पुस्तक - मिस्टेक इन बँकॉक (Mistake in Bangkok)
लेखक - स्वप्नील सोनवडेकर (Swapnil Sonawdekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२१
प्रकाशन - स्वयंप्रकाशित
ISBN - 978-1-63920054-2
छापील किंमत - २४९/- रु.
मागच्या आठवड्यात एका वाचन विषयक फेसबुक ग्रुप वर "केदारनाथ" नावाच्या पुस्तकाचे परीक्षण वाचले. परिचयाची शैली आवडली. म्हणून लिहिणाऱ्याबद्दल उत्सुकता वाटली. नाव स्वप्नील सोनवडेकर होतं. फेसबुक प्रोफाइल बघितलं. त्याच्या फोटोवरून, पोस्टवरून तो एक तरुण वाचनप्रेमी आहे हे लक्षात आलं. मग अजून बघताना कळलं की तो स्वतःही एक लेखक आहे. दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच्या प्रोफाईलवर एका मॉडेल सारखं त्याचं देखणं रूप दाखवणारी बरीच रील्स पण दिसली. फक्त टाईमपास पोस्ट न दिसता लेखन, वाचन, पुस्तकं, सामाजिक विषय ह्यांवरच्या पोस्ट पण दिसल्या. मग त्याच्याशी चॅटिंग होऊन जुजबी ओळख झाली. एकूण इंटरेस्टिंग व्यक्तिमत्त्व वाटलं. म्हणून माझ्या पिढीतल्या ह्या लेखकाने काय लिहिलंय हे वाचून बघावं अशी इच्छा निर्माण झाली. त्याच्या दोन पुस्तकापैकी एका पुस्तकाचा विषय जरा वेगळा ताजा वाटला. म्हणून ते पुस्तक विकत घेतलं..."मिस्टेक इन बँकॉक".
ही एक छोटेखानी कादंबरी आहे. कादंबरीचा नायक एक तरुण मुलगा - अक्षय - आपल्या पत्नीला आपल्या गतायुष्यातल्या घटना सांगतोय. कॉलेजवयीन असतानाचा त्याचा भूतकाळ त्याने बायकोपासून लपवून ठेवला आहे त्याबद्दल तो सांगतो. हा काळ आहे थरारक गोष्टींचा. शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी, चांगलं उत्पन्न ह्यासाठी त्याची उमेदवारी चालू असताना त्याच्या मित्राने - संजयने - त्याची ओळख करणशी करून दिली. करणने दोघांना त्याला बँकॉक मध्ये वेब डेव्हलपमेंट च्या जॉब ची संधी दिली. दोघे बँकॉकला आले. हातात पैसे खुळखुळू लागले. मजा करू लागले. त्यांच्यापेक्षाही करणची जीवनशैली फारच छानचौकीची. कारण हा करण पैसे कमवत होता अमली पदार्थांच्या तस्करीतून. त्याने अक्षय, संजयलाही जाळ्यात ओढले. आणि " बँकॉक मध्ये मिस्टेक" घडली.
मध्यमवर्गीय पापभिरू अक्षय ह्या जाळ्यात कसा फसला, कळून सावरूनही त्यात कसा अडकला, पुढे टाकलेलं पाऊल मागे घ्यायला जमलं, का नाही? हे लेखकाने थोडक्यात पण पटेल असं मांडलं आहे. तस्करी केली की पोलीस यंत्रणा पाठीमागे लागणारच आणि पुढेमागे चोरी उघडकीला येणारच. ते कसं होईल, कसे सुटतील; गुन्हेगारी विश्वातल्या लोकांचे डावपेच त्याला आणखीन काय काय करायाला लावतील हे सगळं उत्कठावर्धक पद्धतीने लेखकाने लिहिलं आहे.
मनात नसूनही गरीबी किंवा काही कौटुंबिक परिस्थितीमुळे झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग कसा चोखाळला जातो आणि एकदा ह्या जगात शिरलं की बाहेर येणं किती कठीण आहे; हे सामाजिक वास्तव लेखकाने मांडलं आहे. पण रडकी, आक्रस्ताळी किंवा अक्कल शिकवणारी वर्णनं टाळली आहेत. हे चांगलं केलं आहे.
निवेदनाची शैली सोपी, सरळ आहे. विनाकारण स्थलवर्णन, वेशभूषा वर्णन करणारी नाही. काही वेळा प्रसंग पूर्ण पटतीलच असं नाही; म्हणजे "हे इतकं सोपं कसं काय" असं काही वेळा वाटू शकेल. लेखकाने प्रसंग अजून सविस्तरपणे सांगायला पाहिजे होता असं वाटू शकतं. निवेदनाचा वेग इतका आहे की आपण "हे घडलं असेल" असं धरून पुढे उत्सुकतेने वाचत राहतो. आणि शेवटपर्यंत मजा घेत वाचतो.
ही रहस्य/थरार स्वरूपातली आणि त्यातही अगदी कमी पानांची कादंबरी असल्यामुळे मजकूराबद्दल अजून सविस्तर लिहिणं म्हणजे भावी वाचकांचा रसभंग ठरेल. म्हणून दोन तीन पानं देतो जेणेकरून लेखनशैलीची कल्पना येईल.
तस्करीच्या कामाशी ओळख
तुरुंगवारीचा अनुभव
पुस्तकात प्रमाणलेखनाच्या चुका खूप आहेत. काही काही वाक्यरचना किंवा शब्द खटकतात. लेखकाने पुढच्या आवृत्तीत किंवा किमान पुढचे पुस्तक तयार करताना त्याकडे फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे वाचनानुभव अजून चांगला होईल.
पुस्तकाचा विषय अनेक रहस्यपटांतून, पुस्तकांतून येऊन गेलेला आहे. अजून कितीही पुस्तकं लिहिली गेली तरी तो नेहमीच ताजा राहणारा विषय आहे. त्यामुळे ह्या पुस्तक प्रकारात लेखकाच्या निरीक्षणशैलीचा, लेखनशैलीचा कस आहे. नवोदित लेखक असूनही इतपत रंजक पुस्तक लिहिलं आहे; ह्याबद्दल स्वप्नील चे खूप खूप अभिनंदन. त्याने पुढे लिहीत राहावं, नवनवे प्रयोग करत राहावेत अशा शुभेच्छा. माझ्या पिढीचे असे ताज्या दमाचे लेखक लिहितायत, मराठीत लिहीतायत. ते अजून काही वर्षांनी ते प्रथितयश लेखक होतील तेव्हा; त्यांची आपली तोंड ओळख आहे, त्यांची पुस्तकं सुरुवातीपासून वाचली आहेत हे सांगायला मलाच अभिमान वाटेल.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
चांगलं लिहू शकणाऱ्या नवोदिताला प्रोत्साहन देण्यासाठी जवा ( जमल्यास वाचा )
अन्यथा वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
No comments:
Post a Comment