फिरंगढंग (phirangdhang)




पुस्तक: फिरंगढंग (phirangdhang)
लेखक: डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde) 
भाषा: मराठी (Marathi)
पाने:२०५
ISBN : दिलेला नाही

लेखकाबद्दल :


लेखकाला त्याच्या व्यवसायानिमित्त भेटलेल्या आणि खास लक्षात राहिलेल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रणे या पुस्तकात आहेत. थोडक्यात हे पुस्तक म्हणजे परदेशी व्यक्ती-आणि-वल्ली आहे अशी एका वाक्यात या पुस्तकाची ओळख करून दिली तरी पुरेशी आहे. त्यांचा वल्लीपण काय आहे हे इथे सांगून उपयोग नाही, ती मजा वाचण्यात आहे. पण पुस्तकाच्या वेगळेपणाबद्दल जरा अजून सांगतो. पुस्तकातल्या व्यक्ती या वल्ली आहेतच पण त्यांच्या वल्लीपणामागे त्यांच्या देशातल्या संस्कृतीचाही वाटा आहे. तो आपल्याला बघायला मिळतो हे त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य. 

प्रवासवर्णनांतून परदेशातल्या जागांची माहिती होते, इतिहासातून प्रसिद्ध लोकांचा जीवनपट कळतो पण अशा पुस्तकांतून परदेशातल्या तुमच्या-आमच्या सारख्या साध्या अनामिक माणसांच्या मनात डोकावायची संधी मिळते. तिकडच्या लोकांची विचार करायची पद्धत कशी आहे ते जाणवते. लग्न, मुलं, व्यवसाय कसा करावा, पाहुण्याचं स्वागत कसं करावं, दुसऱ्याच्या खाजगी गोष्टीत किती बोलावं किंबहुना कुठल्या गोष्टी खाजगी समजाव्यात आणि कुठल्या नाही याची तंत्र किती वेगवेगळी आहेत हे वाचायला मजा येते. 

उदा. अमेरिकन लोकांचं आत्मकेंद्रित्व- "आय डोंट केअर"/"माइंड युर ओन बिझनेस" अ‍ॅटिट्यूड , इटालियन लोकांची डिझाईनबद्दल आत्मियता व सौंदर्यदृष्टी, इजिप्तच्या व्यक्तीला आपल्या जुन्या महान परंपरेचा असणारा अभिमान आणि आता आपल्याला अमेरिकेत तो मान मिळत नाही याची खंत, चिनी व्यक्तीच्या मनात भारत हा दरिद्री, घुसखोर, विश्वासघातकी देश आहे असा समज, श्रीलंकेतल्या व्यक्तीच्या अमेरिकन घरोब्यामुळे होणारी कुचंबणा इ.

लेखकाला या व्यक्ती व्यवसाया निमित्त भेटल्या. त्यातले काही त्याचे ग्राहक आहेत, काही पार्टनर, काही वरिष्ठ. त्यांची कंपनी चालवायची पद्धत, व्यावसायिक यशाची सूत्र, मॅनेजमेंटच्या पद्धती लेखकाला कशी उमगली; त्यांच्याशी धंदा करताना कडुगोड प्रसंग आले हे सगळं उद्बोधक आहे. आपल्यालाही हसतखेळत व्यवस्थापनाचे धडे देणारं आहे. 

लेखकाची शैली मिश्किल, खुसखुशीत आहे. गप्पांची मैफल रंगवाणारा एखादा मित्र आपल्याशी गप्पा मारतो आहे असंच वाटतं. काही उदाहरणं. 
इटालियन जिना ला त्यांच्या बायकोनं दिलेली भेटवस्तू आवडली तेव्हा ..  


कोट्यावढींची ऑर्डर देणारा जर्मन ग्राहक कोहेन चा फोन आला तेव्हा..


एका अमेरिकन व्यक्तीच्या बायकोला लेखक पहिल्यांदा भेटला. तेव्हा लेखक तिला "तुम्ही सेक्सी दिसता" असं म्हाणला नाही म्हणुन तो अमेरिकन रागावला तेव्हा ..

इतकं वाचून या परदेशी वल्लींशी कधी एकदा ओळख होत्ये असं तुम्हाला वाटायला लागलं तर नवल नाही. ओळख करून घ्याच.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

पाडस (paadas)





पुस्तक : पाडस (paadas)
मूळ पुस्तक : इयर्लिंग (The Yearling) 
मूळ लेखिका : मार्जोरी किनन रॉलिंग्स ( Marjorie Kinnan Rawlings )
अनुवादक : राम पटवर्धन (Ram Patwardhan ) 
पाने : ४१६
ISBN : 978-81-7486-805-3


अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक आर्थिक महासत्ता, मोठमोठाली शहरं, झगमगणाऱ्या गगनचुंबी इमारती, सुसाट वाहतूक करणारे लांब-रुंद रस्ते, सोयीसुविधांची रेलचेल इ. गोष्टी डोळ्यासमोर येतील. हीच अमेरिका काही शतकांपूर्वी मात्र अशी नव्हती. तिथे होते नुसते जंगल, नदीनाले, तळी, सरोवरे आणि स्थानिक आदिवासी. युरोपियन लोकांना अमेरिकेचा शोध लागल्यावर त्यांनी तिथे वस्ती करायला सुरुवात केली. ही सुरुवात होती जंगलातल्या वस्तीची. जंगलांमधली काही जागा झाडं तोडून राहण्यासाठी, शेतीसाठी लायक जागा बनावल्या गेल्या. निसर्ग आणि माणसाच्या परस्पर संबंधांचा खेळ या नव्या भूमीवर सुरू झाला. अशाच काळातल्या एका अमेरिकन कुटुंबाची गोष्ट आहे "पाडस". 

बॅक्स्टर कुटुंब - मध्यमवयीन पेनी बॅक्स्टर, त्याची बायको, आणि १२-१३ वर्षंचा ज्योडी - हे जंगलातल्या आपल्या एकाकी घरात राहत असतात. फार मैलांवर जंगलात दुसरे घर "फॉरेस्टर" कुटुंबाचे. कुठल्याही ग्रामीण भागात असावा तसा त्यांच्या रोजच्या वेळातला मोठ भाग व्यापलाय तो शेती आणि पशुपालन यांनी. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे शिकार. शिकार हा त्यांचा शौक, विरंगुळा नाही तर जगण्याचा आधार आहे. तुटपुंज्या शेती उत्पन्नातून जगणं कठीणच. रोजच्या खाण्यासाठी, भयंकर थंडीच्या दिवसातल्या बेगमीसाठी मांस आवश्यकच आहे त्यांना. त्यामुळे पेनी , फॉरेस्टर मंडळी सतत शिकारीच्या शोधात असतात. ससे, हरीण, अस्वल, खारी, लाव्हे पक्षी, सुसरी, इतर छोटे प्राणी असं काय काय ते मारतात आणि खातात. त्यांच्या लहान मोठ्या शिकारींचे रोचक किस्से आपल्याल वाचायला मिळतात. शिकार म्हणजे प्राण्याची मातीत उमटलेली पावलट निरखायची, शिकारी कुत्र्यांच्या सहय्याने त्या पावलटीवरून माग काढायचा, प्राणी योग्य ठिकाणी गाठून बंदुकीने त्याच्यावर गोळी झाडायची आणि गारद करायचा. हे वाचायला अगदी सोपं वाटत असलं तरी त्या निबिड अरण्यात एकट्या दुकट्याने अशी शिकार करणं म्हणजे काय दिव्य हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. 

अन्नाच्या शोधात माणूस प्राण्यांच्या मागे जातो, प्राण्यांना मारतो तरी जंगलात राहणाऱ्या माणसाला देखील या हिंस्त्र प्राण्यांकडून तितकाच धोका होता. बॅक्स्टर कुटुंबावर सुद्धा अस्वलाचा हल्ला होतो आणि गोठ्यातले प्राणी मारले जातात, लंडग्यांची धाड पडते, शेतीचं नुकसान प्राणी करतात; तर शिकारीला जाताना भयंकर विषारी साप चावल्याने पेनी मरणाच्या दाराशी पोचतो. कधी महाभयांकर वादळाचा सामना करावा लागतो. निसर्गाचे क्रूर आणि रौद्र रूप बघितलं की "दुरून डोंगर साजरे" ही म्हण आपल्याला मनोमन पटते. 

पुस्तकात आपल्याला बदलत्या रुतु चक्राप्रमाणे बदलाणरी मनोहारी रूपं  दिसतात तशी निसर्गातल्या प्रत्येक जिवाची भूक, त्यापायी सतत चाललेली वणवण, कोणीतरी आपल्याला खाईल ही भीती आणि जगायचं तर आपणही दुसऱ्याला खाल्लंच पाहिजे - हे क्रूर रूपही जाणवतं. "जीवो जीवस्य जीवनम्‌" !! ज्योडी म्हणतोही "एखादा प्राण्याचं रुपडं बघून त्यांची शिकार करावीशी वाटते. तोच प्राणी तडफडताना, रक्ताची धार लागलेला बघवत नाही, पण तो मेल्यावर त्याच्या मासांचे तुकडे केले की आता छान पदार्थ खायला मिळणार या भावनेने तोंडला पाणी सुटतं". हे छान पदार्थ कुठले हे पुस्तकात वाचताना अंगावर शहारेच येतात. अगदी भारतीय मांसाहारी मंडळी असतील तरी त्यांना हे पदार्थ ऐकून विचित्र वाटेल. एकदोन नावं सांगू ?  अस्वलाच्या चरबीत तळालेला डुकराच्या मासाचे तुकडे, कोवळ्या खारींच्या मासाचा पुलाव, सुसरीच्या शेपटीचे तुकडे !! काय सुटलं का तोंडाला पाणी. :) :)

तर अशा वातावरणात ज्योडी वाढत होता. वडीलांबरोबर शिकार, शेतीकाम शिकत होता. तरीही आपल्याला कोणी सवंगडी नाही याचं त्याला एकटेपण वाटतं आहे. मित्र नाही तर कुणितरी प्राणी आपण पाळावा, त्याच्याशी खेळावं, तो "खास माझा" असावा असं त्याला वाटत असतं. आणि एकेदिवशी त्याला एक हरणाचं पिल्लू-पाडस-सापडतं. आईबाबांना गळ घालून तो त्याला घरी आणतो. हरणाचं पिल्लूच ते; चपळ, अवखळ असणारच. त्याला घरात ठेवल्यावर त्याने इकडे तिकडे उद्या मारून उपद्व्याप केले नाहीत तरच नवल. साहजिकच ज्योडीची आईही रागावणार. ज्योडीचे वडील मात्र या प्रत्येक आगळिकितून त्याला सांभाळून घेतात. ज्योडी पाडसाची काळजी घेतो, लळा लावतो, आपल्याबरोबर शिकारीलाही घेऊन जातो. शिकारींच्या आणि इतर घडामोडींच्या बरोबर त्याचेही किस्से वाचायला मिळतात. 

पाडस हळूहळू मोठं होतं. त्याचा पाडा होतो. त्याच्या मोठेपणाची जाणीव घरी सगळ्यांना होऊ लागते. आणि अचानक गोष्ट असं काही वळण घेते ! आत्तापर्यंत शिकार कथा वाटणारी कादंबरी अचानक ज्योडीची भावकथा होते, पेनी-ज्योडी या बापलेकांमधल्या नाजुक संबंधांची कथा होते, मूल मोठं झाल्याची जाणीव झाल्यावर होणारा आनंद आणि हुरहुर लावणारं दुःख या सनातन भावना मांडणारी वैश्विक कथा होते. कादंबरीला वेगळ्याच उंचीवर नेते. लेखिकेनेही आपल्याला बेसावध गाठून आपली शिकार केली आहे असंच मला वाटलं. लेखिकेच्या प्रतिभेने मी थक्क झालो.

या कादंबरीला १९३९ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. समिक्षकांनी वाचकांनी नावाजली आहे. कादंबरीवर चित्रपट, टिव्ही मालिका, अ‍ॅनिमेशनही इंग्रजीत फार पूर्वीच आलं आहे. 

राम पटवर्धन यांनी मराठी भाषांतर तर इतकं सरस आणि सहज केलंय की जणू तेव्हा अमेरिकेत मराठीच बोलत असतील असं वाटावं.  मला पुस्तक पुन्हा एकदा वाचवं, आणि मूळ इंग्रजी पुस्तकही वाचवं असं वाटतंय.

अमेरिकन इतिहासातल्या सुरुवातीच्या पर्वातील रहिवाशांचा संघर्ष, शिकारीतला थरार आणि बालभावविश्वातले तरंग अनुभवण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

The day I stopped drinking milk (द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क)




पुस्तक : The day I stopped drinking milk  (द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क)
लेखिका :सुधा मूर्ती ( Sudha Murty )
भाषा : इंग्रजी (English)
पाने : २१२
ISBN : 978-0-143-41865-8


इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी इन्फोसिस फाउंडेशन मार्फत मोठं सामाजिक काम उभं केलं आहे. तसेच आपल्या कथा-कादंबऱ्यातून साहित्य विश्वातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा सुधा मुर्तींचा हा इंग्रजी भाषेतील कथासंग्रह आहे.

या कथा काल्पनिक नाहीत तर लेखिकेला भेटलेल्या व्यक्तींच्या आठवणी आहेत. पण या व्यक्ती कुणी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व नव्हेत तर साध्या साध्या , मध्यमवर्गीय किंवा गरीब व्यक्ती आहेत. यातल्या बऱ्याचशा गोष्टी साध्या माणसांनी केलेल्या परोपकाराच्या आहेत. जे स्वतः गरजू आहेत त्यांनी आपल्या पेक्षा जास्त गरजूंची मदत कशी केली याच्या गोष्टी उदा. जी स्वतः झोपडीत राहणाऱ्या गरीब गंगाने भिकाऱ्यांसाठी आंघोळीची व्यवस्था सुरू केली; चाळीतल्या गरीब मुलांनी समाजसेवा म्हणून गरीब-निराधार लोकांच्या अंत्यसंस्कारांसाठी मदत करू लागले इ. काही गोष्टी "आहे रे" वर्गातल्या व्यक्तींनीही देण्यातला आनंद कसा घेतला याच्याही आहेत. उदा. गावातल्या सधन शेतकरी असलेल्या परप्पांनी स्वतःच्या कष्टातून-पैशातून गावातल्या गरीबांसाठी भाजीमळा फुलवला; तर दुसऱ्या गोष्टीत गावच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून "गावासाठी तळं" बांधा असा आग्रह गावपाटलाच्या लेकीने धरला. 

या जशा "देणाऱ्याच्या" गोष्टी आहेत तशा "घेणाऱ्यांच्याही" आहेत. सुधाजींनी फाउंडेशन मार्फत अनेक निराधार, गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य केलं. एका रेल्वे प्रवासात सापडलेल्या चित्राला त्यांनी मदत केली आणि त्या मदतीचं चीज तिने केलं आणि विषेश म्हणजे जाणीव ठेवली. पण सगळेच अशी जाणीव ठेवत नाहीत याचे कटू अनुभवही सुधाजींना आले. कुणी केलेली मदत सरळ विसरून गेलं, कुणी "त्यात काय एवढं मोठं" असं म्हणणारे निघाले तर कोणी आपण मदत घेतली याची लाज वाटून भूतकाळ नाकारणरे निघाले. माणसांच्या या वेगवेगळ्या प्रवृत्तींचं दर्शन आपल्याला या गोष्टींतून दिसतं.

त्यांच्या सहवासात आलेली काही माणसं परिस्थितीनुसार कशी बदलली याच्या काही गोष्टी आहेत. त्यांना भेटलेल्या काहीं वल्लींशीही आपली ओळख त्यांनी काही करून दिली आहे. 

गेल्या २५ वर्षांत भारत खूप बदलला आहे. २५ वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या इमिग्रेशन ऑफिसरने भारताबद्दलच्या अज्ञानातून काय प्रश्न विचारलेले आणि आता प्रश्नांमध्ये किती बदल झालाय याची गंमतशीर आठवणही आहे. 

एकूणच या कथासंग्रहातल्या गोष्टी खूप "इंटरेस्टिंग" किंवा अगदी आगळ्यावेगळ्या आहेत असं नाहीत; पण कंटाळवाण्याही नाहीत. असे अनुभव आणि अश्या व्यक्ती आपल्यालाही भेटतात किंवा आजुबाजूला दिसतात. गप्पागोष्टींमध्ये आपणही एकमेकांना असे किस्से, अनुभव सांगतो. कथांचा बाज साधारण असाच आहे. काही गोष्टी उगीचच प्रकाशित झाल्या आहेत असं वाटतं. पण बहुतेक कथा एकदा वाचायला हरकत नाही.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

राशोमोन आणि जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha)

पुस्तक - राशोमोन आणि इतर जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha) लेखक - ऱ्युनोसुके अकुतागावा (Ryunosuke Akutagawa) अनुवाद - निसीम बेडेकर ...