भारताची अणुगाथा (Bharatachi Anugatha)




पुस्तक : भारताची अणुगाथा  (Bharatachi Anugatha)
लेखक : आल्हाद आपटे (Alhad Apte)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३६०
ISBN : 978-93-86118-46-2

"भारताची अणुगाथा" हे पुस्तक १९४० च्या दशकापासून २०१४-१५ पर्यंत अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारतने केलेली प्रगती आणि प्रवास आपल्यासमोर मांडते. डॉ. होमी भाभा यांनी आपलं विदेशातलं वास्तव्य सोडून भारतात परत यायचा निर्णय घेतला. स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या, विकासाची नवी स्वप्ने पाहणाऱ्या राष्ट्राला स्वयंपूर्ण होण्यासाठी अणुऊर्जा कशी आवश्यक ठरेल या दीर्घदृष्टीतून भारतात संशोधन सुरू केले. त्याला संस्थात्मक स्वरूप दिले. टाटा उद्योगाची मोलाची आर्थिक मदत त्याला मिळाली. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही भाभांच्या या उपक्रमाला राजकीय आणि शासकीय पाठबळ दिलं. आणि मुहूर्तमेढ रोवली गेली भारताच्या अणुगाथेची.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती:


अणुऊर्जा आपल्या कोणाला नवीन नाही. तुर्भे येथलं बीएआरसी, तारापूर येथील अणुविद्युत केंद्र, पोखरण येथे दोनदा झालेल्या अणुचाचण्या, महायुद्धातला अणुबँबचा वापर, चेर्नोबिल दुर्घटना याबद्दल आपल्याला थोडीथोडी तरी माहिती असते. या सगळ्याविषयी सविस्तर माहिती आणि ज्ञान देणारं हे पुस्तक आहे. या प्रगतीच्या आणि प्रवासाच्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती व इतिहास यात आहे.

पहिला पैलू संस्थात्मक इतिहासाचा. भारतात भाभांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कशी सुरू झाली, तिने कुठलं संशोधन हाती घेतलं, त्याचे परिणाम कसे दिसले, भाभांनंतरच्या विक्रम साराभाई, राजा रामण्णा, चिदंबरम्‌ या तितक्याच महान प्रमुखांनी या संस्थांचां जाळं कसं विस्तारलं, सरकारी संस्था असूनही लालफीतशाही टाळत संशोधन कसं केलं गेलं इ. सविस्तर इतिहास यात आहे.



दुसरा पैलू राजकीय. अणुऊर्जेचा शोध लागल्यापासून त्याचा चांगल्यासाठी वापर होण्याआधी त्याचा विध्वंसक वापर अणुबॉंबच्या रूपात झाला. अणुऊर्जेचं हे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन या विषयीचं संषोधन, आणि लागणारा कच्चा माल (युरेनियम इ.) आपल्याच ताब्यात कसे राहतील याचा प्रयत्न अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया सारखे मोठे देश करत आले आहेत. त्यातून "युनो"मधले करारमदार, आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झाल्या. चीन ने आणुचाचण्याकरून भारतावर कसा दबाव आणला, इंदिराजींच्या काळात आपल्याला अणुचाचण्या का कराव्या लागल्या, त्यांनंतर भारतावर घातलेले निर्बंध, त्याचा भारतीय संशोधनावर झालेला बरा-वाईट परिणाम, भारताने घेतलेल्या भूमिका हा सगळा भू-राजकीय पटही लेखकाने सविस्तर मांडला आहे. त्यातून या विषयाचं गांभीर्य आणि पडद्यामागे घडणाऱ्या हालचाली आपल्याला समजतात.

तिसरा पैलू प्रत्यक्ष विज्ञानाचा. एखाद्या विज्ञानाच्या पुस्तकात शोभेल अशा प्रकारे आकृत्या, तक्ते यांच्यांसह लेखकाने अणुऊर्जेचं विज्ञान समजावून सांगितलं आहे. अणू, रेणू, प्रोटॉन, समस्थानिकं, अणूविखंडन, अणूसंमीलन अशा तांत्रिक संज्ञाही मराठीत बऱ्याच सोप्या पद्धतीने समजावून दिल्या आहेत. त्यामुळेच भाभांची तीन टप्प्यांची योजना, भारतात मिळणाऱ्या थोरियमला अनुकूल संशोधन हा पुढचा भाग नीट समजायला मदत होते.


पाचवा पैलू हा या तंत्रज्ञानाच्या इतर वापरांचा आहे. अणुविखंडन, किरणोत्सार यांचा वापर वैद्यकीय सामुग्री निर्जंतुक करणे, खत निर्मिती, पाण्याच्या साठ्यांचा शोध, अन्नप्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार अशा नानाविध प्रकारे होतो. यांची थोडक्यात माहिती आणि त्यासाठी कशाकशा सरकारी व औद्योगिक संस्था उभ्या राहत गेल्या याचीही माहिती आहे. 

सहावा पैलू - पूरक पैलू -म्हणजे छायाचित्रे, सूची. व्यक्तींची, इमारतींची, प्रसंगांची जुनी कृष्ण्धवल आणि रंगीत छायचित्रेही बरीच आहेत. लेखक स्वतः तंत्रज्ञान क्षेत्रातला असल्याने, मराठी पुस्तकांत सहसा न आढळणरी पुस्तकाच्या शेवती विषयसूची, नामसूची, स्थळसूची आहे. अर्थात ते नाव, विषय किंवा स्थळ याचा उल्लेख पुस्तकात कुठल्या पानावर झाला आहे याची यादी. जेणेकरून हवा असलेला संदर्भ पुस्तकातून चटकन शोधता येतो.



अनुक्रमणिका :





नुसता गोषवारा देताना सुद्धा मी इतकं लिहिलं आहे त्यावरून या साडे तीनशे पानी पुस्तकातलं प्रत्येक पान कसं माहिती व ज्ञानाने ओतप्रोत भरलेलं आहे याची कल्पना आली असेलच. त्यामुळे पुस्तक एका बैठकीत संपवून टाकण्यासारखं नाही तर थोडं थोडं वाचत, ज्ञान पचवत पुढे पुढे जायला लावणारं आहे. लेखक स्वतः या क्षेत्रात ४० वर्षं काम करत होते त्यामुळे यातल्या ज्ञानाला सत्यतेबरोबरच आपुलकीची ही जोड आहे.

प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचून आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीची आणि तिला मिळणाऱ्या फळांची माहिती घेत त्यांना कृतज्ञतेचा प्रणाम केलाच पाहिजे.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi - Shodh asvastha kallolacha!)

पुस्तक - शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi - Shodh asvastha kallolacha!)  लेखिका - वसुंधरा काशीकर भागवत (Vasundhara Kashikar - B...