जो जे वांछील (Jo je vancheel)

पुस्तक - जो जे वांछील (Jo je vancheel)
लेखक - नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १८८
प्रकाशन - नीम ट्री पब्लिशिंग हाऊस नोव्हेंबर २०२३
छापील किंमत - रु. ३२५/-
ISBN 978-81-957778-2-2

पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशक द्वितीय सोनावणे, श्री. गुलाब सपकाळ यांची भेट झाली. तिथेच लेखक नचिकेत क्षिरेही उपस्थित असल्यामुळे त्यांच्याशीही बोलण्याची, ओळख करून घेण्याची संधी मिळाली. तेव्हा दोघांनी मिळून मला हे पुस्तक भेट दिले. त्याबद्दल दोघांचे आभार.




याआधी मी लिहिलेलं पुस्तक परीक्षण हे सुद्धा महोत्सवात घेतलेल्या पुस्तकाबद्दल होतं (https://learnmarathiwithkaushik.com/courses/mazi-janmkhep). त्याचे लेखक रीलस्टार युट्युबर आहेत. तर या पुस्तकाचे लेखक नचिकेत क्षिरे हे पॉडकास्टर आहेत. आजच्या पिढीची समाज माध्यम हाताळणाऱ्या ताज्यादमाच्या लेखकांनी ही माध्यमांच्या भोवती फिरणारी कथानके घेऊन पुस्तकं लिहिली आहेत. हे त्याचं वेगळेपण नक्की आहे.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती



ही एक कादंबरी आहे. नायक अनिकेत जोशी हा एक पत्रकार आहे. पत्रकारितेची नोकरी बरी चालली आहे. पण त्याच्या मनात महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीबद्दल संशोधन करून पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे. बरीच वर्षे ते स्वप्न तो मनात धरून आहे. पण त्यावर काम मात्र सुरू करायला टाळाटाळ करतो आहे. त्याच्या संसारिक जीवनातही वादळ आलं आहे. त्याचा घटस्फोट झालाय. त्याच्या लहान मुलाचा ताबा त्याच्याकडे आहे. या परिस्थितीमुळे तो गांजला आहे. त्याचा आत्मविश्वास खचला. आपल्या आयुष्याकडे मागे वळून बघताना त्याला स्वतःचे दोषच दिसतायत. भावंडांसारखे आपण परदेशी स्थायिक झालो नाही. मित्रांसारखी भारीभरकम पगाराची नोकरी नाही. अंगात काही खास गुण नाहीत. एखादं ध्येय घेऊन त्याच्या मागे जाण्याची धडाडी नाही. आपण एक अपयशी व्यक्ती आहोत असं त्याच्या मनाने घेतलं आहे.

योगायोगाने कामाच्या निमित्ताने त्याला एका यशस्वी व्यक्तीची मुलाखत घेण्याची संधी मिळते आणि त्यातून स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या गुणांकडे बघण्याची नवी उमेद त्याला प्राप्त होते. आपण स्वप्न बघूया, त्याचा ध्यास घेऊया याकडे त्याचा कल होतो. आणि तो कामाला लागतो. पण पुढचा प्रवास अगदी सुखकर व त्याच उत्साहात होतो असं नाही. त्याला स्वतःच्या स्वभावाशी, स्वतःच्या परिस्थितीशी झगडावं लागतं. पुन्हा पुन्हा प्रेरित व्हावं लागतं. तिथेही त्याला मोटिवेशनल स्पीकर/प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची पॉडकास्ट उपयोगाला येतात. प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत तो पुढे प्रवास करतो. धडपडत राहतो. कौटुंबिक आयुष्यातही
 एकीकडे त्याला नवा जोडीदार मिळण्याची शक्यता तयार होते. दुसरीकडे जुनी मागे सोडलेली नाती पुन्हा भेटू लागतात. त्यातून नवा मानसिक संघर्ष तयार होतो. कादंबरीत ही प्रेमकथा समांतरपणे चालू राहते.

अनिकेतचं पुस्तक पूर्ण होईल का? झालं तर चांगलं खपेल का? पुढे पुढे तो पुस्तक लिहीत राहील का? त्याला नवा जोडीदार मिळेल का? कोण असेल तो? हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल.
काही पाने उदाहरणादाखल.

उद्योजक चौगुले यांच्याबरोबर झालेल्या संवादाचा प्रसंग.

त्याची शेजारीण अमृता तिच्याबरोबर सलगी वाढत असते तेव्हाचा एक प्रसंग. आई-वडील, मुलगा, अमृताची इच्छा, स्वतःचं मन अशा सगळ्या गोष्टींची संगती लावायची धडपड


पुस्तकाचे लिखाण करत असताना काही तांत्रिक गडबडीमुळे सगळं लेखनच डिलीट होऊन जातं तेव्हाचा प्रसंग आणि त्यात एका पॉडकास्ट चा उल्लेख


पूर्णपणे खचलेला, निराश झालेला नायक आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो याचं भावपूर्ण, संतुलित व पटेल असं चित्रण या कादंबरीत आहे. "मोटिवेशनल स्पीकर्स"चे भाषण ऐकून आलेले "मोटिवेशन" थोडा वेळ जरी टिकलं तरी त्यातून लांब पल्ल्याच्या बदलाची बीजं रुजू शकतात. त्यावर काम करत राहिलं तर बदल घडू शकतो; हे सांगणारं हे पुस्तक आहे. त्याच वेळी स्वतःत बदल केला तरी हमखास यश येईलच असं नाही. परिस्थिती व नशीब यासारखे आपल्या हातात नसणारे घटकही तितकेच महत्त्वाचे असतात हेही आपसूक सुचवलं आहे.
स्वतःला सर्वसामान्य समजणाऱ्या माणसाने असामान्य होण्यासाठी प्रयत्न केले तर चांगलीच गोष्ट आहे. पण किमान त्याने आपल्यात असलेल्या गुणांचा जास्तीत जास्त विकास करत राहावा. अडचणी आल्या तरी न थांबता पुढे पुढे तरी जात राहावे. जमेल तितकी प्रगती करावी असा सकारात्मक दृष्टिकोन देणारं पुस्तक आहे. लेखक पॉडकास्टर असल्यामुळे त्यांनी नायकाच्या आयुष्यात या पॉडकास्टचं महत्त्व दाखवून या माध्यमाकडेही वाचकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

कादंबरी मधले प्रसंग आपली उत्सुकता टिकून ठेवणारे आहेत. ललित लेखनाच्या माध्यमातून "सेल्फ हेल्प" प्रकारचे ज्ञान असा वेगळा प्रयोग लेखक नचिकेत यांनी केला आहे. वाचकांना तो भावेल असं मला वाटतं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

जो जे वांछील (Jo je vancheel)

पुस्तक - जो जे वांछील (Jo je vancheel) लेखक - नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire) भाषा - मराठी (Marathi) पाने - १८८ प्रकाशन - नीम ट्री पब्लिशि...