नृत्यावकाश दिवाळी अंक २०२६ (Nrutyavakash Diwali Ank 2026)



पुस्तक - नृत्यावकाश दिवाळी अंक २०२६ (Nrutyavakash Diwali Ank 2026)
भाषा - मराठी (Marathi)
संपादक - आश्लेषा महाजन आणि सायली कुलकर्णी (Ashlesha Mahajn & Sayali Kulkarni)
पाने - १३६
प्रकाशन - पदन्यास प्रकाशन, ऑक्टोबर २०२६
छापील किंमत - रु. २५०/-

दसरा झाला. दिवाळी काही दिवसांवर आली. आणि मराठी वाचकांच्या मनात नव्या दिवाळी अंकांबद्दल उत्सुकता निर्माण होऊ लागली. ह्या वर्षी माझ्या वाचनात आलेला पहिला दिवाळी अंक "नृत्यावकाश". नृत्य या विषयाला समर्पित दिवाळी अंक आहे. अंकाचं हे तिसरं वर्ष आहे. नृत्याचे वेगवेगळे प्रकार, प्रसिद्ध नर्तिकांचे अनुभव व त्यांचा जीवनपट ह्या अंकात आहे. पण नाचाचा कार्यक्रम सादर होताना प्रत्यक्ष नाचणाऱ्या कलाकाराव्यतिरिक्त अजून अनेकांचे त्यात योगदान असते. त्या विविध बाजूंचा मागोवा घेणारे लेखही ह्यात आहेत.

हे सर्व लेख सात भागांमध्ये गुंफले आहेत. अनुक्रमणिकेवर नजर टाकली की विषयांचं वैविध्य आणि लेखकांची नावं लक्षात येतील.



सोनिया परचुरे, फुलवा खामकर आणि काही आघाडीच्या कलाकारांची मनोगतं ह्यात आहेत तर. चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या हेलन व संध्या ह्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला आहे.
भगवान शंकराच्या नृत्यमूर्तींचे वर्णन त्याक्षेत्रातले तज्ज्ञ देगलूरकर सरांकडून वाचायला मिळते.

प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, छायाचित्रण, वाद्यसाथ, गायनसाथ इ. ह्या क्षेत्रातही उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती, मनोगते "नाट्यरंग" भागात आहेत. जपानी नृत्यप्रकाराची ओळख करून देणारा श्रीनिवास शारंगपाणी ह्यांचा लेख आहे.

नृत्याचे कार्यक्रम आयोजित करणे, त्यामागचे सर्व व्यवस्थापन संभाळणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे हे कोणीतरी करत असतं त्यामुळेच सादरीकरण शक्य होतं. अशा "आर्ट मॅनेजमेंट"च्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या श्रुती रानडे ह्यांचे मनोगतसुद्धा ह्यात आहे. कलेला समर्पण आणि आर्थिक नियोजन ह्या परस्परविरोधी बाबी नसून एकमेकांना कशा पूरक आहेत हे उभरत्या नर्तक-नर्तिकांनी नक्की वाचलं पाहिजे.

कन्नड नृत्यप्रकार "यक्षगान" इतर भारतीय नृत्यप्रकारांपेक्षा कसा वेगळा आहे ह्याची मांडणी श्री. फातर्पेकर ह्यांनी केली आहे.
देशविदेशात भारतीय कला आणि नृत्यप्रकारांना घेऊन गेलेल्या विदुषी उषा राव ह्यांच्या कार्याची दाखल सागरिका पटवर्धन ह्यांनी घेतली आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीत नृत्य हा विषय आणि इतर विषय शिकवताना नृत्याचा वापर करण्याबद्दलच्या शक्यता दीप्ती सिधये ह्यांनी आपल्यापुढे ठेवल्या आहेत. "तृतीयपंथीय कलाकारांचा आत्मशोध" आणि "लोकनृत्यविन्यास" ह्यातून रंगमंदिरांच्या बाहेरील जगाचा वेध घेतला आहे.

मजकुराची कल्पना यावी म्हणून काही लेखांचा गोषवारा सांगितला. असे अजून बरेच लेख आहेत. अंकाचं मुखपृष्ठ तजेलदार, डौलदार असं आकर्षक आहे. कृबु (कृत्रिम बुद्धिमत्ता AI) वापरून तयार केलेलं.

काही पाने उदाहरणादाखल

दीनानाथ दलालांच्या चित्रातील नर्तन


लहेजा - नृत्य, नाट्य ह्यासाठीच्या वेषभूषांसाठीचा उद्योग


हेलनजींबद्दल


यक्षगान समजून घेताना



असा सर्वांगसुंदर, वाचनीय, माहितीपूर्ण दिवाळी अंक आहे. मी स्वतः नाचत नसलो तरी हा दिवाळी अंक वाचून नृत्य आणि त्याच्या आजूबाजूचे घटक ह्यांबद्दलची जाण थोडी वाढली हे निश्चित. सर्व कला आणि विज्ञान ह्यात उत्तमाचा ध्यास घेताना बहुशाखीय ज्ञान कसं आवश्यक आहे हे ठळकपणे कळलं. बहुतेक लेखांमध्ये "नाट्यशास्त्र" आणि त्यातल्या संस्कृत संज्ञा, उक्ती निवेदनाच्या ओघात आल्या आहेत. म्हणजे ते ज्ञान नुसतं पुस्तकात राहून, परीक्षेत उत्तरं देण्यापुरतं राहिलं नाहीये; नृत्यकलाकारांनी ती परंपरा नुसती टिकवून ठेवली नाहीये तर ते ज्ञान आजच्या काळातही लागू पडतंय हे वाचून अभिमान वाटला. त्यामुळे तुम्ही स्वतः नर्तक नसाल तरीही दिवाळी अंक वाचायला आवडेलच.

जर तुम्ही नाचत असाल, नाचाचा आस्वाद घेत असाल तर तुम्हाला हा अंक नक्की आवडेल हे सांगायला नकोच. तुमच्या मित्रमंडळी-नातेवाईकांमधल्या कलाकारांना दिवाळी भेट देण्यासाठीही हा अंक उत्तमच आहे. मी स्वतः तशी भेट देणार आहे. त्यासाठी अंक विकत घेताना दोन्ही संपादकांशी प्रत्यक्ष भेट आणि गप्पांचीही संधी मिळाली. त्यामुळे माझं "अवकाश" अजूनच विस्तारलं.



अंक विकत घेण्यासाठी संपर्क क्रमांक - पदन्यास प्रकाशन 9881498795 / 9860387123




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अपूर्णांकांच्या खुनांची कथा (Apurnankanchya khunachi katha)



पुस्तक - अपूर्णांकांच्या खुनांची कथा (Apurnankanchya khunachi katha)
लेखक- इनोउए हिसाशी (Hisashi Inoue)
अनुवादक - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - 四捨五入殺人事件 (Shishagonyū satsujin jiken / शिशागोन्यू सात्सुजिन् जिकेन)
मूळ पुस्तकाची भाषा - जपानी
ह्या पुस्तकाची पाने - १९५
प्रकाशन - वॉल्डन पब्लिकेशन, सप्टेंबर २०२६
छापील किंमत - रु. ४५०/-
ISBN - 978-81-998467-3-9

अनुवादक मयुरेश कुलकर्णी ह्याने "त्सुबाकी स्टेशनर्स" ही कादंबरी थेट जपानीतून मराठीत आणली. ती लोकप्रिय ठरली. पुरस्कारप्राप्तही झाली. नुकताच त्याला "आंतरतरभारती अनुवाद सुविधा केंद्रा"द्वारे "बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार" दिला गेला. त्या कार्यक्रमात त्याच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली होती.



त्याचे अजून एक पुस्तक प्रकाशित होते आहे हे कळल्यावर पुस्तकाची प्रकाशन पूर्व नोंदणी केली. पुस्तक वाचल्यावर मी म्हणू शकतो की, पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या मयुरेशने आपली फलंदाजी चालू ठेवत आता पुढचा षटकार मारला आहे तो म्हणजे "अपूर्णांकांच्या खुनांची कथा" ही अनुवादित कादंबरी. मूळ जपानी पुस्तकाचा हा पहिलाच अनुवाद, अगदी इंग्रजीतही अनुवाद झालेला नाही. मयुरेशमुळे मराठी भाषकांना सर्वप्रथम ती संधी मिळते आहे. त्यासाठी वॉल्डन पब्लिकेशनच्या अभिषेक धनगर यांनाही धन्यवाद.

कादंबरीची गोष्ट साधारण अशी आहे की दोन लेखक एका साहित्यिक कार्यक्रमासाठी निघालेले आहेत. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी ते सकाळी गावात पोचले. त्यांची सोय एका छोटेखानी खाजगी विश्रामगृहात केली गेली. पण अचानक झालेल्या मोठ्या पावसामुळे गावाच्या दोन भागांना जोडणारा पूलच वाहून गेला. तिन्हीकडून डोंगर आणि एका बाजूने नदी अशा कात्रीत सापडलेल्या ठिकाणी , एका बेटावरच जणू, ते अडकून पडले. कार्यक्रमाला जाणं तर शक्य होतच नाहीये पण पाऊस कमी होऊन, पाणी ओसरून काहीतरी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत म्हणजे किमान एक दिवसभर तरी या छोट्याशा खेड्यात राहणं आता भाग आहे. त्या कल्पनेनेच ते कंटाळले आहेत, वैतागले आहेत. पण लेखकांचे चाहते गावात असतात. त्यामुळे विश्रामगृहाच्या मालकीणबाई, आजूबाजूचे गावकरी लेखकांच्या सोयीची, मनोरंजनाची लगबग सुरू करतात.

आणि त्या रात्री अचानक रात्री अशा घडामोडी घडतात की लेखक जिथे उतरले आहेत त्या विश्रामगृहातच एक खून झालाय असं लक्षात येतं. सगळ्या मंडळींना धक्का बसतो. प्रत्येक जण आपापल्या परीने काय झालं असेल याचा विचार करू लागतात. स्थानिक पोलीस अधिकारी पुरावे गोळा करायला लागतो. ते करता करता संशयाची सुई एका लेखक महाशयांकडेदेखील वळते. लेखक हतबुद्ध होऊन जातात.

त्यातले दुसरे लेखक महाशय मात्र स्वतः डोकं लढवून हे कसं खोटं आहे हे सिद्ध करायच्या तयारीला लागतात. स्वतः लोकांच्या भेटीगाठी घेतात, बोलतात. एखाद्या लेखकाने रहस्यकादंबरी लिहिण्यासाठी संशोधन करावं, जणू तसंच. या शोधाशोधीच्या नादात त्यांना या गावातले आर्थिक आणि सामाजिक ताणतणाव लक्षात येतात. त्याच्या आधारे ते खुनी कोण असेल ह्याचा तर्क मांडतात.

आणि दुसऱ्या दिवशी खुन्याचा शोध लागतो... आता खून कुणाचा झाला? कोणी केला? लेखक महाशयांचा त्यात हातभार किती आणि कसा? सामाजिक परिस्थितीचा त्यात काय भाग ? आणि शेवटचा अनपेक्षित तरीही धमाल धक्का अनुभवण्यासाठी मूळ पुस्तकच वाचायला पाहिजे.

ही एक छोटी पण वाचनीय आणि खिळवून ठेवणारी कादंबरी आहे. खून आणि त्या खुनाची उकल हे ढोबळमानाने कादंबरीचं स्वरूप असलं तरी इतर गुन्हेकादंबऱ्यांपेक्षा ही खूप वेगळी कादंबरी आहे. कारण हिच्यात एक सामाजिक प्रश्न - "शेतकऱ्यांना शेती परवडत नाही " हा - इथे प्रकर्षाने मांडला आहे. शेतीचं यांत्रिकीकरण, सरकारचं आयात निर्यात धोरण, अपूर्ण उत्पन्न, शेतमालाला रास्त भाव न मिळणे; या समस्या ज्या आपण रोज वृत्तपत्रात वाचत असतो; त्या समस्या जपानमध्येही आहेत हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं.

स्वतःला मोठा लेखक म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीला सामाजिक प्रश्नांची, खेडोपाड्यातल्या वास्तविकतेची जाणीव असली पाहिजे असाही संदेश या पुस्तकातून दिला जातो.

साहित्यिकांमध्ये एकमेकांबद्दलची इर्षा आणि सुप्त चढाओढ, दुसरा काही फार मोठा नाही हे दाखवण्याची हौस याचीही झलक आपल्याला मध्येमध्ये संवादातून मिळते. ते वाचून आपणही खुदकन हसतो.

कादंबरीचा सुरुवातीचा भाग थोडा संथ वाटतो. पटकन खून होईल आणि खून उकलाकडे कथानक वळेल अशा अपेक्षेने आपण सुरुवात करतो. मात्र लगेच तसं होत नाही. या पहिल्या भागात पुढच्या भागाची बीजं दडलेली आहेत. जपानचा सरंजामशाही इतिहास, जमीनदारांनी त्यांच्या शेतकऱ्यांवर केलेले अन्याय याची पार्श्वभूमी इथे तयार होते. तर दुसरीकडे जपानी समाजातले सामाजिक संकेत आणि शिष्टाचार हे आपल्यापेक्षा किती वेगळे आहेत हे बघून फारच गडबडून जायला होतं. लेखक ज्या विश्रामगृहात उतरलेत तिथली मालकीण बाई त्यांच्या स्वागतासाठी फक्त खाणंपिणंच नाही तर अगदी शय्यासोबतही करू शकेल अशा प्रकारचं वर्णन त्या प्रसंगांमध्ये आहे. विशेष म्हणजे अशी मागणी करण्यात आणि ती पुरवण्यात पार काही भयंकर गोष्ट नाही असेच संवाद आहेत. तिथे नग्ननृत्याचाही कार्यक्रम होतो. गरम पाण्याच्या झऱ्याखाली स्त्री-पुरुष एकत्रच नागव्याने डुंबतात. भारतीय समाजात असं काही झालं असतं तर खुनापेक्षा ह्या वागण्याच्याच बातम्या बनल्या असत्या. पण जपानी समाजात ते फार स्वभाविक दिसतंय. त्यामुळे पहिला भाग वाचताना मी मुख्य कथानकापेक्षा "लेखकाच्या नजरेतून जपान" बघत होतो. म्हणून तो भाग संथ वाटला तरी कंटाळवाणा झाला नाही. आणि शेवट होताना त्या प्रत्येक तपशीलाचे धागेदोरे आणि संदर्भ लेखकाने किती खुबीने गुंफले आहेत हे लक्षात आल्यावर; "अरे हो रे, हे असंच म्हटलं होतं की... असं बोलले होते त्याचा हा अर्थ होता तर..." असं म्हणत एक वेगळीच वाचनानुभूती जाणवली. पुस्तक वाचताना आपल्याला थोडी माहिती मिळते, आपण थोडं हसतो, थोडा तपास करतो, जरा आश्चर्यचकित होतो आणि काय काय झालं असेल याचा चित्रपटही मनात बघत राहतो.


आता काही पाने उदाहरणादाखल वाचा.
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


लेखक फुजिकावा ह्यांची व्यवस्था नीट झाली आहे ना. ह्याची चौकशी करताना.


खून झालेला बघून प्रत्येकाचा आपलाआपला तर्क.



शेतीचा प्रश्न



मूळ लेखनात काही कच्चे दुवेही आढळतात. पण ते सगळ्यात शेवटी जाणवेल, पण तो पर्यंत आपण पुस्तक पूर्ण केलेलं असेल. त्यामुळे त्यातून रसभंग होत नाही. उलट पूर्ण पुस्तक पुन्हा एकदा उलटसुलट चाळलं जाईल. लेखकाला कदाचित तेच अपेक्षित असावं. ह्या अनुवादासाठी मयुरेशला १००% गुण. ह्या पुस्तकालाही पुरस्कार मिळावेत अशा शुभेच्छा.

पुस्तक वाचून झाल्यावर अनुवादक मयुरेशशी गप्पा झाल्या. पुस्तकातले प्रसंग आठवून, ते कसे गुंफले आहेत याची उजळणी करण्यात आम्हाला दोघांनाही खूप मजा आली.

शीर्षकावरसुद्धा बोललो. "अपूर्णांकांचे खून" ऐवजी "लहान अंकांचे खून" असं शीर्षक असायला हवं होतं हे माझं मत त्याला सांगितलं. हिशेबामध्ये ३.३, ३.४ ला ढोबळमानाने तीनच धरलं जातं आणि ३.८, ३.९ ढोबळमानाने चार धरलं जात. म्हणजे २,३,४ ला महत्व न देता जणू त्यांचा खूनच केला जातो. लाक्षणिक अर्थाने, समाजातल्या दुबळ्या लोकांवरही अत्याचारच केला जातो. अशा अर्थाचा संवाद पुस्तकात आहे आणि त्यावरूनच मूळ जपानी पुस्तकाचे शीर्षक आहे. म्हणून मला शीर्षक "लहान अंकांच्या खुनाची कथा" असायला हवं असं वाटलं.

मयुरेशने पाठवलेले
मूळ जपानी पुस्तकाचे मुखपृष्ठ


जपानी पुस्तकांच्या स्टाईल प्रमाणे या पुस्तकाचा आकार(लांबी रुंदी) नेहमीच्या पुस्तकांपेक्षा लहान आहे. हातात घेतल्यावर फॉन्टचा आकार बारीक वाटला. पण वाचायला सुरुवात केल्यावर त्रास झाला नाही. मुखपृष्ठावर राक्षसांच्या मुखवट्याची चित्र आहेत ज्याचा संदर्भ पुस्तकात शेतकऱ्यांनी सादर केलेल्या दैत्य नृत्याच्या कार्यक्रमाची आहे. जपानी लिपीतील चार आणि पाच या आकड्यांची चिन्ह आहेत. अक्षरांच्या वर शिरोरेखा न देता अक्षरं रेषेवर लिहिली आहेत. क्षणभर आपण ते उलटसुलट करून बघतो. पुस्तकात आपल्याला काय उलट सुलट वाचायला मिळणार आहे याची जणू झलकच.

आता अजून फार सांगत नाही. तुम्हीच पुस्तक वाचा. जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हालाही हे पुस्तका विषयी दुसऱ्या कोणालातरी सांगावसं वाटेल. ज्यांनी वाचलंय त्यांच्याशी बोलून वाचनानुभूती पुन्हा अनुभवायला आवडेल.
पुस्तक विकत घेण्यासाठी वॉल्डन पब्लिकेशनच्या अभिषेक धनगर यांच्याशी 9766975165 वर संपर्क साधा. 


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

खोल खोल पाणी (Khol khol pani)



पुस्तक - खोल खोल पाणी (Khol khol pani)
लेखक - पेरुमाल मुरुगन (Perumal Murugan) 
अनुवादक - सुप्रिया वकील (Supriya Vakil)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - கூளமாதாரி (कूळमादारी)
मूळ पुस्तकाची भाषा - तमिळ (Tamil)
इंग्रजी अनुवाद - Seasons of the Palm (सिजन्स ऑफ पाम)
इंग्रजी अनुवादक - व्ही. गीता (V. Geetha)
ह्या पुस्तकाची पाने - ३००
प्रकाशन - जून २०२५, मेहता पब्लिशिंग हाऊस.
ISBN - 9789357205092

तामिळनाडूमधल्या खेडेगावात घडणारी ही कादंबरी आहे. दलित समाजातील लोक तिथल्या उच्च्वर्णीय जमीनदार वा शेतकऱ्यांकडे शेतमजूर म्हणून काम करतायत. ह्या दलित समाजात मुळातली गरीबी, अत्यल्प मजुरी. मोठा पोरवडा त्यामुळे खर्च फार. तरीही काही पैसे वाचले तर अशिक्षितपणामुळे ते साठवणे, वाढवणे असा विचारच फार नाही. उलट दारूत पैसा घालवणे आणि ऋण काढून सण साजरे करणे. मालकासमोर, जमीनदारासमोर पैशासाठी हात कायम पसरलेलेच! ह्यात भरडलं जातं ते लहानपण. "मजूर" बनण्यासाठीच जन्म घेतला जातो. त्यामुळे जेमतेम समजायला लागलं की मुलं आपल्या आईबापाचं कर्ज फेडण्यासाठी मालकाकडे कामाला लावली जातात. ही लहान मुले गुरे राखतात, बकऱ्या चरायला घेऊन जातात आणि मालक सांगेल ती अंगमेहनतीची कामं करतात. मालकाकडेच राहतात. गोठ्यात झोपतात. मालकीण काय देईल ते खायचं. गुरं घेऊन बाहेर पडायचं. लंगोटीवर राहायायचं. दिवसभर मेहनत करून असंच एका आडोशाला झोपायचं. अशाच मुलांच्या आयुष्याची ही कहाणी आहे.

गावात वेगवेगळ्या मालकांकडे काम करणारी अशी मुलं - बुटक्या, लंब्या, लंगड्या, पोटी, काडेपेटी, किवंडी नावाची - 
आपल्याला कादंबरीत भेटतात. पहाट झाली की बकऱ्यांना चरायला घेऊन ते बाहेर पडतात. बकऱ्यांना त्यांच्या कुरणात सोडलं, जरा निवांतपणा मिळाला की ही मुलं एकमेकांशी गप्पा गोष्टी करतात, खेळतात, एकेमकांची थट्टा मस्करी करतात. तलावात पोहतात. पडक्या विहिरीत बकऱ्या धुतात. मातीत लोळतात. ह्याचे मजेशीर प्रसंगात आहेत. बकऱ्यासुद्धा त्यांचे मित्र मैत्रीणच बनलेले आहेत. त्यामुळे बकऱ्यांनाही नावं आहेत. खोडकर बकरं कुठलं, लाजाळू कुठलं, प्रेमळ कुठलं हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे बकऱ्याचे लाड करतात, कधी त्यांच्यावर रागावतात, प्रसूतीच्या वेळी आजारपणात त्यांची शुश्रूषाही करतात. बकऱ्यांवर चिडताना आपला आवाजही मालकासारखाच झालाय की काय अशी भावना क्षणभर त्याच्या मनात येते. "भूमिका" घेतली की वागणं कस बदलतं !!

मुलं म्हटलं की खोडकरपणा आलाच. त्याच्या जोडीला कायमची भूक. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतातून भुईमुगाच्या शेंगा चोरणं, ताडाची फळं चोरणं, रानमेवा गोळा करण्याच्या नादात बकऱ्यांकडे दुर्लक्ष होणं घडणारच. मग मात्र भयंकर परिणाम होतात. मालकाच्या शिव्या आणि मरेस्तोवर मारहाण...लहानमूल आहे ह्याची तमा न बाळगता !! असे प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो.

मालकांची मुलं आणि ही वेठबिगार 
मुलं आसपासच्या वयायाचीच. त्यामुळे मालकांची मुलं ह्यांच्याबरोबर खेळायला येतात. अस्पृश्यांबरोबर खेळतोय हे घरच्यांना कळलं तर कंबख्ती आहे, हे माहिती असूनही. पण खेळताना मालकाचा पोर म्हणून हे म्हणतील ते खेळ खेळायचे; ह्यांनी खोडी काढली, फटके दिले तरी नोकरमुलांनी ते सहन करायचं. मालक मालक म्हणून नाकदुऱ्या काढायच्या. त्यातून काही आगळीक झाली आणि ते मालकाच्या कानावर गेलं की "माझा मुलगा ढीग म्हणाला .. तुला शेण खायला कोणी सांगितलं?" ह्या न्यायाने पुन्हा शिक्षा गुलामालाच. दोन लहानपणांमधली ही दरी दाखवत दाखवत पुस्तक पुढे जाते. मालक - नोकर नात्याचे संस्कार लहानपणापासून दोन्हीबाजूने कसे होतात, समाजाची दुःस्थिती पुढे कशी राखली जाते हेच ह्यातून जाणवतं.
अशा प्रसंगांनी गुंफलेली ही कादंबरी आहे. प्रसंग सुटे सुटे वाटले तरी हळू हळू पुढचे मागचे संदर्भ जुळत जुळत मोठी कथा आपल्या डोळ्यासमोर येते. एका शोकांतिकेत पर्यवसान होतं. 

கூளமாதாரி (कूळमादारी) ह्या मूळ नावात மாதாரி(मादारी) ही तामिळनाडूतील मागासवर्गीय जात आहे. கூளம் (कूळम्) म्हणजे शेतीतलं उरलंसुरलं, गुरांना खायला ठेवलेलं.


आता काही पाने उदाहरणादाखल वाचा
बकरीचं बाळंतपण बघणारी ही "बाळं"



मालकाचा मुलगा सेल्वन आणि "बुटक्या" ह्यांच्यातला संवाद



शिक्षेच्या भीतीने घरी पळून जाण्याचा प्रसंग





अनुवाद उत्तम झाला आहे. व्यक्तींची आणि ठिकाणांची नावं तमिळ आहेत म्हणून ती तमिळ कादंबरी आहे असं कळतं अन्यथा ती मराठीच वाटते, इतकं भाषांतर मराठमोळं आहे. त्यासाठी अनुवादक सुप्रियाजींचे आभार. 
पण तमिळ नावं मराठीत लिहिताना मात्र अजून काळजी घ्यायला हवी होती. इंग्रजी स्पेलिंगवरून ती मराठीत लिहिताना "th" म्हणजे "थ", "a" म्हणजे "अ की आ" असा गोंघळ केला आहे. प्रत्यक्ष लेखकाचं तमिळ नाव பெருமாள் म्हणजे पेरुमा"ळ" आहे. पेरुमा"ल" नव्हे. "अमरान टॉकीज" असं नाव आहे. ते "अमरन् टॉकीज" असणार. "थुंगाये थंबी थुंगाये" असा चित्रपटाचा उल्लेख आहे. नेटवर शोधल्यावर कळतं की तो "தூங்காதே தம்பி தூங்காதே" म्हणजे "तूंगादे तंबी तूंगादे" असं नाव आहे. मला तमिळ येत असल्यामुळे ह्या चुका लगेच जाणवल्या. "मध्यरात्रीनंतरचे तास" ह्या नावाच्या मराठी अनुवादित पुस्तकातही अशा बऱ्याच चुका होत्या. अनुवादकाने इंग्रजीवरून अनुवाद केला असेल तरी मूळ पुस्तकाच्या भाषेतल्या शब्दांचे योग्य उच्चार मूळ भाषिकाला विचारले पाहिजेत. भारतीय भाषांच्या बाबतीत हे नक्कीच शक्य आहे.

अशा ह्या पुस्तकात सामाजिक उच्चनीचतेची जाणीव दिसते. पुस्तकात मुलांच्या गप्पा, खोड्या दिसतात. शिक्षेच्या भीतीने पळून जाणं आणि सापडणं दिसतं. बेदम मार खाणं दिसतं. वयात येण्याआधीच लैंगिकतेची ओळख झाल्यामुळे होणारी त्याबद्दलची उत्सुकता दिसते. मार खाऊन झाल्यावर वाढता कोडगेपणा दिसतो. आपण काम सोडलं तर आपल्या लहान भावाला कामाला यावं लागेल ह्याचीही काळजी वाटते. दिवसेंदिवस घरी जायला न मिळाल्यामुळे अशा भुकेच्या, वेदनेच्या क्षणी आईची, आजीची येणारी जाणीव बघून आपलंही मन कातर होतं. ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गच नसल्यामुळे बुडत्याचा पाय खोलात.. "खोल खोल पाण्यात" आहे ह्याच गडद जाणीवेत कादंबरीचा शेवट होतो. अशा पाण्यात डोकावायला तुम्हालाही भावेल, कदाचित एखाद्या बुडत्याला हात द्यायची इच्छा मनात निर्माण होईल.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

नृत्यावकाश दिवाळी अंक २०२६ (Nrutyavakash Diwali Ank 2026)

पुस्तक - नृत्यावकाश दिवाळी अंक २०२६ (Nrutyavakash Diwali Ank 2026) भाषा - मराठी (Marathi) संपादक - आश्लेषा महाजन आणि सायली कुलकर्णी (Ashles...