लोक माझे सांगाती (Lok maze sangatee)

 



पुस्तक - लोक माझे सांगाती (Lok maze sangatee)
लेखक - शरद पवार  (Sharad Pawar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - 354
ISBN 978-81-7434-937-8

माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (आणि आजी सुद्धा ?? 😛) शरद पवार यांचं हे आत्मचरित्र आहे. हे पुस्तक 2015 साली प्रकाशित झाले आहे. त्यांच्या लहानपणापासून 2014-15 पर्यंतच्या घटना यात आहेत.


शरद पवार यांचे राजकीय जीवन मोठमोठ्या घडामोडींनी भरलेलं आहे तरुण वयात राजकारणात प्रवेश, युवक काँग्रेसची जबाबदारी, यशवंतराव चव्हाण यांना सोडून काँग्रेस पक्षातून बाहेर जाणं, पुन्हा काँग्रेस प्रवेश, मुख्यमंत्री पद, सोनिया गांधींना विरोध करून राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना, तरी युपीएत सामील होणं, कृषीमंत्री पद अश्या महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा यात समावेश आहे. काही प्रसंगात पडद्यामागे काय घडलं हे सांगितलं आहे.  इंदिरा गांधींचे यशवंतरावांशी वाकडं;  स्वतः काँग्रेस पक्षाध्यक्ष राजीव गांधींनी पवारांविरुद्ध त्यांच्याच मंत्र्यांचा उठाव उठाव घडवून आणला; कोणीही कणखर नेता केंद्रात नको म्हणून दुबळ्या समजल्या गेलेल्या नरसिंह रावांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ कशी पडली इत्यादी कितीतरी प्रसंग आहेत. 

इंदिरा गांधींचे शरद पवारांना गर्भित धमकीवजा आमंत्रण बघा.

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा )





राजकीय उतार-चढावांबरोबरच सतत काहीना काही आरोप आणि वाद हेसुद्धा पवारांच्या कारकीर्दीचा अविभाज्य भाग. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा वाद, एनरॉन प्रकरण, लवासा प्रकरण, गुन्हेगारी जगताशी संबंधांचा आरोप याचाही मागोवा पुस्तकात घेतला आहे.  पवारांनी बाजू स्वतःची बाजू थोडक्यात मांडली आहे उदा. एनरॉन प्रकरणात त्यांचा उद्देश विकासाचा होता. स्वस्त दरात वीज निर्मिती करण्याचा होता. परंतु राजकीय स्वार्थापोटी विरोधकांनी या कामात खीळ घातली. असं त्यांचं म्हणणं आहे. बाकीच्या प्रकरणातही केवळ विरोधासाठी विरोध झाला आणि आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत नाहीत असं त्यांचं प्रतिपादन आहे. मुद्रांक घोटाळा (तेलगीचा), शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जलसिंचन घोटाळा सहकारी बँका बुडणे अशा बऱ्याच प्रकरणांचा उल्लेख यात नाही. पण उल्लेख असता तरी साधारण काय सूर लागला असता याचा अंदाज आपल्याला येतो.

अफाट लोकसंग्रह हे पवारांचे वैशिष्ट्य. सर्व राजकीय पक्षातल्याच नव्हे तर कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक कार्य, उद्योगजगत अशा नाना क्षेत्रातल्या लहान-मोठ्या कर्तुत्ववान व्यक्तींशी व्यक्तींशी पवारांचे अगदी जवळचे संबंध आहेत.  पुस्तकांच्या ओघात अशी कितीतरी नावं येतात. पुस्तक वाचताना तर प्रत्येक वेळी आश्चर्याने तोंडात बोट जातं की "अरे हे तर पवारांचे मित्र आहेत; ही व्यक्ती पण! आणि ह्यांच्याशी सुद्धा घरोबा !!".  ह्या व्यक्तींशी त्यांची ओळख कशी झाली आणि संबंध कसे दृढ झाले झाले हे आपल्याला समजतं. पवारांवर इतके आरोप होत असतात पण कुठलंही प्रकरण धसास लावलं जात नाही. कोणीही त्याचा पाठपुरावा करून एकदाचं खरं खोटं करत नाही. आरोप होतात; त्याचा काहीतरी राजकीय लाभ मिळतो न मिळतो आणि ते प्रकरण मागे पडतं. कदाचित सगळीकडेच पवारांचे मित्र असल्यामुळे कोणाला त्यांच्याविषयी टोकाची कारवाई करावीशी वाटत नाही; हे त्यामागचं कारण नसेल ना; असा विचार पुस्तक वाचताना मनात येतो .

पवारांच्या या सर्वव्यापी संबंधांमुळे अडचणीच्या प्रसंगी संवादकाची भूमिका त्यांच्याकडे दिली जायची. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अकाली दलाच्या नेत्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी राजीव गांधींनी पवारांवर टाकली त्याबद्दल हे वाचा.





पवारांच्या यशामागे, त्यांच्या दबदब्या मागे त्यांची प्रचंड अभ्यासू वृत्ती आणि अपार मेहनत घ्यायची तयारी आहे हे वादातीत. राज्यात किंवा केंद्रात वेगवेगळी पदे भूषवताना त्या त्या विभागाचा खोलात जाऊन अभ्यास त्यांनी कसा केला याचीही काही उदाहरणं पुस्तकाच्या ओघात येतात. किल्लारी ला झालेल्या भूकंपानंतर त्यांनी ज्या तत्परतेने हालचाली केल्या प्रशासकीय कामांना दिशा दिली ते खरंच वाचण्यासारखं आहे आणि वाखाणण्यासारखं आहे. 12 मार्च 1993 ला मुंबई साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यावेळी मुख्यमंत्री पवारांनी केलेली कृती वाचून पहा.





कृषीमंत्रिपदी असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी काय निर्णय घेतले, संस्थात्मक पातळीवर बदल कसे केले गेले, वैज्ञानिकांना उत्तेजन देण्यासाठी प्रकल्प राबवले हे एका प्रकरणात सविस्तर सांगितलेलं आहे. ते वाचताना एक जाणवलं की आपण एखाद्या मंत्र्याच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या किंवा पंतप्रधानांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन किती वर वर करतो. आपल्याला बातम्यांमधून जे वाचायला मिळतं आणि ढोबळमानाने जे निकाल समोर येतात; उदाहरणार्थ - शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या/कमी झाल्या; शेतकऱ्यांची कर्जमाफी किती कोटी झाली वगैरे - त्यावर आपलं मत अवलंबून असतं. त्यापलीकडे जाऊन विषयाचा सखोल अभ्यास आपण सर्वसामान्य लोक करत नाही. कृषिमंत्री म्हणून पवारांचं  काम वाचताना जाणवतं की त्यांनी बरीच दीर्घ पल्ल्याची कामं सुरू केली आहेत. त्याचा परिणाम दिसायला कदाचित अजून काही वर्षे लागतील. त्यामुळे फक्त शरद पवारच नव्हे तर नरेंद्र मोदी असतील किंवा इतर कुठलेही पंतप्रधान किंवा मंत्री असोत; त्यांच्या कामाची शहानिशा करताना ढोबळ आकडेवारीपेक्षा असं खोलात जाऊन जाऊन विश्लेषण केलं नाही तर आपलं मत किती चुकीचं ठरू शकेल. नाही का! दुर्दैवाने राजकारणी वर्गालाही असे ढोबळ विचार करणारे, भावनिक विचार करणारे मतदारच हवे आहेत.

कृषी क्षेत्रातल्या या कामाबद्दलच्या लेखातली काही पाने





पवार आणि बारामती हे अतूट नातं आहे. बारामतीचा पवारांनी केलेला विकास बारामती पॅटर्न म्हणून देशात प्रसिद्ध झाला, चर्चेचा विषय झाला, आणि इतर भागातल्या लोकांच्या हेव्याचा (आणि दाव्यांचा) विषय राहिला आहे. लोकसहभाग, वैयक्तिक ओळखी यातून त्यांनी जलसंधारणाची कामे केली नवनवे उद्योग तिथे आणले. शैक्षणिक संस्थानं सुरू केली. त्याबद्दलही एका प्रकरणात सविस्तर लिहिलेले आहे. ते वाचताना सुद्धा जाणवतं की एखादा राजकारणी दीर्घदृष्टीने विचार करु लागला तर काही वर्षातच कसा कायापालट करू शकतो. पवारांनी आपल्या सत्तेच्या बळावर बारामतीसाठी काही लाभ कदाचित मिळवले असतील. पण इतर राजकारण्यांनी असा अधिकाराचा वापर करून आपल्या विभागाचा इतका प्रचंड कायापालट केला आहे? आपल्या भागातल्या लोकांना अडाणी, गरीब ठेवून; समस्या झुलवत ठेवून निवडून येण्यापेक्षा आपल्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि त्यातून त्यांचा स्नेहभाव, बांधिलकी कायमस्वरूपी मिळवणं हा win-win situation चा बारामती पॅटर्न बरा वाटतो. 

बारामती काय काय उद्योग सुरू झालेत बघा.




वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, बिजू पटनायक, बाळासाहेब ठाकरे अश्या काही निवडक व्यक्तिंबद्दल थोडक्यात एक एक पान एक पान लिहिलं आहे विशेष म्हणजे त्यात पवारांच्या गाडीचे चालक गामा यांचाही समावेश आहे. इतकी वर्ष लामाने कशी प्रामाणिकपणे सेवा दिली आहे त्यांची कशी काळजी घेतो हे आवर्जून नमूद केलं आहे. माणसांची जाणीव अशी ठेवली जात असेल तर "लोक यांचे सांगाती होतात" याचं नवल वाटत नाही.      

हे आत्मचरित्र असलं तरी यात "आत्म" चा भाग अजून जास्त असायला हवा होता असं मला वाटतं. म्हणजे असं की; त्यांच्या आयुष्यात घडलेल्या या राजकीय घडामोडी या तर वर्षानुवर्ष वृत्तपत्रांत, नियतकालिकांत छापून आलेल्या आहेत. याबद्दल कोणीही चरित्रकार किंवा एखाद्या संशोधक पत्रकार लिहू शकला असता. स्वतः पवारांना लिहायची गरज नव्हती. या घडामोडींच्या वेळी पडद्यामागे काय घडलं, पवारांनी काय विचार केला, पवारांचे डावपेच कसे होते याबद्दल वाचणं जास्त औत्सुक्याचं आहे. काही उदाहरण वगळता तो भाग पुस्तकात हवा तितका येत नाही. कदाचित त्यावर एक स्वतंत्र पुस्तक त्यांनी लिहिलं पाहिजे (जर त्यांनी लिहिले असेल तर असेल तर कृपया वाचकांनी मला सांगा)

पुलोद सरकार आणि पवार मुख्यमंत्री होते त्या कालावधीत महाराष्ट्रात घडलेल्या घटना पुस्तकात येतात. पण त्यानंतरच्या त्यानंतरच्या घटना उदाहरणार्थ सेना-भाजपा युतीचे सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील वाटचाल, पुढची दहा वर्षे आघाडी सरकार याबद्दल पुस्तकात काही नाही. गंमत म्हणजे पवारांच्या राजकीय जीवनातल्या नाट्यमय घडामोडी अजून संपलेल्या नाहीत. मागच्या वर्षी शिवसेनेला भाजपापासून फोडून सरकार बनवलं त्यावेळी काय काय घडलं असेल ते खरंच एकदा वाचायला मिळाले पाहिजे. नवीन पुस्तकाचा पुढचा भाग आणि पवारनीती वरचं पुस्तक वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे. तो पर्यंत हे पॉवरफुल पुस्तक वाचाच.




———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


No comments:

Post a Comment

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...