प्रदीप लोखंडे, पुणे-१३ (Pradeep Lokhande, Pune-13)




पुस्तक : प्रदीप लोखंडे, पुणे-१३  (Pradeep Lokhande, Pune-13) 
लेखक : सुमेध वडावाला(रिसबूड) (Sumedh Wadawala (Risbud)
भाषा : मराठी
पाने : २३० 
ISBN : 978-93-80572-27-7

किराणा दुकाना बाहेर जाहिरात करण्यासाठी उभे असणरी मुलंमुली आपण बघितली असतील. बाजारात नवीन आलेली लोणची, सॉस, पास्ता, टूथपेस्ट, साबणपावडर इ. ची जाहिरात ते करत असतात. नमुना चाखायला देतात. आपला अभिप्राय टिपून घेतात. एखादं छोटं सॅम्पल घरी न्यायला देतात. काही वेळा असे सेल्समन दारावर येऊन जाहिरात करतात. आपली माहिती विचारून फॉर्म भरून घेतात. त्या त्या कंपनीचे टीशर्ट, टोपी असं बऱ्याच वेळा त्यांनी घातलेलं असतं. मार्केटिंगचे हे तंत्र कॉर्पोरेट कंपन्या अनेक वर्षांपासून शहरी भागात राबवत आहेत. पण मार्केटिंगच्या या प्रकाराला अक्षरशः खेडोपाडी नेलं आहे प्रदीप लोखंडे यांनी. आज ते मार्केटिंग क्षेत्रातले मान्यवर झाले आहेत. खेडेगावातला एक साधा मुलगा ते मार्केटिंग गुरू हा प्रवास सांगणारं हे चरित्र आहे.

चरित्र-आत्मचरित्र असं मिश्रण आहे. कारण पुस्तकात पूर्ण भाषा प्रथम पुरुषी आहे. तरी प्रत्यक्ष लेखन सुमेध वडावाला यांनी प्रदीपजींशी बोलून केलेलं आहे. प्रदीप लोखंडे यांच्या बालपणातील आठवणी, बेताची आर्थिक परिस्थिती, अभ्यासात फार यश न मिळणं तरीही शिक्षण चालू ठेवण्याची धडपड आणि आपल्याला "विकायला" जमतंय ची होणारी जाणीव कशी निर्माण झाली हे पुस्तकात दिलं आहे. सुरुवातीला त्यांनी नेहमीचा एजन्सी घेऊन विक्री व्यवस्था बघण्याचा व्यवसाय केला त्यात त्यांचा जम चांगलाच बसला. पण काही वर्षांनी बसलेली घडी कंटाळवाणी वाटू लागली. त्यातच त्यांनी "येणारा काळ ग्रामीण भागाचा आहे, व्यवसाय वृद्धी च्या संधी तिथे जास्त आहेत" हे एका अर्थतज्ञाचं मत ऐकलं. त्यांना ते पटलं, भावलं आणि त्यानेच आयुष्याला कलाटणी दिली. त्यातून जन्म झाला "रूरल मार्केटंग"चा.

ग्रामीण भागाची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी हजारो गावांमधल्या सरपंच, मुख्याध्यापक, पोस्टमास्तर आणि इतरांना पत्रं पाठवली. गावचे बाजार कधी भरतात, गावची आर्थिक परिस्थिती कशी याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. गावात पत्र पोचल्यावर अनोळखी अशा प्रदीप लोखंडे नावाच्या माणासाने केलेल्या चौकशीला कसा कसा प्रतिसाद मिळाला हे वाचण्यासारखं आहे. पुढे त्यांनी गावोगावी जाऊन लोकांशी थेट संवाद साधत माहिती घेतली. या भ्रमंतीत आलेले अनुभव, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेबदलची त्यांची काय मतं बनली, गावातला माणूस वस्तू विकत घेताना काय विचार करतो, दुकानदार काय विचार करतो याचे आडाखे कसे बांधले हे ही खूप रंजक आहे. काही भीषण सामाजिक वास्तव तर काही मनोरंजक.  उदा.

(फोटो मोठे करण्यासाठी क्लिक करून झूम करा)




दोन तीन वर्षं स्वतःचा पैसा, वेळ, श्रम चिकाटीने घालवून जो माहितीचा डेटाबेस त्यांनी जमवला तो पुढच्या मोठमोठ्या कामाची भक्कम पायाभरणी ठरला. त्यातून त्यांना टाटा टी चे मार्केटिंग करायची संधी मिळाली. गावोगावी जाण्यासाठी योग्य तरूण मुलं-मुली जमवणे, त्यांना कामासाठी तयार करणे, गावांचा क्रम ठरवणे, गावोगावी जाऊन स्टॉल मांडून चहा सँपल देणे या अनेक बाबी त्यांनी हाताळल्या. याच्या पाठोपाठ त्यांना मोठमोठ्या कंपन्या बोलावू लागल्या.  यातल्या कॅंपेनची सविस्तर माहिती पुस्तकात आहे. हे सगळं वाचणं म्हणजे मला अपरिचित असणाऱ्या मार्केटिंग क्षेत्राची झकास ओळख होती.


खेडोपाडीची महिती, दांडगा जनसंपर्क याच्याकडे राजकारणी लोकांचं लक्षही गेलं. त्यातून मार्केटिंगच्या जोडीला गावोगावी सर्वेक्षण करण्याची कामं त्यांना मिळू लागली. सुरेश कलमाडी, शरद पवार, राज ठाकरे, प्रमोद महाजन यांच्या साठी केलेली निवडणूकपूर्व सर्वेक्षणांबद्दल त्यांनी लिहिलं आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शासकीय आणि खाजगी पद्धतीने चालणऱ्या कृष्णा खोरे प्रकल्पाच्या कर्ज रोख्यांच्या विक्रीच्या मार्केटिंगचं काम त्यांनी केलं. या व्यक्तींच्या भेटी कशा झाल्या, त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं दिसलं, कुशल नियोजन कसं करत  हे त्यांनी पुस्तकात दिलं आहे. त्या निमित्ताने प्रसिद्ध राजकारण्यांना जवळून भेटण्याचा आपल्यालाही योग मिळतो. उदा. शरद पवारांबरोबरच्या एका भेटीबद्दल



पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात गावांसाठी जे समाजोपयोगी उप्करम राबवत आहेत त्याचा प्रवास सांगितला आहे. गावोगावी संगणक पोचवण्यासाठी मदतीचे हात व गरजू शाळा यांची सांगड त्यांनी घातली. वाचनसंस्कृती वाढावई म्हणून शाळेत वाचनालयांचा उपक्रम सुरू केला. चमकदार कामगिरी करूनही कौतुक आणि प्रसिद्धी पासून वंचित राहणऱ्या ग्रामीण नायकांची ओळख करून देण्याचाही उपक्रम ते राबवत आहेत. 

पुस्तकाचं मुखपृष्ठ वेगळंच आहे. सहसा मलपृष्ठावर आढळणारा मजकूर थेट मुखपृष्ठावर देऊन ते लक्षवेधी केलं आहे. फोटो आहेत पण जरा कमी आहेत. विशेषतः कॅम्पेनच्या वेळचे, मोठ्यांबरोबरचे, पुरस्कार घेतानाचे फोटो अजून हवे होते. मजकुराबरोबर त्याच्या अनुषंगाने फोटो द्यायला हवे होते. 

एकूण हे पुस्तक म्हणजे एका जिद्दी (चांगल्या अर्थी) माणसाची यशोगाथा, ग्रामीण भागाचा मनात डोकावण्याची संधी, मार्केटिंगच्या दुनियेची सफर आणि ग्रामीण भागात दडलेल्या संधींची झलक असा बहुपेडी वैचारिक दस्त ऐवज आहे. नक्की वाचा.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...