माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)



पुस्तक - माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)
लेखक - मनोज शिंगुस्ते (Manoj Shinguste)
भाषा - मराठी
पाने - १४१
प्रकाशन - रायटर पब्लिकेशन, डिसेंबर २०२५
छापील किंमत - रु. २९०/-
ISBN - दिलेला नाही


पुणे पुस्तक महोत्सवाला १३ डिसेंबर पासून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरुवात झाली. १४ डिसेंबरला रविवारी मी तिथे बराच वेळ होतो. वेगवेगळ्या दालनांना भेट दिली. सध्या गाजणारा युवा लेखक नितीन थोरात यांच्या रायटर पब्लिकेशनच्या दालनालाही भेट दिली. तिथे त्याच्या पुस्तकांबरोबरच एक वेगळं पुस्तक दिसलं. "माझी जन्मखेप". लेखक मनोज शिंगुस्ते . पुस्तकाचे मुखपृष्ठ व पाठमजकूर बघून, पुस्तक चाळून लक्षात आलं की हे एक विनोदी पुस्तक आहे. ह्या लेखकाचे हे पहिलेच पुस्तक आहे. माझ्या वयाची तरुण लेखकांचं लेखन वाचण्याची मला नेहमीच उत्सुकता असते. विशेषतः पौराणिक किंवा ऐतिहासिक कादंबऱ्यांपेक्षा ते लेखन जर आजच्या जगण्यावर आधारित किंवा भविष्यवेधी असेल तर त्याबद्दल जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे हे पुस्तक लगेच विकत घेतलं.
नितीन आणि मनोज दोघांबरोबर फोटोही काढला.

घरी आल्यावर लेखक मनोज शिंगुस्ते कोण आहे याचाही जरा सोशल मीडिया वरती शोध घेतला. तेव्हा असं कळलं की मनोज चं स्पायसीकिक (spicykick) नावाचं instagram handle आहे. त्यात तो पुणे परिसरातील वेगवेगळी खाण्याची ठिकाणं , हॉटेल, स्थानिक उद्योग वगैरेंची माहिती लोकांना देतो. त्यात त्याची पत्नी आणि पुतण्या - बारक्या - असतात.
त्याची reel बघताना त्याच्या शाब्दिक कोट्या, समालोचन केल्यासारखी शैली आणि स्वतःचा झालेला पचका, बारक्याकडून झालेला अपमान असे विनोदी पैलू दिसले. रीलमधली माहिती आणि विनोद ह्यामुळे तो चांगलाच प्रसिद्ध आहे. जवळजवळ तीन लाख फॉलोवर्स. थोडक्यात आजच्या पिढीतला तो रील स्टार आहे. माझं रील बघणं फार कमी होतं आणि माझ्या आवडीचे विषय थोडे वेगळे असल्यामुळे मनोज बद्दल मला माहिती नव्हती यात काही विशेष नाही.

तर अशा मनोजने मनोगतात त्याच्या लेखनाच्या उर्मीबद्दल लिहिलं आहे. रील करताना काही मिनिटांच्या आत सगळं सादरीकरण करावं लागतं. त्याची सवय असतानाही मनोजने मोठ्या विनोदी कथा लिहिल्या हे कौतुकास्पद वाटलं. त्यामुळे रात्री आल्या आल्या हे पुस्तक वाचलं आणि एका बैठकीत वाचून पूर्णही केलं. वाचताना मजा आली.

या पुस्तकात मनोज स्वतःच निवेदक आहे. एक रीलस्टार म्हणून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गमतीजमती, फजिती या माध्यमातून आपल्यासमोर छान विनोद निर्मिती केली आहे. प्रसिद्ध व्यक्ती असताना विशेषतः तरुणांच्यात प्रसिद्ध असताना चाहत्यांच्या अतिउत्साहामुळे किंवा काहींच्या विचित्र स्वभावामुळे अनवस्था प्रसंग ओढवतो हे काही कथांमध्ये आहे. तर काही वेळा उलट घडतं की आपण प्रसिद्ध आहोत, आपल्याला सगळे ओळखतात ,आपलं कौतुक होईल या भावनेतून एखाद्या ठिकाणी गेल्यावर फार मोजकेच लोक ओळखतात किंवा जे ओळखतात त्यांनाही फार विशेष कौतुक वाटत नाही. आणि मग कसा हिरमोड होतो त्याच्या मजेशीर घटना पुस्तकात आहेत.

पुस्तकात एकूण दहा गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीबद्दल अगदी थोडक्यात सांगतो.

लय मोठा गेम - मनोजच्या स्वतःच्या गावात निवडणुकीच्या प्रचाराला "स्टार प्रचारक" रूपात
त्याला बोलावलं जातं. पण रिल सटार म्हणून त्याचे चाहते महाराष्ट्रभर असले तरी प्रत्यक्ष गावात चाहते मतदार फारच कमी आहेत हे लक्षात येतं. लोकांना आकर्षित करायसाठी दुसरा नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवायची टूम निघते आणि स्टार प्रचारकाचा "को-स्टार प्रचारक" होतो आणि काय धमाल उडते.

"पुण्याचा फेमस फुडगॉगल" - वडिलोपार्जित जमिनीच्या कामासाठी गावी जाताना त्याला भेटतात उत्साही युट्यूब वाले. त्यांच्या उत्साहाने नाकी नऊ येतात. प्रवास खड्ड्यांनी त्रासदायक. त्यावर कडी म्हणजे त्याला गावात भेटलेली आजीबाई. त्याला फुफुड ब्लॉगर च्या ऐवजी "फूडगॉगल" म्हणत राहते. पण अशी बाई अडाणी, भोळी म्हणावी का तिच्या वागण्यातून बेरकी.. वाचून तुम्हीच ठरवा.

"लॉर्ड ऑटो" - मनोज गाडी विकत घेतो. घरच्यांना सरप्राईज म्हणून कुठली गाडी आहे हे न सांगता त्यांना शोरूम मध्ये नेतो. आपला मुलगा, काका, दीर एवढा लाखो फॉलोवर असणारा स्टार व्यक्ती गाडी घेणार म्हटल्यावर सगळ्यांच्या अपेक्षा प्रचंड उंचावतात. त्यांची अपेक्षा आणि सत्य वेगळं आहे हे सांगायचा तो प्रयत्न करतो. पण घरचे कुठे ऐकायला तयार.


"रेश्मा लॉज"- अचानक पोलीस स्टेशन मधून फोन येतो की तुमच्या भावाने दारू पिऊन एका म्हाताऱ्याला उडवले आहे. त्याला सोडवायला या. आता हा भाऊ कोण याचा विचार करत, मनोज तिकडे पोचतो, पोलिसांना पटवून त्याला बाहेर काढतो त्या सगळ्या प्रसंगाची धमाल.

"पुरुष म्हणजे नेमकं काय?"- व्हिडिओ, सोशल मीडिया चाहते, घरातली वादावादी या गडबडीतून जरा निवांत बसावं म्हणून मनोज एका डोंगरावर जातो. तिकडे त्याला भेटतो एक वल्ली गावकरी. बोलण्या बोलण्यातून तो स्टारगिरीतली हवाच काढतो आणि मनोजला जमिनीवर आणतो. पण नंतर पुन्हा हवेत कसं नेतो त्याची धमाल.

"मैतं रे मैतं"- एका नातलगाच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर तिथल्या गावातल्या चाहत्यांनी मांडलेला उच्छाद , अतिउत्साहात अंत्यसंस्काराचाच बट्ट्याबोळ.

"टॉम लिब्सन गिअर" - एका हॉटेलमध्ये शूटिंगसाठी गेला असताना तिथला मालक त्याला एक कुत्रा भेट देतो. कुत्र्याचं नाव. मनोजला आणि कुटुंबीयांना नको असताना कुत्रा गळ्यात पडतो आता हे विकतच दुखणं कसं मिटवायचं ह्याची उलाढाल.

"व्यासपीठ मानापमान नाट्य"- रीलस्टार म्हणून पाहुणा म्हणून "कार्यक्रमाची सुपारी" मिळाली. पण जेमतेम काहीतरी मानधन आणि आणि तिथली प्रसिद्धी सुद्धा आज स्थानिक राजकारण हायजॅक केली तर कशी होईल तगमग. खास पाहुणचार होईल असं वाटत असताना पोलिसांनीच पकडलं तर ?

"सुका पाटील"- नातेवाईकांचा फोन आला मामा आजारी आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळलं मामांना प्रसूती गृहात नेलं आहे. म्हणजे मामाच गरोदर आहेत ? काय आहे भानगड ?

"अकलेचा कांदा" - फुडब्लॉगिंग करताना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटी दिल्या जातात. तिथले पदार्थ चाखले जातात. ते पदार्थ कसे वाटतात ते व्हिडिओमध्ये मनोज सांगतो. पण इतके पदार्थ चाखायचे म्हटल्यावर सगळे पदार्थ पोटभर थोडेच खाता येणार सगळं थोडं संपवता येणार मग काय बर करायचं?

अशा या वेगवेगळ्या कथा सूत्रांवर आधारलेल्या गोष्टी आहेत. चार पाने उदाहरणादाखल देतो जेणेकरून त्याच्या शैलीची कल्पना येईल.

मोठ्या गाडीबद्दलच्या कल्पनांच्या उड्यांवर उड्या


अंत्यसंस्कारातले अतिउत्साही चाहते


शाब्दिक कोट्यांची धमाल आणि प्रासंगिक विनोद आहेत. काही ठिकाणी द्वयर्थी वाक्ये आहेत; पण अगदी मोजकीच. थेट अश्लीलता आलेली नाही. सध्याच्या स्टँड अप विनोदवीरांना अश्लीलता आणि शिव्या यांशिवाय विनोद करता येत नाही. मनोजने मात्र ती निसरडी वाट टाळलेली आहे. रील स्टार ही तशी अलीकडची सामाजिक पदवी. त्याचे अनुभव हे खास आजचे, आत्ताच्या पिढीचे आहेत. त्यामुळे  पुस्तकातल्या प्रसंगांशी आपण लगेच जोडले जाऊ शकतो. प्रमाण मराठी, गावाकडची बोली दोन्हीचा खुबीने वापर केला आहे. शहर आणि गाव ह्यातल्या कमी होत जाणारं सामाजिक अंतर आपोआप ह्यात टिपलं गेलंय. पुस्तक प्रसन्न आहे. निखळ करमणुकीसाठी, आजच्या पिढीचं लेखन वाचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. 

मनोजला त्याच्या पुढच्या लेखनाच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)

पुस्तक - माझी जन्मखेप (Mazi Janmkhep) लेखक - मनोज शिंगुस्ते (Manoj Shinguste) भाषा - मराठी पाने - १४१ प्रकाशन - रायटर पब्लिकेशन, डिसेंबर २०...