After Dark (आफ्टर डार्क)




पुस्तक - After Dark (आफ्टर डार्क)
लेखक - Haruki Murakami (हारुकी मुराकामी)
भाषा - English (इंग्रजी)
मूळ पुस्तक - アフターダーク  (Afutā Dāku)
मूळ पुस्तकाची भाषा - Japanese (जपानी)
अनुवाद - Jay Rubin (जे रुबीन)
पाने - २०१
ISBN - 978-0-099-50624-9


ह्या कादंबरीला निश्चित अशी गोष्ट नाही. एका रात्रीत घडणाऱ्या घटना आहेत. योगायोगाने एकत्र आलेल्या व्यक्ती एकमेकांशी मोकळेपणाने गप्पा मारतात. आपल्या आयुष्यातला सल किंवा काही दु:ख एकेमेकांना सांगून मन मोकळं करतात. त्यातून आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यातली दुःखद किनार समजते. पण ह्या सगळ्या कोलाज कामातून काही मुख्य आकृतीबंध तयार होत नाही.
कादंबरीच्या सुरुवातीला एका मुलीचं - एरीचं - वर्णन आहे. ती एका खोलीत गाढ झोपली आहे. आहे. तिथल्या टीव्हीचा स्क्रीन थोडा वेगळा आहे. त्या स्क्रीन मधून कोणीतरी तिला बघतंय असं वर्णन आहे. नंतर, एखाद्या वैद्यानिक कल्पनारंजनाप्रमाणे त्या स्क्रीन मधून ती मुलगी एका अनोळख्या ठिकाणी आपोआप जाते. एखाद्या बंद खोली प्रमाणे ती जागा असते. तिकडे तिला जाग येते. आणि कादंबरीच्या शेवटी ती मुलगी पुन्हा मूळ जगात येते, पण इथे पुन्हा ती निद्रिस्तच.
ह्या एरीची बहीण मारी, तिला रात्री एक तरुण - एरीचा शाळूसोबती - भेटतो, ते गप्पा मारतात. तो एका "वेश्याव्यवसाय" चालणाऱ्या हॉटेलात मदतनीस असतो. तिथे एका मुलीला मारहाण होते, तेव्हा हे दोघे मदत करतात. मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या ऑफिसचं वर्णन आहे. असे बरेच प्रसंग घडत राहतात. ते वाचताना खूप कंटाळा येतो तरी आपण वाचत राहतो कारण असं वाटत राहतं की ह्या सगळ्या कड्या एकत्र होऊन शेवटी त्या चमत्काराची उकल होईल असं आपल्याला वाटत राहतं.
पण असं काहीच होत नाही. सगळं अधांतरी सोडून कादंबरी संपते.

काही पाने उदाहरणादाखल
एरीच्या खोलीचं वर्णन.





"मारी"चा मित्र तिला तिच्या आयुष्यातल्या समस्या सांगतो तेव्हा




हॉटेलातली महिला कर्मचारी तिच्यामागे लागलेल्या ससेमिऱ्याबद्दल सांगते.





सगळा वेळ फुकट. मुराकामी च्या बंडल पुस्तकाचा हा दुसरा अनुभव. ह्या आधी वाचलेलं "
Colorless Tsukuru Tazaki and His years of Pilgrimage" हे पुस्तक असंच. त्याचं परीक्षण पुढील लिंकवर वाचू शकाल
निरर्थक वर्णन आणि कशाचा कशाला पत्ता नाही. हा लेखक इतका बेस्टसेलर कसा झाला कळत नाहीये! खरं तर काही अर्थ नाही असं लिहून मग "मी स्पष्ट सांगणार नाही, लोकांनी ते शोधावं" असा खेळ मुराकामी ने केला असावा; त्यात लोक गंडले. "काही कळलं नाही" असं म्हणून बावळट ठरण्यापेक्षा "हो हो , खूप मोठा अर्थ आहे" असं म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलेलं दिसतंय.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

सूर्योपासना (Suryopasana)



पुस्तक - सूर्योपासना (Suryopasana)
लेखक - निखिल कुलकर्णी (Nikhil Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १०४
प्रकाशन - विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग,जून २०२२ (Vivekananda Kendra)
छापील किंमत - १५०/- रू.
ISBN - दिलेला नाही

सूर्यनमस्कार हा शब्द ऐकला नसेल असा मराठी माणूस विरळाच. सूर्यनमस्कार घालणारे लोकही बरेच आहेत. परंतु सूर्यनमस्कार न घालणारे लोक दुर्दैवाने जास्त आहेत. म्हणूनच सूर्यनमस्कार का घालावेत हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येणे आवश्यक आहे. त्या प्रयत्नांमधलेच हे पुस्तक आहे.
जे लोक सूर्यनमस्कार घालतात ते सुद्धा बहुतेककरुन ह्याकडे फक्त एक व्यायाम प्रकार म्हणून बघतात. पण हेच सूर्यनमस्कार एका ध्यान-धारणे प्रमाणे केले तर मनाची शांतता, एकाग्रता साधता येईल हे ह्या पुस्तकाने दाखवलं आहे.
इतकंच नाही; तर शरीरातली चक्रे, कुंडलिनी ह्या संकल्पना लक्षात घेऊन जर सूर्यनमस्कार घातले तर अध्यात्मिक प्रगतीही साधता येईल ह्याकडे पुस्तक दिशानिर्देश करते.
एकूणच शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यनमस्कार कसे घालावेत याचं सोपं आणि सुटसुटीत मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे.

लेखक स्वत: उच्चिद्याविभूषित आहेत. आधुनिक तांत्रिक ज्ञान आणि सूर्यन
स्काराचा अभ्यास असा दुहेरी संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यामुळे त्यांचं सांगणं फक्त भावनिक नाही तर तार्किक सुद्धा आहे. लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.


अनुक्रमणिका

पहिले प्रकरण - सूर्यनमस्काराचे प्राचीन उल्लेख कुठे आढळतात, अर्वाचीन काळात स्वामी रामदास आणि औंधचे राजे यांच्यामुळे सूर्यनमस्कारप्रचारात मोलाची भर कशी पडली हे सांगितले आहे.

दुसरे प्रकरण - मनाची एकाग्रता, विचार थांबणे या "संप्रज्ञात समाधी"च्या संकल्पनेबद्दल सांगितले आहे. आपल्या मेंदूची एकावेळी चार कामे करण्याची क्षमता, त्याचा पूर्ण वापर इ. संकल्पना पाश्चात्य वैद्यकीय ज्ञान आणि संशोधनाचा आधार घेऊन स्पष्ट केल्या आहेत.

तिसरे प्रकरण - आपल्या शरीराचे एक नैसर्गिक चक्र आहे जे सूर्याच्या भ्रमणाशी निगडित आहे; पचन चांगलं असेल तर आपली तब्येत कशी चांगली राहते आणि सूर्यनमस्कार यासाठी कसे फायदेशीर ठरू शकतात हे तिसऱ्या प्रकरणात आहे.

चौथे प्रकरण - आत्मा, ऊर्जा, प्राण या संकल्पना सोप्या शब्दात समजून सांगितले आहेत जेणेकरून पुढच्या प्रकरणांमध्ये त्यांचा संदर्भ घेता येतो.

पाचवे प्रकरण - सूर्यनमस्कार कुठेही घातले तरी शरीराला त्याचा फायदा होईलच पण त्यांचा मानसिक-अध्यात्मिक फायदा घ्यायचा असेल तर योग्य स्थळे कशी निवडावीत याबद्दल मार्गदर्शन.

सहावे प्रकरण - प्रत्येक स्थितीमध्ये श्वास घ्यावा/सोडावा/रोखून धरावा याबद्दल संक्षेपात मार्गदर्शन आहे. अशा पद्धतीने श्वासावर लक्ष केंद्रित केलं की हळूहळू आपल्या विचारांची साखळी तुटून ध्यानाची अवस्था साधणं कसं शक्य आहे हे समजावून सांगितलं आहे. श्वास आणि विचार ह्याचं अद्वैत आपल्या मनावर बिंबवतं.

सातवे प्रकरण- सूर्यनमस्काराच्या आधी आणि नंतर कुठल्या प्रार्थना म्हणाव्यात जेणेकरून आपल्याला या सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल; या कृतज्ञतेचा आपल्या शरीरावर कसा सकारात्मक परिणाम होतो हे सांगितले आहे. 

आठवे प्रकरण - सूर्यस्तुती - सूर्याची बारा नावे आणि त्याचा भक्तीपूर्ण अर्थ काय हे सांगणारं प्रकरण.  सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी, त्याच्या तेजाविषयी आदर दाखवणारी, सूर्याकडून मिळणाऱ्या चैतन्याने आनंदित करणारी ही नावे आहेत.

नववे प्रकरण - आपल्या शरीरात सात चक्रे आहेत, तीन नाड्या आहेत असं तुम्ही वाचलं असेल. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, इडा-पिंगला नाड्या अशी नावे कदाचित तुम्ही वाचली असतील. ही चक्रे आणि नाड्या काय भानगड आहे हे सोप्या शब्दात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या कल्पना अतिशय गहन आहेत आणि या पुस्तकाचा तो मूळ उद्देशही नाही. त्यामुळे शंभर टक्के समजेलच असं नाही मात्र सूर्यनमस्कार घालताना एकेका चक्रावर लक्ष केंद्रित करण्याचे फायदे काय हे यातून आपल्याला नीट समजतं.

दहावे प्रकरण -मेडिटिव्ह फॉर्म - यात आधीच्या प्रकरणांचा गोषवारा घेऊन सूर्यनमस्कार म्हणजे एक प्रकारचे ध्यान कसे आहे हा मुद्दा पुन्हा सांगितला आहे.

अकरावे प्रकरण - एरोबिक फॉर्म - एरोबिक व्यायाम प्रकारात हृदयाची गती मोठ्या प्रमाणावर वाढवली जाते. यातून आपला दमसास/स्टॅमिना वाढवला जातो. सूर्यनमस्कार भराभर घालण्याने आपण हे साध्य करू शकतो. म्हणून ज्यांना सूर्यनमस्कार नीट जमत आहेत व ज्यांचा चांगला सराव झाला आहे अशांनी आपली गती वाढवून एरोबिक प्रकाराने सूर्यनमस्कार कसे घालावे याचं मार्गदर्शन आहे.

बारावे प्रकरण - संगीत विचार- संगीत किंवा गाणी लावून सूर्यनमस्कार घातले तर एकाग्रता होण्यासाठी मदतच होईल. ते कसे याबद्दल थोडक्यात माहिती आहे. कुठले संगीत ऐकावे याबद्दल स्वानुभव सांगितले आहेत.

नंतर वेगवेगळ्या वेबसाईट आणि पुस्तके ह्यांची संदर्भसूची आहे.

आता काही पाने उदाहरणादाखल बघू


इतिहासातले उल्लेख




नमस्कार आणि श्वास ह्याच्या मिलाफातून विचारांवर नियंत्रण.


स्थितींचा फोटो.

चक्र विचार


एरोबिक



ह्या पुस्तकाचा भर प्रत्यक्ष सूर्यनमस्कार शिकवण्यावर नसून; हे बिंबवण्यावर आहे की ते घातलेच पाहिजेत आणि विशिष्ट पध्दतीने घालावेत. त्यामुळे ह्यातल्या स्थितींचे फोटो आहेत. पण प्रत्येक स्थितीवर सविस्तर मार्गदर्शन नाही. प्रत्येक स्थिती समजून घ्यायची असेल तर इतर पुस्तके किंवा योग गुरूचे मार्गदर्शन घ्यावे लागेल.

महत्त्वाच्या पारंपरिक विषयाचा त्याच्या आधुनिक आणि बहुविध अंगांनी वेध घेणारे अवश्य वाचावे असे हे पुस्तक.


पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क -
विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग,
अश्विनी हाईट्स, ग्राहक पेठेजवळ, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०
फोन नं. -
(०२०)२४४३२३४२ / ९८८१०६१६८६


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

राशोमोन आणि जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha)

पुस्तक - राशोमोन आणि इतर जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha) लेखक - ऱ्युनोसुके अकुतागावा (Ryunosuke Akutagawa) अनुवाद - निसीम बेडेकर ...