एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती (End of the world Bhatakanti)




पुस्तक : एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती (End of the world Bhatakanti)
लेखक : जयप्रकाश प्रधान (Jaiprakash Pradhan)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १६६
ISBN : 978-93-86493-60-6 

शाळा-कॉलेजमध्ये भूगोलाचा अभ्यास करताना उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, आर्क्टिक महासागर, अंटार्क्टिका इत्यादींबद्दल आपण वाचलेलं असतं; जुजबी माहिती आपल्याला असते. हे दोन्ही प्रदेश खूपच कमी तापमानाचे बर्फाने वेढलेले आणि जायला खडतर हे आपल्याला माहिती असते. त्यामुळे सहसा मराठी प्रवासवर्णनांमध्ये यांच्याबद्दलची माहिती येत नाही. धाडसी गिर्यारोहकांप्रमाणेच फक्त धाडसी नाविक, संशोधन करणारे शास्त्रज्ञ  किंवातिथे ड्युटीवर असलेले सैनिक इत्यादी लोकच तिथे असते जात असतील असं मला वाटत होतं. परंतु जयप्रकाश प्रधान यांच्यासारख्या सैनिक, शास्त्रज्ञ आणि नाविक नसणाऱ्या माणसानेसुद्धा या सफरी केल्या आहेत. आणि तेही आधी सगळे सहा खंड बघून झाल्यावर ! पर्यटनातल्या या अवलियाची पुस्तकातली ओळख वाचा. :
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)


लेखक आणि त्यांची पत्नी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त देश असं न करता, बरेच दिवस प्रदेशात घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना हे दोन्हीही भूप्रदेश आणि जलद प्रदेश अतिशय सविस्तर बघता आले तितक्यात सविस्तरपणे त्यांनी हे प्रवास वर्णन लिहिले आहे. अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यावर कुठल्या प्रदेशांचे वर्णन आहे हे लक्षात येईल.


दक्षिण अमेरिकेतल्या टोकाला शेवटच्या नांदत्या शहरापासून त्यांची सफर सुरू झाली. मोठ्या क्रूज मधून महासागर ओलांडत ते अंटर्क्टिकाला पोहोचले. हिमनग, हिमनद्या यांचं स्तिमित करणारं दर्शन झालं. सील मासे, पेंग्विन, व्हेल सारखी जीवसृष्टीही त्यांनी जवळून बघितली. परतीच्या प्रवासात फॉकलंड आयलंड्स, पेंटागोनिया या दक्षिण अमेरिकेतल्या भागांना भेट दिली.

दक्षिण अमेरिकेच्या टोकापासून निघून अंटर्क्टिकालापर्यंत पोहोचण्याचा महासागरातल्या मार्ग म्हणजे ड्रेक पॅसेज. चाळीस-पन्नास मीटरच्या उसळणाऱ्या लाटांमुळे प्रवास खराच जोखमीचा. जहाजाला काही झाले नाही तरी सतत हेलकावे खाणाऱ्या जहाजामुळे "बोट लागली" म्हणून हैराण करणारा असा प्रवास. त्याच्याबद्दल लेखक काय लिहितो ते वाचा.

अंटार्क्टिकावर उतरल्यावर त्यांनी तयार केले त्याच्या अनुभवाबद्दल.

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात उत्तर ध्रुवा जवळचा भाग आर्क्टिक सर्कल म्हणून ओळखला जातो. यात अमेरिका, कॅनडा, नॉर्वे, रशिया इत्यादींचा भाग येतो. लेखकआणि त्यांच्या पत्नीने वेगवेगळ्या सफरींदरम्यान वेगवेगळ्या वेळी या ठिकाणांना भेट दिली. या भेटींचे वर्णनही पुस्तकात आहे. या प्रदेशात उन्हाळ्यात सूर्य मावळत नाही किंवा मावळला तरी जेमतेम तास दीड तासात पुन्हा उगवतो. म्हणून मध्यरात्री सुद्धा तिथे सूर्यदर्शन होते. याउलट हिवाळ्यात बावीस-तेवीस तास अंधारच असतो. अशावेळी आकाशात रंगीत प्रकाशाची उधळण होण्याचा नैसर्गिक चमत्कार घडतो. तो पण त्यांनी बघितला. स्मारके, संग्रहालये यांना भेट देऊन ग्रीनलांड, आईसलँड मधल्या स्थानिक लोकांची संस्कृती, इतिहास यांच्याबद्दलही माहिती घेतली. जागोजागी तिथल्या खानावळी, घरगुती हॉटेलात जेऊन खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद घेतला. अर्थात सगळे मांसाहारी प्रकार आणि मद्याचे प्रकार.
त्यांच्या ग्रीनलॅंड भेटीची एक झलक


अशाप्रकारे या पुस्तकात "एन्ड ऑफ द वर्ल्ड" म्हणजे पृथ्वी ची शेवटची दोन टोकं इथला निसर्ग, प्राणी, पक्षी, खानपान, भौगोलिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या पैलूंची माहिती दिलेली आहे. भावी पर्यटकांच्या दृष्टीने हे प्रवास कधी करावेत, कुठले व्हिसा लागतात हे खास नमूद केलं आहे. काय तयारी करावी लागते, काय टाळलं पाहिजे काय केले पाहिजे हे सुद्धा वर्णनाच्या ओघात सांगितले आहे.

हे प्रदेश अद्भुत आणि वेगळेच आहेतआपल्या नेहमीच्या अनुभवातून नाही त्यामुळे प्रवास वर्णन वाचताना प्रत्येक वेळीच तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहील असं नाही त्यामुळे पुस्तकात रंगीत फोटोही दिलेले आहेत.


आता इंटरनेमुळे हे प्रदेश घरबसल्या बघण्याची सोय आहे त्यामुळे पुस्तक वाचताना जेव्हा एखाद्या ठिकाणाचा किंवा वैशिष्ट्यपूर्ण अनुभवाचा उल्लेख झाला तेव्हा नेटवरून त्याचे फोटो, व्हिडिओ बघितले. पुस्तक संपवायला त्यामुळे वेळ लागला तरी त्यातून हे पुस्तक समजून घ्यायला आणि या भागाविषयी उत्सुकता वाढवल्या अजूनच मदत झाली. 

तुम्हालाही हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. The book "End of World" will be "Start of curiosity" for you !


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

स्ट्रगलर्स (Strugglers)



पुस्तक : स्ट्रगलर्स (Strugglers)
लेखिका : मुक्ता चैतन्य (Mukta Chaitanya)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १०४
ISBN : 81-7766-701-7


एखाद्या कार्यक्रमाला "सेलिब्रिटी" येणार आहे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं चित्र येत असेल तर ते सिनेनटनट्या, मालिकांमधले कलाकार यांचं. दिसायला देखणे, उंची वेशभूषा, आकर्षक व्यक्तिमत्त्व, भरपूर पैसा, सतत प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या ह्या व्यक्ती. असं आयुष्य आपल्याही वाट्याला यावं ही इच्छा न वाटणारा विरळाच. त्यामुळेच दिसायला बरे, अभिनयाची आवड असणारे, आपलंही नशीब फळफळेल अशी आशा असणारे हजारो-लाखो तरूण तरुणी सिनेमा-दूरदर्शनच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी धडपडत असतात. या क्षेत्रात शिरकाव करण्याची धडपड, उमेदवारीचा कालखंड या प्रक्रियेला कलाक्षेत्रात विशेष नाव आहे ते म्हणजे -स्ट्रगल. आणि असे धडपडे म्हणजे "स्ट्रगलर्स" ! स्ट्रगलर्सच्या दुनियेत, त्यांच्या अनुभवविश्वात डोकावून बघणारं हे पुस्तक आहे. 

मराठी-हिंदी मधल्या सिने-मलिका विश्वात प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी आशेचं ठिकाण म्हणजे - मायानगरी मुंबई. मुंबईत "स्ट्रगल" करायला आलेल्या "स्ट्रगलर्स"शी प्रत्यक्ष संवाद साधत लेखिकेने हे अनुभव गोळा केले आहेत. या धडपडीच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल पुढील प्रकरणांत लिहिलं आहे.




या वेडाची सुरुवात बहुतेक वेळा महाविद्यालयात असताना तिथल्या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेऊन होते. मग तिथलं वातावरण कसं असतं; नवखा मुलगा सिनियर्सशी जुळवून घेत कसा चंचूप्रवेश करतो; सुरुवातीला काम नाही मिळालं तरी, "सतरंज्या उचलणे", "बॅक्स्टेज सांभाळणे" हे कसं रोमॅंटीक वाटतं वगैरे वातावरण असतं हे लेखिकेने दाखवलं आहे. या नव्या नवलाईच्या दिवसांबद्दल लेखिका लिहिते :




मुंबईत यायचा निर्णय मनाशी पक्का झाला की पहिला प्रश्न येतो तो आईबाबांच्या परवानगीचा. प्रत्येक धडपड्याच्या घरची आर्थिक, वैचारिक परिस्थिती वेगळी. "या धंद्यात पडायचं असेल तर तुझे आणि आमचे संबंध तुटले" इथपासून "मला माझ्या मुलीने या क्षेत्रात नाव कमवून दाखवलंच पाहिजे. त्यासाठी काहीही करायला तयार" अशा या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळ्या प्रतिक्रिया दिसतात. निरनिराळ्या अनुभवांचं कोलाज लेखिकेनं शब्दांतून उभं केलं आहे.

मुंबईत आल्यावर खरी सुरुवात होते. थोडेफार पैसे असतील तर ठीक नाहीतर तुटपुंज्या पैशात लहानशा खोल्यांत खूप लोकांबरोबर एकत्र राहावं लागतं. फोटोंचा पोर्टफोलिओ देणं, ऑडिशन्स देणं, स्क्रीन टेस्ट देणं, पुन्हापुन्हा जाऊन दिग्दर्शक, निर्मात्यांना भेटणं हे प्रचंड मानसिक ताणाचं आहे. काम मिळत नसल्याची निराशा, कामाबद्दल दुसऱ्या कोणाला कळलं तर आपलं काम जाईल ही असुरक्षितता, "घरी काय तोंड दाखवणार" अशी स्वतःची लाज वाटायला लावणारी परिस्थिती. इथेही जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. कोणी हे सहन करून झगडत राहतं, कोणी हे नैराश्य दारू-सिगरेट च्या नशेत विसरायचा प्रयत्न करतं तर कोणी दुभंगून, हार खाऊन या दुनियेला राम राम करतं. अनेक स्ट्रगलर्सना भेटून लेखिकेने त्याच्या मनात उठणाऱ्या वादळांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे. चंदेरी दुनियेतल्या ताऱ्यांमागचा हा अंधार समजून घेण्यासारखा आहे.
मुंबईत अगदी अडचणीत रहण्याबद्दल :


सिने-मालिका हे अभिनयाचं क्षेत्र आहे त्याहून जास्त ते दिसण्याचं आहे. आकर्षक दिसण्याचं आणि आकर्षक अंग दाखवण्याचं क्षेत्र आहे. आणि फक्त पडद्यावरच नव्हे तर पडद्यावर झळकण्याची संधी मिळवण्यासाठी सुद्धा शरीरच वापरलं जातं - शब्दशः. काम मिळवून देण्याच्या मोबदल्यात काहीवेळा निर्माते, दिग्दर्शक, मधल्या व्यक्ती आडून आडून शरीरसुखाच्या मागण्या करतात. मुलींकडे आणि मुलांकडेही. ही असली मागणी धुडकवायची का स्वीकारायची हा पुन्हा प्रत्येकाच्या स्वभावाचा, परिस्थितीचा प्रश्न. कोणी नईलाजाने स्वीकारतं, कोणी बेफिकिरीने तर कोणी नफ्यातोट्याचं गणित करून. या एकाच पैलूकडे स्ट्रगलर्स मुली कशा वेगवेगळ्या नजरेने बघतात हे पुस्तकात दिलं आहे.

फक्त कलाकारच नाही तर दिग्दर्शनातले धडपडे, वेशभूषा करणारे, "घोस्ट" म्हणून काम करणारे, लेखक यांनाही स्ट्रगल असतोच. त्याबद्दलही एका प्रकरणात थोडी थोडी कल्पना आहे. सहाय्यक दिग्दर्शनाबद्दलचं पुस्तकातलं एक पान.




स्ट्रगलर्सना पुन्हा पुन्हा खेटे घालून काम मिळवावं लागतं तसंच निर्माते, दिग्दर्शक, मॅनेजर यांनाही सतत या स्ट्रगलर्सच्या माऱ्याला तोंड द्यावं लागतं. अनुभव, दिसणं, अभिनय या बाबतीत हाताशी काही नसणाऱ्यांनाही भेटावं, बोलावं लागतं. त्यांचीही चिडचिड आणि दुर्लक्ष होणंही स्वभाविक आहे. स्ट्रगलची दुसरी बाजू समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न पुस्तकात अहे. 

पुस्तक २००६ साली प्रकाशित झाले असले तरी १३ वर्षांत परिस्थिती खूप वेगळी झाली असेल असे नाही. आभासी सुंदर जगामागची करूप आणि जीवघेणी स्पर्धा आपल्याला भिडते. या क्षेत्रातील होतकरू तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. त्यातून त्यांना या क्षेत्रातल्या आव्हानांची कल्पना येईल, मानसिक तयारी करता येईल. बाकिच्यांनाही हे पुस्तक वाचायला, ही सगळी प्रक्रिया समजून घ्यायला आवडेल. "मी गेलो/ले असतो/ते सिनेमात तर मोठा/ठी स्टार झाले असते" असं कोणाला वाटत असेल तर हे सगळं आपल्याला झेपलं असतं का हा प्रश्न त्या/तिच्या मनात नक्की उभा राहील.

लेखिकेची शैली आवडली. पण मुद्द्यांची आणि निष्कर्षांची पुनरावृत्ती फार वेळा झाली आहे. ती टाळायला हवी होती. सध्याच्या नामवंत कलाकारंच्या "स्ट्रगलिंग पिरेड" बद्दल नावानिशी लिहिलं असतं तर पुस्तकाला अजून वजन प्राप्त झालं असतं. अभिनयेतर कामांच्या स्ट्रगल बद्दल आणि निर्माते-दिग्दर्शक इ.च्या बाजूबद्दल सुद्धा अजून लिहिलं असतं तर जास्त परिपूर्ण वाटलं असतं. पुस्तकात एकूणच नकारात्मक किंवा त्रासदायक पैलूंवरच भर आहे. पण या धडपडीत येणारे सुखद अनुभव, पहिले काम मिळाल्याचा आनंद, अनपेक्षित जुळून आलेल्या गोष्टी, कष्टाचं झालेलं चीज हे सगळं येत नाही. ते सुद्धा असायला हवं होतं.

हे पुस्तक वाचताना सुधीर फडके यांच्या आत्मचरित्राची- "जगाच्या पाठीवरची"- आठवण झाली. (http://kaushiklele-bookreview.blogspot.com/2018/08/jagachya-pathivar.html) त्यांचे अनुभव तर याहून जीवघेणे. तरीही स्वतःचे स्वत्त्व आणि तत्त्व टिकवत त्यांनी संघर्ष केला. मुंबईच्या स्ट्रगल ला कंटाळालेल्या स्ट्रगलर्सनी हे पुस्तक वाचलं तर आपण त्यामानाने बरेच सुखात आहोत असं त्यांना वाटेल. आणि परिस्थितीशी झगडण्याची त्यांची उमेद वाढेल.






----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

अंधारवारी (Andharvari)



पुस्तक : अंधारवारी (Andharvari)
लेखक : हृषिकेश गुप्ते (Hrushikesh Gupte)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : 160
ISBN : दिलेला नाही 
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


हृषिकेश गुप्ते लिखित भयकथांचा हा संग्रह आहे. अनामिक, अनाकलनीय, पाशवी शक्ती माणसांना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करतात आणि त्यांना कधी खून तर कधी आत्महत्या करायला कश्या प्रवृत्त करतात हा कथांचा मुख्य विषय आहे. त्यामुळे एखाद्या पात्राला भास होऊ लागतात, चित्रविचित्र स्वप्ने पडतात किंवा अघोरी शक्ती अचानक त्याचा ताबा घेतात. वाचताना अंगावरून काटा भीतीचा सर्रकन जातो.  गोष्टींत घडणारे प्रसंग अगदी रोजच्या आयुष्यातले असल्यामुळे नकळत पात्रांच्या जागी आपण स्वतःला ठेवतो. भीती अजूनच गडद होते आणि वाचायला मजा येते. 

फक्त एकाच गोष्टीत "भुताचा जन्म" स्पष्ट केला आहे. म्हणजे पडद्यामागून कोणीतरी सूत्र हलवत असतो पण ते कारण न समजल्यामुळे गावकऱ्यांना तो सगळा भुताटकीचा प्रकार वाटतो. बाकी सर्व गोष्टींमध्ये त्या शक्ती, भुतंखेतं अस्तित्वात असतात हे गृहितक नाकारायचा प्रयत्न केलेला नाही. आपणही त्या कल्पना विश्वात चांगले रंगतो. पहिल्या दोन गोष्टी ५०-६० पानांच्या दीर्घकथा आहेत.



कथासंग्रहात प्रत्येक कथेची गोष्ट वेगळी असते त्यामुळे कादंबरीप्रमाणे पुस्तकाचा गोषवारा देता येत नाही. त्यात या भीती कथा असल्यामुळे गोष्टीबद्दल संक्षेपात संगितलं तरी रहस्यभंग आणि पर्यायाने भावी वाचकांचा रसभंग होईल म्हणून जास्त काही लिहित नाही. अंधार, भीती, थंडपणा, मृतदेह वगैरेंची विशेषणे वाचताना जी.एं.च्या "काजळमाया"ची आठवण झाली. "काळ्याकपारी", "गानूआजींची अंगाई" गोष्टी वाचताना "तुंबाड" चित्रपटासारखे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे रहतात. लेखकाच्या लेखनाची ही ताकद आहे. त्याची झलक म्हणून ही दोन पाने.


ज्यांना भीतीकथा आवडतात त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
भीतीकथा आवडत असतील तर : आवा ( आवर्जून वाचा )
भीती वाटत असेल तर : झेवा (झेपल्यास वाचा) जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

संवादु-अनुवादु (Sanvadu-Anuvadu)








पुस्तक : संवादु-अनुवादु (Sanvadu-Anuvadu)
लेखिका : उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४२६
ISBN (P book): 978938688754
ISBN (E book): 978938688757

कन्नड भाषेतील उत्तम साहित्य मराठीत भाषांतरित करून मराठी साहित्य विश्व समृद्ध करणाऱ्या प्रसिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी यांचं हे आत्मकथन आहे. वाचनप्रेमी मराठी मंडळींना उमा कुलकर्णी हे नाव माहीत नाही असं होणं शक्य नाही तरीही त्यांच्याबद्दल आधी थोडी माहिती सांगतो. 1982 मध्ये शिवराम कारंथ यांचे “तनामनाच्या भोवर्‍यात” हे त्यांचे पहिले अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले. प्रसिद्ध कन्नड लेखक डॉक्टर एस एल भैरप्पा यांचे “वंशवृक्ष”, ‘पर्व’, ‘मंद्र’, ‘जा ओलांडुनी’, ‘काठ’, ‘परीशोध’, “तंतू’; गिरीश कार्नाड यांचे ‘नागमंडल’, ‘तेलदंड’ इत्यादी साहित्य अनुवादित केले आहे. साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार; ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’, महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष पुरस्कार इ. पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मराठी व कन्नड समाजातले साहित्यिक सामाजिक बंधुत्व वाढवण्यास हातभार लावल्याबद्दल त्यांना ‘वरदराज आद्य पुरस्कार’ मिळाला आहे.

पुस्तकात दिलेली अजून माहिती
फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा




अश्या उमा कुलकर्णी यांनी त्यांच्या लहानपणापासून आज पर्यंत घडलेल्या प्रसंगांतून त्यांचा जीवनपट आपल्या समोर उभा केला आहे. त्यांचे लहानपण बेळगावात गेल्यामुळे कानडी भाषा त्यांच्या कानावर पडत होती. तरी त्यांना ती जुजबीच येत होती. कॉलेजमध्ये असतानाच वडिलांनी त्यांचे लग्न ठरवले. सासर एक कानडी मध्यमवर्गीय कुटुंब होतं. लग्नानंतर पुण्याला आल्यावर. पतीच्या आग्रहाखातर हळूहळू कानडी बोलायला शिकल्या. त्यादरम्यान शिवराम कारंथ यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. कादंबरी कन्नड असल्यामुळे त्यांच्या पतीने उमाताईंना ती वाचून दाखवली. ती ऐकत असताना तिचा अर्थ मराठीत लिहून ठेवायला सुरुवात केली. हा मराठी अनुवाद जरी त्यांनी स्वतःच्या आनंदा साठी केला असला तरी यातून त्यांच्या अनुवादाच्या प्रवासाला नकळत सुरुवात झाली. आपल्याला अनुवाद करणं जमतंय, आवडतंय हे बघून त्यांनी दुसऱ्या एका कादंबरीच्या अनुवादासाठी शिवराम कारंथ यांची रीतसर परवानगी मगितली. कारंथांनी काही प्रकरणांचा नमुना अनुवाद मागितला. उमाताईंनी केलेला अनुवाद त्यांना आवडला; कारंथांकडून परवानगी मिळाली व पहिला अनुवाद प्रकाशित झाला. पुढे त्यांच्या पतीने कानडी कादंबऱ्या वाचून दाखवायच्या आणि त्यांनी त्या मराठीत अनुवादित करायच्या हा प्रघात पडला. अनुवादाच्या प्रवासात त्यांचे पती विरुपाक्ष सुद्धा उतरले. उमाताईंच्या सहकार्याने त्यांनी मराठीतील पुस्तके, लेख इ. कन्नड मध्ये अनुवादित करायला सुरुवात केली. त्यामुळे हे पुस्तक उमाताईंच्या लेखन प्रवासाबरोबर त्यांच्या पतीचा लेखनप्रवास संगणारे, त्या दोघांचे अनोखे सहजीवन दाखवणारे आहे.

त्यांच्या घरातल्या मराठी-कानडी संगमाचा हा एक गमतीदार प्रसंग


अनुवादाच्या निमित्ताने लेखकांशी संपर्क, पत्रव्यवहार करावाच लागे. काही मोठे लेखक हे उमद्या व्यक्तिमत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्याशी या दांपत्याचे घरोब्याचे संबंध निर्माण झाले. कन्नड लेखक शिवराम कारंत, भैरप्पा हे पुण्यात आल्यावर त्यांच्या कडेच उतरत. उमाताई कर्नाटकात गेल्यावर त्यांच्या घरी जात, त्यांच्या बरोबर कार्यक्रमांना जायची संधी मिळे. अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड यांच्याशीही भेटी झाल्या. अशा भेटींचे, रंगलेल्या गप्पांचे कितीतरी प्रसंग या पुस्तकात आहेत.

कारंथ त्यांच्या घरी सर्वप्रथम आले तो दिवस:



साहित्य क्षेत्रात मुशाफिरी सुरू झाल्यामुळे मराठी साहित्य सृष्टीतल्या दिग्गजांशी ही यानिमित्ताने ओळखी झाल्या अगदी घरगुती नाती तयार झाली. उदाहरणार्थ पुण्यात राहणारे अनिल अवचट, कमल पाध्ये हे लेखिकेच्या घरी नेहमी येत. त्यांच्या साहित्य आणि इतर सामाजिक विषयांवर गप्पा चालत. पुल आणि सुनीताबाईंचंही येणं जाणं असे. कन्नड-मराठी सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी त्यांनी इतर साहित्यिकांच्या सहकार्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले . या सगळ्या प्रसंगांतून मोठ्या लेखकांचे एकमेकांशी संबंध कसे असतात; लेखनाशिवाय च्या खाजगी आयुष्यात ते कसे वागतात यात डोकावण्याची संधी आपल्याला मिळते. अनुवादासाठी त्यांना पुरस्कार मिळाले ते समारंभ, त्या उपस्थित होत्या अश्या साहित्य संमेलनातले महत्त्वाचे प्रसंग, वक्त्यांनी मांडलेले महत्त्वपूर्ण मुद्दे हे देखील पुस्तकाच्या ओघात आपसूकच येतं.

कन्नड-मराठी या भाषा भगिनींच्या साहित्य क्षेत्रातल्या देवाण-घेवाण याबद्दलही आपल्याला बरीच जाणीव यातून होते. दोन शेजारची राज्य असली तरी दोन्ही भाषांमध्ये एकमेकांच्या साहित्याची, मोठ्या साहित्यिकांची तितकी ओळख नाही असेच अनुभव लेखिकेला आले. सुनीताबाई देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मचरित्राचा अनुवाद त्यांचे पती विरुपाक्ष यांनी कन्नडमध्ये केला तेव्हा त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रकाशक शोधणे हे मोठे जिकिरीचे काम झाले कर्नाटकातल्या मंडळींचं असं म्हणणं होतं की जर कर्नाटकातल्या मंडळींना पु.ल. देशपांडे च फार माहीत नाहीत तर त्यांची पत्नी असणाऱ्या सुनीताबाईंचे चरित्र कोण वाचणार?

अनुवादाला साहित्यक्षेत्रात दुय्यम स्थान दिलं जातं याचे अनुभवही त्यांनी अगदी शांतपणे मांडले आहेत. अनुवादक असूनही मुखपृष्ठावर नाव न येणे, योग्य मानधन न मिळणे असे अनुभव घेत आहे. पुस्तकांच्या अनुवादाबरोबरच त्यांनी दूरदर्शन वरच्या मलिकांचे अनुवाद, संवाद पटकथा लेखन सुद्धा केलं आहे. कानडी मालिका मराठीत आणताना फक्त भाषांतरच नाही तर ती मराठमोळ्या स्वरूपात तिचं रूपांतर करणं सुद्धा आवश्यक होतं. हे काम आणि त्यातली आव्हानं पूर्णपणे वेगळी होती. चित्रीकरणाच्या निमित्ताने सुमित्रा भावेंसारख्या दिग्गज दिग्दर्शिकेचं काम जवळून बघण्याची संधी त्यांना मिळाली. सुमित्रा भावेंच्या काम करण्याच्या शैलीबद्दल, इतर व्यावसायिक दिग्दर्शकांच्या अनुभवाबबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.



लेखिका, अनुवादिका उमा कुलकर्णी यांच्या बरोबर एक मध्यमवर्गीय गृहिणी, सून असणारी उमा, मुलगी असणारी सुषमा(त्यांचे माहेरचे नाव) हे कथानकही पुस्तकभर समांतर चालते. त्यांचे बेळगावातले लहानपण, नातेवाईक, आजारपणं, बरेवाईट प्रसंगं याबद्दलही खूपच सविस्तर लिहिलं आहे. उदा पुस्तकाची पहिली दोन प्रकरणं ८४ पानं हाच वैयक्तिक मजकूर आहे. त्यामुळे त्यांच्या अनुवादाबद्दल वाचयला मिळणार की नाही अशी धकधूक वाटत होती.

एकूण पुस्तकाची कल्पना आपल्याला आली असेलच. पुस्तकाची शैली तशी सहज संवादी आहे. उमाताईंचा स्वभाव शांत, समंजस, परिस्थिती स्वीकारत पुढे जाणारा असल्याचं जाणवतं. त्यामुळे पुस्तकात कुठेही नाट्यमय प्रसंग नाहीत; खूप मोठा संघर्ष किंवा अटीतटीचे प्रसंग नाहीत. पुस्तक एका संथ लयीत जात राहते. कंटाळवाणे झाले नाही तरी खूप उत्कंठावर्धकही होत नाही.

वैयक्तिक, कौटुंबिक प्रसंग - अगदी धुणी भांड्याला घरी बाई कशी वागायची, नात्यात कोण आजारी पडलं, घरमालकांशी झालेल्या वादातून कोर्टकचेऱ्या - इ. बारीकसारिक तपशील बरेच आहेत. हे म्हणजे एखाद्याचा घरगुती फोटोअल्बम बघितल्यासारखं आहे. प्रत्येकाच्या घरात, किमान मनात तरी असा अल्बम असतोच. त्यामुळे, महत्त्वाचे प्रसंग सोडल्यास इतर प्रसंग वाचण्यात लेखिकेच्या जवळच्या नातेवाईक नसलेल्या त्रयस्थ वाचकांना 
फार रस वाटणार नाही. अशा प्रसंगांना कात्री लावून पुस्तक थोडं लहान आणि जास्त वेगवान करता आलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे, या शब्दिक अल्बममध्ये एकही फोटो नाही. अश्या प्रकारच्या पुस्तकांत बहुतेक वेळा लेखकाच्या लहानपणची छायाचित्रे तसेच कुटुंबाचे, लग्नातले, पुरस्कार मिळतानाचे, महत्त्वाच्या भेटीगाठींची छायाचित्रे असतात. या पुस्तकात एकही नाही. ते असायला हवे होते.

उमाताईंनी इतके प्रसंग लिहिले आहेत तरीही प्रत्यक्ष अनुवादाच्या अनुभवाविषयी फार त्रोटक लिहिलं आहे असं मला वाटलं. अनुवाद करताना 
शब्दकोश वापरणे, कादंबरीतले कथानक घडते त्या स्थळांना भेटी देणे, जिथे अडेल तिथे मूळ लेखकाची मदत घेणे इ. गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत. तरीही पर्व, आवरण इ. सारख्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांचा अनुवाद कसा आकारत गेला गेला हे सविस्तर वाचायला मिळेल अशी मला अपेक्षा होती. पण ती पूर्ण होत नाही. उदा. "पर्व" बद्दल त्या लिहितात-“‘पर्व’चा अनुवाद मला अतिशय आनंद देऊन गेला अनुवाद पुरा होईपर्यंत मी त्या वातावरणात घुमत राहिले यातील प्रज्ञा प्रवाहात शिरून त्या पात्रांच्या मनातले विचार व्यक्त करताना मी ते पात्र होऊन जात होते. विशेषतः कुंती आणि द्रौपदीच्या मनात भैरप्पा इतक्या समर्थपणे शिरले आहेत की मला तेवढ्या भागापुरती कारंथ यांची ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ आठवली.” बास संपलं! कदाचित अनुवाद त्यांच्यासाठी इतकी सहज प्रक्रिया झाली आहे की त्यात विशेष काही सांगावं असं त्यांना वाटलं नसेल. अनुवादाच्या आधीचे आणि नंतरचे सोपस्कारच कठीण वाटल्यामुळे त्यांचा भर त्यासंबंधित प्रसंगांवर असावा.

कन्नडशी इतका संबंध येऊन, प्रयत्नपूर्वक बोलायला शिकूनही त्या कन्नड वाचयला का शिकल्या नाहीत; अजूनही त्यांना वाचून का दाखवावं लागतं या प्रश्नाचा कीडापण या पुस्तकाने डोक्यात सोडला आहे. :) :)

असो. उमाताईंच्या अनुवादाच्या प्रवासाचा, दिग्गजांशी झालेल्या गप्पागोष्टींचा अनुभव घ्यायला वाचनप्रेमींना नक्कीच आवडेल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...