वाट तिबेटची (Vat Tibetachi)



पुस्तक - वाट तिबेटची (Vat Tibetachi)
लेखिका मीना प्रभु (Meena Prabhu) 
भाषा मराठी (Marathi)
पाने 335 
ISBN : दिलेला नाही

मीना प्रभु यांच्या प्रवास वर्णनाच्या प्रसिद्ध लेखमालेतील वाचलेलं हे दुसरं पुस्तक . त्याच्याआधी चिनीमाती  पुस्तक वाचलं होतं. हे पुस्तक त्याचा पुढचा भाग असावा असं, तिबेट वरचं. तिबेट म्हणजे हिमालयाच्या कुशीत वसलेला बर्फाळ,  रेताड, पहाडी, पठारी प्रदेश. हजारो वर्ष निसर्गप्रिय, शांतताप्रिय आणि आपल्या कोशात रममाण असणाऱ्या लोकांचा प्रदेश. पण चीनची वाकडी नजर त्यावर पडली आणि तो भाग त्यांनी बळाने स्वतःत विलीन करून घेतला. जुन्या धर्मसत्ता, राजसत्ता, परंपरा यांचा विध्वंस केला आणि त्याला "तिबेट मुक्ती"चे गोंडस नाव दिले. त्यामुळेच तिबेटी लोकांचे धर्मगुरू दलाई लामा यांना परागंदा होत भारतात आश्रय घ्यावा लागला. 

चीनची दडपशाही अनेक वर्षे चालूच आहे. त्यामुळे तिबेट जगापासून दुरावलेल्या अवस्थेत होता. आता चीनचे धोरण स्वतःच्या फायद्यासाठी थोडे बदलते आहे. त्यांनी केलेल्या विध्वंसातून सांस्कृतिक जी स्थाने टिकली, जेवढी जगाने बघितलेली चीनला चालतील आणि त्यामाध्यमातून चीनची भलावण साधता येईल तितके पर्यटन चीनने सुरू केले आहे. या संधीचा फायदा घेऊन मीना प्रभु यांनी तिबेटवारी साधली. 

फक्त तिबेटच नव्हे पण चीनचा व्हिसा मिळवणे, मग तिबेटला जायचे परमीट मिळवणे हा सुद्धा एक अनुभवच होता लेखिकेने तिथपासून आपल्या वर्णनाची सुरुवात केली आहे. पण तिबेटला पोचण्यापूर्वी त्या अमेरिकेतील हवाई बेटे आणि चिनच्या काही शहरांना भेटी देणार होत्या. खास खग्रास सूर्यग्रहण बघायला शांघायला. त्यामुळे पुस्तकात सुरुवातीला हवाई बेटे, पर्ल हार्बर यांचे वर्णन आहे.  तिबेटवर हवाई फ्री !! पुढे चीनमधल्या शहरांना दिलेल्या भेटी, त्यांनी शांघायला बघितलेल्या ग्रहणाचे, आधी बघितलेल्या ग्रहणाचे भावस्पर्शी अनुभव आहेत. डॉ. कोटनीस यांचे स्मारक त्यांनी शोधाशोध करून बरीच खटपट करून बघितलेच.



बीजिंग पासून ल्हासा पर्यंत चीनने रेल्वे सुरू केली आहे. डोंगर-दऱ्या नदी-नाले पठारे ओलांडत हजारो फूट उंचीवरून जाणारी रेल्वे चीनच्या दृढनिश्चय याचं तंत्र कौशल्याचा आणि विस्तार वादाचं संमिश्र उदाहरण. या रेल्वे प्रवासापासून आपली लेखिकेबरोबरची तिबेट सफर खऱ्या अर्थाने सुरू होते. त्याची ही एक झलक. 
(फोटो वर क्लिक करून झूम करून वाचा.)


तिबेट मधल्या प्रसिद्ध बौद्ध धार्मिक स्थळांना लेखिकेने भेटी दिल्या. या स्थळांच्या आजूबाजूचा निसर्ग, प्रत्यक्ष वास्तू आणि त्यांचं ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लेखिकेने अतिशय रोचक पद्धतीने सांगितले आहे. त्यामुळे तिबेट बद्दल फार काही वाचलं असेल तरी संदर्भ स्पष्ट होतात आणि त्या स्थळांचे महत्त्व आणि रुपडे आपल्या नजरेसमोर उभे राहते. एका मंदिराचं हे वर्णन वाचा.




तिथल्या लोकांशी, गाईडशी बोलता बोलता तिथली संस्कृती, लोकांची जीवनशैली सुद्धा लेखिका समजून घेत होत्या. माणसांच्या अंत्यसंस्कारांची वेगळीच पद्धत तिकडे आहे. मृतदेहाचे तुकडे करून त्याच्या मासाचे गोळे  गिधाडांच्या स्वाधीन करून मरण्याची "स्काय बरीयल" बद्दल पुस्तकात वाचायला मिळेल. तिबेट मधल्या भटक्या जमातीबद्दलची ही काही माहिती.




पुस्तकात बरेच रंजीत फोटो सुद्धा आहेत.



तिबेट मधली चिनी दडपशाही ठायी ठायी दिसतेच. अर्थातच, त्याबद्दल बोलायला लोकांना परवानगी नाहीच. पाठीवर सतत पोलीस नाहीतर चिनी लष्कराची गस्त आणि हेरगिरी यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था. तरीही लेखिकेने जमेल तसं लोकांना बोलतं करायचा प्रयत्न केला. ते अनुभवकण पुस्तकात वाचायला मिळतील. 



प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी एव्हरेस्ट शिखराच्या तिबेटच्या बाजूच्या बेस कॅम्पला भेट दिली. जगातलं सर्वात उंच शिखर बघण्याचा क्षण म्हणजे परिपूर्णतेचा अनुभव देणारा क्षण. एकीकडे अत्यानंद देणारा तर दुसरीकडे धीरगंभीर करणारा तो अनुभव त्यांच्या शब्दात वाचाच. 

तिबेटचं हे वर्णन वाचून एक जाणवत की तुम्ही फक्त चांगले असून भागत नाही. तुम्ही कणखर सुद्धा असायला हवं. नाहीतर चांगुलपणा, अहिंसा यांचा गैरफायदा घेणारं जंगली जग आहे हे. जर हरीण म्हणले मी वाघाला खात नाही मग तो कशाला मला खाईल ? तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही. सावरकरांच्या शब्दात सद्गुणविकृती ! भारतही अश्याच प्रकारे परकीय आक्रमणांचा बळी पडला असेल का?

चीनमध्ये येणारी भाषेची अडचण, खाण्यापिण्याची अडचण व चीनची धोरणे यामुळे चीनचा प्रवास करणारे  पर्यटक कमीच. तिबेट बघण्याची संधी आणखी कमी. त्यामुळे या पुस्तकाच्या रूपाने का होईना आपल्याला  तेथे प्रवास करून आल्याचा आनंद मिळेल. हे पुस्तक वाचा आणि जाणून घ्या तिबेट मधली - प्रकृती, संस्कृती आणि विकृती !!


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...