रामकथामाला (Ramkathamala)




पुस्तक - रामकथामाला (Ramkathamala)
लेखिका - दीपाली नरेंद्र पाटवदकर (Deepali Narendra Patwadkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ११२
ISBN - दिलेला नाही
प्रकाशन - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग. फेब २०२१
छापील किंमत - रु. २००/-

ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव श्री. सुधीर जोगळेकर ह्यांनी मला हे पुस्तक वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो.

रामायण आणि महाभारत हे ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृतीचा इतिहास. आपल्या संस्कृतीचे आदर्श कायमस्वरूपी डोळ्यासमोर ठेवणारी महाकाव्ये. साहित्य म्हणून अत्युत्कृष्ट. हजारो वर्षे झाली तरी ग्रंथांतील कथा शिळ्या तर वाटत नाहीत उलट त्यातल्या पात्रांचे, घटनांचे नवनवीन अर्थ पुढे येत असतात; त्यांच्याकडे बघण्याचे नवनवीन दृष्टिकोन पुढे येत असतात. कथाकार, कादंबरीकार, चित्रकार, गीतकार, नाटककार, शिल्पकार अश्या प्रत्येक कलावंताला आपल्या कलेतून ही कथा सांगावीशी वाटते. इतिहास संशोधकाला त्याच्यातून भारताचा इतिहास किती पुरातन आहे ते शोधावंसं वाटतं. साधू संतांना त्यातून नीतिमत्तेचा आदर्श शिकवता येतो. आदर्श राजा कसा असावा हे राजकारणी व्यक्तीला कळू शकतं. अश्या कितीतरी अंगांनी ही महाकाव्ये प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहेत; कणाकणात आहेत.

रामायण- महाभारताचं प्रेम आणि आकर्षण फक्त भारतातल्या व्यक्तीलाच नाही, तर जिथे जिथे भारतीय पोचले, भारतीय संस्कृती, धर्म, विचारधारा पोचल्या, रुजल्या त्या देशोदेशी आहे. अफगाणिस्तानापासून-ब्रह्मदेशापर्यंतचा सांस्कृतिक भारतीय उपखंड, आग्नेय आशिया(इंडोनेशिया, कमोडिया इ.), जपान, मॉरिशस असा विशाल प्रदेश ह्या प्रेमात आहे. रामायणाच्या ह्या लोकप्रियतेची साधारण कल्पना आपल्या सगळ्यांनाच आहे. पण त्याबद्दलची तथ्ये, ग्रंथांची नावे, कलाप्रकार, त्यांचा इतिहास ह्याची सविस्तर माहिती कदाचित नसेल.ती माहिती एका ठिकाणी, एका पुस्तकात गुंफून रामकथेच्या दिग्विजयाचे दस्तऐवजीकरण करण्याचं मोठं काम दीपालीजींनी ह्या पुस्तकात केलं आहे.

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका

प्रकारणांबद्दल थोडक्यात

- पहिल्या ५ प्रकरणांमध्ये वेद, पुराणे महाभारत ह्यांमध्ये रामकथा कशी सांगितली गेली आहे हे दाखवलं आहे.

- पूर्ण रामायण किंवा त्यातल्या काही भागांवर आधारित नाटके, काव्ये संस्कृत मध्ये आहेत. भारतातल्या अनेक संतांनी आपल्या भाषेत - आपल्या शैलीत रामायण सांगितलं आहे. अशी कुठली रामायणे वेगवेगळ्या प्रांतांत प्रसिद्ध आहेत ते सांगितलं आहे.

- जैन, बौद्ध, शीख ह्या भारतीय उपासना पद्धतीतही रामकथा ही आदर्शच मानली गेली आहे. धर्मग्रंथांत रामायणातल्या किंवा रामाच्या वंशातल्या राजांच्या गोष्टी येतात. आणि त्या त्या धर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे त्यात बदलही केलेला आढळतो. म्हणजे अहिंसक राम ! घटना भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आहेत अश्या स्वरूपातल्या जातक कथा इ.

-"विदेशातील रामायण"मध्ये कुठल्या कुठल्या देशांत कश्याप्रकारे रामायण हा एक मोलाचा सांस्कृतिक ठेवा मनाला जातो. ते सोदाहरण आणि सचित्र स्पष्ट केलं आहे.

- ही गोष्ट फक्त कथा-कादंबऱ्यांतच मर्यादित राहिली नाही. तर चित्र, शिल्प, नृत्य कलावंतांना देखील तिने मोहित केलं आहे. म्हणूनच अनेक लेण्यांमध्ये दगडांवर रामायणातले प्रसंग कोरलेले आहेत. शिल्पे आहेत. भारतात आणि भारताबाहेरही.

- लोकगीते, लोकनृत्ये, म्हणी, वाक्प्रचार ह्यातही रामायण आहे. त्याचा थोडा मागोवा एका प्रकरणात आहे.

- हनुमान उड्डाण करून लंकेत सीताशोधाला गेला. तिथे त्याने सीतेला रामाचा निरोप सांगितला. "वायुमार्गे जाणारा निरोप्या", "ओळखीची खूण सांगून स्वतःची ओळख सांगणारा निरोप्या" ह्या संकल्पनेतून प्रेरित होऊन अनेक काव्यांमध्ये तो प्रकार नाना रूपांत वापरला आहे असे लेखिकेचे निरीक्षण आहे. ते सोदाहरण पटवून दिलं आहे.

- रामायणात लिहिलेली ठिकाणे शोधायला गेलं तर ती प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहेत. काही ठिकाणी उत्खननातून जुने अवशेष सापडले आहेत. ह्या सगळ्या ठिकाणांचा शोध घेऊन, त्यांचा विकास केल्यास मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी उपलब्ध होईल.

- रामायणावरच्या महत्त्वाच्या ग्रंथांची कालानुक्रमे सूची

- ह्या पुस्तकासाठीच्या पुस्तकांची संदर्भ सूची

हे पुस्तक कॉफीटेबल बुक आकारातील रंगीत आणि देखणे पुस्तक आहे. काही पाने नमुन्यादाखल

रामरक्षा हे वेदांतील मंत्रांचे संकलन आहे. त्यात रामकथा कशी अनोख्या पद्धतीने सांगितली आहे ते पहा. अजून एका मंत्रात थोडक्यात रामकथा कशी सांगितली आहे ते बघा.

विदेशातील रामायण
इतर पंथांमध्ये रामायणकथा
देशी विदेशी नृत्यांतून रामायण

रामायणातील स्थळे आणि आज त्यांचा मग काढला तर ...

रामायणाच्या महत्त्वाचे, व्याप्तीचे थोडक्यात आणि आकर्षक पद्धतीने दस्तऐवजीकरणाचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. इतिहास, संस्कृती, भाषा, कला ह्यातल्या एकात जरी रस असेल तरी त्या अंगाने रामायणाचा विचार तुम्हाला वाचायला आवडेल. पुस्तकाची भाषा आणि स्वरूप बोजड शोधनिबंधासारखे ना ठेवता सर्वसामान्य वाचकाला ते वाचावंसं वाटेल, हाताळायला आवडेल असं साधं सचित्र आणि छोट्या छोट्या प्रकरणाचं आहे. त्यातून मुद्द्याची व्याप्ती लक्षात येते आणि आपण पुढे वाचत राहतो. त्यामुळे हे वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक आहे.

पुस्तक कुठे मिळेल ?
  • पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक
  • आपल्या शहरातल्या विवेकानंद केंद्राच्या शाखेशी संपर्क साधा 
  • अथवा पुढे दिलेल्या चित्रातल्या तळाशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...