श्रील प्रभुपाद (Shrila Prabhupad)

पुस्तक - श्रील प्रभुपाद (Shrila Prabhupad)
लेखक - हिंदोल सेनगुप्ता (Hindol Sengupta)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २७२
मूळ पुस्तक - Sing Dance & Pray (सिंग, डान्स अँड प्रे )
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
अनुवाद - डॉ. शुचिता नांदापूरकर- फडके आणि सौ. नयना पिकळे
(Dr. Shuchita Nandapurkar-Phadke And Nayna Pikale)
प्रकाशन - हेडविग मीडिया हाऊस, एप्रिल २०२५
ISBN - 978-81-967886-0-5
छापील किंमत - ४५०/- रु.

भारतीय संस्कृती, हिंदुधर्म, वेदांमधील ज्ञान, तत्वज्ञान हे हजारो वर्षे चालत आलेले आहे. त्याबद्दल जगभरातल्या विद्वानांना आकर्षण आणि उत्सुकता नेहमीच राहिली आहे. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी देशोदेशी नक्कीच पोचल्या असतील. पण त्या सर्वसामान्य परदेशी लोकांपर्यंत पोचवण्याचं; इतकंच नव्हे तर त्यांची जीवनपद्धती भारतीय करण्याचं काम फार थोड्या व्यक्तींना, संस्थांना जमले असेल. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे "इस्कॉन" - "हरे कृष्णा" चळवळ. परदेशी गोरे लोक भगवी वस्त्रे लेवून, मुंडन करून, "हारे रामा हारे ख्रीश्ना" असा नाचत, वाद्य वाजवत जप करतायत हे दृश्य तुम्ही बघितलं असेलच. "भगवद्गीता - जशी आहे तशी" ह्या पुस्तकाची विक्री करणारे देशी- परदेशी संन्यासी बघितले असतील. हे सगळे "इस्कॉन" - "हरे कृष्णा" चळवळीचे सदस्य. श्रीकृष्ण हे आराध्य दैवत, गीता, भागवत हे महत्त्वाचे धर्मग्रंध आणि "हरे राम हरे कृष्ण" हा जप, जगन्नाथाची रथयात्रा आणि अन्नदानाचे आयोजन ही व्यवच्छेदक लक्षणे आपल्या सहज लक्षात येतील. जागोजागी असणारी मोठमोठी "इस्कॉन मंदिरे" आणि त्यांचे भव्यदिव्य कार्यक्रम ह्यातून ही संस्था आर्थिक दृष्ट्याही भरभराटीला आली असल्याचं ही जाणवेल. एकाअर्थी ही संस्था आणि तिचे साधक हे भारताचे सांस्कृतिक राजदूतच आहेत. अशी ही महत्त्वाची धार्मिक संस्था कशी सुरु झाली, देशाबाहेर कशी पसरली आणि अ-भारतीय लोकांमध्ये इतका आमूलाग्र बदल कशी घडवू शकली हे जाणणं निश्चित औत्सुक्याचं आहे. म्हणूनच तिचे संस्थापक श्रील प्रभुपाद ह्यांचं हे चरित्र वाचनीय आहे.

श्रील प्रभुपाद ह्यांचं मूळ नाव अभय चरण डे. त्यांचा जन्म १८९६ मध्ये कलकत्त्यातील एका सुखवस्तू पण धार्मिक घरात झाला. गौडीय वैष्णव परंपरांचे ते पालन करत. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेप्रमाणे बंगाल मधली चैतन्य महाप्रभु ह्या संतांमुळे प्रचलित झालेली ही परंपरा. त्यांच्या धार्मिक वृत्तीची जोपासना लहानपणीच झाली असली तरी इतर बहुतेक संतांप्रमाणे लहानपणापासून ते एक विरक्त म्हणून राहिले नाहीत. ते संसारी होते. त्यांनी लग्न केले, मुलाबाळांसह संसार केला, नोकरी केली, व्यवसाय केला, यश अपयश पचवले. पण कृष्णभक्ती आणि सांसारिक मोहापासून दूर जाण्याची इच्छा सतत मनात तेवत राहिली. म्हणून त्यांनी ह्याविषयावर पुस्तके लिहिणे, मासिक चालवणे असे उद्योग स्वखर्चाने सुरु केले. शंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळात कागदाच्या टंचाईपासून वर्गणीदार गोळा करण्यापर्यंत सगळे झगडे ते करत होते. झाशी, वृंदावन, प्रयाग अशा ठिकाणी राहून मुख्य धंदा आणि प्रकाशनाचा जोडधंदा सांभाळत होते. पण भारतात त्यांना फार प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी वयाच्या सत्तरीत त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांच्या गुरूच्या आदेशानुसार पुस्तकांद्वारे जगभर कृष्णभक्तीचा प्रसार करायला निघाले. वयाच्या सत्तरीत जेव्हा माणसे शरीराने, मनाने सर्व व्यापांतून निवृत्त होऊन आराम करण्याच्या मनःस्थितीत असतात तेव्हा अभय चरण डे अर्थात संन्यासानंतरचे भक्तिवेदांत नव्या उमेदीने कार्यविस्ताराला परदेशी निघाले. हे वाचून आश्चर्यचकित व्हायला होते. पुस्तकात हाआधीचा कालखंड, त्यांचे तोपर्यंतचे काम ह्याची बऱ्यापैकी माहिती आहे.

त्यानंतर पुस्तकात पुढचा भाग सविस्तर आहे. अमेकरिकेच्या प्रवासातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तरी ते पुढे जातच राहिले. पहिल्यांदा ते पेन्सिलव्हिनिया इथे परिचितांकडे राहिले. त्यांनी लोकांना इंग्रजीतून प्रवचन द्यायला सुरुवात केली. त्यावेळची अमेरिका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक घुसळणीतून जात होती. व्हियेतनाम युद्धासाठी तरुणांना जबरदस्तीने सैन्यात भरती व्हावे लागत होते, त्यामुळे अस्वस्थता होती. काळे - गोरे ह्यांचा वांशिक संघर्ष होता. श्रीमंतांना सर्व भौतिक सुखं मिळत असूनही समाधान नव्हते. त्यातून दारू आणि अमली पदार्थांचे सेवन वाढले होते. प्रस्थापित भांडवलशाही विरुद्ध झगडे होते. ह्या भयंकर परिस्थितीचे वर्णन लेखकाने व्यवस्थित केले आहे. त्यातून प्रभुपादांच्या आगमनाची आणि पुढील कामाची पार्श्वभूमी आणि प्रत्ययकरिता स्पष्ट झाली आहे.

"भक्तिवेदांत" ह्या नावाने त्यांनी आपले काम सुरु केले. प्रवचने, नामस्मरण आणि पुस्तक/मासिकांची विक्री ह्यातून ते संदेश पसरवत होते. स्वतः सुरात गात भजन करायचे. अन्नदान करायचे. "अमली पदार्थांची धुंदी थोडाच वेळ टिकेल पण पेक्षा कृष्णभक्तीची धुंदी चढली नाही की ती उतरणार नाही" असा त्यांचा उपदेश असे. सुरवातीला बेघर, अमली पदार्थांचे सेवन करणारे किंवा तणावग्रस्त अशा लोकांना हे काहीतरी वेगळं असल्याचं जाणवून ते प्रभुपदांकडे आकर्षित झाले. त्यांना अनुयायी मिळायला सुरुवात झाली. इतरांकडून आर्थिक मदत मिळायला सुरवात झाली. दुकानाच्या एका छोट्या गाळ्यात पहिले मंदिर सुरु झाले. अनुयायी मिळत होते. पण पाश्चिमात्य संस्कृतीशी पूर्णपणे वेगळे अशी त्यांची नियमावली होती. मांसाहार, अमली पदार्थाचं सेवन वर्ज्य होतं. साधारण लग्न संसाराला परवानगी होती. जपजाप, आरती ह्या दिनचर्येला महत्व होते. आश्रम म्हणजे काय, त्याचे नियम काय असावेत, दीक्षा कशी द्यायची ह्याचे पायंडे प्रभुपाद घालून देत होते. कितीतरी प्रसंगांतून हे पायाभरणीचे दिवस पुस्तकात उलगडून दाखवले आहेत.

पुढच्या भागात अमेरिकेत त्यांनी केलेला प्रवास, "बीटल्स" ह्या प्रसिद्ध वाद्यवृदांतील संगीतकार जॉर्ज हॅरिसन, प्राध्यापक ॲलन जिन्सबर्ग अशा प्रथितयश व्यक्तींनी घेतलेलं केलेलं शिष्यत्व, लंडनचा प्रवास आणि तिथलं काम असे प्रसंग आहेत. पुढे जगभरचा प्रवास, ठिकठिकाणी केंद्रांची स्थापना ह्याचा प्रसंगोपात उल्लेख आहे. कामाचा व्याप वाढला तसा संस्था म्हणून दैनंदिन व्यवहारांकडे बघणे, पैशाचं व्यवस्थापन ह्याचाही ताण वाढू लागला. अल्पावधीतच चळवळ फोफावली हे चांगलं असलं तरी कार्यकर्ते-साधक नवशिकेच होते. शिकवण पूर्ण अंगी मुरायच्या आधीच त्यांच्यावर एकेका केंद्राची जबाबदारी आली होती. त्यातून मतभेद, चुकीचे निर्णय, वैयक्त्तिक महत्त्वाकांक्षा असे दोषही संस्थेत दिसू लागले. प्रभुपाद पत्रांद्वारे लोकांना कसे मार्गदर्शन करत, त्यांनी नियामक मंडळ कसे सुरु केले, वाद कसे झाले असा कटू भाग सुद्धा पुस्तकात आहे.

युरोप-अमेरिकेत यश मिळाल्यावर भारतीयांचे कुतूहल वाढले, आदर वाढला असे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मायापूर(प. बंगाल), वृंदावन, मुंबई इथे मोठमोठी मंदिरे आणि केंद्रे उभारायचे प्रकल्प त्यांनी हाती घेतले. तरी सगळं अगदी सुतासारखं सरळ झालं नाही. कधी जागेचे वाद तर कधी स्थानिकांकडून कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले असेही प्रकार झाले. असे पुस्तकात उल्लेख आहेत. अमेरिकेत कोर्ट कचेऱ्यांनाही तोंड द्यावं लागलं. इस्कॉनवाले लोकांचा बुद्धीभ्रंश करून स्वतःच्या कह्यात आणतात. जणू काही चेटूक करून लोकांना वाममार्गाला लावतात असाच आरोप झाला. तेव्हा संस्थेने काय प्रतिवाद केला ते पुस्तकात आहे. ख्रिश्चन लोक धर्मांतरित होतायत हे बघून चर्चने सुद्धा बदनामी करायचा प्रयत्न केला. तेव्हाही संस्थेला प्रतिवाद करावा लागला. त्याचेही प्रसंग पुस्तकात आहेत.

अशा प्रकारे प्रभुपादांच्या वैयक्तिक आणि संस्थात्मक संघर्षातून इस्कॉन नावारूपाला आली. वयाच्या सत्तरीनंतर केलेले हे अद्वितीय कार्य आहे. १९७७ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्या आवडत्या वृंदावन धामी त्यांनी आपला देह ठेवला. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा जगाला कायम मार्गदर्शक राहील आणि त्यातून ते आपल्यात आहेत असा संदेश त्यांनी अखेरीस दिला. त्यांच्या अंतिम दिवसांत निवृत्तिपर होत असूनही रात्र रात्रभर जागून ते अविरत लेखन करत होते.


आता काही पाने उदाहरणादाखल वाचूया  

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती
गांधीजींना प्रभुपदांचा सल्ला  


अमेरिकेतली परिस्थिती आणि आपल्या संस्कारांचा गाभा ह्यादोन्हीचा तोल सांभाळत केलेले कार्य आणि सामाजिक सहभाग 
परदेशी भक्तांचे अनुभव कथन 


पुस्तक असं माहितीने भरलेलं आहे. ह्यात लोकांच्या मुलाखती, दोन व्यक्तींमधल्या संवादाचे वेचे, टीव्ही वरच्या कार्यक्रमातले अंश, खटल्यातल्या प्रतिवादाचा अंश, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मजकुराची रचना केली आहे. त्यामुळे ते एकसुरी होत नाही. पण अमेरिकन संदर्भ नीट ठाऊक नसल्यामुळे काही जागांचे, प्रसंगांचे उल्लेख लगेच समजले नाहीत. ते थोडं गुगल करून बघावं लागलं. अनुवादही चांगला झाला आहे. पण बऱ्याच ठिकाणी मूळ पुस्तकाची निवेदनशैलीच - विशेषतः संवाद लिहिले आहेत तिचे - जरा ठोकळेबाज असावी असं वाटलं, साहजिकच त्याचा परिणाम अनुवादावर झाला आहे.

प्रभुपादांचे जीवन व त्यांचे कार्य ह्याबद्दल प्राथमिक ओळख करून घेण्यासाठी उत्तम पुस्तक आहे. अजून माहिती हवी असणाऱ्यांसाठी शेवटी संदर्भ सूची आहेच. 


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

पासबुक माझ्या आयुष्याचं (Passboook Mazya Ayushyache)



पुस्तक - पासबुक माझ्या आयुष्याचं (Passboook Mazya Ayushyache)
लेखिका - आरती संजय कार्लेकर (Arati Karlekar)
भाषा - मराठी
पाने - १७६
प्रकाशन - संवेदना प्रकाशन जून २०२४
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-81-19737-23-9


आरती कार्लेकर ह्याचं हे आत्मचरित्र आहे. हे वाक्य वाचल्यावर कदाचित तुमच्या मनात येईल की ह्याचं नाव ऐकल्यासारखं वाटत नाही. यांचं काम काय ? 
ते सांगतोच, पण त्याआधी मला सांगा; की बसमध्ये गर्दीच्या वेळी एखादा मुलगा विनाकारण लोकांची वाट अडवून मुलींना अडचण आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही काय कराल ? ऑफिसमध्ये बदली व्हावी यासाठी केलेल्या अर्जावर कारवाई करण्यासाठी तुमचा युनियन लीडर तुमच्याकडे अनैतिक मागणी करत असेल तर तुम्ही काय कराल? तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी संस्था विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देत असेल पण त्यातल्या सज्जन शिक्षकाला तिथले संस्थाचालक त्रास देत असतील, खोटेनाटे आरोप करून बदनाम करत असतील तर तुम्ही काय कराल?
आपल्या अंगात किती धडाडी आहे, स्वतःची नैतिकता किती आहे, गावगुंडांना व राजकारण्यांना शिंगावर घ्यायची धमक किती आहे यावर आपला प्रतिसाद अवलंबून राहील. ह्या सगळ्या प्रसंगांत या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांच्याच काय पण बहुतांश पुरुषांच्याही कितीतरी पट जास्त धडाडीच्या, खमक्या आणि शूर आहेत आरतीताई.

बस मध्ये वाट अडवणाऱ्या गावगुंडाला सर्वांसमक्ष खणखणीत मुस्काडात हाणण्याची आणि "परत असं करायचं नाही आणि माझ्या वाटेला जायचा तर विचार पण करायचा नाही" हे सांगण्याची धमक त्यांच्यात आहे.
ऑफिसमधल्या युनियन लीडरच्या धमकीला न घाबरता त्याची अंडीपिल्ली बाहेर काढून बडतर्फ करायची चिकाटी आहे. 
अटीतटीच्या प्रसंगी प्रत्यक्ष शस्त्र उभारून स्वसंरक्षण करण्याची निडरता त्यांच्यात आहे. प्रामाणिक शिक्षकाला त्रास देणाऱ्या संस्थाचालकांच्या विरुद्ध आवाज उठवून पोलीस स्टेशन गाजवणाऱ्या दुर्गेचं स्वरूप त्या घेऊ शकतात.

आता तुमच्या मनात येईल म्हणजे बहुतेक या कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या "लीडर बाई" दिसतायत. आपल्या नेत्याच्या आदेशावरून 
रस्त्यावर राडेबाजी करणाऱ्या असाव्यात. पण तसं अजिबात नाहीये. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या, लग्नानंतरही तशाच नोकरदारांच्या कुटुंबात वावरणाऱ्या त्या एक निवृत्त बँक अधिकारी आहेत. पुणे, चाकण, सावंतवाडी, वेंगुर्ला इथे त्यांनी काम केलं आहे. पण मी- माझं घर - माझी मुलं माझं कुटुंब - इतकाच स्वतःचा परीघ न ठेवता आपल्या आजूबाजूचा समाज हा सुद्धा आपलाच आहे याचं भान ठेवून त्या वावरतात हे त्यांचं सामान्यातलं असामान्यत्व.

इनर्व्हील संस्था, विधी प्राधिकरण यांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामाला त्यांनी हातभार लावला आहे. विशेष सांगायचं म्हणजे सावंतवाडीला त्यांच्या स्वतःच्या घरी अनेक गरजू स्त्रिया, परित्यक्ता, घटस्फोटीता येऊन राहत. त्यांना मानसिक आधार, योग्य मार्गदर्शन आणि पदरमोड करून आर्थिक आधार देत त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचं काम त्यांनी केले आहे.

दोन प्रसिद्ध गीतांतल्या ओळी मला आठवल्या ...
अन्याय घडो कोठेही की दुनियेच्या बाजारी | धावून तिथेही जाऊ स्वातंत्र्यमंत्र हा गाऊ
आणि
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
पहिल्या ओळीतली खंबीरता आणि दुसरीतली सहृदयता एकाच वेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावली आहे

हे सगळे अनुभव आरतीताईंनी आपल्या या चरित्रात्मक पुस्तकातून मांडले आहेत. "डेंजर" कामासाठी त्यांचा पिंड अनुकूल आहेच पण आईवडीलही धीट आणि मुलीची पाठराखण करणारे होते. जडणघडण, संस्कार, बेताच्या परिस्थितीशी झगडत केलेल्या शिक्षण ही पार्श्वभूमी पुस्तकात आहे. वर उल्लेख केलेलं युनियन अधिकाऱ्याच्या धमकीचं प्रकरण सविस्तरपणे पुस्तकात आहे. त्या प्रकरणातून बाहेर आल्यानंतर 
त्या पुण्यातून सावंतवाडीला गेल्या. नवऱ्यासाठी व्यवसाय म्हणून घरगुती गॅस एजन्सी सुरू केली. स्वतः अंगमेहनत करून ती नावारूपाला आणली.
बँक सांभाळून सामाजिक कामात भाग घेतला. वेळोवेळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ते सगळे प्रसंग पुस्तकात आहेत. वाचनीय किस्से आहेत.

त्यांचं लग्नापूर्वीचे नाव "विद्या". पुस्तकात सुरुवातीला तेव्हाची "विद्या" आणि आत्ताची "आरती" जुन्या आठवणी सांगताहेत अशा पद्धतीने वर्णन आहे. त्यानंतर त्रयस्थ निवेदकाच्या भूमिकेतून "आरती"च्या आयुष्याचं वर्णन आहे. हे शब्दांकन लेखिका वैशाली पंडित यांनी केलं आहे. कमीत कमी शब्दात प्रसंग डोळ्यासमोर उभं करणारं वर्णन आहे. त्यांच्या आयुष्यातले प्रसंगच इतके थरारक आहेत की आपण पुस्तक हातात घेतल्यावर सलग वाचत राहतो. आता आरती ताई कुठला पराक्रम करतात याची उत्सुकता वाटत राहते.

हा त्रयस्थ निवेदक नायिकेच्या भूमिकेचं कौतुक करतो. तिला वेगवेगळी विशेषणही लावतो. तसं म्हटलं तर हा "आत्मस्तुतीचा दोष" वाटू शकतो पण आरती ताईंचं कामच असं आहे की ही विशेषणे आत्मस्तुती न वाटता "स्व ची साधार जाणीव" आहे हे आपल्या लक्षात येतं.

आता काही पाने उदाहरणादाखल.

ऑफिसमधला युनियन लीडर घरी येऊन धमकी देऊ लागला तेव्हा एक भयानक प्रसंग होता होता टळला तो लेखिकेच्या प्रसंगावधानामुळे.



सावंतवाडीला बदली घेतल्यावर नवऱ्यासाठी त्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरची एजन्सी घेतली. स्वतः शारीरिक कष्टाला पुढे मागे बघितले नाही. गावकरी अचंबित झाले नसते तरच नवल.



गावातल्या एका भंगारवालीला पोलिसांनी चोरीचा खोटा आळ घेऊन अटक केली. अशावेळी त्या बाईच्या मुलीने मदतीसाठी धाव घेतली ती आरती ताईंकडेच. तो प्रसंग



माझी आरतीताईंशी ओळख झाली ती आमच्या "पुस्तकप्रेमी" नावाच्या एका साहित्यविषयक उपक्रमातून व्हाट्सअप ग्रुप मधून. पण एक निवृत्त बँक अधिकारी व वाचनप्रेमी इतकीच जुजबी ओळख मलाही होती. जून महिन्यात आमच्या पुस्तकप्रेमी समूहाचं दोन दिवसीय संमेलन कराडला झालं. त्या संमेलनात आरतीताईंच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्व तेव्हा प्रत्यक्ष जाणवलं. त्या स्वतः कार चालवत काही सदस्यांना घेऊन घेऊन पुण्याहून कराडला आल्या हे कळलं. प्रकाशनाच्या वेळी सूत्रसंचालक म्हणाले की "त्यांनी त्यांच्या हाताने अनेक जणांची तोंड रंगवली आहेत". या सगळ्यामुळे उत्सुकता वाटून हे पुस्तक मी लगेच विकत घेतलं. वाचायला सुरुवात केल्यावर त्यात इतका गुंगून घेतो की दोन दिवसातच वेळ मिळेल तसा हे पुस्तक वाचून पूर्ण केलं.आरती ताईंच्या आयुष्यातल्या विशेष प्रसंगांची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या समाजसेवेची मला ओळख झाली. इतरांनाही ती व्हावी असं मनापासून वाटतं आहे.




एखाद दोन वर्षांपूर्वी वाचलेली "पोलादी" हे अनुजा तेंडोलकर ह्यांचं आत्मकथन आठवलं. त्याही वेंगुर्ल्याच्या . व्यावसायिक, महिला वेटलिफ्टर आणि स्थानिक अन्यायाला पुरून उरलेल्या. त्या पुस्तकाचे मी लिहिलेले परीक्षण वाचण्यासाठी लिंक https://learnmarathiwithkaushik.com/courses/poladi/

एक मध्यमवर्गीय नोकरदार गृहिणी आपली बुद्धिमत्ता,धडाडी आणि निडरता या गुणांच्या जोरावर किती प्रभावशाली ठरू शकते हे आरती ताईकडे बघितल्यावर कळतं. एक जागरूक नागरिक म्हणून आपली कर्तव्य बजावून आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल कसा घडवता येईल याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोणी लुंगासुंगा चित्रपट अभिनेता, वेडेवाकडे नाचणारे "रील"वाले हे आपल्या समाजात सेलिब्रिटी ठरतात. लाखो लोकांना ते माहीत असतात. पण आरती ताईंसारखे खरे हिरो आहेत म्हणून समाजाचा तोल राहतो आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ना!

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

रती महारथी (Rati Maharathi)



पुस्तक - रती महारथी  (Rati Maharathi)
लेखक - डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
भाषा - मराठी
पाने - २६३
प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस. मार्च २०२४
छापील किंमत - रु. ३५०/-
ISBN - 978-93-93528-41-4

शरद वर्दे हे माझे आवडते लेखक. ह्यांची "राशा", "झुळूक अमेरिकन तोऱ्याची", "फिरंगढांग", "बोलगप्पा" ही पुस्तकं वाचली होती फार आवडली होती. त्यामुळे वाचनालयात त्यांचं नवीन प्रकाशित पुस्तक दिसल्यावर लगेच घेतले. ह्या पुस्तकाने सुद्धा आधीच्या पुस्तकांप्रमाणे वाचनानंद दिला.
(ह्या आधीच्या पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे पुढील लिंकवर वाचू शकाल 
"झुळूक अमेरिकन तोऱ्याची" 
"फिरंगढांग"
"राशा"
"बोलगप्पा"
)

कामाच्या निमित्ताने लेखक देशोदेशी फिरतात, राहतात, परदेशी लोकांना भेटतात. अनेक परदेशी लोकांबरोबर बरेच दिवस काम करायची संधी मिळते. तर काही वेळा सामान्य लोकांशीही ओळख होऊन गप्पा मारल्या जातात. ह्या भेटीगाठींतून अनेक वल्ली व्यक्तिमत्त्व समोर येतात. अशा बऱ्याच वल्लींशी ओळख लेखक आपल्याला करून देतात. लेखकाने निवडलेल्या बहुतेक व्यक्तिरेखा ह्या फक्त वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या पिंडाच्या आहेत म्हणून निवडलेल्या नाहीत तर त्या व्यक्तीच्या तशा वागण्यामागे तिच्या समाजाची, देशाची संस्कृती, इतिहास, भूगोल सुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे ही व्यक्तिचित्रणे असली तरी त्यातून फक्त एक व्यक्ती नाही तर एक अनोळखी संस्कृती, विचारपद्धती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

एकेका प्रकरणाबद्दल सांगतो

१) सिनियर परी आणि ज्यूनियर ताई
लेखक अमेरिकेत मुलीच्या घरी राहायला गेले होते. त्या भाड्याच्या घरात तिच्याबरोबर अजून एक बल्गेरियाची तरुणी आणि तिची आई राहत होती. तरुणी कॉलेजला जाणारी आणि मोकळंढाकळं वागणारी. तर तिची आई तिच्याहून स्वतःला नीटनेटकी, आकर्षक ठेवणारी, मधाळ बोलणारी. लेखकाची मुलगी आणि त्यांची घरमालकीण सुद्धा म्हणते ह्या बाईपासून जरा सावध राहा. ती पुरुषांना आदी लावते असं वाटतंय. तीच ही "सिनियर परी". इतकं सांगूनही लेखक आणि "सिनियर परी" ह्यांची ओळख होतेच, गप्पा होतात. आणि त्यातून उलगडतं की "सिनियर परी" अशी का वागते. बल्गेरियातली विवाहसंस्कृती आणि कुटुंबव्यवस्था बघता हे वागणं किती स्वाभाविक आहे. आपल्यापेक्षा वेगळी पाश्चात्य संस्कृती असं म्हणतो. पण त्यातलाही हा उपप्रकार अचंबित करणारा आहे.

२) गुप्त हार
एक अमेरिकन पाहुणा लेखकाला एका प्रवासात भेटला. त्याचं नाव केविन. व्यवसायानिमित्त जागोजागी भटकंती करणारा, लोकांचं निरीक्षण करून त्यांच्या हावभावातून बोलीतून त्यांच्या मनाचा वेध घेणारा - मनकवडा. आपल्या वागण्याने लेखकावर छाप पडलीच आणि योगायोगाने दोघांच्या कंपन्यांचं कामही जुळलं. प्रत्येक भेटीतून केविनबद्दल थोडं थोडं कळत होतं. त्याच्या घरच्या लोकांसाठी भेटी देण्याइतपत मैत्री झाली. आणि एकदा थेट त्याच्या अमेरिकन घरी जायला मिळालं. आणि मग कळलं मानकवड्या केविनच्या मनातलं दुःख !

३) ओ मारिया
प्रकरणाची सुरुवात होते अशी ... "ई काडेक बुदी सेतीयावान आणि मारिया बुहा डेबोरा पासारिबू ह्यांना लग्न करायचं होतं. अर्थातच एकमेकांशी तुम्ही विचाराल की ही कुठली विचित्र नावं "... ही नावं आहेत इंडोनेशिया देशातल्या एका तरुण आणि तरुणीची. एक बाली बेटावरचा हिंदू. एक सुमात्रा बेटावरची ख्रिश्चन. आणि इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्र. ह्या नावांचा अर्थ समजून घेताना आपण "तिथल्या हिंदू" धर्माबद्दल समजून घेतो. "आधी शरीरसंबंध , आणि गर्भधारणा झाली तर लग्नासाठी जोडपं अनुरूप" ह्या वेगळ्याच पद्धतीबद्दल. पुढे लेखक आणि त्या दोघांच्या गप्पांतून उलगडते इंडोनेशियातली त्रिधर्मी रचना. आणि ह्या अंतरधर्मिय विवाहाचं त्रांगडं !
बालीतल्या पर्यटन स्थळांबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेलच. पण "सामाजिक पर्यटन" करण्यासाठी हे प्रकरण वाचाच

४) ढोल्याशास्त्री
एका अरबी शेखला त्याच्या कंपनीतले लोक "ढोल्याशास्त्री" म्हणतात. शरीराने प्रचंड लठ्ठ "ढोल्या" आणि पण "शास्त्री" का बरं ? भरपूर वाचणारा आणि भरपूर बोलणाऱ्या ह्या वैशिष्टयपूर्ण शेखाच्या गमती

५) रोझी
बसमधल्या सहप्रवासाशी झालेल्या गप्पा आहेत ह्या. एक बडबडकरणारी, भोचक म्हातारी. गप्पा सहज जातात माझ्याघरी कोण, तुझ्या घरी कोण ; ह्या वळणावर. ती सांगते की ... मुलीच्या मुलांना भेटायला जाते आहे. पाच नातवंडं आहेत. - एक तिची आणि तिच्या नवऱ्याची, दोन तिची पहिल्या नवऱ्याची, एक दुसऱ्या नवऱ्याची पहिल्या लग्नाची आणि सर्वात मोठी मुलगी तिचीच पण "अशीच" झालेली. हे सगळं इथे कसं स्वीकारलं जातं अमेरिका कशी मोकळ्याढाकळ्या स्वभावाची, भारत कसा मागास अशा टिप्पण्या. मग लेखकही भारताची बाजू मांडतो. चर्चा होत राहते. भांडण नाही. पण ह्या सगळ्याचा शेवट कसा होईल ?

६) सेन आणि नॉनसेन्स
स्वीडन मध्ये राहणाऱ्या बंगाली कुटुंबाची ही कहाणी. दोन बंगाली बंधू. एकाची बायको स्थानिक स्वीडिश बायको. तर दुसऱ्याची बंगाली. त्यातून दोन भिन्न संस्कृतींची सरमिसळ होणं , विरोधाभास दिसणं स्वाभाविकच. स्वीडिश लोक म्हणजे कमी बोलणारे, दुसऱ्याचे स्वातंत्र्य जपणारे, शिस्तप्रिय. भारताच्या बरेचसे विरुद्ध. पण स्वीडिश बाईला भारतातली कुटुंबव्यवस्था, उत्सवी वातावरण आवडतंय तर बंगाली बाईला ह्या सगळ्याचा तिटकारा. आपलं भारतीयत्व सोडून - स्वीडिश - होण्याचा तिचा प्रयत्न. पुरुष स्वीडनला राहून "जाज्वल्य भारतीयपणा" जपणारे. "पिकतं तिथे विकत नाही" चा अनुभव 
वाचणं मजेशीर आणि उद्बोधकही आहे.

७) इव्हिनिंग इन पॅरिस
"स्त्रीवादी" किंबहुना "पुरुषद्वेष्ट्या" स्त्री अधिकाऱ्याशी व्यावसायिक बैठका करण्याचा अनुभव

८) कॅबी
लेखक अमेरिकेत गेला असता तिथला कॅब चालवणारा वाटत होता भारतीय. पण बोलता बोलता तोच म्हणाला की तो बेकायदारित्या अमेरिकेत आला. त्यामुळे अशा माणसाच्या गाडीत बसणं धोकादायक. लेखकाने त्याला टाळायचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा तोच प्रवासासाठी यायचा. प्रत्येक भेटीतून त्याच्याबद्दल थोडं थोडं कळत होतं. एकदा लेखकाने थोडी दारू पाजून बोलतं करायचा प्रयत्न केला. त्यातून मालवाहू जहाजातून, धोकादाकय रित्या केलेला प्रवास त्याने सांगितला. अमेरिकेत कसा राहण्याचा परवाना मिळवला ते सांगितलं. आणि ... बऱ्याच वर्षांनी पुन्हा गेल्यावर बरंच काही धक्कादायक कळलं.

९) मिस लेबनॉन
लेबनॉन देशातल्या सुंदरीचा आधी तोरा , मग पुरुषांपासून सावध राहायची वृत्ती आणि मग अनपेक्षित फसवणूक

१०) शिकार
कंपनीतल्या व्यवस्थापनात बदल झाल्यामुळे एक नवीन ब्रिटिश अधिकारी नेमला गेला. भारतात आल्यावर त्याच्या कार्यशैलीचा फटका लोकांना बसायला लागला. दोन सहकाऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण करून, स्पर्धा निर्माण करून "फोडा आणि राज्य करा"ची अंमलबजावणी चक्क कंपनीतच व्हायला लागली. राज्यकर्त्या ब्रिटिशांना "भारत छोडो" म्हणता येत होतं, "बॉस"ला कसं म्हणणार ? पण लेखकाच्या सहकाऱ्याने ह्या बॉसची माहिती, इतिहास शोधून काढला. आणि तो वापरून "गोळी" न घालता साहेबाला 'फुटाची गोळी" दिली.

११) नशीबवान
ही सुद्धा एका अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या शरणार्थीची कहाणी आहे. लेखकाच्या घरी काम करणारी मोलकरीण एल साल्वाडोर देशातून बेकायदेशीररित्या अमेरिकेत आली आहे. त्या देशातली गुन्हेगारी, अमानुष वातावरण, मेक्सिकोमार्गे चालत प्रवास, त्यात झालेले अत्याचार, अमेरीकेत स्वतःची मूळ ओळख उघड होणार नाही असं राहायला लागणं, मागे राहिलेल्या नातेवाईकांच्या आठवणींनी व्याकुळ होणं हे सगळं तिच्या बोलण्यातून आपल्यासमोर येतं.

आता काही पाने उदाहरणादाखल
मनोगत


चौथ्या लग्नाच्या गडबडीत असणारी "सिनियर परी"



अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या टॅक्सी चालकाने नागरिकत्त्व कसं मिळवलं



"शिकार" प्रकरणातल्या ब्रिटिश अधिकाऱ्याला लक्षात आलं की मीटिंग मध्ये लोक हिंदीत काहीतरी कुजबुजतात. त्याचे अर्थ विचारल्यावर लेखकाची उडालेली तारांबळ





तर अशीही वैविध्यपूर्ण प्रकरणं जगाची सफर घडवून आणतात. ह्यातले विषय आणि माहिती महत्त्वाची आहेच पण लेखकाच्या विनोदी, शाब्दिक कोट्यांच्या शैलीने ती हलकीफुलकी होते. ज्ञानरंजक (Edu-tainment) असं हे पुस्तक आहे. लेखकाच्या मिश्किल टिप्पण्या, परदेशी पाहुण्याला शालजोडीतले हाणण्याचे किस्से किंवा कधी झालेली फजिती हे सगळं वाचताना पुस्तक खाली ठेववत नाही. तुम्हीही लवकरात लवकर पुस्तक हाती घ्या.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


अनुभाषिते (Anubhashite)

पुस्तक - अनुभाषिते (Anubhashite) लेखिका - मंजिरी धामणकर (Manjiri Dhamankar) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४८ प्रकाशन - अल्टिमेट असोसिएट्स....