आत्म्याचे नाव अविनाश (Aatmyache Nav Avinash)


.




पुस्तक : आत्म्याचे नाव अविनाश (Aatmyache Nav Avinash)
लेखिका : डॉ. चित्रलेखा पुरंदरे (Dr. Chitralekha Purandare)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २५४
ISBN : 978-93-89624-11-3
प्रकाश : विश्वकर्मा प्रकाशन

अविनाश धर्माधिकारी हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. धर्माधिकारी हे आयएएस अधिकारी होते. सरकारी सेवेत दहा वर्षे पूर्ण झाल्यावर स्वतःहून राजीनामा देऊन ते बाहेर पडले. स्वतःला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात पूर्णवेळ झोकून दिलं. "चाणक्य मंडल परिवार" या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ते स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची व्याख्याने, चर्चा-परिसंवाद यातला सहभाग यांमध्ये त्या त्या विषयावरचे अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकण्यासारखे असते. अश्या धर्माधिकारी सरांच्या जडणघडणीचा आणि त्यांच्या कामाचा मागोवा घेणार हे पुस्तक आहे. सरांच्या लहानपणापासून च्या आठवणी यात आहेत. 


लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती


बाल अविनाशचं शाळा कॉलेजमध्ये असताना अतिशय खोडकर, व्रात्य होते. आयुष्यभर गुंडगिरीच करेल की काय असं वाटायला लागेल असं त्यांचं वागणं होतं. पण दुसरीकडे वक्तृत्व, क्रीडा, अभ्यास या क्षेत्रातही चांगलं यश संपादन करत होते. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या माध्यमातून तरुण वयात सामाजिक काम, मुक्त पत्रकारिता आणि त्यावेळी अशांत असलेल्या पंजाब, आसाम अशा भारताच्या विविध भागात अभ्यास दौरे त्यांनी केले. नोकरी सोडल्यावर सक्रीय राजकारणात घेण्याचाही प्रयत्न केला. पुढे "चाणक्य .." ची स्थापना झाली.  अशा टप्प्यांची माहिती  लेखिकेने दिली आहे.  

लहानपणीचा अविनाश बघा कसा होता.

त्या त्या वेळी अविनाश सरांबरोबर काम केलेल्या त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना च्या  आठवणी पुस्तकात आहेत. आप्तजनांच्या आठवणी आहेत. थोडं लेखिकेचं निवेदन आणि थोड्या इतरांच्या आठवणी असं जोडीजोडीने चालत पुस्तकाचा प्रवास होतो.

उदा. सरांच्या पत्नी पूर्णाताईंनी त्यांची ओळख, पुढे प्रेमविवाह आणि संसारातले चढउतार, नवऱ्याच्या वागण्यातला कडूगोड गोष्टी याबद्दल मनमोकळेपणे बोलल्या आहेत. त्याला काही अंश 


"चाणक्य मंडल" हा फक्त शिकवणीवर्ग / क्लास नाही. तर अधिकारी "कसं व्हावं" आणि "कसं अधिकारी" व्हावं हे दोन्ही शिकवणारी, संस्कार करणारी शिक्षणसंस्था आहे.  तिची ही एक झलक

आता अधिकारी म्हणून काम करणारे; चाणक्य मंडल परिवारात मार्गदर्शन लाभलेले असे माजी विद्यार्थी पुस्तकात आपलं मनोगत व्यक्त करतात. सरांशी कसे ऋणानुबंध आहेत; सरांच्या मार्गदर्शनाचा व व्यक्तिमत्त्वाचा आयुष्यावर कसा खोलवर परिणाम झाला आहे हृद्य प्रसंग ते सांगतात.



पुस्तक चरित्रात्मक असलं तरी सलग कथानक स्वरूपात नाहीये.  प्रत्येक प्रकरणात आयुष्याचा पुढचा टप्पा येतो आणि त्यावेळी घेतलेल्या माणसांच्या आठवणीतून त्या दिवसापासून आज पर्यंत आजपर्यंतच्या अनेक आठवणी आणि प्रसंग नजरेसमोर येतात. त्यामुळे एक घटन, त्यातून fast forward 
आणि पुढच्या प्रकरणात पुन्हा मागे असा पुस्तकाची रचना आहे. 

या प्रकारामुळे पुस्तकात तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा येतात पण त्या मुद्द्यांच्या खोलात पुस्तक जात नाही. उदाहरणार्थ अविनाश सरांनी राजकारणात प्रवेश करायचा प्रयत्न केला. निवडणुका लढवल्या पण ते हरले. हा मुद्दा अनेकांच्या मनोगतात येतो पण त्या मुद्द्याच्या खोलात पुस्तक शिरत नाही. म्हणजे निवडणुका कधी लढवल्या; त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते; त्यांना किती मते मिळाली; ते का हरले; कारणमीमांसा स्वतः कशी केली; त्यातून काय धडा शिकले इ. काहीच माहिती नाही. 
तरुण वयात त्यांनी पंजाब आणि आसाम इत्यादी भागांचे दौरे केले आणि लोकांच्या भेटीगाठी घेतल्या हा संदर्भ पुन्हा पुन्हा येतो. पण त्या दौर्‍याचे फलित काय ? त्यातून त्यांना काही उपाय सुचले का? उपायांच्या अंमलबजावणीवर त्यांनी काही काम केलं का? हे काहीच समजत नाही.
आय ए एस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी होती. परंतु त्यांची कामगिरी पुस्तकात तितक्या भक्कमपणे येत नाही. उदा. निवडणूक ओळखपत्रे देण्याची मोहीम कशी धडाडीने राबवली होती हे एका व्याख्यानात (युट्युब वर व्हिडीओ आहे) अविनाश सरांनी सविस्तर सांगितलं आहे. त्यातून त्यांचा वेगळेपणा, निष्ठा, कामावरची पकड दिसते. पुस्तकात हे उदाहरण येतं पण तपशील दिलेला नाही. कुठल्याही एखाद्या कार्यक्षम अधिकाऱ्याने काम केलं असतं असं वाटायला लावणारं निवेदन आहे. कामाची "अविनाशी" मुद्रा दिसत नाही. 

"चाणक्य"चा विस्तार हा भागही कमीच आहे.

पुस्तक वाचताना सतत असं वाटत राहतं की एका मोठ्या कर्तृत्ववान व्यक्ती बद्दल आपण वाचतो आहोत; त्याच्यातली कर्तृत्वाची खूण आपल्याला दिसते आहे पण त्याचा नक्की अदमास लागत नाहीये. हे पुस्तक वाचल्यावर "तरीही उरे काही उणे" असं वाटून आपल्याला पडणाऱ्या "तू पूर्तता होशील का ?" या प्रश्नाचं उत्तर कुठलं पुस्तक देतंय बघूया !

 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

जरा, याद करो कुर्बानी ( Jara, Yad karo kurbani)




पुस्तक - ... जरा, याद करो कुर्बानी ( Jara, Yad karo kurbani)
संकलन - विलास सुतावणे (Vilas Sutavane)
पाने : १००
भाषा : मराठी 
ISBN : दिलेला नाही

सैन्यदलाच्या कौटुंबिक बाजूची सुखदुःखे मांडणारे "घर सैनिकाचे" हे पुस्तक नुकतेच वाचले आणि त्याचे परीक्षण परवा लिहिले होते. (ते http://kaushiklele-bookreview.blogspot.com/2021/01/ghar-sainikache.html इथे वाचू शकाल). योगायोगाने वाचनात आलेले पुढचे पुस्तकही सैन्याशी संबंधित असेच आहे.

डोंबिवलीची "विविसु डेहरा" (www.vivisudehra.com) पर्यटन संस्था गेली अनेक वर्ष पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या सैन्यदलाची जवळून ओळख व्हावी अशा पद्धतीच्या विशेष सहलींचे आयोजन करते. तसेच सेनेच्या शौर्याची, त्यागाची योग्य जाणीव व कृतज्ञता सर्वसामान्यांच्या मनात वाढीस लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम करते. उदाहरणार्थ दिवाळीच्या वेळी सैनिकांना फराळ पाठवण्यात ते पुढाकार घेतात.

या संस्थेने "जरा याद करो कुर्बानी" हे कॉफी टेबल बुक डायरी स्वरुपात छापलं आहे. परमवीर चक्र विजेत्यांची माहिती हा मुख्य विषय आहे. आत्तापर्यंत ज्या 21 शूरवीरांना सेनेतील सर्वोच्च असे "परमवीर चक्र" मिळाले आहे त्या प्रत्येकावर एक छोटेखानी लेख आहे ज्यातून त्यांच्या शौर्याची आपल्याला माहिती होते.

अनुक्रमणिका


उदाहरणार्थ मेजर धन सिंग थापा यांच्यावरचा हा लेख पहा.







परमवीर चक्राची रचना कशी आहे याची माहिती दिली आहे.



भारतीय सैन्य दलाने मध्ये असलेली काही वैशिष्ट्यपूर्ण विमाने जहाजे आणि श्वान दल यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे



आणि सर्वात शेवटी डायरी सारखी काही कोरी पाने आहेत



पुस्तक हवे असल्यास पुढील क्रमांकांवर फोन केल्यावर पुस्तक मिळेल. 
विविसु डेहरा 
९८१९५०४०२०
९८३३४१०३६५
अथवा खालील संकेत स्थळावर भेट द्यावी. 
www.vivisudehra.com


माहितीपूर्ण, देखणे आणि चटकन वाचून होईल असे पुस्तक आहे. आपल्यासाठी ज्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येक सुज्ञ वाचकाला आवडेलच.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




घर सैनिकाचे (Ghar Sainikache)

 


पुस्तक - घर सैनिकाचे (Ghar Sainikache)
लेखक - डॉ. नीलिमा निशाणदार (Dr. Neelima Nishandar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २६४
ISBN - 978-938-4416-348

देशाच्या संरक्षण दलात प्रवेश करणं हे आपल्या जीवावर उदार होऊन देशासाठी अनिश्चित भविष्याचा स्वीकार करणं आहे.  त्यासाठी निधडी छाती, देशप्रेम, शिस्त अश्या कितीतरी गुणांची आवश्यकता आहे. तितकीच आवश्यकता आहे कुटुंबाकडून मिळणाऱ्या साथीची. एका सैनिकाशी लग्न करुन त्याची जीवनसाथी होणं हे सुद्धा तितकंच मोठं धाडसाचं आहे. म्हणूनच सैनिकांच्या, अधिकाऱ्यांच्या शौर्याच्या गोष्टी रोमांचकारी आहेत तसेच त्यांच्या जोडीदाराचे, कुटुंबियांचे संसाराच्या रणभूमीवरचे अनुभव आहेत. हे अनुभव आपल्या समोर मांडले आहेत सैन्यातील अधिकारी विजय निशाणदार यांच्या पत्नी सौ. नीलिमा निशाणदार यांनी. 

१९७१ साली त्यांचं विजयरावांशी लग्न झालं तेव्हा ते सैन्यात कॅप्टन होते. सैनिकांशी संसाराचा अनुभव पहिल्यापासूनच येऊ लागला. ७१ साली भारत-पाक युद्धाची शक्यता होती. त्यामुळे विजरावांना सुट्टी मिळत नव्हती. कशीबशी सुट्टी मिळाली आणि लग्न होऊन थोडे दिवस होतायत तोच युद्ध सुरु झालं. त्यांना ड्युटीवर रुजू व्हावं लागलं. नवविवाहित आणि गर्भार अवस्थेत पतीविरहात संसाराची सुरुवात झाली. 

सैनिकाच्या घराचं हे वर्णन इथून सुरु होऊन विजयराव सैन्यातून मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त होई पर्यंत पूर्ण आहे. या काळात त्यांच्या देवळाली, अंबाला, लुधियाना, काश्मीर, उडिशा अशा वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या. बदल्या झाल्या की असलेलं घर सोडायचं आणि नवीन जागी नव्याने घराची शोधाशोध करायची. उत्साहाने सजवायचं. पण बदलीची टांगती तलवार डोक्यावर ठेवूनच. मला असं वाटायचं की सैन्यात बदली झाली की नव्या ठिकाणी क्वार्टर मिळतच असणार. पण तसा प्रकार दिसत नाहीये.  कारण काही वेळा लेखिकेला स्वतः घरासाठी शोधाशोध करावी लागली. तर काहीवेळा छावणीत मिळालेल्या खोल्यांचं घर करावं लागलं. अश्या खोल्यांच्या जवळ झोपड्या (बाशा) बांधून लोक राहायचे असा उल्लेख आहे.

कॅंटोन्मेंट मध्ये घर असेल तर आजूबाजूला सगळे अधिकारी, सैनिक यांची घरं. तेच सगळे नातेवाईक, मित्रमंडळी. देशभरातून विविध प्रांतांचे, भाषांचे लोक सैन्यात. त्यामुळे भारताचं लघुरूपच. तिथल्या जीवनात त्यात सैनिकी शिस्त, ब्रिटिश परंपरांतले रीतिरिवाज, सिनियर-ज्युनियर ची वर्णव्यवस्था आणि भारतीय सण-उत्सव यांचं निराळंच मिश्रण होतं. तिथल्या या जीवनाचे पैलू लेखिकेने खूप छान सांगितले आहेत. 

तिथल्या पार्ट्यांमध्ये पोशाखाला (ड्रेस कोड ला) खूप महत्त्व आहे. स्त्रीदाक्षिण्याला सुद्धा. सर्वसाधारणपणे, आपण बसलेलो असू आणि कोणी मोठी व्यक्ती समोर आली की आपण उभं राहून स्वागत करतो. पण सैन्यात महिलेने तसं करायची गरज नाही. त्यामुळे सुरुवातीला गडबड उडायची त्याचा हा किस्सा 



पार्टी, मुलं आणि महिला अधिकारी यांच्याबद्दलचा अजून एक प्रसंग 





सैन्य हे एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे चालतं. अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय यांचा हे सगळं बांधून ठेवण्यात मोठा वाटा आहे. काही अलिखित नियम, जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. असाच एक अनुभव लेखिकेला आला. सैन्याच्या एका गुप्त मोहिमेसाठी सर्व रेजिमेंट रवाना झाली. छावणीत राहिले फक्त कुटुंबीय आणि थोडेसे लष्करी लोक. अश्यावेळी प्रमुख अधिकाऱ्याची पत्नी म्हणून ह्या विस्तृत कुटुंबाचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी लेखिकेवर आली. त्याचा हा अनुभव. 
 




सततच्या बदल्या म्हणजे मुलांचे हाल. सारख्या शाळा बदलायच्या. मित्र बदलणार. अभ्यासक्रम बदलणार. कॅंटोन्मेंट शहरापासून लांब असेल तर चांगल्या शाळेत जाणं येणं सुद्धा त्रासदायक. त्याबद्दल लेखिकेने प्रसंगोपात लिहीले आहे. त्याची एक झलक. 





ह्या समस्येवर उपाय म्हणून दोन छावण्यांमध्ये स्वतः शाळा सुरु करायचा, चांगल्या चालवायचा उपक्रम त्यांनी राबवला. सैन्य व्यव्यस्थापन आणि सैनिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. पण सैन्याच्या कुटुंबियांना या बाबतीत सुद्धा झगडावं लागत असेल हे मला जरा धक्कादायक होतं.

सीमेवर लढणारे, गस्त घालणारे जवान कितीतरी अमानुष प्रसंगात लढत असतात, खंबीर उभे असतात याची वर्णने आपण वाचतो.  हे अनुभव थेट त्या जवानांच्या तोंडून, पतीकडून लेखिकेला ऐकता आले. विजयरावांची तुकडी सुद्धा सियाचीन ला होती. ते स्वतः सियाचीन ला जाऊन आले होते. त्या अनुभव कथनाचा हा एक प्रसंग 



सैन्याला मिळणाऱ्या सवलतींचा गैरफायदा घेण्याच्या वृत्तीसुद्धा त्यांना दिसल्या. त्यांच्या पतीने त्या तिथल्या तिथे निपटून काढायचा प्रयत्न केला. ही बाजू दाखवणारा हा एक प्रसंग वाचून बघा. 




छावणीत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, होळी-दिवाळी-ख्रिसमस-ईद च्या मेजवान्या आणि धमाल, सैन्यात होणाऱ्या प्रमोशनची चढाओढ या बद्दल सुद्धा पुस्तकात लिहिले आहे. 

हे पुस्तक जितकं सैन्याबद्दलच्या अनुभवावर आहे तितकंच ते लेखिकेच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या सासरी-माहेरी घडणारी लग्नकार्य, आजारपणं, घरगुती वादावादी, केलेले प्रवास यांचे प्रसंग सुद्धा भरपूर आहेत.  आनंदाचे-दुःखाचे, काळजीचे-धमाल करण्याचे, अनपेक्षित धक्क्यांचे आणि फटफजितीचे असे कितीतरी किस्से सांगत सांगत लेखिका निवेदन पुढे नेते. त्यामुळे आपण वाचताना गुंगून जातो. 

`वैयक्तिक भाग कमी करून सैन्यविषयक अनुभवच अजून वाचता आले असते तर बरं झालं असतं असं वाटतं. सैनिकाचा संसार करणं हे मानसिक पातळीवरसुद्धा एक दिव्य आहे. रेजिमेंट युद्धावर गेली, अचानक मोहिमेवर गेली  आणि बऱ्याच दिवसांनी परत आली त्या काळात लेखिकेला आणि त्यांच्या कुटुंबियांना काळजी वाटली असणारच. शेजारपाजारच्या इतर कुटुंबांनी मानसिक पातळीवर संघर्ष केला असेलच. अश्या प्रसंगातल्या स्वतःच्या भावनांबद्दल लेखिकेने बरंच हात राखून लिहिलं आहे. इतरांच्या भावनांबद्दल खास असं लिहिलेलं नाही. त्यांच्या मुलाचा उल्लेख पुस्तकात येतो पण त्या बालमानावर ह्या आयुष्याचा परिणाम कसा झाला ते पुस्तकात येत नाही.
त्यामुळे बदल्यांचा त्रास सोडला तर बाकी सगळं अगदीच सोपं होतं असं वाटू लागतं. ते तसं नसतं याची जाणीव आपल्याला आहे; पण पुस्तकाची ही मोठी उणीव आहे. 

प्रसंगाच्या तारखा, किमान वर्ष तरी द्यायला हवी होती. ती बऱ्याच ठिकाणी दिली नसल्यामुळे कालसंगती लागत नाही. मधल्या काळात किती वर्षे गेली; कुठल्या वर्षी भारतात तशी परिस्थिती हा संदर्भ लागत नाही.

लेखिकेची शैली अगदी खिळवून ठेवणारी आहे. शाब्दिक कोट्या, म्हणी वाक्प्रचार यांचा वापर करत मराठी भाषेच्या वळणाची आडवळणे दाखवत लेखिका आपल्याशी गप्पा मारते. सैन्याच्या कौटुंबिक बाजूवर प्रकाश टाकणार हे पुस्तक वाचनीय आहे हे नक्की.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade)

पुस्तक - काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale - Sahavedanetun Samruddhikade) लेखिका - वसुंधरा काशीकर (Vasundhara Kashika...