लेखक - माधव जोशी (Madhav Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २५६
ISBN - 978-93-91784-61-4
प्रकाशक - ग्रंथाली
छापील किंमत - ३००
अशी मेजवानी मला घरबसल्या मिळाली ती म्हणजे माधव जोशी लिखित "माझी कॉर्पोरेट दिंडी" ह्या पुस्तकाच्या रूपाने. माझी पुस्तकपरीक्षणे त्यांनी वाचली होती. डोंबिवलीच्या लोकप्रिय "पै'ज फ्रेंड्स लायब्ररी"चे पुंडलिक पै काका ह्यांनीही त्यांना माझं नाव सांगितलं होतं. त्यामुळे माझ्या कौतुकाच्या रूपात माधवजींनी त्यांचं नवं पुस्तक मला भेट दिलं. ह्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला आमंत्रित केलं. आपलं परीक्षण इतक्या मोठ्या माणसाला आवडतंय हे बघून माझी कॉलर टाईट !! म्हणूनच इथे सुद्धा पुस्तक परीक्षणाआधी त्याबद्दल सांगायचा मोह आवरला नाही. तुम्ही सुद्धा सगळे माझं वेडं-वाकडं लेखन कौतुकानेच वाचता म्हणून हक्काने सांगितलं. :)
असो ! आता पुस्तकाबद्दल लिहितो. माधव जोशी हे नाव सुजाण डोंबिवलीकरांना परिचित आहे. कंपनी सेक्रेटरी, टाटा च्या कंपन्यांमध्ये उचचपदस्थ ,सल्लागार, कायदा व व्यवस्थापन तज्ज्ञ आणि डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात सक्रिय असे माधव जोशी. त्यांनी आपल्या लहानपणापासून आत्तापर्यंतच्या करियर मधल्या महत्वाच्या घटना, किस्से, आठवणी ह्या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत.
कोकणातल्या लहान गावातून ते शिक्षणासाठी डोंबिवलीत आले. बी कॉम चं शिक्षण पूर्ण करता करता नोकरी करू लागले. पुढे कंपनी सेक्रेटरी आणि कायदेतज्ज्ञ झाले. बेयर ("बेगॉन" स्प्रे वाली" बायर), विंडसर, कादंबरी अश्या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी मोठ्या हुद्द्यांवर काम केलं. त्यांची प्रगती होत होत ते टाटा टेली चे प्रेसिडेंट आणि अनेक कंपन्यांचे संचालक, सल्लगार झाले. रतन टाटांसाखे उद्योगमहर्षीबरोबर प्रत्यक्ष काम करता आलं. कंपन्यांच्या नव्या प्रेजेक्टची स्थापना, विस्तार व त्यासाठी स्थानिक राजकारण्यांपासून वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांना चर्चेत सहभागी व्हावं लागायचं. सतत परदेश वाऱ्या होत. कंपनीवर इतरांनी केलेल्या ठोकलेल्या कायदेशीर दाव्यांसाठी उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटले लढवण्याचा अनुभव आला. जेठमलानी, चिदंबरम, सिब्बल अश्या राजकारणी-वकिलांबरोबर चर्चा आणि गप्पा झाल्या. मोठमोठ्या कंपन्यांचे विलीनीकरणाचे प्रकल्प त्यांनी हाताळले. कंपनी शेअर बाजारात उतरण्याचे अनुभव घेतले. सुरुवातीला कामगार युनियनचे कामही केले. मोबाईल ऑपरेटर्स च्या संघटनेचे अध्यक्ष होते. एकूणच कॉर्पोरेट क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करत त्यांनी आपली मुद्रा उमटवली आहे. हे काम करत असताना त्यांनी माणसंही जोडली. अनेक सामाजिक संथांमध्ये काम केलं किंवा त्या कामांना आपल्या मार्गदर्शनाचा लाभ करून दिला.
असं हे चतुरस्त्र, कर्तृत्ववान आणि तरीही नम्र व्यक्तिमत्त्व स्वतःहून आपले अनुभव सांगायला पुढे येतंय म्हटल्यावर - गीत रामायणातील - "आपल्या सर्व शक्ती कानांच्या ठायी एकवटून"- ह्या निवेदना प्रमाणे "आपल्या सर्व शक्ती नेत्रांच्या ठायी एकवटून" वाचक वाचायला तयार होतील ह्यात काही नवल नाही.
पुस्तकात वेगवेगळ्या प्रकारचे किस्से आहेत. नेहमीच्या कामातल्या गमतीजमती; एखादं मोठं प्रोजेक्ट उभं राहणायमागे कसे कष्ट घ्यावे लागले ह्याचा अनुभव, प्रोजेक्ट गुंडाळावा लागला ह्याचे अनुभव; न्यायालयात खटल्याचा अनुभव इ. पण ह्या सगळ्या अनुभवांच्या केंद्रस्थानी "तांत्रिक तपशील" नाहीत तर तेव्हा भेटलेली माणसे त्यांची वागण्याची पद्धत, त्यातून मिळालेली कलाटणी; नाना स्वभाव किंवा आपापल्या संस्कृतीचा प्रभाव ! त्यामुळे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला परिस्थितीचं गांभीर्य योग्यपणे दाखवतं पण गंभीर करून ठेवत नाही. लेखकाकडे सांगण्यासारखं खूप असल्यामुळे प्रसंग कितीही महत्त्वाचा असला तरी त्यात अडकून ना पडता गोषवारा देऊन लेखक पुढे जातो. आणि कथानक वेगाने पुढे सरकतं. काही परिच्छेदांमध्येच इतक्या मोठ्यामोठ्या व्यक्तींची, संस्थांची नावं येऊन जातात की मीच जरा थबकून पुन्हा वाचून, पचवून पुढे जात राहिलो.
अनुक्रमणिका
ब्रिटिश वल्ली पीटर विंडसर
"बेयर" आणि "ABS प्लास्टिक्स" ह्या दोन कंपन्यांचा करार होताना "घडलंय-बिघडलंय-घडलंय" चा अनुभव
राजकीय हस्तक्षेप आणि त्या हाताचं सहकार्यात रूपांतर
"टाटा" म्हणजे विश्वास ! ह्या उक्तीसाठी टाटा ग्रुप बाळगत असलेली मूल्यनिष्ठा
निवेदनाचा वेग व त्यातला नर्मविनोद, अहंकाराचा पूर्ण अभाव, दुसऱ्यावर टीका करण्याचा किंवा कमी लेखण्याचा अजिबात प्रयत्न नाही, जे आवडलं नव्हतं किंवा मनासारखं नाही झालं त्याबद्दल कटुता/बदला घेण्याची भाषा नाही; किंवा जुन्या घटनेमागच्या कारणाचा गौप्यस्फोट करायचा उद्देश नाही..ह्या सगळ्या गुणांमुळे वाचन सुखकरही होतं. कोणी त्यावर टीका करेल; स्पष्टपणे सांगितलं नाही खऱ्या गोष्टी उघड केल्या नाहीत असंही म्हणेल. पण व्यवसायातल्या गोपनीयतेच्या अटी शर्ती पाळून लेखकाला हे बंधन पाळावं लागलं असेल हे उघडंच आहे. आणि लेखनाचा उद्देश शोधापत्रिकारितेसारखा नाही. त्यामुळे सर्वसाधारण वाचकाला, ह्या क्षेत्रात नव्याने शिरू इच्छिणाऱ्याला ही बोच तितकी जाणवणार नाही.
त्यांच्या सामाजिक कामांबद्दल आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ देणाऱ्या अनेकांचे उल्लेख त्यांनी प्रेमाने, आदराने, कौतुकाने केले आहेत. आई-वडिलांपासून स्वतःच्या ड्रयव्हर पर्यंत, शिक्षकांपासून सहकाऱ्यांपर्यंत, वरिष्ठांपासून मित्रांपर्यंत ... माणूस जोडण्याचं हे अफाट कौशल्य हेवा वाटण्यासारखं आहे. इतक्या सगळ्या गोष्टी करायला त्यांना वेळ आणि ताकद कशी मिळते ह्याबद्दल त्यांनी एक पुस्तक आता लिहिलं पाहिजे. २५० पानी पुस्तकांत बऱ्याच आठवणी आपल्या तरी कितीतरी राहून गेल्याच असतील. ज्याप्रमाणे पंढरपूरची दिंडी वर्षातून दोनदा असते त्याप्रमाणे पुस्तकाचा दुसरा भाग आला पाहिजे. आणि हो, वारी दरवर्षी दोनदा असते. त्याप्रमाणे दरवर्षी त्यांनी लिहिले तर वाचक वाचायला तयार असतीलच ही खात्री वाटते.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
No comments:
Post a Comment