रंगांधळा (Rangandhala)




पुस्तक : रंगांधळा (Rangandhala)
लेखक : रत्नाकर मतकरी (Ratnakar Matakari)
भाषा : मराठी (Marathi)

पाने : १९७
ISBN : 978-81-7766-949-7

रत्नाकर मतकरींच्या गूढ कथांचा हा संग्रह आहे. 



कथा संग्रहाबद्दल लिहिताना थोडी पंचाईत होते. प्रत्येक कथा वेगळी असते. त्यामुळे एक-दोन कथांबद्दल लिहिले म्हणजे सगळ्या पुस्तकाबद्दल लिहिले असे होत नाही. प्रत्येक कथेबद्दल लिहिणेही योग्य वाटत नाही; कारण ते लिहिताना कथा काय आहे हे अप्रत्यक्षपणे सांगितले जाते. म्हणजे भावी वाचकाचा रसभंग व्हायचा आणि कलाकृती विनापरवाना तशीच सादर केल्याचा औचित्यभंग. त्यात जर गूढकथा असतील तर कथा काय आहे हे सांगणं म्हणजे गूढ फोडल्यासारखंच व्हायचं. म्हणून थोडक्यात आणि मोघम लिहितो आहे. कथांचे कुठले प्रकार दिसले ते सांगतो. म्हणजे पुरेशी कल्पना येईल.

जुनाट, एकाकी भयाण वास्तू; त्या वाड्यात पूर्वी घडलेल्या घटना -मृत्यू, अपघात, खून इ. आणि त्यात राहायला आलेल्या माणसांना येणारे त्यांचे अनुभव हे तीन चार कथांमध्ये आहे. तरीही प्रत्येक कथा वेगळी आहे, पुढे काय होईल याची उत्कंठा ताणून धरणारी आहे.

मृत्यूनंतरचं जीवन आणि त्या जीवनाचा जिवंत माणसांशी येणारा संबंध हा काही कथांचा मूलाधार आहे. मेलेली माणसं भुतांच्या, अदृश्य रुपात आपलं प्रेम, आपलं वात्सल्य कसं मिळवतील याच्या या कथा आहेत. मरणोत्तर जीवनाच्या अज्ञाताबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. प्रत्येक जण त्याबद्दल काहीनाकाही कल्पना बाळगून असेल. मतकरींसारखा प्रतिभावान आपल्यासमोर ही प्रतिसृष्टी उभी करतो.

काही गूढ कथा मनाचे खेळ दाखवणाऱ्या आहेत. माणसांना वेडेवाकडे भास होणे, विचित्र स्वप्न पडणे, पुढच्या-मागच्या घटना दिसू लागणे किंवा पात्रांचे स्वभावाच्या विपरीत वागणं यातून रहस्यमयता निर्माण केली आहे. या वैचित्र्यामागचं कारण हे गोष्टीत गूढच राहतं, पण असं खरंच घडलं तर काय भयानक स्थिती होईल या भीतीने अंगावर शहारे येतात. 

काही कथा या गूढ-आणि-कलाटणी प्रकारच्या आहेत. कथेत काहीतरी विचित्र घडतं. त्या पात्राच्या डोक्यावर परिणाम झाला असेल किंवा काहीतरी भुताखेतचाच प्रकार असेल असा आपण समज करून घेतो. आणि अचानक लेखक असा काही चकवतो की वास्तवही किती रहस्यमय असू शकतं हे बघून आपण अचंबित होतो.

असे प्रकार मला गोष्टींचे दिसले.

गोष्टीतली भुतं किंवा आत्मेही सर्वसाधारण मानवी देह/आकृती असणारे आहेत. उलटे पाय किंवा घाणेरडे चेहरे असं 90 च्या दशकातल्या भयमालिकांसारखे वर्णन कुठेच नाही. गोष्टींमध्ये भयरस आहे बीभत्सरस नाही. जो भाग गूढ, अनाकलनीय आहे तो तसा आहे पण बाकीच्या तपशिलात अतर्क्य असं काही नाही. रजनीकांतपट किंवा हॉलिवूड सायफाय पट यांच्या "सारखं काहीही हं श्री" म्हणायला लावत नाहीत. त्यामुळे "डोकं बाजूला ठेवून वाचा" असं नाही उलट "डोकं कामाला लावून वाचा", डोक्याला थोडा ताण देऊन कल्पना करून तर बघा असं म्हणावसं वाटतं. गोष्टीत जे अनाकलनीय आहे ते तसंच ठेवलेले आहे, पात्रांच्या संवादातून त्याला वैज्ञानिक, धार्मिक, श्रद्धांचा कुठलाही आधार द्यायचा प्रयत्न केलेला नाही. अंधश्रद्धा पसरवणे किंवा त्यांचं खंडन करणे या दोन्ही टोकांपासून दूर निखळ चमत्कृतीचा आनंद देणाऱ्या कथा मला वाटल्या. ७७ साली पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. पण त्या वेळच्या काळाचे, तंत्रज्ञानाचे फार संदर्भ नसल्याने ४० वर्षांनीही कथा जुन्या वाटत नाहीत. 

तुम्हाला अशा कथा वाचायला आवडत असतील तर पुस्तक आवडेलच. आधी अशा कथा नसतील वाचल्या तरी वाचा, कदाचित नवी आवड निर्माण होईल. आणि भीती वाटत असेल तर... किती वेगवेगळ्या प्रकारे भीती वाटू शकते याचा अनुभव घ्या. मी पण शक्यतो भयकथा, गूढकथा वाचत नाही. न जाणो एखादी भीती डोक्यात बसली तर, तसले काही मनाचे खेळ सुरू झाले तर.. या भीतीनेच वाचत नव्हतो. पण सगळ्या प्रकारचं वाचलं पाहिजे या विचारातून पुस्तक हातात घेतलं. वाचायला मजा आली. थोडा वेळ डोक्यात ते विचार राहतात हे मात्र खरं.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- 
गूढकथा आवडत असतील तर, आधी वाचल्या नसतील तर : आवा ( आवर्जून वाचा )
भीती वाटत असेल तर : झेवा (झेपल्यास वाचा) जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...