण्याचा गरिबांचा दृष्टिकोन कसा बदलतो असे दोन्ही बाजूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबद्दलची आकडेवारी मांडली आहे.


गरिबाला गरिबीतून बाहेर पाडण्यासाठी
 त्याचे उत्पन्न वाढले पाहिजे. त्यासाठी त्याला योग्य उद्योग धंदा सुरू करण्यासाठी भांडवल मिळाले पाहिजे; कर्ज मिळाले पाहिजे. पण गरीब व्यक्ती कर्ज फेडू शकतील का नाही याबाबत शंका असल्यामुळे संस्थात्मक कर्ज मिळणं त्यांना कठीण होतं. अशा वेळी त्यांना स्थानिक सावकारी व्यवस्थेकडे वळावं लागतं आणि प्रचंड मोठ्या दराने व्याज देऊन कर्ज घ्यावे लागतं. म्हणजे गरीबांना स्वस्त कर्ज मिळणे ऐवजी महाग कर्ज मिळतं. दुसरीकडे लघुकर्ज देणाऱ्या संस्था, बचत गट अशा संस्थाही काम करतात. गरीब व्यक्तींनी कर्ज वेळेत फेडावे यासाठी बचत संस्था साप्ताहिक मेळावे घेणं, मार्गदर्शन करणं असे वेगवेगळे उपक्रम राबवतात. याबद्दलची माहिती. त्याचा होणारा परिणाम त्यात न निघणारे निष्कर्ष मांडलेले आहेत. त्यातील एक पान.

गरीबी हा काही एकट्यादुकट्याचा विषय नाही. तो पूर्ण समाजाचा, देशाचा विषय आहे. त्यामुळे सरकारी धोरणे आणि ती कशी राबवली जातात याचा मोठा परिणाम 
नक्कीच दिसतो. त्या पैलूचा विचारही एका प्रकरणात केलेला आहे. भ्रष्ट व्यवस्था आणि लोकांची अनास्था यामुळे कुचकामी ठरणाऱ्या संस्था आणि त्यामुळे गरीब राहणाऱ्या देशांची उदाहरणे आहेत. हुकूमशाहीमुळे स्वातंत्र्य नसणाऱ्या पण तरीही काही बाबतीत कठोर निर्णय घेतल्यामुळे लोकांचा फायदा झालेल्या हुकूमशहाची उदाहरणे आहेत. स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढला की त्याचे परिणाम कसे दिसतात ह्याची उदाहरणे आहेत. तर सर्व गोष्टी लोकांवर सोडून देता येत नाहीत; स्वातंत्र्यही लादता येत नाही. लोकांवर नियंत्रण ठेवावं लागतं. अशी दुसरी बाजूही मांडलेली आहे त्यातील एक पानपुस्तकातील मजकूरा
ची साधारण कल्पना आपल्याला आली असेलच. पुस्तक वाचताना सतत एक जाणवत राहतं की ही सगळी माहिती, साधकबाधक विचार मांडून शेवटी लेखक आपलं काहीतरी ठाम मत, ठाम उपायोजना सांगेल. पण तसं काही पुस्तकात नाही. कुठलीही एकच एक उपायोजना सांगणे हा पुस्तकाचा उद्देश दिसत नाही. तर जो कोणी अशा उपाययोजना करत असेल त्याने या उपाययोजनांकडे वेगवेगळ्या कोनातून कसं बघितलं पाहिजे याबद्दलची प्रगल्भता वाढवणारं हे पुस्तक आहे. सहाजिकच शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था या मध्ये काम करणाऱ्या लोकांना या पुस्तकाचं वाचन उपयुक्त ठरेल. पण माझ्यासारखे सर्वसामान्य वाचक जे या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करत नाहीत त्यांना हे पुस्तक गोंधळूनच टाकेल. सर्वेक्षणे आणि त्याची आकडेवारीसुद्धा माझ्या डोक्यावरून गेली. उदा. एका योजनेच्या लाभाबद्दल ते लिहितात "(ह्या योजनेमुळे)... कुटुंबनियोजनासंबंधीची चर्चा करण्यासाठी त्या संबंधित परिचारिकेला भेटण्याची शक्यता २३%  नी जास्त होती... इंजेक्शनचा वापर करण्याची शक्यता ३८%नी वाढली आणि ... नको असलेली प्रसूती व्हायचं प्रमाण ५७%नी कमी होतं ". म्हणजे नक्की काय ? शक्यता वाढली म्हणून यश समजायचं का हवी तशी वाढली नाही म्हणून अपयश ? सर्वेक्षणे आणि आकडेवारीतून नक्की निष्कर्ष न निघता आपल्याला हवा तसा अर्थ काढू शकू की काय असं वाटतं.
( शिरीष कणेकरांनी सांगितलेलं एका पाश्चात्त्याचं चावट वाक्य आठवलं “statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.”) 
थोडक्यात काय तर काहीही केलं तरी प्रत्येक गोष्टीत काही ना काही तरी उणीव आहे असंच जाणवत राहील.

तरीही एखाद्या गरीब व्यक्तीला आपण मदत करणार असू तर केवळ पैसे देऊन भागेल असं न धरता आपल्या ज्ञानाचा, माहितीचा सुद्धा त्यांना वापर करून दिला तर ती मदत अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास हे पुस्तक देतं. जुनी म्हण आहे की; एखाद्याला तुम्ही एखाद्या उपाशी व्यक्तीला तुम्ही मासा दिलात तर तो तुमच्याबद्दल एकदा कृतज्ञ राहिली पण तुम्ही त्याला मासेमारी शिकवली तर तो आयुष्यभर कृतज्ञ राहील. त्या पद्धतीनेच गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आर्थिक वैचारिक अशा वेगवेगळ्या प्रकारची मदतीची आवश्यकता आहे. त्यातली जो भार आपण उचलू शकतो तो भार आपल्या परीने घ्यायचा आपण प्रयत्न करणं इतकच आपल्या हातात आहे.

अतुल कहाते यांनी केलेला अनुवाद उत्तम आणि सहज आहे. असे वेगळे आणि महत्त्वपूर्ण पुस्तक मराठीत आणल्याबद्दल मनोविकास प्रकाशन आणि अतुल कहाते यांचं कौतुक आहे. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्थांतल्या व्यक्तींनी आवा ( आवर्जून वाचा )
इतरांनी    वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...