खोल खोल पाणी (Khol khol pani)



पुस्तक - खोल खोल पाणी (Khol khol pani)
लेखक - पेरुमाल मुरुगन (Perumal Murugan) 
अनुवादक - सुप्रिया वकील (Supriya Vakil)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - கூளமாதாரி (कूळमादारी)
मूळ पुस्तकाची भाषा - तमिळ (Tamil)
इंग्रजी अनुवाद - Seasons of the Palm (सिजन्स ऑफ पाम)
इंग्रजी अनुवादक - व्ही. गीता (V. Geetha)
ह्या पुस्तकाची पाने - ३००
प्रकाशन - जून २०२५, मेहता पब्लिशिंग हाऊस.
ISBN - 9789357205092

तामिळनाडूमधल्या खेडेगावात घडणारी ही कादंबरी आहे. दलित समाजातील लोक तिथल्या उच्च्वर्णीय जमीनदार वा शेतकऱ्यांकडे शेतमजूर म्हणून काम करतायत. ह्या दलित समाजात मुळातली गरीबी, अत्यल्प मजुरी. मोठा पोरवडा त्यामुळे खर्च फार. तरीही काही पैसे वाचले तर अशिक्षितपणामुळे ते साठवणे, वाढवणे असा विचारच फार नाही. उलट दारूत पैसा घालवणे आणि ऋण काढून सण साजरे करणे. मालकासमोर, जमीनदारासमोर पैशासाठी हात कायम पसरलेलेच! ह्यात भरडलं जातं ते लहानपण. "मजूर" बनण्यासाठीच जन्म घेतला जातो. त्यामुळे जेमतेम समजायला लागलं की मुलं आपल्या आईबापाचं कर्ज फेडण्यासाठी मालकाकडे कामाला लावली जातात. ही लहान मुले गुरे राखतात, बकऱ्या चरायला घेऊन जातात आणि मालक सांगेल ती अंगमेहनतीची कामं करतात. मालकाकडेच राहतात. गोठ्यात झोपतात. मालकीण काय देईल ते खायचं. गुरं घेऊन बाहेर पडायचं. लंगोटीवर राहायायचं. दिवसभर मेहनत करून असंच एका आडोशाला झोपायचं. अशाच मुलांच्या आयुष्याची ही कहाणी आहे.

गावात वेगवेगळ्या मालकांकडे काम करणारी अशी मुलं - बुटक्या, लंब्या, लंगड्या, पोटी, काडेपेटी, किवंडी नावाची - 
आपल्याला कादंबरीत भेटतात. पहाट झाली की बकऱ्यांना चरायला घेऊन ते बाहेर पडतात. बकऱ्यांना त्यांच्या कुरणात सोडलं, जरा निवांतपणा मिळाला की ही मुलं एकमेकांशी गप्पा गोष्टी करतात, खेळतात, एकेमकांची थट्टा मस्करी करतात. तलावात पोहतात. पडक्या विहिरीत बकऱ्या धुतात. मातीत लोळतात. ह्याचे मजेशीर प्रसंगात आहेत. बकऱ्यासुद्धा त्यांचे मित्र मैत्रीणच बनलेले आहेत. त्यामुळे बकऱ्यांनाही नावं आहेत. खोडकर बकरं कुठलं, लाजाळू कुठलं, प्रेमळ कुठलं हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे बकऱ्याचे लाड करतात, कधी त्यांच्यावर रागावतात, प्रसूतीच्या वेळी आजारपणात त्यांची शुश्रूषाही करतात. बकऱ्यांवर चिडताना आपला आवाजही मालकासारखाच झालाय की काय अशी भावना क्षणभर त्याच्या मनात येते. "भूमिका" घेतली की वागणं कस बदलतं !!

मुलं म्हटलं की खोडकरपणा आलाच. त्याच्या जोडीला कायमची भूक. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतातून भुईमुगाच्या शेंगा चोरणं, ताडाची फळं चोरणं, रानमेवा गोळा करण्याच्या नादात बकऱ्यांकडे दुर्लक्ष होणं घडणारच. मग मात्र भयंकर परिणाम होतात. मालकाच्या शिव्या आणि मरेस्तोवर मारहाण...लहानमूल आहे ह्याची तमा न बाळगता !! असे प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो.

मालकांची मुलं आणि ही वेठबिगार 
मुलं आसपासच्या वयायाचीच. त्यामुळे मालकांची मुलं ह्यांच्याबरोबर खेळायला येतात. अस्पृश्यांबरोबर खेळतोय हे घरच्यांना कळलं तर कंबख्ती आहे, हे माहिती असूनही. पण खेळताना मालकाचा पोर म्हणून हे म्हणतील ते खेळ खेळायचे; ह्यांनी खोडी काढली, फटके दिले तरी नोकरमुलांनी ते सहन करायचं. मालक मालक म्हणून नाकदुऱ्या काढायच्या. त्यातून काही आगळीक झाली आणि ते मालकाच्या कानावर गेलं की "माझा मुलगा ढीग म्हणाला .. तुला शेण खायला कोणी सांगितलं?" ह्या न्यायाने पुन्हा शिक्षा गुलामालाच. दोन लहानपणांमधली ही दरी दाखवत दाखवत पुस्तक पुढे जाते. मालक - नोकर नात्याचे संस्कार लहानपणापासून दोन्हीबाजूने कसे होतात, समाजाची दुःस्थिती पुढे कशी राखली जाते हेच ह्यातून जाणवतं.
अशा प्रसंगांनी गुंफलेली ही कादंबरी आहे. प्रसंग सुटे सुटे वाटले तरी हळू हळू पुढचे मागचे संदर्भ जुळत जुळत मोठी कथा आपल्या डोळ्यासमोर येते. एका शोकांतिकेत पर्यवसान होतं. 

கூளமாதாரி (कूळमादारी) ह्या मूळ नावात மாதாரி(मादारी) ही तामिळनाडूतील मागासवर्गीय जात आहे. கூளம் (कूळम्) म्हणजे शेतीतलं उरलंसुरलं, गुरांना खायला ठेवलेलं.


आता काही पाने उदाहरणादाखल वाचा
बकरीचं बाळंतपण बघणारी ही "बाळं"



मालकाचा मुलगा सेल्वन आणि "बुटक्या" ह्यांच्यातला संवाद



शिक्षेच्या भीतीने घरी पळून जाण्याचा प्रसंग





अनुवाद उत्तम झाला आहे. व्यक्तींची आणि ठिकाणांची नावं तमिळ आहेत म्हणून ती तमिळ कादंबरी आहे असं कळतं अन्यथा ती मराठीच वाटते, इतकं भाषांतर मराठमोळं आहे. त्यासाठी अनुवादक सुप्रियाजींचे आभार. 
पण तमिळ नावं मराठीत लिहिताना मात्र अजून काळजी घ्यायला हवी होती. इंग्रजी स्पेलिंगवरून ती मराठीत लिहिताना "th" म्हणजे "थ", "a" म्हणजे "अ की आ" असा गोंघळ केला आहे. प्रत्यक्ष लेखकाचं तमिळ नाव பெருமாள் म्हणजे पेरुमा"ळ" आहे. पेरुमा"ल" नव्हे. "अमरान टॉकीज" असं नाव आहे. ते "अमरन् टॉकीज" असणार. "थुंगाये थंबी थुंगाये" असा चित्रपटाचा उल्लेख आहे. नेटवर शोधल्यावर कळतं की तो "தூங்காதே தம்பி தூங்காதே" म्हणजे "तूंगादे तंबी तूंगादे" असं नाव आहे. मला तमिळ येत असल्यामुळे ह्या चुका लगेच जाणवल्या. "मध्यरात्रीनंतरचे तास" ह्या नावाच्या मराठी अनुवादित पुस्तकातही अशा बऱ्याच चुका होत्या. अनुवादकाने इंग्रजीवरून अनुवाद केला असेल तरी मूळ पुस्तकाच्या भाषेतल्या शब्दांचे योग्य उच्चार मूळ भाषिकाला विचारले पाहिजेत. भारतीय भाषांच्या बाबतीत हे नक्कीच शक्य आहे.

अशा ह्या पुस्तकात सामाजिक उच्चनीचतेची जाणीव दिसते. पुस्तकात मुलांच्या गप्पा, खोड्या दिसतात. शिक्षेच्या भीतीने पळून जाणं आणि सापडणं दिसतं. बेदम मार खाणं दिसतं. वयात येण्याआधीच लैंगिकतेची ओळख झाल्यामुळे होणारी त्याबद्दलची उत्सुकता दिसते. मार खाऊन झाल्यावर वाढता कोडगेपणा दिसतो. आपण काम सोडलं तर आपल्या लहान भावाला कामाला यावं लागेल ह्याचीही काळजी वाटते. दिवसेंदिवस घरी जायला न मिळाल्यामुळे अशा भुकेच्या, वेदनेच्या क्षणी आईची, आजीची येणारी जाणीव बघून आपलंही मन कातर होतं. ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गच नसल्यामुळे बुडत्याचा पाय खोलात.. "खोल खोल पाण्यात" आहे ह्याच गडद जाणीवेत कादंबरीचा शेवट होतो. अशा पाण्यात डोकावायला तुम्हालाही भावेल, कदाचित एखाद्या बुडत्याला हात द्यायची इच्छा मनात निर्माण होईल.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

खोल खोल पाणी (Khol khol pani)

पुस्तक - खोल खोल पाणी (Khol khol pani) लेखक - पेरुमाल मुरुगन (Perumal Murugan)  अनुवादक - सुप्रिया वकील (Supriya Vakil) भाषा - मराठी (Marath...