हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025)



पुस्तक - हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025)
संकल्पना व प्रकाशक - पुंडलिक पै. पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवली (Pundalik Pai. Friend's Library Dombivli)
संपादक - डॉ. योगेश जोशी (Dr. Yogesh Joshi)
अतिथी संपादक - डॉ. विठ्ठल कामत (Dr. Viththal Kamat)
निर्मिती सहाय्य - डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन (Dr. Shrikant Shinde Foundation)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २०२
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - दिलेला नाही


"पै फ्रेंड्स लायब्ररी" हे डोंबिवलीतील लोकप्रिय वाचनालय आहे. नेहमीच्या पुस्तकांबरोबरच दिवाळीच्या दिवसांत दिवाळी अंक सुद्धा तिथे वाचायला उपलब्ध असतात. तेही मोठ्या प्रमाणात. पण फक्त पुस्तके वाचायला उपलब्ध करून देऊन न थांबता वेगवेगळे साहित्यिक उपक्रम करून वाचनसंस्कृती वाढवणारे हे वाचनालय आहे. "बुक स्ट्रीट", "पुस्तक आदान प्रदान", पुस्तक प्रदर्शने, पुस्तक प्रकाशने, मुलाखती, सादरीकरणे, मुलांसाठी गोष्ट वाचन असे नवनवीन आणि रंजक उपक्रम. (https://www.facebook.com/friendslibrary वर तुम्हाला फोटो बघता येतील). दिवाळी अंकांच्या कालावधीची सुरुवात पण धूमधडाक्यात "दिवाळी अंक पूजनाने होते". हे सगळे उपक्रम " फ्रेंड्स लायब्ररी"चे पुंडलिक पै अर्थात "पै काका" राबवत असतात. गेल्यावर्षीपासून ह्या उपक्रमांत भर पडून स्वतःचा आता दिवाळी अंक काढायलाही सुरुवात केली आहे. पै काकांनी मला हा अंक वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.


ह्या वर्षीच्या अंकाचा विषय आहे "प्रवास". पण हा प्रवास म्हणजे "प्रवासवर्णन", "स्थळ वर्णन" इतकाच मर्यादित नसून; तो व्यक्ती, संस्था, उपक्रम, तत्वज्ञान, उद्योगक्षेत्र ह्यांची उभारणी, विकास कसा झाला ह्याचा मागोवा; ह्या अर्थी आहे. त्यामुळे दिवाळी अंक माहितीपूर्ण आणि वैचारिक लेखांची मेजवानी झाला आहे.


अनुक्रमणिकेवर एक नजर टाका.


चाळीस लेख आणि दोनशेहून अधिक पाने असल्यामुळे प्रत्येक लेखाची माहिती देणं जरा कठीण आहे. पण काही लेखांची माहिती देतो म्हणजे वैविध्याची आणि मजकुराच्या दर्जाची कल्पना येईल.

पहिला लेख "व्रतस्थ व पर्यावरणस्नेही व्यवसायिकाची यशोगाथा". हा लेख विठ्ठल कामतांची मुलाखत आणि माहिती असा मिश्र आहे. पंचतारांकित हॉटेलची साखळी उभी करणारे विठ्ठल कामत हे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी उद्योगाची सुरुवात का केली, लहानपण कसं होतं, उद्योग विस्तारातले मोठे टप्पे कुठले ह्याबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मिळते. अशाच प्रकारे अजून काही उद्योगांवर लेख आहेत. उदा. घरात कपडे वाळत घालण्यासाठी सोपी योजना पुरवणारे "ईझीड्राय" , "पितांबरी", डोंबिवलीतील प्रसिद्ध "कानिटकर लाडूवाले" आणि "हेमंत सुगंधी भांडार" आणि अजून काही उद्योग ह्यांवरचे लेख आहेत. एक छोटी पण सर्वांना आवश्यक अशी गोष्ट कल्पकतेने तयार करून सुरु झालेले हे उद्योग आता चांगलेच नावारूपाला आले आहेत. त्यांचा प्रवास समजून घेणं ज्ञानवर्धक आहे.

एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, एकनाथ शिंदे, श्रीधर फडके, रामदास फुटाणे, अशोक पत्की, हृदयनाथ मंगेशकर आणि अजून काही नामवंतांच्या जीवन प्रवासाबद्दल लेख आहेत.

रेल्वे विषयक दोन लेख आहेत. आशियातील पहिल्या महिला मोटरमन सुरेखा यादव ह्यांच्यावर एक लेख आहे. तर "रुळानुबंध" पुस्तकाचे लोकप्रिय लेखक आणि स्वतः इंजिन ड्रयव्हर असणाऱ्या गणेश कुलकर्णी ह्यांनी जगात रेल्वे कशी सुरु झाली, तिच्या तंत्रज्ञानात महत्वाचे बदल कसे झाले, ती पूर्वीपेक्षा जास्त वेगवान, सुरक्षित, आरामदायी कशी झाली ह्याची रोचक माहिती देणारा लेख लिहिला आहे... "रेल्वेचा प्रवास". "मेट्रो वुमन" अश्विनी भिडे ह्यांच्यावर एक लेख आहे. तर मुंबईच्या बेस्ट बसमधील प्रवासाचे किस्से सांगणारा रवी प्रकाश कुलकर्णी ह्यांचा लेख आहे. लता मंगेशकर तरुणपणी गाण्याचा रियाज करण्यासाठी बेस्ट प्रवास कसा करत; नूरजहाँच्या आठवणी असे अपरिचित किस्से ह्यात वाचायला मिळतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने "शताब्दी प्रचारक संकल्पनेची" असा लेख ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर ह्यांनी लिहिला आहे. सु. ग. शेवडे, सच्चिदानंद शेवडे, परीक्षित शेवडे ह्या एकाच कुटुंबातील तीन पिढ्या आपल्या लेखन व वक्तृत्वातून राष्ट्रपेमी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी कसे काम करतायत हा "कौटुंबिक प्रवास" एका लेखात आहे. अजून एकदोन सामाजिक कामांची चांगली माहिती देणारे लेख आहेत.

वाचकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ग्रंथाली प्रकाशन आणि चळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली बद्दल एक लेख आहे. "कॉर्पोरेट दिंडी" पुस्तक, टाटा समूह, विशेषतः रतन टाटांबरोबर केलेल्या कामाच्या अनुभवांवरच्या व्याख्यानांसाठी जास्त प्रसिद्ध असलेल्या माधव जोशींनी वेगळ्याच विषयांवर लेख लिहिले आहेत. ते म्हणजे ज्ञानेश्वरीचे रसग्रहण आणि "भारतीय शास्त्रीय संगीताची वाटचाल".

क्रीडा विषयक "भारतीय क्रिकेटचा इतिहास" असा कौस्तुभ चाटेंचा लेख आहे. ते स्वतः क्रिकेटला वाहिलेला "क्रिककथा" असा दिवाळी अंक काढतात. त्यांच्या व्यासंगाची ओळख ह्या लेखातून होईल. सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर ह्यांच्यावर एक छोटा लेख आहे.

काही पाने उदाहरणादाखल
विठ्ठल कामतांच्या आठवणी



श्रीधर फडके आणि शांता शेळके ह्यांनी एकत्र काम केले ते प्रसंग


रेल्वे इंजिनांच्या विद्युतीकरणाचा प्रवास


"बायको गेली माहेरी काम करी पितांबरी" अशा पितांबरीचा प्रवास


"भारतीय क्रिकेटचा इतिहास"


अशाप्रकारे साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, उद्योग, चित्रपट, संगीत, रेल्वे -मेट्रो, सामाजिक कार्य अशा आपल्या आयुष्याच्या नानाविध अंगांना स्पर्श करणारा हा दिवाळी अंक आहे. लेख लिहिणारे सुद्धा मान्यवर, अभ्यासू अशी व्यक्तिमत्त्वे आहेत. प्रत्येक पान वाचनीय, माहितीपूर्ण आहे. ह्यावर्षीच्या दिवाळी अंकांच्या वाचनीय अंकांच्या यादीत "हॅशटॅग"चा नक्की समावेश करा.

अंक विकत घेण्यासाठी अंकात दिलेली माहिती पुढीलप्रमाणे


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जॅपनीझ रोझ (Japanese Rose)



पुस्तक - जॅपनीझ रोझ (Japanese Rose)
लेखिका - रेई किमुरा (Rei Kimura)
अनुवाद - स्नेहल जोशी (Snehal Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Japanese Rose (जॅपनीझ रोझ)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - १८९
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०१२
छापील किंमत - रु. २००/-
ISBN - 978-81-8498-334-0

दुसऱ्या महायुद्धाचे दिवस. जपानची बाजू आणि विरुद्ध बाजू ह्यांची चांगलीच जुंपलेली. एकीकडे युरोपवर बॉम्बवर्षाव होतोय तर दुसरीकडे जपानवर. राजधानी टोकियोही त्यातून सुटलेली नाहीये. जपानची आगेकूच आग्नेय आशियात चालू आहे. पर्ल हार्बर वर जपानने हल्ला करून अमेरिकेला अचानक मोठा दणका दिला आहे. युद्ध अजून भडकतं आहे. अजून सैनिक युद्धात पाठवा, अजून विमानं हल्ल्यात उतरवा !! आता मूळचं सैन्य कमी पडू लागल्यामुळे सक्तीची सैन्य भरती सुरु झाली आहे. अठरा वर्षांचे धडधाकट तरुण सक्तीने सैन्यात पाठवले जातायत. प्रचार असा होतोय की ; आपला देश संकटात आहे. जपानची, सम्राटाची इभ्रत वाचवण्यासाठी प्रत्येकाने त्याग केला पाहिजे. सर्व उद्योगधंदे आता सैनिकी कामासाठी वळवले पाहिजेत. तरुण मुलं, त्यांच्या आया, त्यांच्या प्रेयसी सगळेच मानसिक उद्धवस्तता अनुभवतायत. एकीकडे देशासाठी काहीतरी केल्याचे समाधान तर दुसरीकडे स्वतःचे तारुण्य, स्वतःची स्वप्ने आणि जिवलग ह्यांना कायमचे मुकण्याची खात्री. एकीकडे देशभक्तीची लाट आणि दुसरीकडे स्वतः गोळ्याखाऊन मरणे किंवा दुसऱ्याला मारणे ह्या विचारानेच गर्भगळीत होणे.

अशाच अस्वस्थ वातावरणात नायिका "सायुरी मायामोटो" आणि तिची मैत्रीण "रैको" आहेत. त्या टोकियोपासून दूर गावात राहतायत. "सायुरी"चा भाऊ आणि रैकोचा होणारा नवरा सैन्यात जबरदस्ती भरती झाले आहेत. आता त्यांना आपण जवळजवळ गमावलंच ह्या भावनेने त्या दोघी त्या दोघांना भेटायला टोकियोला निघतात. युद्ध, बॉम्बहल्ला, रक्तबंबाळ नागरिक, छिन्न विछिन्न देह त्या प्रत्यक्ष अनुभवतात. जीवनावश्यक वस्तूंचाच नव्हे तर जीवनाचाच जिथे भरवसा नाही अशा अवस्थेत घसरत चाललेली नैतिकताही त्या बघतात.

दुर्दैवाने "सायुरी"चा भाऊ, रैकोचा होणारा नवरा आणि रैको हे तिघेही वेगवेगळ्या बॉंबहल्ल्यात मरण पावतात. हे युद्ध आता "सायुरी"चं वैयक्तिक युद्ध होतं. शत्रू सैन्याविरुद्ध तिच्या मनात सूडाग्नी पेटतो. आपणही सैन्यात जाऊ. शत्रूला मारताना मरून जाऊ हा विचार तिच्या मनात घर करतो. पण सैन्यात स्त्रियांना तेव्हा प्रवेश नव्हता. मग ती ठरवते पुरुष वेषांतर करून सैन्यात घुसायचं. तिचा तो प्रयत्न यशस्वीही होतो. शत्रूवर हल्ला करण्याची संधीही मिळते. ती "कामिकाझी" पायलट - म्हणजे शत्रूवर विमान आदळवून आत्मघातकी हल्ला करणारा पायलट - बनते.

पण ऐन युद्धाच्या धामधुमीत, वेषांतराच्या आत दडलेलं तिचं स्त्रीमन एकाकडे आकर्षित होतं. देशासाठी काहीतरी करायचं पण ह्या युद्धाचा देशाला खरंच काही फायदा होतोय का ? जिवलगांचा सूड घ्यायचा, का आपलं प्रेमजीवन खुलवण्यासाठी जिवंत राहायचं ? वेषांतर उघड झालं तरी सैन्याला फसवणुकीची जबर शिक्षा आणि दिलेल्या कामगिरीत नापास झालो तरी जबर शिक्षा. काय होईल सायुरीचं ? ते समजून घेण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.

पुरुष म्हणून सैन्यात भरती होणे, ते निभावताना आलेली आव्हाने, मानसिक आंदोलने हे लेखिकेने अगदी समरसून लिहिलं आहे. सायुरीचं सोंग आता उघडकीस येतंय की काय अशी धाकधूक आपल्याला वाटते. वेषांतर आणि त्याचे परिणाम हा जरी कादंबरीचा कळसाध्याय असला तरी सैन्यात जायच्या निर्णयापर्यंत पोचण्याचा सायुरीचा प्रवास हा सुद्धा तितकाच परिणामकारक आहे. टोकियोवरच्या हल्ल्यामुळे होणारा विध्वंस, नर्स म्हणून काम करताना जखमी आणि मृतांची अवस्था हे प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो. वाचताना आपणही त्या युद्धग्रस्त जपानमध्येच आहोत असंच वाटू लागतं. तिचा भाऊ, तिची आई, वडील, रैको ह्या प्रत्येकाची अगतिकता, हातातून वाळूसारखं निसटून चाललेलं आयुष्य वाचताना आपणही अस्वस्थ होतो. पुढे काय होईल ह्याच्या उत्सुकतेने वाचत राहतो. दुसरं महायुद्ध आणि तेव्हा झालेली हानी हा घडून गेलेला इतिहास आहे, तो काही बदलता येणार नाही. पण पुस्तक वाचताना वाटत राहतं की काहीतरी आता पुढे काहीतरी चमत्कार घडेल आणि ती सर्व पात्र सुखाने पुन्हा नांदू लागतील. लेखिकेच्या लिखाणाची ही ताकद आहे.
इंटरनेटवरच्या माहितीनुसार ही सत्य घटना नाही. काल्पनिक कादंबरी आहे.

काही पाने उदाहरणादाखल

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती

सक्तीच्या सैन्य भरतीमुळे पसरलेली विकलता



"हिरो मियामोटो"ह्या नावाने वावरणाऱ्या सायुरी आणि प्रशिक्षक ताकुशी ह्यांच्यातील एक प्रसंग.


अयशस्वी "कामिकाझी" पायलटची चौकशी. "कामिकाझी"ने "जिंकू किंवा मरू"हाच बाणा बाळगला पाहिजे. तिसरा पर्याय नाही.



नुकत्याच झालेला भारत-पाक संघर्ष, तेव्हा शिगेला पोचलेली देशभक्ती आणि युद्धसदृश परिस्थिती ह्याची आठवण झाली. 'पाक'ला धडा शिकवा, आरपार युद्ध करा, "होऊन जाऊ दे" ची मागणी करणारे लोक युद्धाबाबत, त्याने शहरोशहरी, घरोघरी निर्माण होऊ शकणाऱ्या विक्राळ परिस्थितीबाबत खरेच संवेदनशील होते का ? ह्याच नाही, कुठल्याही दोन देशांत युद्ध होईल तेव्हा देशभक्ती-स्वाभिमान-त्याग आणि वैयक्तिक सुख-भविष्याची ओढ-मरण्यामारण्याची भीती ह्यांची रस्सीखेच अशीच होईल ना ! ह्यदृष्टीने हे पुस्तक जपानची, सायुरीची गोष्ट राहत नाही. तर प्रत्येक माणसाची होते.

स्नेहल जोशी ह्यांनी केलेला मराठी अनुवाद अगदी योग्य. मूळ मराठी पुस्तकच वाटावं असा हा अनुवाद आहे.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan)



पुस्तक - संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan)
लेखक - नितीन गडकरी आणि शैलेश पांडे (Nitin Gadkari & Shailesh Pande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५१
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, एप्रिल २०२५
छापील किंमत - रू. २५०/-
ISBN 978-81-19625-88-8

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतीच (विजयादशमी २०२५) आपली शताब्दी पूर्ण केली. ह्यानिमित्ताने संघाची स्थापना, शंभर वर्षांचा प्रवास ह्याबद्दल विविध माध्यमात चर्चा होत आहे. नागपूरला मोजक्या लोकांनिशी सुरु झालेली संघटना इतकी वर्षे कशी चालली, वाढली आणि भारतीय समाजकारणात-राजकारणात इतकी महत्त्वाची कशी झाली ह्याचं अप्रूप, कौतुक अनेकांना आहे. त्याचवेळी द्वेष आणि असूयाही आहे. संघाचे योगदानाबद्दल अनेकांना कौतुक आहे तर संघ-विचारांना अनेकांना पराकोटीचा विरोधही आहे. बऱ्याच वेळा ही चर्चा एकतर्फी होते. म्हणजे संघाकडून अधिकृतरित्या प्रत्येक वादविवादावर उत्तर दिलं जात नाही. मात्र संघाशी संबंधित व्यक्ती आपली मते, संघाची मूल्ये प्रकट करतात. अशा प्रकटीकरणात एक महत्त्वाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं दिसलं ते म्हणजे नितीन गडकरी लिखित "संघातील मानवी व्यवस्थापन". नितीन गडकरी हे - रोडकरी , पूलकरी , टोलकरी, विकासपुरुष - अशा नावांनी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री आहेत. लहानपणापासून संघ स्वयंसेवक, तरुण वयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे कार्यकर्ते मग भाजपचे कार्यकर्ते, नेते, राष्ट्रीय अध्यक्ष इतकंच काय पंतप्रधान पदासाठी भाजपमधील योग्य व्यक्तींपैकी एक अशी ख्याती मिळवणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने संघ कसा आहे हे बघणं औचित्यपूर्ण आहे.

हे पुस्तक संघाचा कालसूत्रबद्ध इतिहास नाही तर संघाच्या स्थापनेचे कारण, ध्येय, कार्यपद्धती, वेळोवेळी होत गेलेला बदल ह्या सगळ्यामागे काय तत्वज्ञान आहे ह्यावर भर देणारे आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ही सगळी तात्त्विक चर्चा, उदात्त हेतू केवळ नेत्यांच्या मनात किंवा कागदावर राहिले नाहीत तर लाखो स्वयंसेवकांच्या मनात ते बिंबले गेले आहेत. तीनचार पिढ्या ते विचार अमलात येतायत. आणि त्यातून संघाची ताकद वाढते आहे. त्यामुळे "थेअरी" ते "प्रॅक्टिकल" हे अंतर संघाने कसं कापलं हे बघणंही औत्सुक्याचं आहे. त्यावर लेखकाने आपलं मत मांडलं आहे. ह्यात एकूण १६ लेख आणि चार परिशिष्टे आहेत. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली की त्यांचा अंदाज येईल.

दैनंदिन शाखा हे संघाच्या ताकदीचं उगमस्थान आहे. लहानपणापासून मुले शाखेत जातात, खेळ खेळतात, शूरवीरांच्या गोष्टी ऐकतात, देशभक्तीपर गाणी म्हणतात, मोठ्यांचे विचार ऐकतात. त्यातून संघाचा विचार मनात रुजतो. व्यक्ती कायमची कामाशी जोडली जाते. मोठेपणी ती कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल तरी देशभक्ती, स्वबांधवप्रीती , समाजऋण हे भाव मनात ठेवूनच ती काम करते. ही शाखा कशी चालते, त्याबद्दल वेगवेगळ्या सरसंघचालकांचं मत काय आहे हे पुस्तकात दिलं आहे. त्यामुळे संघाच्या शाखेत कधी न गेलेल्या व्यक्तीला संघाचं हे उघड गुपित जाणून घ्यायची संधी पुस्तक देते.

पुढच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये ह्या पुढची प्रगत रचना, संघटनेतील उतरंड, प्रचारक, संलग्न संस्थांची स्थापना ह्याची माहिती दिली आहे. ही माहिती तांत्रिक नाही. कार्यकर्त्यांना कसे प्रेरित केले जाते, मूळ मूल्ये कशी अधोरेखित केली जातात हे सांगितलं आहे. कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नाही. पण त्या व्यक्ती एकत्र येऊन पूर्णांकासारखे काम करू शकतात; हा भाव रुजवला जातो. म्हणून संघात कार्यकर्ता महत्त्वाचा आहे पण व्यक्तिपूजा नाही, असे लेखकाचे प्रतिपादन आहे. ही स्वयंसेवी संस्था आहे. त्यामुळे ज्याला स्वतः त्याग करायची मनापासून इच्छा आहे तोच ह्यात सामील होईल, हे खरेच. पण सामील झाल्यावर त्या त्यागाला अनुरूप काम मिळतं. आपल्यासारखेच समाजप्रेमी लोक मिळतात. हे सगळं सातत्याने कसे होते, ह्याबद्दलचे वर्णन पुस्तकात आहे.


संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या सरसंघचालकांचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि निर्णयांचा मोठा वाटा संघाच्या यशात आहे. डॉ. हेडगेवारांपासून आत्ताच्या सरसंघचालकांपर्यंत प्रत्येकाच्या विचारांची, निस्पृहतेची थोडक्यात ओळख दिली आहे. सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि त्यांचे बंधू भाऊराव देवरस ह्यांच्याशी लेखकाचा प्रत्यक्ष परिचय आला. त्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लेख आहेत. पुढील चार लेखांत पुन्हा संघाची तात्त्विक भूमिका मांडली आहे. अभाविप, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विवेकानंद केंद्र इ. महत्वाच्या संस्था कुठल्या कुठल्या टप्प्यावर झाली हा भाग निवेदनाच्या ओघात आला आहे.

एकूणच ह्या पुस्तकात तत्वज्ञानाचा, "थेअरी"चा भाग जास्त आहे. गीता, उपनिषदे, धर्मग्रंथे ह्यांच्यातील श्लोक व वचने जी भारतीय विचारपद्धतीचा आधार आहे त्यांचा उल्लेख आहे. केवळ स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही तर पुन्हा पारतंत्र्यात जायला नको ह्यासाठी स्वतःची शक्ती विकसित झाली पाहिजे हा विचार पुन्हा पुन्हा मांडला आहे. कार्यकर्त्याने कसे समर्पण करावे हे सांगितले आहे. सरसंघचालक आणि इतर मोठ्या नेत्यांची वचने आहेत. पण असे वाटले की तोच तोच भाग पुन्हा पुन्हा येतो. नितीन गडकरी स्वतः कार्यकर्ते म्हणून कसे घडले, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले, त्यांचे गुणदोष कसे बदलले हे सगळं सविस्तर येईल असं वाटलं होत. त्याची अगदी एकदोन उदाहरणे आहेत. ती पण फार मोघम - वरवरची.

"व्यक्ती तितक्या प्रकृती", "मतभेद", "घर म्हटलं कि भांड्याला भांडं लागणारच" ह्या समस्या संघात पण असणारच. पण त्यांवर कशी मात केली जाते हा भाग फार येत नाही. कार्यकर्त्याशी बोललं जातं, वाटल्यास जबाबदाऱ्या बदलल्या जातात इतपत लिहून बोळवण केली आहे. एकूणच सगळे "स्वयं"सेवक असल्यामुळे सगळं आपसूक सुरळीत होत असावं असं पुस्तक वाचून वाटू लागतं. "मानवी व्यवस्थापना"बद्दलच्या पुस्तकात ह्या पैलूचा वस्तुनिष्ठ विचार आवश्यक होता.


काही पाने उदाहरणादाखल वाचा


शाखेची माहिती बद्दलच्या प्रकरणातील दोन पाने


संघाच्या दृष्टीने, धर्म, आत्मतत्त्व


कुशल संघटक/नेता कसा असावा ह्याबद्दलच्या प्रकरणातील दोन पाने


तुम्ही संघाच्या शाखेत कधी गेला नसाल, संघाचे मूळ विचार काय आहेत हे माहिती नसेल तर हे पुस्तक तुम्हाला संघाची वैचारिक बैठक आणि कामाचा विस्तार ह्याबद्दल चांगली माहिती मिळेल. संघाची जुजबी माहिती असेल तरी काही नवे पैलू कळतील. तात्विक चर्चेची पुनरुक्ती टाळून नितीन गडकरींची किंवा इतरांची वैयक्तिक उदाहरणे, अंतर्गत संघर्षाची उदाहरणे, नवीन ध्येये ठरवण्याची प्रक्रिया ह्या सगळ्या बाबी पुढच्या आवृत्तीत आल्या तर "व्यवस्थापन" समजून घेण्याच्या दृष्टीने पुस्तक अजून माहितीपूर्ण ठरेल.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)




पुस्तक - तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)
लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२८
प्रकाशन - भाग्यश्री प्रकाशन सप्टेंबर २०२५ 
ISBN - 978-81-987168-1-1
छापील किंमत रुपये २००/-



लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अग्रगण्य नाव. त्यांचे वृत्तपत्रातले लेख, भाषणे, भारतभर केलेले दौरे, आणि स्वतः भोगलेला तुरुंगवास यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमानस जागृत झाले. ब्रिटिश विरोधी जनतेच्या भावना मांडणाऱ्या त्यांच्या आधीच्या भारतीय नेत्यांपेक्षा त्यांची भूमिका जास्त जहाल, कृतीशील होती. थेट "स्वराज्य मिळविणारच" हे ठासून सांगणारी होती. स्वातंत्र्याची चळवळ टिळकांच्या आधी सुरू झाली होती. टिळकांनी तिला मोठा लोकाश्रय मिळवून दिला. त्यांच्या निधनानंतरही ती चळवळ पुढे चालत राहून शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.

टिळक जसा स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते तसाच प्रयत्न इतर अनेक महान व्यक्तिमत्व सुद्धा करत होती. प्रत्येकाची आपापली विचारसरणी होती, आपापली आंदोलनाबद्दलची धारणा होती. परस्पर विरोधी मते होती. जहाल- मवाळ, सशस्त्र- नि:शस्त्र, सैन्यात जावं की न जावं, सामाजिक सुधारणा आधी का राजकीय स्वातंत्र्य आधी, सुधारणांसाठी ब्रिटिशांचे सहकार्य घ्यावे की न घ्यावे, पारंपारिक स्वदेशी विचार घ्यावा का आधुनिक पाश्चिमात्य विचार आचरावा ... असे असंख्य मतभेदाचे मुद्दे होते. प्रत्येकाची कार्यशैली वेगळी होती आणि समाजावर प्रभाव टाकण्याची क्षमता देखील वेगळी.

त्यामुळे कुठेही एका चरित्र नायकाचा अभ्यास करताना त्याचे तत्कालीन नेत्यांची आलेले संबंध नक्कीच अभ्यासनीय ठरतात. या नेत्याने आपल्या पूर्वसुरींकडून काय बोध घेतला होता हे समजणं महत्त्वाचं असतं. तर हा नेता दिवंगत झाल्यावर काय झालं त्यांचे विचार टिकले का काळाच्या कसोटी उतरले का हे जाणणं देखील महत्त्वाचं आहे. एकूणच हा प्रचंड मोठ्या अभ्यासाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. ज्याला इतिहासात खरंच मनापासून रस आहे तोच हे करू जाणो. पण इतरांनी मात्र नाराज व्हायचं कारण नाही. कारण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात असा अभ्यास करून ते सार रूपात आपल्यासमोर मांडण्याचं मोठं काम लेखक चंद्रशेखर टिळक यांनी सदर पुस्तकाच्या रूपात केलं आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली ओळख


हे पुस्तक २५ लेखांचा संग्रह आहे यात पहिल्या बारा लेखांमध्ये लोकमान्य टिळक आणि एक एक भारतीय नेतृत्व याची तुलना केलेली आहे. दोघांचा स्वभाव, विचार, कामाची पद्धत केलेले लिखाण, लोकांचा प्रतिसाद, परदेश प्रवास, भोगलेल्या शिक्षा अशा वेगवेगळ्या पैलूंद्वारे सारखेपणा आणि फरक दाखवून दिलेला आहे. यात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास असे टिळकांच्या आधीच्या दोन विभूती आहेत. गांधीजी, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि सावरकर, विनोबा भावे ही त्यांच्या कार्यकाळच्या आसपास झालेली व्यक्तिमत्व आहेत. गंमत म्हणजे पुस्तकाची सुरुवात होते ती अटलजी, मोदीजी आणि इंदिरा गांधी ह्यांच्याशी तुलनेतून.

अनुक्रमणिका



समकालीन लोकांवरच्या लेखात टिळक आणि दुसरी व्यक्ती ह्यांची भेट कधी, कुठे झाली होती, त्यांच्यात कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली होती, त्यांनी एकत्र काम केले किंवा नाही, एकमेकांवर टीका कशी केली, एकमेकांची स्तुती कधी केली, त्यांच्याबद्दल इतर पत्रकार किंवा नेते काय म्हणत अशी उदाहरणे दिली आहेत. 
लेखकाने तुलनेसाठी घेतलेले काही मुद्दे आपल्याला आश्चर्यचकितही करतील. उदा. टिळक आणि सावरकर ह्यांच्या जीवनावर आधारित कलाकृती किती आणि त्या व्यावसायिक दृष्ट्या किती चालल्या (किंबहुना नाही चालल्या) असाही मुद्दा घेतलाय. टिळक आणि आगरकर ह्यांच्या लेखनशैलीची देखील तुलना आहे. "गीतारहस्य" व "गीताई" ह्यांच्यातले साम्यभेद एका लेखात आहेत. असे विचार डोक्यात येणं आणि त्याबरहुकूम माहिती गोळा करून ती मांडणं ह्याबद्दल लेखकाला प्रणाम.

शेवटचे दहा बारा लेख हे टिळक आणि एखादे ठिकाण, समुदाय, वस्तू ह्यांचा पुन्हा पुन्हा संपर्क कसा आला किंवा आलेला संपर्क कसा महत्त्वाचा ठरला ह्याची माहिती आहे. टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात मुसलमानांचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काँग्रेस व मुस्लिम लीग ह्यांच्यातला "लखनौ करार" झाला होता. तो वादग्रस्त ठरला पण. टिळकांबद्दल मुस्लिम समाजात किती विश्वासाची भावना होती हे त्या प्रकरणातून दिसतं. टिळक समाजाचा सर्वांगीण विकास करणारे राजकीय नेते होते. त्यांनी कामगार चळवळीला कसा पाठिंबा दिला हे एका लेखात आहे. टिळकांचा अर्थकारणाचा अभ्यासही दांडगा होता. "बॉम्बे स्वदेशी" कंपनीत ते संचालक सदस्य होते. समभाग (शेअरची) किंमत किती ठेवावी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून कंपनीचे शेअर द्यावेत इ. निर्णय त्याकाळात त्यांनी घेतले. "टिळक आणि शेअर बाजार " लेख वाचताना ही अपरिचित बाजू पुढे येते.

काही पाने उदाहरणार्थ
टिळक आणि रामदास

टिळक आणि योगी अरविंद

टिळक आणि मुसलमान

परकीयांच्या शब्दांत टिळक


कितीही लिहिलं आणि कितीही व्यक्तिमत्त्वांशी तुलना करत लिहिलं तरी अजून लिहायला वाव राहणारच. तरी कामगार कायदे, आर्थिक बाबी ह्याबद्दल वाचताना आंबेडकरांची आठवण झाली. आर्थिक, कायदेशीर बाबी, ब्राह्मण-ब्राह्मणेतरांकडे बघायचा दृष्टिकोन हे मुद्दे घेऊन आंबेडकर- टिळक एखादं प्रकरण जोडता आलं तर छान. "अर्थकारणी लोकमान्य" ह्या आगामी पुस्तकात तो मुद्दा सविस्तर येणार आहे.
ह्या पुस्तकात उल्लेख झालेल्या टिळकांच्या आयुष्यातल्या घटना वाचकाला नीट माहिती असतील तर विवेचन व्यवस्थित कळेल. तो गृहपाठ वाचकानेच केला पाहिजे. तरी.. सूरत काँग्रेस, लखनौ करार, चिरोल खटला ह्यांच्याबद्दल सुरुवातीलाच तपशील दिले तर मदत होईल. "मुसलमान" प्रकरण वाचताना मी आत्ता नेट वर शोधून वाचलं की नक्की सहकार्य म्हणजे काय करार केला होता. ते वाचल्यावर चित्र अजून स्पष्ट झालं.

सुरुवातीला म्हटलं तसं लेखकाच्या अभ्यासाचं, व्यासंगाचं सार आपल्या समोर असल्यामुळे हे लेख वाचताना शाळेतलं "नवनीत गाईड" वाचतो आहे असं वाटलं. "टिळक आणि अमुक अमुक ह्यांच्यातील पाच फरक आणि पाच साम्यस्थळे सांगा; "टिळक आणि अमुक अमुक आव्हान ह्यावर शंभर ओळींचा निबंध लिहा".. अशा प्रश्नाची तयार उत्तर म्हणजे एकेक लेख. त्यामुळे ह्या लेखांमध्ये मुद्द्याला ओझरता स्पर्श करून लेखक पुढच्या मुद्द्याकडे वळतो. ते वाचताना तयार उत्तर मिळाल्याचा आनंद आपल्याला मिळेल. तर अभ्यासू वाचकाला प्रत्येक तुलनेचा मुद्दा अभ्यासाची नवीन वाट दाखवेल.

पुस्तकातले विवेचनाचे स्वरूप वस्तुनिष्ठ तुलना आहे. कुठल्याही महापुरुषाला कमी लेखण्याचा किंवा चढे दाखवण्याचा हेतू ह्यात दिसत नाही. छुपा अजेंडा दिसत नाही. अजेंडा असलाच तर; तो हा असावा की लोकमान्यांचे विचार, कर्तृत्व आजही किती अभ्यासनीय, अनुकरणीय आहे; समाज आणि शासन पातळीवर त्याबद्दलची अनास्था दूर केली तर आपलंच भलं आहे हे जाणवून देणे !

काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)

पुस्तक - काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)
लेखिका - वसुंधरा काशीकर (Vasundhara Kashikar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २६५
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, जुलै २०२५
छापील किंमत रु.४९९/-
ISBN 978-93-49487-78-9

"चितळे बंधू मिठाईवाले" हे नाव ऐकलं नाही असा महाराष्ट्रातील माणूस विरळाच. पुण्यासारख्या ऐतिहासिक सांस्कृतिक नगरीची एक ओळख बनलेला "चितळे बंधू" हा ब्रँड आहे. चितळ्यांची बाकरवडी, श्रीखंड, इतकंच काय, दुकानाच्या चालूबंद असण्याच्या वेळा हा सुद्धा लोकांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. चितळे दूध, चक्का, तूप इतर दुग्धजन्य पदार्थ मिठाया तिखट मिठाचे पदार्थ या सगळ्यांचे चाहते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. परदेशस्थ मराठी माणसांमुळे ही नाममुद्रा सातासमुद्रापलीकडेही पोचली आहे. चव, स्वच्छता, मालाचा दर्जा ह्यातली उत्तमता त्यांनी कायम राखली आहे. त्यांच्या उत्पादनांमध्ये व व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वृद्धीच होते आहे. एका मराठी माणसाने सुरू केलेला, त्याच्या कुटुंबीयांनी वाढवलेला आणि चौथ्या पिढीपर्यंत एकत्र राहून प्रगतीपथावर राखलेला हा उद्योग असल्यामुळे सहसा उद्योगाच्या वाटेला न जाणाऱ्या मराठी माणसासाठी अजूनच कौतुकाचा आहे.

मला तर त्यांच्या मिठाया आणि तिखटमिठाचे पदार्थ इतके आवडतात की वरचेवर दुकानात खरेदी होत असते. मित्रांना - सहकाऱ्यांना काही खाऊ न्यायाचा असेल तर तो हमखास चितळेंचाच असतो. त्यामुळे मला तर माझे मित्र थट्टेने चितळ्यांचा ब्रँड अम्बॅसेडरच म्हणतात. त्यांच्या दोन कारखान्यांना खाजगी भेट देण्याची संधी योगायोगाने मिळाली. त्यांचे वर्णन फेसबुकवरच्या माझ्या पोस्टमध्ये वाचू शकाल

https://www.facebook.com/kaushik.lele/posts/pfbid0raGA1C4bdzD1Z8RAQsSWH7s3HsZq56nXazzDPh4AqnWijNy4cKqsEZXxGpktMWNrl

https://www.facebook.com/kaushik.lele/posts/pfbid0rBsfxsyuAUQr6t7oZNRENjCg4CTuV82DBYcsKWxZcQ1e97PMS1fku6qxm3hRTAHfl

सांगली जवळच्या भिलवडी गावामध्ये भास्कर चितळे अर्थात बाबासाहेब चितळे यांनी एक छोटा दुधाचा धंदा सुरू केला. त्या बीजाचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला दिसतो. या विस्तारात बाबासाहेबांची मुलं, सुना, नातवंडं आणि आता पतवंडंही कार्यरत आहेत. बाबासाहेबांचे चिरंजीव दत्तात्रय उर्फ काकासाहेब चितळे हे त्यापैकी एक. काकासाहेबांच्या कर्तृत्वाची, दातृत्वाची आणि सहृदयतेची विविधांगी ओळख करून देणारं असं हे पुस्तक आहे. या आधी मी काकासाहेबांबद्दल काही विशेष वाचलं नव्हतं. चितळे समूहाच्या सामाजिक कामाबद्दलही विशेष माहिती नव्हती. पण या पुस्तकातून त्या दोन्ही बद्दल फार छान ओळख झाली. चितळ्यांच्या खास पेढ्यांसारखं उद्योजगतेच्या गोड खव्याच्या आत सामाजिक बांधिलकीचं सारण कसं भरलेलं आहे हे जाणवलं.

पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की, नवनवीन तंत्रज्ञान आणून, नवीन संकल्पना राबवून काकासाहेबांनी केवळ उद्योग वाढ केली असती तरीही एक यशस्वी उद्योगपती म्हणून आपल्या मनात कौतुकाचे स्थान मिळवते झाले असते. पण काकासाहेबांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपला धंदा वाढवताना नफेखोरी केली नाही. आपले ग्राहक, पुरवठादार कर्मचारी यांची पिळवणूक करून उत्पन्नाचे मोठमोठे आकडे गाठण्याची खेळी केली नाही, उलट या सर्वांचा आर्थिक, सामाजिक व वैचारिक विकास कसा होईल याची काळजी घेतली. त्याचे योग्य परिणाम दिसलेच. मालक-कर्मचारी, मालक-पुरवठादार असे कोरडे संबंध न राहता ते संबंध परस्पर विश्वासाचे झाले, जिव्हाळ्याचे झाले. चितळे समूहाच्या विस्तारित कुटुंबाचे ते सगळे भाग झाले. इतकं केलं असतं तरी एक सहृदय उद्योजक म्हणून आपला आदर दुणावला असता. पण काकासाहेब इतक्यावर थांबले नाहीत. ते ज्या गावात उद्योग करत होते त्या "भिलवडी" गावाचा, पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. शिक्षण संस्था आणि इतर सामाजिक कामांना भरभरून देणग्या दिल्या. गरजूंना मदत केली. इतकं केलं असतं तरी ते दानशूर सहृदय उद्योजक ठरले असते. पण काकासाहेब फक्त देणग्या देऊन थांबले नाहीत तर जिथे आर्थिक मदत केली आहे तिथे तिथे आपल्या अनुभवाचा वापर करून योग्य मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या. त्यांच्या दैनंदिन कामात भाग घेऊन संस्था कार्यप्रवण केल्या. ग्रामस्वच्छतेसाठी श्रमदान असो, महापूर येऊन गेल्यावर गावात झालेला गाळ काढण्याचे असो; काम काका हातात कुदळ-फावडं घेऊन कमला पुढे. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरी लग्नकार्य किंवा दुःखद प्रसंग असो, संस्थेच्या कामासाठी आलेल्या पाहुण्यांची उठबस असो; काका तिथे प्रत्यक्ष काम करत होते. हे वाचल्यावर तर कर्ता सुधारक, दानशूर, सहृदय यशस्वी उद्योजक अशी किती विशेषणे त्यांना लावावी ! समजत नाही.

इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यग्र असणाऱ्या माणसाला घरच्यांना वेळ देणं, आपल्या मुलानातवंडांशी प्रेमाचे संबंध ठेवण्यासाठी पुरेसा वेळ आणि मानसिक स्थैर्य मिळणं कठीण जातं. बऱ्याच वेळा आपण बघतो की महापुरुषांच्या सावलीत त्यांची पुढची पिढी तितकी यशस्वी वाढत नाही. समाजासाठी वाहून घेतलेल्या लोकांच्या कामाची झळ कुटुंबीयांना भोगावी लागते. पण पुस्तकात दिलेल्या वर्णानुसार काकांचे आपल्या घरच्या मंडळींशी सुद्धा अतिशय प्रेमाचे, आनंदाचे संबंध होते. एकत्र कुटुंब म्हणून नांदणाऱ्या चितळे घरात घरच्या आनंदाच्या आणि अडचणीच्या प्रसंगातही काका उपलब्ध होते.

भारतीय परंपरेने सांगितलेले चार पुरुषार्थ धर्म-अर्थ-काम आणि मोक्ष. या ऐहिक जगातले धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ काकासाहेबांनी साधले आहेत. चौथा पुरुषार्थही नक्कीच परमेश्वराने त्यांना आनंदाने दिला असेल.

चरित्र नायकाची ही धावती ओळख वाचून तुम्हाला पुस्तकाबद्दल नक्कीच उत्सुकता वाटत असेल त्यामुळे थोडं पुस्तकाच्या मजकुराबद्दल सांगतो. पुस्तकात एकूण २२ प्रकरणं आहेत. त्यात काकांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्याची वर्गवारी केलेली आहे. 
काही प्रकरणाबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे कल्पना येईल.

"अशी म्हैस सुरेख बाई" - म्हशीचं दूध हा चितळ्यांचा मुख्य धंदा. त्यासाठी चांगल्या जातीच्या, भरपूर दूध देणाऱ्या म्हशी निवडण्यासाठी काका परराज्यात जायचे. परिसरातील शेतकऱ्यांना, पशुपालकांना म्हशी घेण्यासाठी मदत करायचे. म्हशींचे आरोग्य सांभाळण्यासाठी डॉक्टरांची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. म्हशींचा विमा काढण्याच्या प्रक्रियेत सुद्धा त्यांनी लक्ष घालून ती शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सोपी कशी होईल हे बघितले. आजाराने म्हशी दगावणे, अपघात होणे किंवा परराज्यातून म्हैस आणताना अपघात होणे या सगळ्या गोष्टींसाठी कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा कवच त्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिलं.

"भिलवडी चे गाडगेबाबा" - गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २००२ साली भिलवडीत राबविण्यात आलं. त्यात काकांनी पुढाकार घेतला. कामाचं पूर्ण नियोजन केलं. गटारे बांधणे, शौचालये बांधणे, उद्यान तयार करणे, वृक्षारोपण करणे, वैद्यकीय शिबिर घेणे, कचरा व्यवस्थापन करणे अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी स्वतःचा अनुभव आणि नेनेतृत्त्वगुण कामाला लावले. जिथे शासकीय मदत वा गावाचा निधी कमी पडत होता तिथे चितळे समूहातर्फे पैसे देऊन काम मार्गी लावलं. राज्यात भिलवडीचा दुसरा क्रमांक आला.

"सार्वजनिक वाचनालय आणि भिलवडी शिक्षण संस्था" - फक्त इमारत बांधून, चांगली पुस्तकं तिथे आणून काका थांबले नाहीत तर जास्तीत जास्त लोक तिथे यावेत यासाठी वाचन कट्टा, पुस्तक भेट असे कार्यक्रमही राबवले. शिशुवर्गापासून उच्च शिक्षणापर्यंत सोयी उभारण्यात मोठा सहभाग घेतला.

"मी अजून जहाज सोडलेलं नाही" - भिलवडीला आलेल्या दोन महापुरात काकासाहेब भिलवडी न सोडता तिथेच राहिले. लोकांना बाहेर काढणं, जनावरांना बाहेर काढणं, बाहेरगावाहून मदत आणणं आणि त्याचं योग्य वाटप करणं ह्या सगळ्यात त्यांनी जीवाचं रान केलं ते सगळे प्रसंग यात आहेत.

काकांचे भाऊ, मुलं, सुना, नातू यांच्या काकांविषयीच्या आठवणी दोन लेखात आहेत तर. "व्रतस्थ इमानाची यात्रा ८५ वर्षांची" ह्या लेखात चितळे समूहाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला आहे. कुटुंबातल्या कुठल्या व्यक्ती कुठल्या जबाबदारीवर आहे याची माहिती दिलेली आहे.

काही पाने उदाहरणादाखल

आजूबाजूच्या होतकरू तरुणांना स्वतः आर्थिक मदत करणे, स्वतःची पत खर्ची घालून बँकेकडून मोठ्या रकमांची कर्ज मिळवून देणे आणि परतफेडीची योग्य व्यवस्था लावणे याबद्दलची दोन पाने


फक्त धान्यशेती आणि दूध इतपतच मर्यादित न राहता शेतकऱ्यांनी फळबागा कराव्यात, नवीन प्रकारची पिकं घ्यावी यासाठीही ते प्रोत्साहन देत. मार्गदर्शन करत. आर्थिक मदत देत आणि पुढाकार घेऊन संस्थात्मक काम करत त्यातील एक उदाहरण.

असंख्य सामाजिक विषयात काम करणारे काकासाहेब नेत्रदानासाठीही सक्रिय होते त्याबद्दल



अशा पद्धतीने काकासाहेबांच्या सामाजिक कामाची माहिती अतिशय जोरकसपणे या पुस्तकात येते हे या पुस्तकाचं  नक्की यश आहे. पण काकासाहेबांचं पूर्ण चरित्र किंवा त्यांचा जीवनपट असा डोळ्यासमोर येत नाही. सर्वसामान्य वाचकांना चितळ्यांची मिठाई माहिती आहे पण "चितळे बंधू" म्हटल्यावर चितळ्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत; कोण उद्योगात आहेत; त्यांची परस्पर नाती काय हे माहिती नाही. त्यामुळे ह्या चितळ्यांपैकी काकासाहेब हे नक्की कोणाचे कोण हे आधी स्पष्ट व्हायला हवं होतं. चितळे वंशवृक्षाची माहिती, काकासाहेबांच्या आयुष्यातले मुख्य टप्पे, त्याचा काळ, त्याची ठिकाणं हे थोडक्यात सांगायला हवं होतं. ही स्थलकालनिश्चिती झाल्यावर पुढची प्रकरणे अजून परिणामकारक झाली असती. प्रत्यक्ष चितळे डेअरी साठी 
त्यांनी केलेलं काम हे देखील तुटक तुटकपणे समोर येतं. ते अजून जोरकसपणे यायला हवं होतं. त्यांच्या बुद्धीचा, तांत्रिक कौशल्याचा वापर त्यांनी प्रत्यक्ष डेअरी साठी कसा केला; काय काय पद सांभाळली, कुठल्या भूमिका निभावल्या, उत्पादनांची संख्या गुणवत्ता आणि उत्पन्न कसं वाढवलं हा सगळा भाग तितका जोरकसपणे येत नाही. त्यांनी उद्योगात मिळवलेले यश आणि "उत्तम व्यवहाराने जोडलेले धन" हे त्यांच्या पुढच्या सामाजिक कामासाठी एक मजबूत पाया झाले आहे. तो पाया कसा घडला हे सविस्तर वाचायला मिळणं आवश्यक होतं.पुढच्या आवृत्तीत त्यात एक प्रकरण सुरुवातीला जोडावं असं मला वाटतं.

काकासाहेबांचं काम जितक्या सकारात्मकतेने आणि ऊर्जेने भरलेलं आहे ते तितक्याच ऊर्जाभरल्या शब्दांनी आपल्यासमोर आणलं आहे वसुंधरा काशीकर यांनी. निवेदन, एखाद्या व्यक्तीच्या मुलाखतीतला भाग, थोडी माहिती अशा स्वरूपातलं लेखन अतिशय प्रवाही आहे. थेट लोकांच्या तोंडून काकासाहेबांचे अनुभव ऐकतोय आहोत असंच वाटतं. लेखिकेने वाचकाने घ्यायचा बोध सोप्या शब्दांत सांगितला आहे. गाण्याच्या ओळी, गजलेच्या ओळी, उद्धृते ह्यांनी मजकूर नटलेला आहे. म्हणूनच पुस्तक रुक्ष चरित्र किंवा कामाची जंत्री असं होत नाही. ही एक सुंदर ललित कलाकृती आहे.

"सकाळ प्रकाशना"ने पूर्ण मजकूरही वेगवेगळ्या रंगात सादर केला आहे. ठळक शीर्षक, त्याच्याखाली दाट रेघ, डावीकडचे पानभर रेखाचित्र, चित्र मजकूर ठळक दाखवण्यासाठी रंगांचा वापर केला आहे. "Kaka says" असं म्हणत काकांची त्या त्या प्रसंगाला साजेशी वाक्ये ठळक दिलेली आहेत. वृत्तपत्रे लेखातील चौकटीप्रमाणे. यामुळे हे पुस्तक सुद्धा तितकंच देखणं आणि अभिरुचीपूर्ण झालं आहे.

पुस्तकात भरपूर फोटोही आहेत विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक छान रेखाचित्र आहे. अनंत खासबारदार यांनी ही चित्रे काढली आहेत. एक उदाहरण पहा.

महापुराच्या वेळी काकांनी केलेल्या कामा ची ओळख करून देणारे हे चित्र किती यथायोग्य आहे, सुरेख आहे, आकर्षक आहे. "अ पिक्चर इज वर्थ थाउजंड वर्ड्स" चा प्रत्यय देणारं आहे.

तर असं हे पुस्तक वाचाच. हवं तर चितळ्यांची श्रीखंड आणि बाकरवडी खात खात पुस्तक वाचा 😀😀. काकासाहेबांच्या कामाची गोडी चाखताना पदार्थांची गोडी आणि खुमारीही वाढेल. लक्ष्मी आणि सरस्वतीचं एकत्र वास्तव्य दिसेल. आपल्या वकुबानुसार समाजासाठी काही करायची ऊर्मीही वाढेल.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)




पुस्तक - जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade)
लेखक - आशुतोष जोशी (Ashutosh Joshi)
अनुवाद - सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Journey to the east (जर्नी टू द ईस्ट)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - १७५
प्रकाशन - ब्लीच पब्लिशिंग 2025
ISBN - 978-93-342-9139-1
छापील किंमत - रु. ५००/-

समाज माध्यमांवर पोस्ट वाचताना, व्हिडिओ बघताना कळलं की आशुतोष जोशी या पंचवीस-तिशीतल्या तरुणाने कोकणापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पदयात्रा केली आहे. ह्या प्रवासापूर्वी तो इंग्लंडमध्ये फोटोग्राफीची व्यावसायिक कामे करत होता. पण त्याने भारतात परत यायचं ठरवलं. ही पदयात्रा केली. आणि सध्या तो त्याच्या गावी गावकऱ्यांसाठीचे काही सामाजिक प्रकल्प राबवतो आहे. ह्या जुजबी माहितीवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता वाटून त्याचे पुस्तक मी विकत घेतलं. "जा जरा पूर्वेकडे" या पुस्तकात त्याने त्याच्या पदयात्रेतल्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. १८५० किलोमीटर इतकी लांब ही पदयात्रा होती त्याला ६७ दिवस लागले.

हे पुस्तक त्याच्या प्रवासाची रोजनिशी नाहीये. प्रवासाचा सुरुवातीचा दिवस, शेवटचा दिवस आणि मधल्या काळात घडलेल्या दहा पंधरा घटना त्यात आहेत. एखादा प्रसंग आणि त्यावर आधारित त्याचं बरंचसं तत्वचिंतन असं निवेदनाचं स्वरूप आहे.

पुस्तक वाचताना कळतं की मर्यादित सामान एका ढकलगाडीत घालून तो प्रवास करत होता. कधी कुणाच्या घरी, कधी देवळात, तर कधी उघड्यावरती तंबू ठोकून त्याने मुक्काम केला. वाटेतल्या लागणाऱ्या गावांमध्ये गावकऱ्यांनी त्याला खायला दिलं. काहीवेळा घरीही राहायला देऊन पाहुणचार केला. असं काहीमिळालं नाही तेव्हा त्याच्या स्वतः कडची मॅगी किंवा पॅकेट फूड खाऊन दिवस काढला. ऊन, पाऊस, जंगली दमटपणा, सिमेंटचा रस्ता, कच्चा रस्ता माळरान अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून त्याने प्रवास केला.

काही पाने उदाहरणादाखल

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती.


गावकऱ्याशी संवाद आणि शेतीबद्दल चिंतन.



नक्षलप्रभावित भागात शिरताना पोलिसांनी चौकशी केली.



पंचविशीतला एक तरुण पदयात्रेवर निघतोय हे किती धाडसाचं आहे! अशा प्रवासात स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवणं महत्त्वाचं आहे. अनोळखी प्रदेशातून जाताना कधी त्रासदायक तर कधी चिंतेत टाकणारी परिस्थिती समोर येणार; तर कधी अनपेक्षित आनंदाचे क्षणही येणार. आशुतोषचं हे धाडस, त्याला आलेले अनुभव आणि त्यातून त्याच्या मनावर विचारांवर झालेला परिणाम हे सगळं ह्या पुस्तकात सापडेल असं वाटून मोठ्या औत्सुक्याने मी हे पुस्तक वाचायला घेतलं. परंतु पुस्तकाने माझी निराशा केली.

ज्या प्रसं
गांचं वर्णन केलं आहे त्या प्रसंगांचा स्थलकालाचा संदर्भच बहुतेक वेळा लागत नाही. अगदी सुरुवात म्हणजे त्याचं नरवण गाव कोकणात नक्की कुठे आहे हे मला माहिती नाही. शेवट ज्या गावात झाला ते माहिती नाही. त्याचा प्रवासाचा मार्ग कसा होता ते समजत नाही. नकाशा नाही तरी एखादं रेखाचित्र हवं होतं. रोजनिशी सारखं वर्णन नसल्यामुळे अचानक उड्या मारत मारत एका गावातलं वर्णन मग कुठल्यातरी पुढच्या गावाचं वर्णन मग त्याच्या पुढचं असं आहे. त्यामुळे मध्ये किती वेळ गेला, किती अंतर गेलं, काय केलं काही समजत नाही. त्यामुळे त्या प्रवासाचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

पुस्तकाच्या सुरुवातीला आशुतोष म्हणतो की परदेशात राहत असताना भारतात
ल्या  "कृषी कायदे" विरोधी आंदोलनाच्या बातम्या त्याने बघितल्या. शेतीच्या समस्या त्याला जाणवल्या. त्या नीट समजून घ्याव्यात हाही पदयात्रेचा उद्देश होता. पण पुस्तकात बघितलं तर; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट आणि गावातल्या एक दोन लोकांशी बदलत्या पीक पद्धती बद्दल बोलणं या व्यतिरिक्त काही खास संशोधनात्मक प्रसंग नाहीत. डोळेसपणे बातम्या बघणाऱ्या, वृत्तपत्रीय लेख वाचणाऱ्या कुठल्याही माणसाला जी जुजबी माहिती या समस्यांबद्दल असेल तेवढेच त्याला प्रत्यक्ष चालूनही समजली; असा समज वाचकाचा झाला तर नवल नाही. कदाचित त्याची वैयक्तिक समज खूप वाढली असेलही पण इथे ते ध्वनित होत नाही.

जंगलातल्या प्रवासात जाताना अस्वल अगदी त्याच्या जवळ आलं होतं. हल्ला व्हायची वेळ आली होती. हा एक प्रसंग वगळता पायी चालणे, उघड्यावर राहणे ह्यामुळे घडलेला कुठलाही थरारक प्रसंग पुस्तकात नाही. पदयात्रा करताना त्याला वारंवार संकटं यायला हवी होती आणि मग ती वाचायला आम्हाला मजा आली असती असं मला म्हणायचं नाहीये. मी सुरुवातीला म्हटलं तसं स्वतःची शारीरिक-मानसिक खंबीरता टिकवणे आणि स्वतःच्या रोजच्या सोयी करणे यासाठी केलेली धडपड सुद्धा वाचकाला समजून घ्यायला आवडलं असतं. पण पुस्तक त्याही बाबतीत लंगडं आहे. त्याला आलेले अजून अनुभव, भेटलेली माणसं, दिसलेला निसर्ग ह्यांचा अजून उल्लेख हवा होता. एक सलगता आली असती.

तिसरा पैलू म्हणजे सामाजिक परिस्थितीबद्दलचं त्याचं मुक्त चिंतन. एकूणच कथनाचा सूर असा आहे की शहरातले लोक आरामात जगतात आणि गावातले लोक फारच दुःखी आहेत. शहरातल्या लोकांना गावातल्या लोकांची जाण नाहीये. शहरातले लोक फक्त तंत्रज्ञानाचा आनंद घेत आहेत तर गावातले लोक मात्र निसर्गाशी तल्लीन झालेले आहेत. राग, क्रोध, ईर्षा हे सगळे अवगुण फक्त शहरी लोकांमध्ये आहेत. गावातले लोक मात्र मुक्त, स्वच्छंदी, आनंदी. हे काळंपांढरं चित्र फार खटकतं. एका प्रसंगात तो साधारणपणे असं म्हणतो की "माळरानावर भरपूर पाऊस पडत होता आणि दोन-तीन शेतकरी तिथे निवांत एकमेव च्या पाठीला पाठ लावून निवांत झोपले होते. द्वेषाचं ओझं त्यांच्या मनावर नव्हतं
पाऊस थांबल्यावर ते उठले. आकाश निरभ्र तशी त्यांची मनही निरभ्र. ते कसा छान आनंद घेत होते. शहरातल्या लोकांनी असा आनंद घेतला नसता". पण खरंच असं असेल का? ते शेतकरी पावसाचा आनंद घेत असतील, का कामाच्या चिंतेत असतील? आता हा पाऊस किती वेळ पडणार, यावर्षी जास्त पडणार, का कमी पडणार; ही भीती मनात नसेल का? तो पाऊस अवकाळी असेल तर त्यांच्याही मनात पावसाबद्दल शिव्याच असतील ना! दुसऱ्या एखाद्या गावकऱ्याकडे शेत जास्त आहे किंवा त्याची जमीन जास्त उपजावू आहे अशी असूयाही असेल. खेड्यात राहणाऱ्या लोकांमधली बांधांवरून भांडणं, भाऊबंदकी कोणाला ठाऊक नाही? "एक वेळ शहरातली कटकट परवडली पण भावकीतली भांडण नकोत", असं म्हणणारे कितीतरी गावकरी आपल्याला आजूबाजूलाही दिसतील. त्यामुळे लेखकाची शहरी जीवनाबद्दलची अनास्था, वैयक्तिक नावड आणि खेड्याबद्दलच्या काहीतरी रोमँटिक कल्पनारंजन अशा भावनेतूनच पूर्ण पुस्तक लिहिलं आहे. सरकार, नागरी व्यवस्था, आधुनिक जीवनपद्धती ह्यांना सरसकट अपराधी ठरवण्याची भूमिकाही दिसते. त्यामुळे त्याची तात्विक मल्लिनाथी ठिसूळ पायावर उभी आहे असंच मला वाटलं.

हे पुस्तक मूळ इंग्रजीत आहे. लेखकाने त्याच्या परदेशी परिचितांना डोळ्यासमोर ठेवून गोष्टींचं वर्णन केलं आहे असं जाणवतं. भारतात लग्नाच्या वेळी मांडव घालतात; काही वेळा काही खेड्यांमध्ये लोक प्रातर्विधीसाठी बाहेर जातात; भारतात स्थानिक राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर याचं साटंलोटं असतं अशा प्रकारचे उल्लेख आहेत. सर्वसामान्य भारतीय वाचकाला हे नित्यनियमाचे आहे. पण कदाचित ही वर्णन परदेशी लोकांना दुर्लक्षित भारत ह्यात दिसला
. म्हणून सुरुवातीला तीन परदेशी लेखकांनी पुस्तकाची भलावण केलेली आहे. मला मुन्नाभाई एमबीबीएस मधल्या "आय वॉन्ट पुअर पीपल हंग्री पीपल" ह्या प्रसंगाची आठवण मला झाली.

असो ! पुस्तक जरी भावलं नसलं तरी आशुतोष सारखा परदेशात राहून आलेला उच्चशिक्षित, चिंतनशील तरुण कृतीशील होऊन आपल्या सभोवतालालकडे डोळसपणे बघतो आहे, त्याच्या क्षमतांनुसार प्रत्यक्ष काम करतो आहे हे खूप स्वागतार्ह आहे. त्याच्या कामासाठी खूप शुभेच्छा. त्याचा आयुष्याचा प्रवास सुखकर आणि यशस्वी होवो. आणि त्या प्रवासाचे पुस्तक काही वर्षांनी आपल्याला वाचायला मिळो ही सदिच्छा!!


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025)

पुस्तक - हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025) संकल्पना व प्रकाशक - पुंडलिक पै. पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवली (Pundalik Pai. F...