घर सैनिकाचे (Ghar Sainikache)

 


पुस्तक - घर सैनिकाचे (Ghar Sainikache)
लेखक - डॉ. नीलिमा निशाणदार (Dr. Neelima Nishandar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २६४
ISBN - 978-938-4416-348

देशाच्या संरक्षण दलात प्रवेश करणं हे आपल्या जीवावर उदार होऊन देशासाठी अनिश्चित भविष्याचा स्वीकार करणं आहे.  त्यासाठी निधडी छाती, देशप्रेम, शिस्त अश्या कितीतरी गुणांची आवश्यकता आहे. तितकीच आवश्यकता आहे कुटुंबाकडून मिळणाऱ्या साथीची. एका सैनिकाशी लग्न करुन त्याची जीवनसाथी होणं हे सुद्धा तितकंच मोठं धाडसाचं आहे. म्हणूनच सैनिकांच्या, अधिकाऱ्यांच्या शौर्याच्या गोष्टी रोमांचकारी आहेत तसेच त्यांच्या जोडीदाराचे, कुटुंबियांचे संसाराच्या रणभूमीवरचे अनुभव आहेत. हे अनुभव आपल्या समोर मांडले आहेत सैन्यातील अधिकारी विजय निशाणदार यांच्या पत्नी सौ. नीलिमा निशाणदार यांनी. 

१९७१ साली त्यांचं विजयरावांशी लग्न झालं तेव्हा ते सैन्यात कॅप्टन होते. सैनिकांशी संसाराचा अनुभव पहिल्यापासूनच येऊ लागला. ७१ साली भारत-पाक युद्धाची शक्यता होती. त्यामुळे विजरावांना सुट्टी मिळत नव्हती. कशीबशी सुट्टी मिळाली आणि लग्न होऊन थोडे दिवस होतायत तोच युद्ध सुरु झालं. त्यांना ड्युटीवर रुजू व्हावं लागलं. नवविवाहित आणि गर्भार अवस्थेत पतीविरहात संसाराची सुरुवात झाली. 

सैनिकाच्या घराचं हे वर्णन इथून सुरु होऊन विजयराव सैन्यातून मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त होई पर्यंत पूर्ण आहे. या काळात त्यांच्या देवळाली, अंबाला, लुधियाना, काश्मीर, उडिशा अशा वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या. बदल्या झाल्या की असलेलं घर सोडायचं आणि नवीन जागी नव्याने घराची शोधाशोध करायची. उत्साहाने सजवायचं. पण बदलीची टांगती तलवार डोक्यावर ठेवूनच. मला असं वाटायचं की सैन्यात बदली झाली की नव्या ठिकाणी क्वार्टर मिळतच असणार. पण तसा प्रकार दिसत नाहीये.  कारण काही वेळा लेखिकेला स्वतः घरासाठी शोधाशोध करावी लागली. तर काहीवेळा छावणीत मिळालेल्या खोल्यांचं घर करावं लागलं. अश्या खोल्यांच्या जवळ झोपड्या (बाशा) बांधून लोक राहायचे असा उल्लेख आहे.

कॅंटोन्मेंट मध्ये घर असेल तर आजूबाजूला सगळे अधिकारी, सैनिक यांची घरं. तेच सगळे नातेवाईक, मित्रमंडळी. देशभरातून विविध प्रांतांचे, भाषांचे लोक सैन्यात. त्यामुळे भारताचं लघुरूपच. तिथल्या जीवनात त्यात सैनिकी शिस्त, ब्रिटिश परंपरांतले रीतिरिवाज, सिनियर-ज्युनियर ची वर्णव्यवस्था आणि भारतीय सण-उत्सव यांचं निराळंच मिश्रण होतं. तिथल्या या जीवनाचे पैलू लेखिकेने खूप छान सांगितले आहेत. 

तिथल्या पार्ट्यांमध्ये पोशाखाला (ड्रेस कोड ला) खूप महत्त्व आहे. स्त्रीदाक्षिण्याला सुद्धा. सर्वसाधारणपणे, आपण बसलेलो असू आणि कोणी मोठी व्यक्ती समोर आली की आपण उभं राहून स्वागत करतो. पण सैन्यात महिलेने तसं करायची गरज नाही. त्यामुळे सुरुवातीला गडबड उडायची त्याचा हा किस्सा 



पार्टी, मुलं आणि महिला अधिकारी यांच्याबद्दलचा अजून एक प्रसंग 





सैन्य हे एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे चालतं. अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय यांचा हे सगळं बांधून ठेवण्यात मोठा वाटा आहे. काही अलिखित नियम, जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. असाच एक अनुभव लेखिकेला आला. सैन्याच्या एका गुप्त मोहिमेसाठी सर्व रेजिमेंट रवाना झाली. छावणीत राहिले फक्त कुटुंबीय आणि थोडेसे लष्करी लोक. अश्यावेळी प्रमुख अधिकाऱ्याची पत्नी म्हणून ह्या विस्तृत कुटुंबाचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी लेखिकेवर आली. त्याचा हा अनुभव. 
 




सततच्या बदल्या म्हणजे मुलांचे हाल. सारख्या शाळा बदलायच्या. मित्र बदलणार. अभ्यासक्रम बदलणार. कॅंटोन्मेंट शहरापासून लांब असेल तर चांगल्या शाळेत जाणं येणं सुद्धा त्रासदायक. त्याबद्दल लेखिकेने प्रसंगोपात लिहीले आहे. त्याची एक झलक. 





ह्या समस्येवर उपाय म्हणून दोन छावण्यांमध्ये स्वतः शाळा सुरु करायचा, चांगल्या चालवायचा उपक्रम त्यांनी राबवला. सैन्य व्यव्यस्थापन आणि सैनिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. पण सैन्याच्या कुटुंबियांना या बाबतीत सुद्धा झगडावं लागत असेल हे मला जरा धक्कादायक होतं.

सीमेवर लढणारे, गस्त घालणारे जवान कितीतरी अमानुष प्रसंगात लढत असतात, खंबीर उभे असतात याची वर्णने आपण वाचतो.  हे अनुभव थेट त्या जवानांच्या तोंडून, पतीकडून लेखिकेला ऐकता आले. विजयरावांची तुकडी सुद्धा सियाचीन ला होती. ते स्वतः सियाचीन ला जाऊन आले होते. त्या अनुभव कथनाचा हा एक प्रसंग 



सैन्याला मिळणाऱ्या सवलतींचा गैरफायदा घेण्याच्या वृत्तीसुद्धा त्यांना दिसल्या. त्यांच्या पतीने त्या तिथल्या तिथे निपटून काढायचा प्रयत्न केला. ही बाजू दाखवणारा हा एक प्रसंग वाचून बघा. 




छावणीत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, होळी-दिवाळी-ख्रिसमस-ईद च्या मेजवान्या आणि धमाल, सैन्यात होणाऱ्या प्रमोशनची चढाओढ या बद्दल सुद्धा पुस्तकात लिहिले आहे. 

हे पुस्तक जितकं सैन्याबद्दलच्या अनुभवावर आहे तितकंच ते लेखिकेच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या सासरी-माहेरी घडणारी लग्नकार्य, आजारपणं, घरगुती वादावादी, केलेले प्रवास यांचे प्रसंग सुद्धा भरपूर आहेत.  आनंदाचे-दुःखाचे, काळजीचे-धमाल करण्याचे, अनपेक्षित धक्क्यांचे आणि फटफजितीचे असे कितीतरी किस्से सांगत सांगत लेखिका निवेदन पुढे नेते. त्यामुळे आपण वाचताना गुंगून जातो. 

`वैयक्तिक भाग कमी करून सैन्यविषयक अनुभवच अजून वाचता आले असते तर बरं झालं असतं असं वाटतं. सैनिकाचा संसार करणं हे मानसिक पातळीवरसुद्धा एक दिव्य आहे. रेजिमेंट युद्धावर गेली, अचानक मोहिमेवर गेली  आणि बऱ्याच दिवसांनी परत आली त्या काळात लेखिकेला आणि त्यांच्या कुटुंबियांना काळजी वाटली असणारच. शेजारपाजारच्या इतर कुटुंबांनी मानसिक पातळीवर संघर्ष केला असेलच. अश्या प्रसंगातल्या स्वतःच्या भावनांबद्दल लेखिकेने बरंच हात राखून लिहिलं आहे. इतरांच्या भावनांबद्दल खास असं लिहिलेलं नाही. त्यांच्या मुलाचा उल्लेख पुस्तकात येतो पण त्या बालमानावर ह्या आयुष्याचा परिणाम कसा झाला ते पुस्तकात येत नाही.
त्यामुळे बदल्यांचा त्रास सोडला तर बाकी सगळं अगदीच सोपं होतं असं वाटू लागतं. ते तसं नसतं याची जाणीव आपल्याला आहे; पण पुस्तकाची ही मोठी उणीव आहे. 

प्रसंगाच्या तारखा, किमान वर्ष तरी द्यायला हवी होती. ती बऱ्याच ठिकाणी दिली नसल्यामुळे कालसंगती लागत नाही. मधल्या काळात किती वर्षे गेली; कुठल्या वर्षी भारतात तशी परिस्थिती हा संदर्भ लागत नाही.

लेखिकेची शैली अगदी खिळवून ठेवणारी आहे. शाब्दिक कोट्या, म्हणी वाक्प्रचार यांचा वापर करत मराठी भाषेच्या वळणाची आडवळणे दाखवत लेखिका आपल्याशी गप्पा मारते. सैन्याच्या कौटुंबिक बाजूवर प्रकाश टाकणार हे पुस्तक वाचनीय आहे हे नक्की.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...