पाडस (paadas)





पुस्तक : पाडस (paadas)
मूळ पुस्तक : इयर्लिंग (The Yearling) 
मूळ लेखिका : मार्जोरी किनन रॉलिंग्स ( Marjorie Kinnan Rawlings )
अनुवादक : राम पटवर्धन (Ram Patwardhan ) 
पाने : ४१६
ISBN : 978-81-7486-805-3


अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक आर्थिक महासत्ता, मोठमोठाली शहरं, झगमगणाऱ्या गगनचुंबी इमारती, सुसाट वाहतूक करणारे लांब-रुंद रस्ते, सोयीसुविधांची रेलचेल इ. गोष्टी डोळ्यासमोर येतील. हीच अमेरिका काही शतकांपूर्वी मात्र अशी नव्हती. तिथे होते नुसते जंगल, नदीनाले, तळी, सरोवरे आणि स्थानिक आदिवासी. युरोपियन लोकांना अमेरिकेचा शोध लागल्यावर त्यांनी तिथे वस्ती करायला सुरुवात केली. ही सुरुवात होती जंगलातल्या वस्तीची. जंगलांमधली काही जागा झाडं तोडून राहण्यासाठी, शेतीसाठी लायक जागा बनावल्या गेल्या. निसर्ग आणि माणसाच्या परस्पर संबंधांचा खेळ या नव्या भूमीवर सुरू झाला. अशाच काळातल्या एका अमेरिकन कुटुंबाची गोष्ट आहे "पाडस". 

बॅक्स्टर कुटुंब - मध्यमवयीन पेनी बॅक्स्टर, त्याची बायको, आणि १२-१३ वर्षंचा ज्योडी - हे जंगलातल्या आपल्या एकाकी घरात राहत असतात. फार मैलांवर जंगलात दुसरे घर "फॉरेस्टर" कुटुंबाचे. कुठल्याही ग्रामीण भागात असावा तसा त्यांच्या रोजच्या वेळातला मोठ भाग व्यापलाय तो शेती आणि पशुपालन यांनी. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे शिकार. शिकार हा त्यांचा शौक, विरंगुळा नाही तर जगण्याचा आधार आहे. तुटपुंज्या शेती उत्पन्नातून जगणं कठीणच. रोजच्या खाण्यासाठी, भयंकर थंडीच्या दिवसातल्या बेगमीसाठी मांस आवश्यकच आहे त्यांना. त्यामुळे पेनी , फॉरेस्टर मंडळी सतत शिकारीच्या शोधात असतात. ससे, हरीण, अस्वल, खारी, लाव्हे पक्षी, सुसरी, इतर छोटे प्राणी असं काय काय ते मारतात आणि खातात. त्यांच्या लहान मोठ्या शिकारींचे रोचक किस्से आपल्याल वाचायला मिळतात. शिकार म्हणजे प्राण्याची मातीत उमटलेली पावलट निरखायची, शिकारी कुत्र्यांच्या सहय्याने त्या पावलटीवरून माग काढायचा, प्राणी योग्य ठिकाणी गाठून बंदुकीने त्याच्यावर गोळी झाडायची आणि गारद करायचा. हे वाचायला अगदी सोपं वाटत असलं तरी त्या निबिड अरण्यात एकट्या दुकट्याने अशी शिकार करणं म्हणजे काय दिव्य हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. 

अन्नाच्या शोधात माणूस प्राण्यांच्या मागे जातो, प्राण्यांना मारतो तरी जंगलात राहणाऱ्या माणसाला देखील या हिंस्त्र प्राण्यांकडून तितकाच धोका होता. बॅक्स्टर कुटुंबावर सुद्धा अस्वलाचा हल्ला होतो आणि गोठ्यातले प्राणी मारले जातात, लंडग्यांची धाड पडते, शेतीचं नुकसान प्राणी करतात; तर शिकारीला जाताना भयंकर विषारी साप चावल्याने पेनी मरणाच्या दाराशी पोचतो. कधी महाभयांकर वादळाचा सामना करावा लागतो. निसर्गाचे क्रूर आणि रौद्र रूप बघितलं की "दुरून डोंगर साजरे" ही म्हण आपल्याला मनोमन पटते. 

पुस्तकात आपल्याला बदलत्या रुतु चक्राप्रमाणे बदलाणरी मनोहारी रूपं  दिसतात तशी निसर्गातल्या प्रत्येक जिवाची भूक, त्यापायी सतत चाललेली वणवण, कोणीतरी आपल्याला खाईल ही भीती आणि जगायचं तर आपणही दुसऱ्याला खाल्लंच पाहिजे - हे क्रूर रूपही जाणवतं. "जीवो जीवस्य जीवनम्‌" !! ज्योडी म्हणतोही "एखादा प्राण्याचं रुपडं बघून त्यांची शिकार करावीशी वाटते. तोच प्राणी तडफडताना, रक्ताची धार लागलेला बघवत नाही, पण तो मेल्यावर त्याच्या मासांचे तुकडे केले की आता छान पदार्थ खायला मिळणार या भावनेने तोंडला पाणी सुटतं". हे छान पदार्थ कुठले हे पुस्तकात वाचताना अंगावर शहारेच येतात. अगदी भारतीय मांसाहारी मंडळी असतील तरी त्यांना हे पदार्थ ऐकून विचित्र वाटेल. एकदोन नावं सांगू ?  अस्वलाच्या चरबीत तळालेला डुकराच्या मासाचे तुकडे, कोवळ्या खारींच्या मासाचा पुलाव, सुसरीच्या शेपटीचे तुकडे !! काय सुटलं का तोंडाला पाणी. :) :)

तर अशा वातावरणात ज्योडी वाढत होता. वडीलांबरोबर शिकार, शेतीकाम शिकत होता. तरीही आपल्याला कोणी सवंगडी नाही याचं त्याला एकटेपण वाटतं आहे. मित्र नाही तर कुणितरी प्राणी आपण पाळावा, त्याच्याशी खेळावं, तो "खास माझा" असावा असं त्याला वाटत असतं. आणि एकेदिवशी त्याला एक हरणाचं पिल्लू-पाडस-सापडतं. आईबाबांना गळ घालून तो त्याला घरी आणतो. हरणाचं पिल्लूच ते; चपळ, अवखळ असणारच. त्याला घरात ठेवल्यावर त्याने इकडे तिकडे उद्या मारून उपद्व्याप केले नाहीत तरच नवल. साहजिकच ज्योडीची आईही रागावणार. ज्योडीचे वडील मात्र या प्रत्येक आगळिकितून त्याला सांभाळून घेतात. ज्योडी पाडसाची काळजी घेतो, लळा लावतो, आपल्याबरोबर शिकारीलाही घेऊन जातो. शिकारींच्या आणि इतर घडामोडींच्या बरोबर त्याचेही किस्से वाचायला मिळतात. 

पाडस हळूहळू मोठं होतं. त्याचा पाडा होतो. त्याच्या मोठेपणाची जाणीव घरी सगळ्यांना होऊ लागते. आणि अचानक गोष्ट असं काही वळण घेते ! आत्तापर्यंत शिकार कथा वाटणारी कादंबरी अचानक ज्योडीची भावकथा होते, पेनी-ज्योडी या बापलेकांमधल्या नाजुक संबंधांची कथा होते, मूल मोठं झाल्याची जाणीव झाल्यावर होणारा आनंद आणि हुरहुर लावणारं दुःख या सनातन भावना मांडणारी वैश्विक कथा होते. कादंबरीला वेगळ्याच उंचीवर नेते. लेखिकेनेही आपल्याला बेसावध गाठून आपली शिकार केली आहे असंच मला वाटलं. लेखिकेच्या प्रतिभेने मी थक्क झालो.

या कादंबरीला १९३९ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. समिक्षकांनी वाचकांनी नावाजली आहे. कादंबरीवर चित्रपट, टिव्ही मालिका, अ‍ॅनिमेशनही इंग्रजीत फार पूर्वीच आलं आहे. 

राम पटवर्धन यांनी मराठी भाषांतर तर इतकं सरस आणि सहज केलंय की जणू तेव्हा अमेरिकेत मराठीच बोलत असतील असं वाटावं.  मला पुस्तक पुन्हा एकदा वाचवं, आणि मूळ इंग्रजी पुस्तकही वाचवं असं वाटतंय.

अमेरिकन इतिहासातल्या सुरुवातीच्या पर्वातील रहिवाशांचा संघर्ष, शिकारीतला थरार आणि बालभावविश्वातले तरंग अनुभवण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. ​एका अप्रतिम पुस्तकाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! साधारण पंधरा वर्षांपूर्वी मराठी अनुवाद वाचला होता. आता पुन्हा एकदा अनुवाद आणि मूळ इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचलेच पाहिजे असे वाटतंय.

    ReplyDelete

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...