AADHAR-A Biometric history of India's 12-Digit Revolution आधार-अ बायोमेट्रिक हिस्टरी ऑफ इंडिया’ज १२-डिजिट रिव्हॉल्युशन







पुस्तक : AADHAR-A Biometric history of India's 12-Digit Revolution 
(आधार-अ बायोमेट्रिक हिस्टरी ऑफ इंडिया’ज १२-डिजिट रिव्हॉल्युशन) 
लेखक : Shankar Aiyar ( शंकर अय्यर )
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २६६
ISBN : 978-93-86224-95-8
किंमत : रु. ३५०

आधार कार्ड हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. कितीतरी ठिकाणी आपण आधार क्रमांक जोडण्याच्या सरकारी आदेशाचे पालन करत आहोत. "आधार"आधारित योजनांतून अनुदानही आपल्याला मिळत असेल; उदा. स्वयंपाक गॅसवरील सबसिडी थेट खात्यात जमा होत असेल. यातूनच आधारबद्दल काही प्रश्नही मनात येत असतील. आधीपासून इतकी सगळी ओळखपत्रं - रेशन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र इ.- असताना हे अजून एक कार्ड कशाला ? हे सगळीकडे जोडून काय मिळणारे सरकारला ? आधार इतक्या ठिकाणी जोडल्यावर आपली सगळीच माहिती सरकारच्या ताब्यात जाते आहे. सरकार याचा वापर नागरिकांवर अनावश्यक "नजर" ठेवायला तर वापरणार नाही ना? यातून एखाद्या व्यक्तीचा खाजगीपणा काही राहणारच नाही का ? खरंच खाजगीपणाचा अधिकार आणि ही आधारची व्यवस्था यांचा कोणी कायदेशीर विचार केला आहे क? ही माहिती चुकीच्या हातात पडली तर काय होईल ? या आणि अशा "आधारित" प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर हे पुस्तक वाचायला हवं. 


 लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :


या पुस्तकात आधारची जन्मकहाणी आहे. वाजपेयींच्या काळात सर्व भारतीयांसाठीच्या एखाद्या ओळखपत्राची कल्पना पुढे आली होती. नंतरच्या यूपिए-१ सरकार मध्ये "केवायसी" साठीचे जागतिक निकष आणि अनुदान गरीबांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवण्यासाठी अशा कार्डची कल्पना आली. नंदन निलेकणींनी "बायोमेट्रिक" कार्डची कल्पना मांडली होती. निलेकणींची आणि राहुल गांधींची चांगली मैत्री आहे. त्यांनी निलेकणींचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा प्रयत्न केलेला. पण "बाहेरच्या" व्यक्तीला मंत्रीमंडळात घेण्याचे पक्षातील ज्येष्ठांना आवडले नाही म्हणून ते रद्द झालं. पुढे मनमोहनसिंगांनी बायोमेट्रिककार्डची संकल्पना स्वीकारली आणि कामाला सुरुवात झाली आणि त्यात निलेकणींची कल्पना स्वीकारली गेली. या कमी माहिती असलेल्या घडामोडी पुस्तकात वाचायला मिळतात.

निलेकणींची नेमणूक झाल्यावर या कार्डासंबंधित "शासकीय कामकाज" कसे चालले याची सविस्तर माहिती पुस्तकात आहे. यूपिए च्या स्टाईलप्रमाणे मंत्र्यांच्या वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या. सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे परस्परविरोधी दृष्टिकोन, "नियमांवर बोट" ठेवून चालण्याच्या आवश्यकतेमुळे UIDAI ची नक्की कामे काय, कार्यक्षेत्रं काय, बायोमेट्रिक माहिती कुठल्या खात्याने गोळा करायची, नक्की काय माहिती गोळा करायची, ती कोणी साठवायची; केंद्र आणि राज्य सरकारंमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप कसं होईल या सर्व विषयांवर कसं मंथन-मतभेद-आणि क्वचित सरकारी गोंधळ  झाला हे सगळं वाचणं रोचक ठरतं. पुस्तकात मंत्रिगटांच्या, निलेकणींच्या बैठका, त्यात झालेल्या चर्चा, विशेष विधानं इ. तारीखवार दिलं आहे. त्यामुळे आपल्याला इतक्या मोठ्या विषयावर सरकारी निर्णयप्रक्रिया कशी होते आणि ती का लांबते - सकारण/निष्कारण ते कळतं.  या एकूण प्रक्रियेच्या वेगवेगळ्या पैलूंवर स्वतंत्र प्रकरणात कालानुरूप मांडलं आहे. 




स्टार्टप सरकार मध्ये - निलेकणींसारखा खाजगी क्षेत्रातला माणूस आणि सरकारी अधिकारी यांनी एकत्र येऊन टीम कशी तयार केली. सनदी अधिकारी कसे शोधले आणि नेमले; समाजसेवी संस्था आणि वैयक्तीक भागिदार(वॉलेंटियर्स) हे सुद्धा कसे सहभागी झाले याची महिती आहे. त्यामुळे आधार सरकारी असूनही त्यात खाजगी क्षेत्रातल्या प्रमाणे काम होत होतं हे सविस्तर सांगितलं आहे. "आधार" हे नाव, त्याचे बोधचिन्ह, घोषवाक्य हे सगळं कसं ठरलं याचे किस्से आहेत. 
उदा. आधार हे नाव कसं ठरलं त्याचा किस्सा :
फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा


The know who factor : मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी यांनी आपली राजकीय ताकद वेळोवेळी वापरून आधारचं काम पुढे चालू ठेवण्यात कशी सक्रीय भूमिका बजवली ते आहे. अन्यथा प्रशासकीय अनास्था, राजकीय विरोध यात ते केव्हाच बारगळलं असतं. आधारच्या मागे वेळोवेळी कोण कसं उभं रहिलं त्याबद्दल या प्रकरणात आहे.

Push for the Pull : आधार नोंदणी सुरू झाली, लाखो लोकांना ते दिलं गेलं तरी नोंदणी सक्तीची नव्हती. तसंच त्याचा वपर नक्की कुठल्या कुठल्या ठिकाणी होणार हे नक्की नव्हतं. हळूहळू बँकांमध्ये पुरावा म्हणून, मनरेगा साठी पुरावा म्हणून त्याच्या वापराला मान्यता देण्यात आली. त्याबद्दल या प्रकरणात आहे.

पुढच्या दोन प्रकरणात यूआयडीएआय वर झालेले खटले, त्याची वैधानिकता, गोपनीयतेचा अधिकार, राजकीय विरोधकांनी(त्यावेळी भाजपा) उठवलेलं रान, माहितीची चोरी होत्येय असा झालेला आरोप, आधार नाही म्हणून लोकांना सुविधा मिळत नाहीत याची झालेली बोंबाबोंब हे सगळं आपल्यसमोर मांडलं आहे. त्यात दिलं आहे की मोदींनी आधार बाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते. तरीही गुजरात मध्ये आधार नोंदणीला पूर्ण सहकार्य केले होते. आधार नोंदणीच्य वेळी प्रत्येक राज्य जादाची माहिती (आधार प्लस) गोळा करू शकत होती त्याचाही वापर गुजरातने केला होता.  
विरोध फक्त विरोधकांचाच होता असं नाही. खुद्द कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षेतेखालच्या सल्लागार समितीनेही जोरदार विरोध केलेला. सरकारमधील आधारसमर्थकांना त्यांच्याही नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. 

Modification: २०१४ मध्ये निवडणुकींच्याआधी आधार चं काम जवळपास. भाजप सरकार आल्यावर तर आधार बंद होणं अटळ दिसत होतं. पण मोदी फॅक्टर इथे कामाला आला. निलेकणींनी जेटली आणि मोदींची भेट घेऊन आधारची पुन्हा महिती दिली. आधारची आवश्यकता पटल्यामुळे मोदींनी आधार बंद करणे दूरच; उलट त्याला नवसंजीवनी दिली. 
त्याभेटीबद्दल :

"थेट खात्यात अनुदान"यशस्वी करण्यासाठी जनधन योजना धडाक्यात राबवली त्यासाठी आधार महत्त्वाचे ठरले. स्वयंपकाचा गॅस सबसिडी आधाराधारीत खात्यात जमा करायला सुरुवात झाली. गेल्या चार वर्षांत आधारची व्याप्ती वाढली. संसदेत आधारला कायदेशीर स्थान देणारं विधेयक पारित करून घेण्यात आलं. मोदींनी लेखकाला मुलखतीत सांगितलं की "आधारला विरोधासाठी विरोध नव्हता; तर मुद्द्यांवर आधारित विरोध होता. केवळ मोदी या व्यक्तीचं ऐकायचं नाही म्हणून कॉंग्रेस या प्रश्नांची दखल घेत नव्हतं". यूपिए च्या काळातल्या वैधानिक आणि अंमलबजावणीतल्या कमतरतांची पूर्ती मोठ्याप्रमाणवर करण्यात आली. या सगळ्याची मोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बँक यांनाही घ्यावी लागली. 
हे प्रकरण लवकर संपवल्यासारखं वाटलं. मोदीपूर्व दहा वर्षांना दीडशे पानं आणि मोदींच्या काळातल्या चार वर्षांना फक्त चाळीस पानं. आधीच्या सरकारमध्ये झालेल्या चर्चा, मीटिंग्स, मतमतांतरे यांची जितक्या जवळून माहिती दिली आहे तसं इथे नाही. तुम्ही-आम्ही पेपरात ज्या बातम्या वाचल्या असतील त्याच पातळीवरची माहिती आहे. गेल्या चार वर्षांत आधारला जोर मिळलाय त्यामुळे या प्रकरणाकडून जास्त अपेक्षा होती.

उपसंहारात एकूणच अश्या प्रकारे कार्ड देणे, सरकारने माहिती गोळा करणे याचे फायदेतोटे, गोपनीयता आणि सामजिक सुरक्षिततेसाठी माहिती यांच्यातली रस्सीखेच, असे माहितीचे साठे किती सुरक्षित/असुरक्षित आहे इ. साधकबाधक मुद्दे मांडले आहेत.

एकूणच हे पुस्तक माहितीने भरलेलं आहे. शैली साधी, सरळ आहे. किचकट, अग्रलेखी इंग्रजी नाही. वार्षिक अहवलाप्रमाणे आकड्यांची जंत्री, तक्ते इ. नाही. असायला हवे होते-पण एखादे छायाचित्रही नाही. तरीही पुस्तक कंटाळवाणे नाही. या प्रचंड उद्योगासाठी पडद्यामागे घडत असलेल्या गोष्टी वाचणं रोचक आहे. राजकीय घडामोडी हे पुस्तकाचे मुख्य अंग आहे तरीही फार राजकीय शेरेबाजी न करता, समतोल भाषेत पुस्तक लिहिलं आहे.

"सवासो करोड" देशवासियांची माहिती गोळा करण्याचं शिवधनुष्य ही व्यवस्था पेलत आहे. त्याचे फायदेही कोट्यवधीच्या आकड्यात आहेत. "आधार" चे हे वर्तमान हा आपल्या डोळ्यासमोर घडत असलेला इतिहास आहे. या इतिहासात डोकावण्याचे, वर्तमानाचे चांगले भान देण्याचे काम हे पुस्तक करतंय. 


लेखकाबद्दल नेटवर शोधताना कळलं की नुकताच या पुस्तकाचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे "आधार भारताच्या १२ अंकी क्रांतीचा बायोमेट्रिक इतिहास" या नावाने


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

खाली डोकं वर पाय (khali doka var pay)


सुट्टी वार्षिकांक : खाली डोकं वर पाय (khali doka var pay) 
भाषा : मराठी (Marathi)
संपादक श्रीरंग गोडबोले (Shrirang Godbole)
पाने : २००
किंमत : १०० रु

मराठी मनोरंजन क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या झी मराठी वहिनीने या उन्हाळ्याच्या सुट्टीत नवीन प्रयोग केला आहे. लहान मुलांसाठी "खाली डोकं वर पाय" नावाचा सुट्टी वार्षिकांक काढला आहे. 

मासिक लहान मुलांसाठी असलं तरी मुलांना वाचनाची गोडी लागवी यासाठी कोणीतरी प्रयत्न करतंय म्हटल्यावर माझ्यासारख्या वाचनप्रेमीला बरंच वाटलं. झी मराठीचे सर्व उपक्रम अगदी आकर्षक, देखणे असतात. त्यात झी मराठी वरून या अंकाची सारखी जाहिरातही होत होती. त्यामुळे या आंकाबद्दल उत्सुकता वाटत होती. नातेवाईकांकडे हा अंक बघितल्यावर चाळायचा, वाचायचा आणि त्या बद्दल माझ्या परीक्षणवाचकांना या बद्दल सांगायचा मोह आवरला नाही. 

दोनशे पनी अंक गुळगुळीत कागदावर रंगित, आकर्षक छपाईचा आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाका



यात गोष्टींवर मुख्य भर आहे - विनोदी, वैज्ञानिक, बोधकथा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. परेश मोकाशी, चिन्मय मांडलेकर, संजय मोने इ. सुपरिचित व्यक्तींनी लिहिलेल्या गोष्टी हेत. राजाराणीच्या, प्राण्यांच्या, पौराणिक अशा बाळबोध गोष्टी न देता आजच्या जमान्यातल्या गोष्टी आहेत.

राजीव तांबे यांनी लिहिलेलं नाटुकलं आहे. 
दिलीप प्रभावळकरांनी त्यांचा अनुभ सांगितला आहे

एक चित्रकथा आहे. 


ओरिगामी करून निरनिराळ्या ५-६ वस्तू बनवायची सचित्र कृती आहे. सावल्यांचे खेळ कसे करायचे ते सचित्र दिलं आहे. 


"मी खाल्लेला मार" हे एकपानी ७ लेख आहेत ज्यात प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांना लहानपणी मार का खावा लागला याचा किस्सा सांगितला आहे. 


तीन-चार माहितीपर लेखही आहेत. उदा. मुंबईत रेल्वे वेळापत्रक आणि गाड्या वेळेवर धावतायत का नाही याची माहिती देणारं ऍप एम-इंडिकेटर प्रसिद्ध आहे. त्याचा निर्मात सचिन टेके याने या ऍप च्या निर्मितीबद्दल सांगितलं अहे. विमानांची निर्मिती करणारे अमोल यादव यांनी त्यांच्या उपक्रमाबद्दल लिहिलं आहे. राजीव तांब्यांचा अभयाराण्यावरचा लेख आहे. 
असे काही लेख मोठ्यांनाही वाचावेसे वाटतील. 



प्राथमिक शाळेतल्या मुलांना हा अंक वाचायला आवडेल. निरागस, निखळ मनोरंजन हल्ली मिळणं कमी झालं आहे त्यावर उपाय म्हणून असे बालमासिकांचे अंक निघणं, मुलांनी ते वाचणं आणि त्यासाठी पालकांनी ते त्यांच्या पर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. माझ्या अगदी लहानपणचीच्या चंपक, ठकठक, चांदोबा या गोष्टींच्या मासिकांची आणि किशोर, टॉनिक अश्या अजून प्रगल्भ मासिकांची आठवण झाली. ही नियतकालिकं अजूनही निघत असतीलच पण हल्ली कमी दिसतात. झी मराठी च्या या अंकामुळे बालमासिकांमध्ये आकर्षकपणा आणि जोरकस मार्केटिंग नव्याने रुजावे; मुलांमधली वाचनाची आवड वाढीला लागावी अशीच अपेक्षा. 



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- लहान मुलांनी जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

वाचत सुटलो त्याची गोष्ट..एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर (Vachat sutalo tyachi gosht)




पुस्तक : वाचत सुटलो त्याची गोष्ट..एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर (Vachat sutalo tyachi gosht)
लेखक : निरंजन घाटे (Niranjan Ghate) 
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २४५

ISBN : दिलेला नाही

निरंजन घाटे हे प्रसिद्ध विज्ञानकथा आणि वैज्ञानिक लेख लिहिणारे ज्येष्ठ लेखक आहेत. जितकी त्यांची पुस्तकांची संख्या भरपूर आहे (विकीपिडिया नुसार १८५ पेक्षा जास्त) तशीच त्यांची वाचन कारकीर्द ही भरपूर आहे. या पुस्तकातून त्यांनी आत्तापर्यंत वाचलेल्या, महत्त्वाच्या पुस्तकांची लेखकांची ओळख करून दिली आहे. त्यांचं वाचन अफाट आहे. त्यांना कुठला विषय वर्ज्य नाही, लेखक वर्ज्य नाही, लेखन प्रकार वर्ज्य नाही का पुस्तकप्रकार वर्ज्य नाही. कथा, कादंबऱ्या, लेखसंग्रह, चरित्रं हे नेहमीचे प्रकार आहेतच पण संशोधनांचे अहवाल,  शब्दकोश, विश्वकोश, विषयानुरूप जंत्र्या, असभ्य/चावट कथा-कविता त्यांनवरची वैज्ञानिक माहिती; भूत-पिशाच्च-प्लॅंचेट यांच्यावरची पुस्तके हे देखील आहे. म्हणूनच त्यांनी विषयानुरूप प्रकरणे ठेवली आहेत ती अशी


शब्दकोशांच्या प्रकरणातही इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे माहितीकोश असतात हे वाचून थक्क झालो मी. शब्दकोश म्हणजेफक्त डिक्शनरी किंवा विश्वकोश नाही तर विषयानुरुप माहिती मांडली जाते हे मलाही थोडं नवं होतं. उदा. ट्रकड्रायवरांच्या बोली भाषेचा कोश, लघुरूपांचा संग्रह, बायबल मध्ये येणाऱ्या शब्दांचा कोश, उच्चारांची डिक्शनरी इ.

झंगड पुस्तकं म्हणजे चाकोरी बाहेर जाऊन काही साहसं, सामजिक प्रयोग, सफरी करणऱ्या लोकांनी लिहिलेली, त्यांच्या अनुभवांवरची पुस्तकं

त्यांनी आपल्याला कितितरी पुस्तकांची नावं सांगितली आहेत, ओळख करून दिली आहे. पण ती पुस्तक परीक्षणे नाहीत आणि नुसती अकारविल्हे यादी नाही. तर त्या त्या विषयांवरच्या पुस्तकांवरच्या गप्पा आहेत.  वाचनाची सुरुवात कशी झाली, लहानपणी कुठली पुस्तकं वाचायला मिळाली हे सांगितलं आहे. प्रकरणाशी संबंधित एका पुस्तकाबद्दल सांगायला सुरुवात केली की त्या लेखकाच्या अजून पुस्तकांची नावं येतात. मग त्याचाच समकालीन लेखक कोण होता, त्याची पुस्तकं कुठली ते येतं. या लेखकाच्या विरोधी प्रतिपादन कोणी केलं ते येतं. त्याचवेळी मराठीत यातल्या कुठल्या पुस्तकाचं भाषांतर आलंय का, किंवा त्या पद्धतीने कुणी लिहिलंय का ते येतं. देशी विदेशी पुस्तकांच्या दर्जा बद्दल चर्चा होते. काही विषय परदेशात का आणि कसे लिहिले गेले यांची ते पार्श्वभूमी समजावून सांगतात. गप्पांच्या ओघात त्या त्या लेखकाचे किस्से येतात. ही पुस्तकं घाटे यांना कशी मिळाली याचे किस्से येतात. उदा. काही पुस्तकं त्यांना रद्दीच्या दुकानात किंवा जुन्या पुस्तकांच्या दुकानात योगायोगाने मिळाली. जुनी पुस्तकवाले पण अभ्यासू वाचकांना कशी पुस्तकं आठवणीने मिळवून देत याचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. विदेशातून भारतात रद्दी म्हणून, जहाजात तळात भरायचं वजन म्हणून पुस्तकं वापरली जायची आणि बंदरावर रद्दीचा लिलाव व्हायचा त्या सिस्टीम ची माहिती सांगितली आहे. त्यांच्या लिखाणाचे, संपादनाचे ही काही अनुभव सांगितले आहेत. नमुन्यादाखल ही एक दोन पानं वाचा म्हणजे कल्पना येईल.

(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)



असं माहितीने भरलेलं पुस्तक आहे हे. पुस्तक वाचताना एक मनात आलं की इतकं अफाट वाचन, विषयांच्या खोलात जाऊन अभ्यास करण्याची चिकाटी, विषयाचा सर्व बाजूने पूर्वग्रह न ठेवता अभ्यास करण्याची बौद्धिक तयारी,वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाची आवड आणि स्वतःच्या भाषेत ते मांडायची प्रतिभा हे एखाद्या संशोधकाला आवश्यक गुण घाटे यांच्यात ठासून भरले असून स्वतः ख्यातकीर्त शास्त्रज्ञ, संशोधक झाले नाहीत. इतरांच्या अभ्यासाचा, लेखनाचा अभ्यास करून त्यावर आधारित स्वतःचं लेखन त्यांनी केलं, इंग्रजीतली माहिती मराठी लोकांसमोर आणली. हे काम खूपच महत्त्वाचं आहे हे नि:संशय. पण अजून मोठं अद्वितीय काम हातून होऊ शकलं असतं. अशी कल्पना करा की एखाद्या व्यक्तीला उपजत सुंदर गळा आहे. त्याने रियाझ करून फक्त आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करून मोठं गायक होण्याच्या ऐवजी इतरांच्या मैफिली ऐकत, मोठ्या गायकापासून हौशी कालाकारपर्यन्त नुसती गाणीच ऐकत सुटावं, त्यांची वर्णनं करावीत, ते कसे गायले हे आपल्या आवाजात ऐकून दाखवावं. आणि एका महान कलाकाराला समाज मुकावा. तसंच काहीसं वाटलं हे.

या पुस्तकात इंग्रजी साहित्यावर जास्त भर आहे. त्याचं कारण त्यांनी प्रस्तावनेत स्पष्ट केलं आहे की त्यांचं इंग्रजी वाचन जास्त झालं. आणि मराठी माणसाला मराठी लेखक-पुस्तकांची ओळख असेलच. ती पुन्हा करून देण्यापेक्षा अल्पपरिचित इंग्रजी साहित्यावर भर ठेवणं अधिक उपयुक्त होईल.

छायाचित्रे नाहियेत.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांच्या वाचनाच्या वेगाबद्दल लोक त्यांना विचारतात असा उल्लेख आहे. तो उपजतच आहे असं त्यांचं म्हणणं पडलंय. हा वेग वाढवण्यासाठी काहीच करता येणार नाही का हे ते सांगत नाहीत. इतकं वाचायला वेळ कसा मिळाला किंवा कसा काढला हा प्रश्न कुणालाही पडेल. त्याचं उत्तर पुस्तकात नाही.  

पुस्तकात इतके लेखक आणि पुस्तकांची नावं येतात की मी काही पानांनंतर ते लक्षात ठेवायचा नाद सोडून दिला. त्यावरून मला असा प्रश्न पडला की त्यांनी इतकं वाचलं त्यांच्या त्यापैकी किती लक्षात राहिलं असेल? जास्त लक्षात रहावं यासाठी त्यांनी काय केलं? सगळं लक्षात राहणं आवश्यक आहे का की पुस्तकाचा गाभा कळला की पुरे झालं? इतकी पुस्तकं, मासिकं संग्रही असताना योग्य वेळी संदर्भ सापडावा यासाठी त्यांनी काही विशेश क्लृप्त्या लढवल्या असतील का? पण या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात नाहीत. त्यांनी वाचन मार्गदर्शनावरही एक पुस्तक लिहायला हवं.

ज्याला खूप वाचनाची आवड आहे, जो स्वतःला पुस्तकी कीडा समजतो त्याला आपल्यातला एक "बकासूरकीडा" भेटल्याचा आनंद होईल आणि वाचण्याचं प्रमाण अजून वाढेल. ज्यांना वाचनाची फार आवड नाही त्यांना हे वाचता वाचता घेरी येईल आणि तो पुस्तक बाजूला ठेवेल. जो थोडंफार वाचतो त्याला आपल्या अल्पवाचनाबद्दल न्यूनगंड वाटेल किंवा पुस्तकांच्या नवीन दालनांची ओळख झाल्याने वाचायचा हुरूप वाढेल. 

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- पुस्तकी किड्यांनी आवा ( आवर्जून वाचा )
                                       थोडंफार वाचणाऱ्यांनी जवा ( जमल्यास वाचा )
                                       वाचन न करणाऱ्यांनी नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

वेगळं जग (Vegale Jag)






पुस्तक : वेगळं जग  (Vegale Jag)
लेखक : गंगाधर गाडगीळ (Gangadhar Gadgil)
भाषा : मराठी
पाने : ३५० (छोट्या वहीच्या आकाराची)
ISBN : 978-81-7185-481-3


मराठी नवकथेचे अध्वर्यू गंगाधर गाडगीळ यांचा हा कथा संग्रह आहे. 




कथा छान आहेत, साध्या सोप्या सरळ आहेत. १९५०-६० च्या आसपासचा मध्यमवर्गीय, पांढरपेशा, सवर्ण समाज ही त्यांची पार्श्वभूमी आहे. आशा समाजातली तरुण मुले-मुली आणि मध्यमवयीन स्त्री-पुरुष त्यांच्या कथेचे नायक नायिका आहेत. त्यातल्या काही लक्षात राहणाऱ्या कथांचा गोषवारा.

  • वेगळं जग -  कारकुनांमधला एक काहितरी घोटाळा करतो आणि त्याने घोटाळा केल्याचा राग, त्याला हे जमलं आणि पैसे मिळवले याची असूया आणि त्याच्या धीटपणाचं कौतुक आशा मिश्र भावनांचं चित्रण


  • दामले आणि पळसुले - आपल्या सुरक्षित कोशात राहणाऱ्या पापभिरू मित्र. आपलं चाकोरीबद्ध आयुष्य बदलण्याची शक्यतेने सुद्धा घाबरण्याची त्यांची गोष्ट


  • दारिद्र्याचे मनोरथ - उच्च शिक्षण घेऊन काहीतरी करून दाखवायची इच्छा पण त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता नसणाऱ्या एका गृहस्थाची गोष्ट


  • पंख गाळलेले फुलपाखरू - परिपूर्ण संसार असणाऱ्या मध्यमवयीन अनसुयाबाई आणि त्यांचे शेजारी नावापरिणित जोडपं. संसार करून झालेल्या बाई आणि संसार सुरू करणारे ते. या दोन टोकांचा एकमेकांशी संपर्क आल्यावर भावनांची झालेली देवाणघेवाण.


  • विळखा - सगळे आपल्याशी फटकून वागतायत असा समज झालेल्या एक प्रौढ शिक्षिका. त्या लोकांशी जवळीक साधायचा कसा प्रयत्न करतायत आणि सगळं नीट बोलूनही नाती जुळता जुळता कशी तुटतात याची गोष्ट


  • काळजी - एका लहानग्याच्या निरागासतेचं सुंदर वर्णन आणि त्या निरागासतेला अजून हवाहवासा करणारा कथांत.


  • झिंगलेली माणसं - साहित्यप्रांतात रमणारे, पण व्यावहारिक जगात नापास ठरणाऱ्या लेखकाची गोष्ट


  • "अर्धवट प्राणी", "भाबडा" - बावळट म्हणून एखाद्याला मदत करावी आणि त्या बावळटपणामागे धूर्तपणा आहे की काय अशी शंका यावी असे प्रसंग घडावेत तर काय होईल याची गोष्ट.


  • तिसऱ्या वर्गाचा डबा - रेल्वेच्या डब्यात घडणाऱ्या नित्य घटनांचं शब्दचित्र


  • गुलाबी संध्याकाळ - प्रेमात पडलेल्या जोडप्याच्या मनाचे हेलकावे. दुसऱ्याचं आपल्यावर प्रेम आहे का नाही आणि आपण तरी याच्यावर प्रेम करतो का नाही; आणि करतो ते का करतो. प्रसंगा प्रसंगात हे चाचपून बघणाऱ्या जोडप्याची गोष्ट


  • वृष्टी - एखाद्या लेखकाला, कवीला कल्पना सुचते, अर्धवट सुचते तेव्हा कशी तगमग होते, त्या पात्रांशी कसा संवाद होतो, झटापट होते त्याची कथा.


  • पराजित -  नवीन लेखकाला आपलं लिखाण छापून यावं, लोकांनी वाचावं त्याची चर्चा व्हावी अशी इच्छा एकीकडे आणि त्याच्या विरुद्ध वर्तन जगाचं. वाईट लिहिणाऱ्यांना प्रसिद्धी मिळते आणि आपल्याला लोक डावलतात ही त्याची भावना. नवीन लेखकाची घालमेल दाखवणारी गोष्ट.
"पंख गाळलेले फुलपाखरू" मधील एक प्रसंग :





कथांमध्ये घडणारे प्रसंग अगदी रोजच्या आयुष्यात घडणारे आहेत. त्यात खूप विनोदी, भावव्याकुळ करणारं, कल्पनारंजक, गूढ असं नाही. पण तरीही कथा कंटाळवाण्या अजिबात नाहीत. पुस्तक पन्नास वर्षांपूर्वीचं असलं तरी भाषा आजही तितकी जुनाट वाटत नाही. पल्लेदार वाक्य, उपदेशाचे डोस पाजायची हौस असं काही दिसत नाही. थोडे अपवाद सोडले तर खूप अलंकारिक प्रसंगवर्णनं नाहीयेत. सरळ पण प्रभावी भाषेत प्रसंग उभे केले आहेत आणि त्या साध्या साध्या प्रसंगातून माणसांच्या मनात डोकावयाचा प्रयत्न केला आहे. 

वाचायला मजा येतेपुढची पुढची कथा वाचत रहाविशी वाटतेएकाच बैठकीत बर्‍याच कथा वाचून होतील




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------


प्रदीप लोखंडे, पुणे-१३ (Pradeep Lokhande, Pune-13)




पुस्तक : प्रदीप लोखंडे, पुणे-१३  (Pradeep Lokhande, Pune-13) 
लेखक : सुमेध वडावाला(रिसबूड) (Sumedh Wadawala (Risbud)
भाषा : मराठी
पाने : २३० 
ISBN : 978-93-80572-27-7

किराणा दुकाना बाहेर जाहिरात करण्यासाठी उभे असणरी मुलंमुली आपण बघितली असतील. बाजारात नवीन आलेली लोणची, सॉस, पास्ता, टूथपेस्ट, साबणपावडर इ. ची जाहिरात ते करत असतात. नमुना चाखायला देतात. आपला अभिप्राय टिपून घेतात. एखादं छोटं सॅम्पल घरी न्यायला देतात. काही वेळा असे सेल्समन दारावर येऊन जाहिरात करतात. आपली माहिती विचारून फॉर्म भरून घेतात. त्या त्या कंपनीचे टीशर्ट, टोपी असं बऱ्याच वेळा त्यांनी घातलेलं असतं. मार्केटिंगचे हे तंत्र कॉर्पोरेट कंपन्या अनेक वर्षांपासून शहरी भागात राबवत आहेत. पण मार्केटिंगच्या या प्रकाराला अक्षरशः खेडोपाडी नेलं आहे प्रदीप लोखंडे यांनी. आज ते मार्केटिंग क्षेत्रातले मान्यवर झाले आहेत. खेडेगावातला एक साधा मुलगा ते मार्केटिंग गुरू हा प्रवास सांगणारं हे चरित्र आहे.

चरित्र-आत्मचरित्र असं मिश्रण आहे. कारण पुस्तकात पूर्ण भाषा प्रथम पुरुषी आहे. तरी प्रत्यक्ष लेखन सुमेध वडावाला यांनी प्रदीपजींशी बोलून केलेलं आहे. प्रदीप लोखंडे यांच्या बालपणातील आठवणी, बेताची आर्थिक परिस्थिती, अभ्यासात फार यश न मिळणं तरीही शिक्षण चालू ठेवण्याची धडपड आणि आपल्याला "विकायला" जमतंय ची होणारी जाणीव कशी निर्माण झाली हे पुस्तकात दिलं आहे. सुरुवातीला त्यांनी नेहमीचा एजन्सी घेऊन विक्री व्यवस्था बघण्याचा व्यवसाय केला त्यात त्यांचा जम चांगलाच बसला. पण काही वर्षांनी बसलेली घडी कंटाळवाणी वाटू लागली. त्यातच त्यांनी "येणारा काळ ग्रामीण भागाचा आहे, व्यवसाय वृद्धी च्या संधी तिथे जास्त आहेत" हे एका अर्थतज्ञाचं मत ऐकलं. त्यांना ते पटलं, भावलं आणि त्यानेच आयुष्याला कलाटणी दिली. त्यातून जन्म झाला "रूरल मार्केटंग"चा.

ग्रामीण भागाची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी हजारो गावांमधल्या सरपंच, मुख्याध्यापक, पोस्टमास्तर आणि इतरांना पत्रं पाठवली. गावचे बाजार कधी भरतात, गावची आर्थिक परिस्थिती कशी याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. गावात पत्र पोचल्यावर अनोळखी अशा प्रदीप लोखंडे नावाच्या माणासाने केलेल्या चौकशीला कसा कसा प्रतिसाद मिळाला हे वाचण्यासारखं आहे. पुढे त्यांनी गावोगावी जाऊन लोकांशी थेट संवाद साधत माहिती घेतली. या भ्रमंतीत आलेले अनुभव, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेबदलची त्यांची काय मतं बनली, गावातला माणूस वस्तू विकत घेताना काय विचार करतो, दुकानदार काय विचार करतो याचे आडाखे कसे बांधले हे ही खूप रंजक आहे. काही भीषण सामाजिक वास्तव तर काही मनोरंजक.  उदा.

(फोटो मोठे करण्यासाठी क्लिक करून झूम करा)




दोन तीन वर्षं स्वतःचा पैसा, वेळ, श्रम चिकाटीने घालवून जो माहितीचा डेटाबेस त्यांनी जमवला तो पुढच्या मोठमोठ्या कामाची भक्कम पायाभरणी ठरला. त्यातून त्यांना टाटा टी चे मार्केटिंग करायची संधी मिळाली. गावोगावी जाण्यासाठी योग्य तरूण मुलं-मुली जमवणे, त्यांना कामासाठी तयार करणे, गावांचा क्रम ठरवणे, गावोगावी जाऊन स्टॉल मांडून चहा सँपल देणे या अनेक बाबी त्यांनी हाताळल्या. याच्या पाठोपाठ त्यांना मोठमोठ्या कंपन्या बोलावू लागल्या.  यातल्या कॅंपेनची सविस्तर माहिती पुस्तकात आहे. हे सगळं वाचणं म्हणजे मला अपरिचित असणाऱ्या मार्केटिंग क्षेत्राची झकास ओळख होती.


खेडोपाडीची महिती, दांडगा जनसंपर्क याच्याकडे राजकारणी लोकांचं लक्षही गेलं. त्यातून मार्केटिंगच्या जोडीला गावोगावी सर्वेक्षण करण्याची कामं त्यांना मिळू लागली. सुरेश कलमाडी, शरद पवार, राज ठाकरे, प्रमोद महाजन यांच्या साठी केलेली निवडणूकपूर्व सर्वेक्षणांबद्दल त्यांनी लिहिलं आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शासकीय आणि खाजगी पद्धतीने चालणऱ्या कृष्णा खोरे प्रकल्पाच्या कर्ज रोख्यांच्या विक्रीच्या मार्केटिंगचं काम त्यांनी केलं. या व्यक्तींच्या भेटी कशा झाल्या, त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं दिसलं, कुशल नियोजन कसं करत  हे त्यांनी पुस्तकात दिलं आहे. त्या निमित्ताने प्रसिद्ध राजकारण्यांना जवळून भेटण्याचा आपल्यालाही योग मिळतो. उदा. शरद पवारांबरोबरच्या एका भेटीबद्दल



पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात गावांसाठी जे समाजोपयोगी उप्करम राबवत आहेत त्याचा प्रवास सांगितला आहे. गावोगावी संगणक पोचवण्यासाठी मदतीचे हात व गरजू शाळा यांची सांगड त्यांनी घातली. वाचनसंस्कृती वाढावई म्हणून शाळेत वाचनालयांचा उपक्रम सुरू केला. चमकदार कामगिरी करूनही कौतुक आणि प्रसिद्धी पासून वंचित राहणऱ्या ग्रामीण नायकांची ओळख करून देण्याचाही उपक्रम ते राबवत आहेत. 

पुस्तकाचं मुखपृष्ठ वेगळंच आहे. सहसा मलपृष्ठावर आढळणारा मजकूर थेट मुखपृष्ठावर देऊन ते लक्षवेधी केलं आहे. फोटो आहेत पण जरा कमी आहेत. विशेषतः कॅम्पेनच्या वेळचे, मोठ्यांबरोबरचे, पुरस्कार घेतानाचे फोटो अजून हवे होते. मजकुराबरोबर त्याच्या अनुषंगाने फोटो द्यायला हवे होते. 

एकूण हे पुस्तक म्हणजे एका जिद्दी (चांगल्या अर्थी) माणसाची यशोगाथा, ग्रामीण भागाचा मनात डोकावण्याची संधी, मार्केटिंगच्या दुनियेची सफर आणि ग्रामीण भागात दडलेल्या संधींची झलक असा बहुपेडी वैचारिक दस्त ऐवज आहे. नक्की वाचा.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...