पुस्तक : Ikigai (इकिगाई )
लेखक : Hector Garcia & Farncess Miralles ( हेक्टर गार्सिया , फ्रान्सिस मीरेलस )
भाषा : English (इंग्रजी)
पाने : १९४
ISBN : 978-1-786-33089-5
मोठ्या व्यक्तीला वाकून नमस्कार केला की बहुतेक वेळा आशीर्वाद मिळतो "औक्षवंत व्हा". वाढदिवशी आपण शुभेच्छा देतो "जीवेत शरदः शतम्". आपल्याला, आपल्या कुटुंबियांना दीर्घायुष्य, आरोग्यपूर्ण आयुष्य मिळावं अशी आपली सर्वांचीच इच्छा असते. म्हणूनच दीर्घआयुष्याचं रहस्य काय हे जाणून घ्यायची उत्सुकता आपल्याला नेहमीच असते. जगभरातल्या लोकांच्या आयुष्यमानाची सरासरी बघितली तर जगात काही निश्चित प्रदेशांमध्ये दीर्घायुषी लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्यात जपान सर्वात पुढे आहे. विशेषतः जपानमधल्या ओकिनावा प्रांतात शंभर किंवा त्याहून जास्त वर्ष जगणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. म्हणून पुस्तकाच्या लेखकाने या जपानी लोकांचा अभ्यास करून त्याची निरीक्षणे व निष्कर्ष या पुस्तकात मांडले आहेत.
"इकिगाई" म्हणजे अशी गोष्ट जी करताना आपल्याला खूप आनंद मिळतो, आपलं वेळेचं भान हरपतं, आपल्याला पूर्ततेचा आनंद मिळतो. अशी गोष्ट जी करताना आपलं आयुष्याचं ध्येय सापडल्याची भावना येते. आपला "स्वधर्म". ज्या लोकांना आपली "इकिगाई" काय आहे हे नक्की माहित असतं आणि जे आपला जास्तीत जास्त वेळ अश्या कामात घालवतात ते लोक दीर्घायुषी असतात असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी काही व्यक्तींची उदाहरणे देऊन समजावून संगितले आहे. अशी कामं करताना जी सहजपणाची (flow ची) भावना होते ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतर कामं करताना पण असा "फ़्लो" आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं लेखकाचं म्हणणं आहे.
गंमत म्हणजे हे पुस्तक वाचत असताना नेमकं याच स्वरूपाचं पु.ल. देशपांडे यांनी केलेले एक विधान वाचाण्यात आलं. हे विधान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल आहे आणि आज तेही शंभरीच्या घरात आहेत.
"इकिगाई" बद्दल साधारण इतकेच आहे. पुढे मोठं आणि आरोग्यपूर्ण आयुष्यावर परिणाम करणाऱ्या इतर घटकांचा उहापोह आहे. "योग्य आहार, व्यायाम, विश्रांती आणि विचार ही आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली" आहे हे आपण वाचलेलं असतंच. या पुस्तकाचं सुद्धा हेच सांगणं आहे. त्यातही हे पुस्तक जपानवर, जपानी संस्कृतीवर आधारित आहे. जपानी संस्कृतीवर बौद्धधर्माचा म्हणजेच भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचा मोठा पगडा आहे. त्यामुळे मांडलेले विचार आपल्यासाठी, दिलेल्या टिप्स फार वेगळ्या नाहीत. उदा. जपान मधले दीर्घायुषी लोकही सकस आहार घेतात; मिताहार घेतात; उपास करतात. माझी आजीपण सांगायची "अति खाणं नि मसणात जाणं. गळेघाशी खाऊ नका. दोन घास कमीच खा !" :) . .
पुढे एक प्रकरण व्यायामावर आहे. दीर्घायुषी लोकांमध्ये आढळणारा एक सामान धागा म्हणजे ते सतत हिंडते फिरते होते(आहेत). या लोकांनी तरुणपणी किंवा सध्या खूप व्यायाम केला असं नाही. पण ते सतत हालचाल करत असतात. चालणं, फिरणं, बागकाम करणं, आपली कामं स्वतः करणं इ. त्याच जोडीला देशोदेशीचे लोक सहज सोप्या हालचालींचे व्यायाम प्रकार करतात. त्यांची तोंडओळख पुस्तकात करून दिली आहे. त्यात सूर्यनमस्कार, ताईची , छिगॉन्ग , "रेडिओ तायसो" इ. चा समावेश आहे. पुस्तकात काही आकृत्या काढून हा काय प्रकार आहे हे समजावून दिलं आहे. हे करणं किती सोपं आहे हे जाणवतं. "मूर्ती लहान पण कीर्ती महान" असं या व्यायाम प्रकारांबद्दल म्हणू शकतो.
"ज़िंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं बाबू मोशाय." असा एक सिनेमातला संवाद आहे. या "लंबी उम्र वाल्यांचा" या बाबतीत काय अनुभव ? हे लोक आनंदी आहेत का ? कर्तृत्ववान आहेत का ? त्यांचं रोजचं जगणं कसं असतं ? असे प्रश्न आपल्याला पडू शकतात. याचाही वेध एका प्रकरणात आहे. हे लोक "असामान्य कर्तृत्त्ववान" वर्गातले नाहीत. पण आनंदी नक्की आहेत. आणि आनंद घेणं, आनंद देणं, इतरांशी मिळूनमिसळून बोलणं हा त्यांच्या स्वभाव झाला आहे. आनंदी आयुष्यासाठी फक्त वैयक्तिक आरोग्यच नाही तर आपला सामाजिक संपर्क, मित्रमैत्रणींशी होणाऱ्या गप्पा टप्पा, सण-उत्सव साजरे करणे हे पण महत्त्वाचे आहे. हे अधोरेखित करणारे हे प्रकरण आहे.
पुढचा महत्त्वाचा पैलू म्हणजे "विचार". पाश्चात्त्य समाजावर आधारित स्वमदत पुस्तकांपेक्षा हा भाग खूप वेगळा आहे. उलट पाश्चात्त्य जीवनशैली मुळेच अनेक मानसिक समस्या निर्माण होत असून त्यावर उतारा म्हणजे पौर्वात्य - जपानी - भारतीय विचारपद्धती. काही गोष्टींचा अपरिहार्य म्हणून स्वीकार करणे; आत्ताच्या क्षणात जगणे; आपल्या जीवनाची क्षणभंगुरता लक्षात ठेवणे, श्वासावर लक्ष केंद्रित करून विचारांकडे समदृष्टीने पाहणे इ. टिप्स त्यात आहेत.
अशी एकूण प्रकरणे आहेत. अनुक्रमणिकेवरून पुस्तकाची रचना अजून लक्षात येईल .
अनुक्रमणिका
पुस्तकाच्या "मागेमाहिती"त (blurb साठी मला सुचलेला नवीन शब्द) तुम्हाला एक आकृती दिसेल. पुस्तकाच्या सुरुवातीला सुद्धा ती आकृती दिसते.
आज इकिगाई असं नेटवर शोधलं तर हीच आकृती दिसते. पण पूर्ण पुस्तकात या आकृतीचा पुढे संदर्भ किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. आपली आवड, आपलं उत्पन्नाचं साधन , समाजाची गरज या सगळ्यातून तयार होणारं ते इकिगाई. या सगळ्याचा समतोल साधणं म्हणजे इकिगाई असा समज सुरुवातीला होतो. पण तसं नाही. नेटवर शोधल्यावर असं दिसलं की खरं म्हणजे या आकृतीचा आणि इकिगाई संकल्पनेचा तसा काही संबंध नाही. पण ग्यानबाची मेख इथेच आहे. आपला स्वधर्म समाजला तरी वेळ, पैसा , जबाबदाऱ्या यांच्या ओझ्याखाली तसं वागणं जमेलच का ? ज्यांना ते जमलं त्यांनी ते कसं जमवलं हे पुस्तकात सांगितलं असेल असं मला वाटलं. त्याबाबतीत पुस्तक काही बोलत नाही. ही मोठी कमतरता आहे.
या दीर्घायुषी लोकांचे कौटुंबिक संबंध कसे होते, जॉब वर ते कसे होते, काही समजोपयोगी कामं त्यांनी केली का त्यांच्याबद्दल इतर लोकांचं म्हणणं काय हे पैलू सुद्धा पुस्तकात दुर्लक्षित आहेत.
जगण्याचं प्रयोजन शोधायला लावणारं, निरोगी, आनंदी आणि तितकेच समाधानी किंवा कृतार्थ वाटणारे आयुष्य जगणं किती सोपं आहे हे सांगणारं पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे, त्यातलं जे पटेल, रुचेल, जमेल तितकं आचरणात आणलं पाहिजे. लहान मुलांनी , तरुण मुलांनी हे वाचलं तर पूर्ण आयुष्यभर त्याचा उपयोग होईल आणि जर वृद्धांनी वाचलं तर कदाचित त्यांचीही मरगळ जाऊन आनंदाच्या दृष्टीने अजून पावले पुढे पडतील.
पुस्तकाचे मराठी भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे .
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------