हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन (Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahtan)




पुस्तक - हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन (Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahtan)
लेखक - श्री. एम्. (Shri. M.)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Apprenticed to a Himalayan Master: A Yogi's Autobiography
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
अनुवादक - श्री. वि. पटवर्धन. 
(S.V. Patwardhan)
प्रकाशन - मॅजेन्टा प्रेस, २०१२
छापील किंमत - ३९५/-
पाने - ३६१
ISBN - 978-819100968-2


आत्तापर्यंत मी वाचलेल्या पुस्तकांपैकी सर्वांत अद्भुत आणि आणि अविश्वसनीय पुस्तक असं हे पुस्तक आहे. लेखकाबद्दल मला काही माहिती नव्हती पण माझ्या युट्युब चॅनलवर ज्यांची पुस्तक अभिवाचने मी सादर करत असतो त्या केळकर काकूंनी मला हे पुस्तक वाचायला दिलं. आणि मी ते झपाट्याने वाचून काही दिवसांत पूर्ण केलं. पुस्तकाचा विषय आहे ध्यानधारणा करणाऱ्या, कुंडलिनी किंवा सप्तचक्रे जागृत झालेल्या एका साधकाचे - लेखक श्री. एम् यांचे - अनुभव.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका


श्री. एम् हे जन्माने मुस्लिम मुमताज अली खान. पण लहानपणापासून त्यांना स्वप्नांमध्ये असं दिसू लागलं की कोणी तरी हिंदू योगी, तपस्वी त्यांना दर्शन देतो आहे. आपल्याला बोलावतो आहे. आतला आवाज, अध्यात्मिक जाण, ह्या भौतिक आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं, वरचं असं त्यांना खुणावत राहिली. त्यांच्या वडिलांच्या व्यासंगामुळे व हिंदू मित्रांच्या संगतीमुळे त्यांना हिंदू शास्त्रांची पुस्तके वाचनात आली. त्यातून ही जाणीव वृद्धिंगत झाली. आयुष्यात चमत्कार म्हणावेत अश्या गोष्टीही घडत होत्या - म्हणजे काही साधू, फकीर त्यांच्या समोर येऊन "तू ती विशेष व्यक्ती आहेस" असं सुचवू लागले. आपले गुरु हिमालयात आहेत. त्यांचा शोध घेतलाच पाहिजे ही अनिवार उर्मी त्यांच्या मनात दाटून येत होती. त्यामुळे कळत्या वयात घर सोडून ते हिमालयाच्या दिशेने निघाले.

पण गुरू कोण? कुठे भेटणार? काय शोधणार हे काहीच माहिती नाही. त्यामुळे वाट फुटेल तसं, मनाला वाटेल तसं ते फिरू लागले. दक्षिण भारतातील तीर्थस्थळांपासून काशी, प्रयाग, हृषीकेश, बद्रिकेदार असं फिरत राहिले. वेगवेगळ्या आश्रमांत राहिले. साधू, संन्यासी ह्यांना भेटत राहिले. पैसे, नेहमीचे कपडे वगैरे सोडून देऊन ब्रह्मचाऱ्याचा रूपाचा स्वीकार केला. तिथे भेटलेल्या एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी शिवप्रसाद हे नाव धारण केलं. त्यांना योगी भेटत होते. ध्यानमग्न अवस्थेत अतींद्रिय अनुभव येत होते.

फिरता फिरता त्यांची शेवटी गुरूंशी - बाबाजींशी - गाठ पडली. आणि त्यांनी दीक्षा दिली. ध्यानधारणेचे नवीन मार्ग शिकवले. चमत्कार दाखवले. शरीर विरहित योगी लोकांनी त्यांना दर्शन दिल. "नागलोकातले" नागराज त्यांना भेटले. गुरूंनी त्यांना पूर्वजन्मात श्री एम्. कोण होते आणि त्यांचा हा प्रवास कसा आधीपासून ठरलेला आहे हे सांगितलं. गुरूंबरोबर ते सडे तीन वर्षं हिमालयात राहिले. त्यामुळे पुढची कित्येक पानं अश्या अद्भुत अनुभवांनी भरलेली आहेत.

गुरूंनी त्यांना व्यवहारिक जीवनात जायला सांगितलं. त्यामुळे पुढे त्यांनी पत्रकार, अध्यात्मिक संस्थांचा व्यवस्थापक वगैरे कामं केली. रामकृष्ण मिशनमध्ये , दिल्लीतील एका मासिकात, जे. कृष्णमुर्तींच्या संस्थेत, शैक्षणिक संस्थेत त्यांनी कामं केली. पण त्यांचे गुरु त्यांना दृष्टांत देऊन आता पुढे काय करायचं सांगत. त्यामुळे भटकंती आणि वेगवेगळ्या साधूंना, त्यांच्या समाधीला भेट देणं हे चालूच होतं. आळंदीला ज्ञानेश्वर समाधीचा त्यांचा अनुभव, शिर्डीला साईबाबांनी दिलेलं दर्शन, पुढे कैलास पर्वताच्या यात्रेत तर थेट "कैलासलोका"त जाऊन आल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्या शंकराच्या दरबारात जीझस, नानक आणि इतर महात्मे उपस्थित होते. असे अनुभव त्यांनी सांगितले आहेत.

आता पुस्तकातली काही पाने वाचून बघा.

लहानपणी कोणीतरी आपल्याशी संपर्क साधतंय हा अनुभव




तरुणपणी एका जंगलातल्या समाधी जवळ आलेला अनुभव




गुरूंचे कुंडलिनी बद्दल मार्गदर्शन




हिंदू असोत की मुसलमान, आत्म्याच्या पातळीवर जगणारे साधू-फकीर सगळे एकमेकांना आतून "ओळखतात" हे सांगणारा प्रसंग. गुरूंनी त्यांना सुफी पद्धतीची ध्यानधारणा पण शिकून घ्यायला लावली.





एकूणच हे पुस्तक अश्या अचाट, अतीन्द्रिय अनुभवांनी भरलेलं आहे. हे सगळं खरं असेल का कल्पनाविलास हे प्रत्येक वाचकाने स्वतःच ठरवायचं. हे सगळं थोतांड आहे असं वाटायला लागलं तर काही पानांतच कंटाळा येईल. हे खरं असेल अशी खात्री असेल तर भक्तिभावाने पुस्तक पूर्ण होईल. किंवा तिसऱ्या पद्धतीने, हे खरं आहे असं गृहीत धरून वाचलं तरी एक छान अद्भुतरम्य - फँटसी - पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल. अश्या सिद्धी प्राप्त झाल्या तर खरंच काय घडेल ह्याची एक झलक दिसेल. पुस्तक अध्यात्मिक विषयावरचं असलं तरी प्रत्यक्ष अध्यात्मिक चर्चा, तत्त्वज्ञान असं पुस्तकात फार नाहीये. ओझरतं येतं इतकंच. पुस्तकाचा पूर्ण भर अनुभव सांगण्यावर आहे; त्यांच्या प्रवासावर आहे. त्यामुळे हे "जड" पुस्तक नाहीये. अनुवाद छान झाला आहे. ह्या पद्धतीचं वाचायला आवडत असेल किंवा ह्या आधी असं काही वाचलं नसेल तर हे पुस्तक वाचून बघा.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)

पुस्तक - सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara) लेखक - बेन्यामिन (Benyamin) अनुवादक - ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Th...