पेशवाई (Peshwai)








पुस्तक :- पेशवाई (Peshwai)
लेखक :- कौस्तुभ कस्तुरे (Kaustubh Kasture)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- ३५६

छत्रपती शिवरायांच्या स्वप्नाची -सिंधू नदीपासून कावेरी नदी पर्यंत पूर्ण भारतभर हिंदवी स्वराज्य साकारण्याचा स्वप्नाची -बऱ्याच अंशी पूर्ती ज्या काळात झाली तो कालखंड म्हणजे पेशवाई. मराठा साम्राज्यच नव्हे तर भारताच्या इतिहासातही हा कालखंड दूरदर्शी परिणाम साधणारा आहे. पण या कालखंडाची जेवढी माहिती व अभिमान सर्व मराठी समजात असायला हवा तेवढा दिसत नाही. केवळ ब्राह्मण राज्यकर्ते म्हणून या शतकाला अनुल्लेखाने मारायचं किंवा जातीयवादी टीका करून कलंकित करायचं असाच उद्योग सामान्यपणे दिसतो. अशा परिस्थितीत पेशवाईचा अभ्यास करून तथ्याच्या आधारावर ३५० पानी पुस्तक लिहायचं हे धाडसाचं आणि श्रमाचं काम केल्याबद्दल लेखकाचं मनापासून अभिनंदन.

पेशवा अर्थात पंतप्रधान हे राजदाराबारातलं नेहमीचं पद. पण एकाच घराण्याकडे ते वंशपरंपरागत राहण्याचा हा काळ म्हणजे पेशवाई. हे घराणं "भट" आडनावाचं. या घराण्यातले पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पासून शेवटचे पेशवे बाजीराव(दुसरे) यांच्यापर्यंत सर्व पेशव्यांबद्दल या पुस्तकात माहिती आहे. 

बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांचा विश्वास संपादन केला, बादशहाकडून दख्खनच्या सुभ्यांमधून महसूल गोळा करण्याचा हक्क मिळवला, कैदेत असलेल्या महाराणी येसूबाईंची सुटका केली. या स्वपराक्रमातून त्यांना पेशवाई मिळवली. या घटनांची, त्यामागच्या राजकारणांची महत्त्वाची माहिती पुस्तकात मिळते.

पुढे सर्व पेशव्यांच्या काळात झालेल्या महत्त्वपूर्ण लढाया, राज्य वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी करावे लागलेले दरबारी राजकारण हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. 

बाजीरावांच्या वेगवान हालचाली,राघोबा दादांनी 'अटक' पर्यंत मारलेली मुसंडी, नानासाहेब पेशव्यांचे मुत्सद्दी राजकारण व पुण्याची नियोजनबद्ध वाढ, पानिपतचे युद्ध, माधवराव-निजाम यांच्यातली राक्षभुवनची लढाई, नारायणरावांची हत्या, पेशवाईतली भाऊबंदकी, इंदूर-उज्जैन-झांशी-बडोदे ही मराठ्यांची ठाणी (व पुढची संस्थाने) कशी विकसित झाली, निजमावरचा विजय आणि तरी त्याच्या पुन्हा पुन्हा चालणाऱ्या कुरापती, पेशवे आणि आंग्रे यांच्यातला वाद, होळकर-शिंदे-भोसले-दाभाडे-गायकवाड यांची कधी पेशव्यांच्या बाजूची तर कधी विरोधी भूमिका, पेशवाई राखण्यासाठी नाना फडणवीस आणि त्र्यंबकजी डेंगळे यांच्या सारख्या कारभाऱ्यांचं कर्तृत्व व चतुराई, इंग्रजांचा चंचूप्रवेश आणि धूर्ततेने हातपाय पसरणे, अँग्लो-मराठा वॉर,टिपू-निजाम-हैदर या कट्टर शत्रूंनी इंग्रजांविरोधात एकत्र येणं आणि कारण झालं की पुन्हा संघर्ष करणं.....बापरे काही महत्वाच्या गोष्टी लिहितानाही थकायला झालं . इतका मोठा पट आहे पुस्तकाचा.

एकापाठोपाठ एक लढाया, संघर्ष आणि वेगवान घडामोडी वाचताना आपण पुढेपुढे कसे जातो कळतच नाही. पुस्तक वाचताना कंटाळा येण्याचा संभवच नाही. तारखांची, व्यक्तींची, ठिकाणांची इतकी माहिती सतत मिळत राहते की आधी 'पुढे काय घडतंय' हे वाचूया आणि माहिती लक्षात ठेवायला पुन्हा एकदा वाचूया असं वाटतं.

काही गैरसमजांचं खंडनही पुस्तकात केलंय उदा. पेशव्यांनी छत्रपतींकडून राज्य जबरदस्ती बळकावलं,ध-चा-मा, नानांवरचा घाशीराम कोतवालाच्या वेळचा किटाळ, पानिपत चालू असताना स्वतःच्या मौजेसाठी नानासाहेबांनी लग्न केलं, दुसऱ्या बाजीरावांच्या चारित्र्याबद्दल किटाळ इ. 

लढायांमध्ये मराठी आणि शत्रूच्य फौजेच्या हालचाली दाखवणारे नकाशे आणि सर्व छत्रपती व पेशव्यांच्या राजमुद्रा पुस्तकात आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संदर्भ पुस्तकांची सूची दिली आहे. 

पण पेशव्यांच्या काळात राज्यकारभार कसा चालू होता, रायतेसाठी काय बरा-वाईट फरक पडला हे कळत नाही. उदा. शिवरायांनी राज्यव्यवहारकोश बनवला, शेतसारासारा पद्धतीत सुधारणा केल्या इ.; त्याप्रमाणे पेशवाईत काय घडले?
पेशवाईत ब्राह्मणेतरांवर अन्याय झाला असं का म्हटलं जातं ते खरं का खोटं या बद्दल फार उहापोह नाही. ते असणं आवश्यक होतं.

सारख्या चालणाऱ्या लढाया आणि एक मुलुख जिंकला तोच हरला तोच पुन्हा जिंकला , मराठी मुलुख निजामाने लुटला-जाळला म्हणून मराठ्यांनी त्याचा लुटला हे उल्लेख सतत पुस्तकात येतात. तेव्हाची राजकीय परिस्थिती बघता एक सर्व साधारण नागरिक म्हणून आपण किती शांततेत जगतो आहोत याची जाणीव होते. 

जहागिरीसाठी-आपल्या वसुलीच्या हक्कासाठी पेशवे विरुद्ध भट घराण्यातले इतर, पेशवे वि. इतर सरदार, एक मराठा सरदार वि. दुसरा सरदार अश्या लाढायांचाही अनेकदा उल्लेख आहे. यांना म्हणायचं मराठे पण खरंच छ. शिवाजी महाराजांचं स्वप्न या सरदारांना कळलं होतं का? खरंच स्वतःसाठी नाही तर रयतेसाठी राजा व्हायचंय, उपभोगशून्य स्वामी व्हायचंय हे उच्च मूल्य  थोड्याच पेशव्यांना आणि सरदारांना कळलं होतं हे बघून वाईट वाटतं. विशेष म्हणजे आजची परिस्थितीही बदललेली नाही हे विदारक चित्र जाणवतं.

पेशवे युद्धमोहिमा चालवण्यासाठी सावकारांकडून कर्ज घेत. त्याची त्यांना पातफेड करावी लागे. हा व्यवहार साधण्यासाठी, जास्त कर्ज मिळण्यासाठी पेशवे घराण्यातल्या मुलांची सावकारांच्या मुलींशी लग्ने लावली जात. गंमतच वाटली मला वाचून!! राजाला कर्ज?लोकांसाठीच लढायचं पण पण तेही लोकांकडून खाजगी कर्ज घेतल्यासारखं करून !! आज आपण संरक्षणासाठी सरकारला कर्ज देत नाही तर ती आपलीच जबाबदारी आहे असं समजून कर रूपाने सहभागी होतो. तेव्हा अशी पद्धत का नसेल? मग सुभ्यांकडून मिळणाऱ्या महसूलाचा, खंडणीचा काय कामात वापर व्हायचा? कळत नाही.

एकूणच पेशवाई पर्वाबद्दल समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणं महत्त्वाचं ठरतं. इथलं प्रत्येक ऐतिहासिक पात्र स्वतंत्र शोधग्रंथ लिहिण्याएवढं प्रभावशाली आहे. त्यांचा ३५० पानात वेध घेणं परिपूर्ण ठरणार नाहीच. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून त्यांच्याबद्दल आणखी सखोल वाचायची उत्सुकता वाटेल हे निश्चित.

लेखकाबद्दल 
कौस्तुभ कस्तुरे हे तरूण लेखक आहेत. प्रकाशकांच्या मनोगतात म्हटले आहे की कौस्तुभ कस्तुरे यांनी वयाच्या १८-१९ व्या वर्षीच लिहून पूर्ण केले होते.
लेखकाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे लेखक इतिहासकार किंवा इतिहास संशोधक नाही तर इतिहासाचा अभ्यासक आहे.
पण इतिहास वाचनाची, संशोधनाची आवड असल्यामुळेच इतक्या तरूण वयात हे लेखन होऊ शकले. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी १५-२० पुस्तकांची संदर्भसूची दिली आहे. त्यामुळे लेखक नवोदित तरूण असला तरी अभ्यास दांडगा आहे हे जाणवतं. 
पुस्तकाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आशिर्वादपर प्रस्तावना आहे. 


पुस्तक आवर्जून वाचा हे आता वेगळं सांगायला नको; तरी सांगतोच :) 



------------------------------------------------------------

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

लेखकासाठी काही अभिप्राय
1 पुस्तकातले नकाशे खूप काळपट असल्यामुळे नीट समजत नाहीत. त्या ऐवजी साध्या पांढऱ्या पृष्ठभागावर नकाशे हवे होते. सध्याच्या महाराष्ट्राच्या/देशाच्या सीमा दाखवून त्यात ठिकाणं दाखवायला पाहिजेत म्हणजे ते ठिकाण नक्की कुठे आहे ते कळलं असतं. माळवा, राजपुताना, गुजरात, निजामाचे राज्य इ.च्या सीमा दाखवल्या असत्या तर सुभ्यांची व्याप्ती सुद्धा नीट कळली असती.
प्रत्येक पेशव्याच्या प्रकरणाच्या शेवटी मराठा साम्राज्य केवढं होतं, किती भागाचा चौथाईचा हक्क होता हे दाखवणारा नकाशा हवा होता म्हणजे प्रगती चट्कन ध्यानात अली असती.

2 कुठला भाग सार्वभौम स्वराज्यात होता (ज्याच्यावर बादशहाचा/मुसलमानी सारदाराचा अधिकार नव्हता) आणि कुठला बादशहाच्या(पण खंडणी मराठे वसुली करत) हे नक्की कळत नाही. 

3 पेशवाईचा समाजावर परिणाम काय झाला; राजकाराभराच्या पद्धतीत काय बरेवाईट बदल झाले याचा उहापोह हवा होता.

4 पुस्तकात वारंवार चौथाई, खंडणी, अमुक अमुक लक्ष उत्पन्नाचा मुलुख, सावकारांकडून कर्ज इ महसूला संबंधी उल्लेख येतो. नक्की महसूल/कर कोणाकडून वसूल केला जायचा, कोण गोळा करायचं, राजाला तो कसा पोचायचा, खंडणी कोण द्यायचं हे समजत नाही. ही माहिती पुस्तकाचा मुख्य विषय नाही पण हे नीट समजलं तर त्या लढायांचं फलित समजायला मदत होईल. 

5 इंग्लिश पुस्तकांमध्ये असतो तसा शेवटी index पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती, ठिकाण, घटना, तत्व याचा संदर्भ कुठल्या कुठल्या पानावर आहे ते लगेच समजतं.

6 समज- गैरसमज प्रकरणात आधी आलेली माहितीच पुन्हा दिली आहे त्यापेक्षा नवीन मुद्द्यांचा समावेश करता आला असता.

7 दुसऱ्या बाजीरावांच्या चारित्र्याबद्दलच्या शंकांना उत्तर देताना आधी आलेल्या काही मुद्द्यांच्या विरुद्ध विधानं आली आहेत. उदा. मस्तानी च्या संदर्भात लिहिलं आहे की ब्राह्मणांमध्ये बहुभार्या पद्धत नाही. पण दु.बाजीरावांबद्दल म्हटलं आहे की राजांमध्ये बाहुभार्या पद्धत होती, त्यात गहजब करण्याचे काय कारण?दु. बाजीराव स्त्रीलंपट नव्हते असं म्हटलंय पण आधीच्या प्रकरणात त्यांच्या वाईट चालीचे उल्लेख आले आहेत. 



No comments:

Post a Comment

अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)

पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी पाने - २३९ प्रकाशन - मेहता पब...