हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाईफ (How Starbucks saved my life)




पुस्तक - हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाईफ (How Starbucks saved my life)
लेखक - मायकेल गिट्स गिल (Michael Gates Gill)
अनुवाद - नीला चांदोरकर (Neela Chandorkar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - २६२
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१८
ISBN - 9789353171414

मायकेल गिट्स गिल ह्या लेखकाचे हे स्वानुभव आहेत. मायकेल एका सधन कुटुंबात जन्माला आले
ला. नामवंत शिक्षणसंस्थांत शिक्षणाच्या संधी मिळाल्या. त्यानंतर एका प्रथितयश अमेरिकन जाहिरात कंपनीत नोकरीही मिळाली. आपल्या कामाच्या गुणवत्तेमुळे त्यांच्या बढत्याही झाल्या. अधिकाराचं पद मिळालं. मोठं घर, गाडी, परदेशवाऱ्या असं हेवा वाटेल असं आयुष्य होतं. पण सतत जबाबदारीचं ओझं, कामाचा ताण, घरच्यांकडे बघायला वेळ नाही अशीही अवस्था. तरीही ही सुस्थिती, अधिकार आणि व्यग्रता झिंग आणणारीच. ही झिंग आयुष्यभर मिळत राहणार असं जणू अध्याहृतच. पण नियतीचा खेळ वेगळा ! कंपनीतलं व्यवस्थापन बदललं. नोकरकपात सुरु झाली. मायकलचा नंबरही त्यात लागला. मध्यमवयीन मायकल बेकार झाला. नवीन सुरुवात करायचे प्रयत्न अपयशी ठरत होते. बचत संपत आली. त्यात बाहेरख्यालीपणामुळे बायकोला घटस्फोट द्यावा लागला. बायको आणि चार मुलांच्या संगोपनापोटी राहते घर आणि उरलेली संपत्तीसुद्धा पोटगीपोटी द्यावी लागली. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे कर्करोगाचं निदान झालं. अधीकार-संपत्तीच्या शिखरावरून थेट बेकारी-गरीबीच्या गर्तेत तो कोसळला.

आता पुढे काय ? ह्या विवंचनेत असताना "स्टारबक्स" कॉफीच्या दुकानात त्याला नोकरी लागली. "स्टारबक्स"ही अमेरिकेतली मोठी कॉफीच्या दुकानांची साखळी आहे. विविधप्रकाराच्या कॉफी त्यात मिळतात. स्वच्छ, नीटनेटकी दुकाने असतात. दुकानात मंद संगीताचे प्रसन्न वातावरण असते. कॉफी घ्या आणि गप्पा मारत बसा, काम करा असं दुकानाचं स्वरूप. 
(टीप - भारतातही आता स्टारबक्स ची दुकाने आहेत. जर तुम्ही कधी आत गेला नसाल तर नमुन्यादाखल हे फोटो. त्यातून तुम्हाला पुढच्या वर्णनाशी अजून समरस होता येईल.)

"स्टारबक्स" मध्ये नियमितपणे जाणारे ग्राहक असतात. दुकानातले "बरिस्ता" - कॉफी देणारे - ऑर्डर घेतात, ऑर्डर प्रमाणे त्या त्या प्रकाराची कॉफी बनवतात, पैसे घेतात परत देतात, तेवढ्यात ग्राहकाशी अदबीने संवाद साधतात. "बरिस्ता" म्हणून काम करणं म्हणजे चपळ हालचाली आणि तरीही स्मितहास्ययुक्त सेवा ! कष्टाचं काम; म्हणूनच म्हटलं तर थोडं कमी दर्जाचं - मायकेल सारख्या व्यक्तीसाठी तरी !

"मरता क्या न करता" ह्या उक्तीनुसार मायकेलने काम स्वीकारलं. आणि आता ते नीटपणे करून नोकरी टिकवण्याची धडपड करू लागला. मायकेलच्या ह्या धडपडीची कहाणी म्हणजे हे पुस्तक. बहुतेक बरिस्ता हे कृष्णवर्णीय तर मायकेल गौरवर्णीय. इतर 
बरिस्ता तरुण तर मायकेल पन्नाशीतला. इतर निम्नमध्यमवर्गीय, कष्टांची सवय असणारे तर मायकेल सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला. मायकेलला लोकांकडून काम करून घ्यायची, आदेश द्यायची सवय आणि इथे त्याला दुसऱ्यांचा हाताखाली काम करावी लागत होती - अगदी संडास धुण्यापर्यंतची. 
हा विरोधाभास; आयुष्याचा हा यु-टर्न त्याने कसा पचवला ह्याचं प्रांजळ आत्मकथन पुस्तकात आहे. नाईलाजाने स्वीकारलेलं काम ते आवडू लागलेलं काम असा त्याचा प्रवास पुस्तकात आहे. सुरुवातीला कामाचं दडपण, होणाऱ्या चुका आणि आपल्या ओळखीच्या लोकांनी "असं" काम करताना बघितल्यावर आलेलं ओशाळलेपण सगळं त्याने छान मांडलं आहे. कॉफीदुकान कर्मचारी जरी हसतमुख सेवा देत असले तरी त्यांची कशी तारेवरची कसरत चालू असते; किती गोष्टींचं व्यवधान सांभाळावं लागतं हे वाचून आपण सुद्धा अचंबित होतो. पैसे कमीजास्त मिळत असले तरी प्रत्येक काम म्हणजे एक कलाच आहे हे कळतं. प्रसंगांच्या ओघात अमेरिकन कंपन्यांतले व्यवस्थापनाचे, कार्यशैलीतले दोन स्वतंत्र प्रवाह सुद्धा लेखक आपल्याला दाखवतो. मायकलच्या आधीच्या कंपनीत अधिकारांची उतरंड, खालच्याला "हुकूम" सोडणे, कंपनीला योग्य ते निर्णय घेताना कर्मचाऱ्याची जास्त पर्वा न करणे अशी जुनी सरंजामी शैली होती. तर स्टारबक्स मध्ये "सगळे समान", "कुठलंही काम हलकं नाही", "सगळ्यांना आदर द्या, प्रोत्साहन द्या" असं वातावरण.

पुस्तकातली काही पाने वाचूया म्हणजे कल्पना येईल.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


जाहिरात कंपनीतला कामाचा अनुभव.




कशी नशिबाने थट्टा आज मांडली...




साफसफाई, ऑर्डर घेणे ही कामे जमू लागल्यावर कॉफी विषयी माहिती घेऊन ग्राहकांसाठी "कॉफी टेस्टिंग" सेमिनार घेण्याचं काम मिळालं; इतर तरुण सहकाऱ्यांशीही चांगले संबंध प्रस्थिपित होऊ लागले त्याबद्दलचा एक प्रसंग.




बरिस्ताचं सगळ्यात महत्त्वाचं आणि कठीण काम म्हणजे कॉफीची वेगवेगळी पेयं बनवणं. नेहमी तीच चव यायला पाहिजे. त्यासाठी सगळी सामुग्री, तापमान आणि पाककृती अगदी तश्शीच झाली पाहिजे. त्याबद्दलचा हा प्रसंग





नीला चांदोरकर ह्यांनी केलेला अनुवाद उत्तम झाला आहे. विशेषतः ह्यात पात्रांचे संवाद आहेत ते मूळ इंग्रजी पद्धतीचे पण मराठी लहेजा सांभाळून घेतलेले जाणवतात. त्यामुळे  वाचताना अडाखायला होत नाही तरी मूळ इंग्रजी वाक्य काय असेल ह्याचा अंदाज बांधता येतो.  

कामात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे आणि परिस्थितीमुळे लेखकाचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन अजून प्रगल्भ झाला. पुस्तकाच्या वाचनातून आपला सुद्धा. श्रीमंत असो वा गरीब; उच्चपदस्थ असो की कष्टकरी; प्रत्येकाचा स्वतःचा संघर्ष आहे, स्वतःची सुखदुःख आहेत, प्रत्येक कामाची आपापली एक धमालसुद्धा आहे. काम-पैसा-अधिकार-आरोग्य-कुटुंब-आनंद असं सगळ्याचं संतुलन साधत जगणं हे आवश्यक आहे. परिस्थितीने उभारलेली आव्हानं स्वीकारत खचून न जात पुन्हा पुन्हा उभं राहणं आवश्यक आहे, शक्य आहे !


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन (Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahtan)




पुस्तक - हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन (Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahtan)
लेखक - श्री. एम्. (Shri. M.)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Apprenticed to a Himalayan Master: A Yogi's Autobiography
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
अनुवादक - श्री. वि. पटवर्धन. 
(S.V. Patwardhan)
प्रकाशन - मॅजेन्टा प्रेस, २०१२
छापील किंमत - ३९५/-
पाने - ३६१
ISBN - 978-819100968-2


आत्तापर्यंत मी वाचलेल्या पुस्तकांपैकी सर्वांत अद्भुत आणि आणि अविश्वसनीय पुस्तक असं हे पुस्तक आहे. लेखकाबद्दल मला काही माहिती नव्हती पण माझ्या युट्युब चॅनलवर ज्यांची पुस्तक अभिवाचने मी सादर करत असतो त्या केळकर काकूंनी मला हे पुस्तक वाचायला दिलं. आणि मी ते झपाट्याने वाचून काही दिवसांत पूर्ण केलं. पुस्तकाचा विषय आहे ध्यानधारणा करणाऱ्या, कुंडलिनी किंवा सप्तचक्रे जागृत झालेल्या एका साधकाचे - लेखक श्री. एम् यांचे - अनुभव.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका


श्री. एम् हे जन्माने मुस्लिम मुमताज अली खान. पण लहानपणापासून त्यांना स्वप्नांमध्ये असं दिसू लागलं की कोणी तरी हिंदू योगी, तपस्वी त्यांना दर्शन देतो आहे. आपल्याला बोलावतो आहे. आतला आवाज, अध्यात्मिक जाण, ह्या भौतिक आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं, वरचं असं त्यांना खुणावत राहिली. त्यांच्या वडिलांच्या व्यासंगामुळे व हिंदू मित्रांच्या संगतीमुळे त्यांना हिंदू शास्त्रांची पुस्तके वाचनात आली. त्यातून ही जाणीव वृद्धिंगत झाली. आयुष्यात चमत्कार म्हणावेत अश्या गोष्टीही घडत होत्या - म्हणजे काही साधू, फकीर त्यांच्या समोर येऊन "तू ती विशेष व्यक्ती आहेस" असं सुचवू लागले. आपले गुरु हिमालयात आहेत. त्यांचा शोध घेतलाच पाहिजे ही अनिवार उर्मी त्यांच्या मनात दाटून येत होती. त्यामुळे कळत्या वयात घर सोडून ते हिमालयाच्या दिशेने निघाले.

पण गुरू कोण? कुठे भेटणार? काय शोधणार हे काहीच माहिती नाही. त्यामुळे वाट फुटेल तसं, मनाला वाटेल तसं ते फिरू लागले. दक्षिण भारतातील तीर्थस्थळांपासून काशी, प्रयाग, हृषीकेश, बद्रिकेदार असं फिरत राहिले. वेगवेगळ्या आश्रमांत राहिले. साधू, संन्यासी ह्यांना भेटत राहिले. पैसे, नेहमीचे कपडे वगैरे सोडून देऊन ब्रह्मचाऱ्याचा रूपाचा स्वीकार केला. तिथे भेटलेल्या एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी शिवप्रसाद हे नाव धारण केलं. त्यांना योगी भेटत होते. ध्यानमग्न अवस्थेत अतींद्रिय अनुभव येत होते.

फिरता फिरता त्यांची शेवटी गुरूंशी - बाबाजींशी - गाठ पडली. आणि त्यांनी दीक्षा दिली. ध्यानधारणेचे नवीन मार्ग शिकवले. चमत्कार दाखवले. शरीर विरहित योगी लोकांनी त्यांना दर्शन दिल. "नागलोकातले" नागराज त्यांना भेटले. गुरूंनी त्यांना पूर्वजन्मात श्री एम्. कोण होते आणि त्यांचा हा प्रवास कसा आधीपासून ठरलेला आहे हे सांगितलं. गुरूंबरोबर ते सडे तीन वर्षं हिमालयात राहिले. त्यामुळे पुढची कित्येक पानं अश्या अद्भुत अनुभवांनी भरलेली आहेत.

गुरूंनी त्यांना व्यवहारिक जीवनात जायला सांगितलं. त्यामुळे पुढे त्यांनी पत्रकार, अध्यात्मिक संस्थांचा व्यवस्थापक वगैरे कामं केली. रामकृष्ण मिशनमध्ये , दिल्लीतील एका मासिकात, जे. कृष्णमुर्तींच्या संस्थेत, शैक्षणिक संस्थेत त्यांनी कामं केली. पण त्यांचे गुरु त्यांना दृष्टांत देऊन आता पुढे काय करायचं सांगत. त्यामुळे भटकंती आणि वेगवेगळ्या साधूंना, त्यांच्या समाधीला भेट देणं हे चालूच होतं. आळंदीला ज्ञानेश्वर समाधीचा त्यांचा अनुभव, शिर्डीला साईबाबांनी दिलेलं दर्शन, पुढे कैलास पर्वताच्या यात्रेत तर थेट "कैलासलोका"त जाऊन आल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्या शंकराच्या दरबारात जीझस, नानक आणि इतर महात्मे उपस्थित होते. असे अनुभव त्यांनी सांगितले आहेत.

आता पुस्तकातली काही पाने वाचून बघा.

लहानपणी कोणीतरी आपल्याशी संपर्क साधतंय हा अनुभव




तरुणपणी एका जंगलातल्या समाधी जवळ आलेला अनुभव




गुरूंचे कुंडलिनी बद्दल मार्गदर्शन




हिंदू असोत की मुसलमान, आत्म्याच्या पातळीवर जगणारे साधू-फकीर सगळे एकमेकांना आतून "ओळखतात" हे सांगणारा प्रसंग. गुरूंनी त्यांना सुफी पद्धतीची ध्यानधारणा पण शिकून घ्यायला लावली.





एकूणच हे पुस्तक अश्या अचाट, अतीन्द्रिय अनुभवांनी भरलेलं आहे. हे सगळं खरं असेल का कल्पनाविलास हे प्रत्येक वाचकाने स्वतःच ठरवायचं. हे सगळं थोतांड आहे असं वाटायला लागलं तर काही पानांतच कंटाळा येईल. हे खरं असेल अशी खात्री असेल तर भक्तिभावाने पुस्तक पूर्ण होईल. किंवा तिसऱ्या पद्धतीने, हे खरं आहे असं गृहीत धरून वाचलं तरी एक छान अद्भुतरम्य - फँटसी - पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल. अश्या सिद्धी प्राप्त झाल्या तर खरंच काय घडेल ह्याची एक झलक दिसेल. पुस्तक अध्यात्मिक विषयावरचं असलं तरी प्रत्यक्ष अध्यात्मिक चर्चा, तत्त्वज्ञान असं पुस्तकात फार नाहीये. ओझरतं येतं इतकंच. पुस्तकाचा पूर्ण भर अनुभव सांगण्यावर आहे; त्यांच्या प्रवासावर आहे. त्यामुळे हे "जड" पुस्तक नाहीये. अनुवाद छान झाला आहे. ह्या पद्धतीचं वाचायला आवडत असेल किंवा ह्या आधी असं काही वाचलं नसेल तर हे पुस्तक वाचून बघा.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...