द आंत्रप्रेन्यूअर (The Entrepreneur)




पुस्तक - द आंत्रप्रेन्यूअर (The Entrepreneur)
लेखक - शरद तांदळे (Sharad Tandale)
भाषा - मराठी
पाने - १८४
प्रकाशन - न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
छापील किंमत - रु २५० /-
ISBN 978-81-934468-7-4

सदर पुस्तक "द आंत्रप्रेन्यूअर" आणि "रावण - राजा राक्षसांचा" ह्या दोन पुस्तकांमुळे शरद तांदळे प्रसिद्ध आहेत. मराठवाड्यात एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला सर्वसाधारण मुलगा ते एक यशस्वी "सरकारी कामांचा कंत्राटदार" आणि आता लेखकही; असा त्यांचा प्रवास आहे. "द आंत्रप्रेन्यूअर" ही त्यांची आत्मकथा आहे. स्वतःचे गुणदोष आणि चुका प्रामाणिकपणे सांगणारे हे पुस्तक एकाअर्थी तांदळे ह्यांचे "माझे सत्याचे प्रयोग" आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आयुष्यात नक्की काय करायचं आहे; आपला खरा कल, खरी आवड कशात आहे; हे खरं म्हटलं तर आयुष्यात आपल्या फार उशीरा लक्षात येतं. पण करियरची निवड ही दहावी, बारावी, पदवी ह्यात आपल्याला करावीच लागते. आजूबाजूची मुलं, कुटुंबातल्या लोकांचे सल्ले आणि थोडीफार ऐकीव माहिती ह्यांवर निर्णय घेतला जातो. मग घेतलेला निर्णय कसाबसा तडीस नेणे आणि त्यानुसार आयुष्य घालवणे हेच हातात उरतं. पण बरीच मुलं ही घालमेल नीट निभावून नेऊ शकत नाही. अशीच अवस्था लेखकाची होती. अभ्यास आवडत नाही. त्यात लक्ष लागत नाही. कॉलेजचा वेळ टाईमपास करण्यात जातो. उनाडक्या, अवांतर धंदे, क्षुद्र राजकरण असे करण्यात लक्ष दिल्यामुळे यथातथा मार्कांनी उत्तीर्ण होतात. मग नोकरी मिळवण्याची धडपड. हा कोर्स कर, तिकडची एजन्सी गाठ; ह्याला पैसे दे असं करण्यात वेळ पैसा जातो. नैराश्य येतं. उमेदीचं वय फुकट जातं. घरच्यांचा अपेक्षाभंग होतो. पैशांसाठी त्यांच्यावरच अवलंबून असलो ट्री त्यांना आपला "स्ट्रगल" कळत नाही हा माज सुद्धा आहे. त्यातून नात्यांत कटुता येते. पुस्तकाची सुमारे ८०-९० पानं लेखकाने आपण अश्या सगळ्या चुकांचं वर्णन - जणू स्वतःवरचं सविस्तर आरोपपत्र - सादर केलं आहे.

इतकं वाचून आपण दमतो आणि असं वाटतं की ह्या मुलाच्या हातून काही घडणार आहे की नाही. मग लेखकाला एकदाची सरकारी कामाच्या कंत्राटांचा "सब-कॉन्ट्रॅक्टर" होण्याची वाट सापडते. त्यातले टक्के टोणपे खात; चुका करत पण तरीही प्रामाणिक प्रयत्न करत आणि स्वतःला सावरत तो प्रगती करतो. पुस्तकाचा पुढचा भाग. "सब-कॉन्ट्रॅक्टर" ते "कॉन्ट्रॅक्टर" ते राज्यभर कामे घेणारा, मोठी उलाढाल असलेला कंत्राटदार कशी झाली ह्याचं वर्णन आहे. महत्त्वाचे प्रसंग, झालेल्या चुका, गैरसमज आणि त्यातून शिकलेले धडे असा बराच रोचक मजकूर आहे. जणू "आरोपपपत्र" दाखल झालेल्या आरोपीने आता सुधारून "चांगल्या वागणुकीचं प्रमाणपत्र" मिळवलं आहे. असाच फरक दिसतो.

शेवटच्या काही पानांत ब्रिटन मधल्या संस्थेने "यंग आंत्रप्रेन्यूअर" पुरस्कारासाठी कशी निवड केली, तो अनुभव कसा होता; त्यातूनही काय शिकायला मिळालं हे वर्णन आहे. चुकांची शिक्षा भोगून, नैराश्याच्या तुरुंगातून आता सुटका होऊन आता स्पर्धेच्या, यशस्वीतेच्या खुल्या जगात त्याला सोडण्यात आलं आहे. असा सुखद शेवट होतो.

आता काही पाने वाचूया
इंजिनिअरिंग कॉलेज मधला टाईमपास




कशीबशी पदवी मिळवल्यावर, नोकरी साठी बरेच धक्के खाल्ल्यावर; "जाऊ दे, आता आपण सरळ स्वतःच धंदा करू" असला विचार आणि त्यासाठी पुन्हा घरच्यांकडेच पैसे मागणे




"सब-कॉन्ट्रॅक्टर" म्हणून एक अनुभव




यश मिळायला लागल्यावर ते पचवता ही आलं पाहिजे. तसंच यशस्वी माणसाच्या समस्या पण वेगळ्या. त्याबद्दल थोडं.




तरुण वयातलं बेफाम वागणं आणि त्याचे दुष्परिणाम समजून घेण्यासाठी शाळा-कॉलेजच्या मुलांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" हे घडलं पाहिजे. जे आत्ता स्वतःचा व्यवसाय थाटायच्या विचारात असतील - मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो - त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण, आपला वेळ, पैसा, श्रम, अहंकार, चिकाटी, मानसन्मान, नाती, चातुर्य सगळं पणाला कसं लावावं लागतं हे त्यातून समजेल. केवळ "स्टार्टअप"ची गुलाबी चित्रे बघून उद्योग सुरु करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा "नोकरी" बरी. म्हणूनच आपली नोकरी प्रामाणिकपणे करण्यातही काही कमीपणा नाही; आपण जिथे काम करतोय त्या उद्योजकाच्या त्यागाची-कष्टाची जण ठेवून चांगलं काम केलं, चांगलं वेतन मिळवलं तर तर "उभयविजय (win-win)" च आहे. हे सांगायलाही लेखक विसरत नाही.


तरुणाईचं आणि उद्योजकाचं भावविश्व स्वानुभवातून मांडणारं; त्यातून त्यांनी घेतलेले धडे सांगणारं, बरंच काही शिकवणारं पुस्तक आहे हे. तरुणांनी वाचावं. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- तरुणांनी  आवा ( आवर्जून वाचा )
                             इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...