सेर सिवराज है (Ser Sivaraj hai)





पुस्तक - सेर सिवराज है (Ser Sivaraj hai)
लेखक - प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar) 
भाषा - मराठी  (Marathi)
पाने - १३६
ISBN - 978-81-947875-3-2 

"इंद्र जिमि जंभ पार बाडव सुअंब पर .... सेर सिवराज है" हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचं वर्णन करणारं कवन खूप प्रसिद्ध आहे. हे कवन कवी भूषण यांनी लिहिलेलं आहे. जे शिवाजी महाराजांच्या पदरी कवी म्हणून उपस्थित होते. त्यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांवरच्या कवनांवरचं यांच्यावरचं हे पुस्तक आहे.  त्या कवनांतली भाषा जुनी मैथिली/व्रज बोली अर्थात जुनी उत्तर हिंदुस्थानी बोली आहे. त्यामुळे सर्वसाधारण मराठी माणसाला त्या कविता आता समजणं फार कठीण आहे. लेखकाने त्या कवितांचे  मराठीत भाषांतर दिलं आहे. 


लेखक हे हिंदी आणि मराठी भाषा तज्ज्ञ आहेत. त्यांनी "छावा", "श्रीमान योगी" या कादंबऱ्यांचे हिंदी भाषांतर केले आहे. पुस्तकात दिलेला त्यांचा परिचय. 


कवी भूषण यांच्या कवितांबद्दल पुस्तकात दिलेली पूर्वपीठिका वाचली की या कवनांचा अंदाज येईल 



वर दिल्याप्रमाणे प्रत्येक कविता रचताना काव्यरचनेसाठी कुठलातरी छंद किंवा अलंकार निश्चित करून त्यानुसार कवीने शब्दांची निवड केलेली आहे. त्यामुळे या पुस्तकात प्रत्येक कवितेच्या अलंकाराचं व्याकरणाच्या परिभाषेतलं नाव त्याचा अर्थ दिलेला आहे. मग मूळ कविता व त्यांनतर मराठी भाषांतर दिलं आहे. तो अलंकार कसा साधला गेला आहे हे स्पष्ट केलं आहे. शाळेत असताना शिकलेल्या उपमा, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, वक्रोक्ती ह्या कल्पना आठवतायत का ? त्यांची उजळणी होईल व बऱ्याच नव्या संज्ञा कळतील. 

कवितांमधल्या वर्णनानुसार मला तीन प्रकारच्या कविता वाटल्या. 

एखाद्या घटनेचा संदर्भ घेऊन शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे कौतुक करणाऱ्या कविता. उदा. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले ह्यातून त्यांचे चातुर्य दिसले; औरंगजेबाच्या भर दरबारात शिवाजी महाराजांनी त्याला खडे बोल सुनावले हे त्यांचे धैर्य, साल्हेर च्या लढाईत तुंबळ युद्ध झाले इ. 
उदा.  


दुसऱ्या प्रकारात शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे शत्रू सैन्य, सरदार कसे भयभीत झाले आहेत, दख्खनेत लढाईला यायला नाही म्हणतात, त्यांचे कुटुंबीय पराभवामुळे भयभीत झाले आहेत ह्या अर्थाच्या कविता 
उदा.   



तिसरा प्रकार म्हणजे कुठलीही एकच घटना न घेता "in general" शब्दांच्या फुलोऱ्यातून शिवाजी महाराजांचे कौतुक करणाऱ्या कविता 
उदा. 



कवी भूषण शिवाजी महाराजांच्या पदरी, दरबारात होते. त्यामुळे मला असं वाटलं होतं की महाराज प्रत्यक्ष कसे दिसत, कसे वागत याचं खरंखुरं वर्णन कवितांमध्ये असेल. एखाद्या प्रसंगाचा "आँखो देखा हाल" असेल. पण त्या बाबतीत ह्या कवितांनी निराशा केली. अतिशयोक्त वर्णनं, उपमांचे फुलोरे आणि शब्दांचे खुळखुळे असंच कवितांच स्वरूप वाटलं. वर्णन सुद्धा खूप साचेबद्ध. जसं की - राजा म्हटला की तो पाण्यासारखा पैसा दानधर्मात घालवणार. हत्ती दानात देणार. राजाची राजधानी म्हटलं की स्वर्गाला लाजवेल अशी. हिऱ्यामाणकांनी सववलेले महाल आणि रूपवान स्त्रियांचा वावर असणारी. पण हे वर्णन  "श्रीमान योगी" असणाऱ्या राजांचं, त्यांच्या "दुर्गदुर्गेश्वर" रायगडाचं असेल असं पटत नाही. त्यांची जनतेच्या सेवेची आस बघता पैशाची उधळपट्टी झाली असेल हे पटत नाही. तसंच, शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे घाबरून शत्रूचे सरदार कुटुंबकबिल्यासह डोंगरदऱ्यात राहतायत असं वर्णन आहे. असे कोण राहिले होते ? किती राहिले होते ? शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार बघता, स्वाऱ्या बघता असं खरंच झालं होतं का ही उगीच हवेत पतंगबाजी ? पोवाड्यांप्रमाणे एका एका घटनेचं सविस्तर वर्णन असा प्रकारही नाही. त्यामुळे पोवड्यांमध्ये थोडीफार कल्पनिकता असली, घटना जरा चढवून सांगितलेल्या तरी ते जास्त आकर्षक वाटतात.

खरं बघितलं तर "अफजखानाचा कोथळा काढला", "लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं तोडली", "बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटले", "रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली" ही तथ्य सांगणारी साधी वाक्यसुद्धा रोमांचकारी आहेत. त्यांना कवीच्या बेगडाची गरज नाही असं वाटलं. चारपाच कविता वाचल्या की तोचतोचपणाचा खूप कंटाळा येतो. 

त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून कविता वाचण्यात अर्थ नाही. केवळ शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पण शब्दचमत्कृती दाखवणाऱ्या, कवीचं शब्दसामर्थ्य दाखवणाऱ्या, जुन्या भाषेची गंमत दाखवणाऱ्या कविता म्हणून निखळ साहित्यिक हेतूने कविता वाचल्या तर काव्यशास्त्रविनोदाचा आनंद घेता येईल. ".. सेर सिवराज है" , "अगर न होता शिवाजी तो सुन्नत होती सबकी" ह्या गाजलेल्या ओळींच्या मूळ कविता वाचता येतील. तसंच हा ऐतिहासिक दस्तऐवज मराठीत आणून लेखकाने मोठं काम केलं आहे ते ही वयाच्या नव्वदीत. ज्ञानतपस्वीच्या परिश्रमाला दाद दिली पाहिजे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

बुद्धायन आणि इतर प्रवास (Buddhayan Ani itar pravas)



पुस्तक - बुद्धायन आणि इतर प्रवास (Buddhayan Ani itar pravas)
लेखक - 
समीर झांट्ये (Sameer Zantye)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२५
ISBN - दिलेला नाही

लेखक समीर झांट्ये यांनी स्वतःहून मला हे पुस्तक भेट म्हणून पाठवले त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. 

पुस्तकाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे विशी-तिशीत त्यांनी केलेल्या प्रवसांबद्दल त्यांना जे आणि जितकं सांगावंसं वाटलं ते ह्या पुस्तकात आहे. विशी-तिशीतल्या तरुणाला साधारणपणे हौसीमौजेची ठिकाणं किंवा साहसी अनुभवांची ठिकाणंच आवडली असतील असं आपल्याला वाटेल. पण लेखकाने निवडलेली ठिकाणं ही भारतीय संस्कृतीच्या, तत्वज्ञानाच्या इतिहासात महत्त्वाची ठरलेली ठिकाणं आहेत. अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यावर स्थळांची नावे समजतील.



नावावरून लक्षात येणार नाहीत ती स्थळे
"अ सिटी अॅज ओल्ड अॅज टाईम" - वाराणसी,
"दक्षिणेतील बौद्ध ज्ञानपीठ" - हैदराबाद जवळचे नागार्जुनकोंडा
"समुद्रात रुजलेले जंगल" - बंगाल मधील सुंदरबन, 
"प्रतिभावंतांच्या गावात" - केरळातल्या कोवलम येथील मल्याळम कवींचे स्मारक.


बहुतेक सगळे लेख ४-५ पानी छोटे छोटे लेख आहेत. त्या ठिकाणची किंवा प्रमुख वास्तूची ओझरती ओळख, त्या संबंधीची एखादी घटना आणि तिला भेट दिल्यावर लेखकाच्या मनात उठलेले भावतरंग असे लेखनाचे स्वरूप आहे. एक दोन उदाहरणांवर नजर टाका.

गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधगयेतील विविध मंदिरांबद्दल




सेवाग्राम आश्रमात वास्तव्याच्या अनुभवाबद्दल





बंगालमध्ये गंगा समुद्राला मिळते तिथल्या खारफुटीच्या जंगलाचा - सुंदरबन चा अनुभव





या भेटींमध्ये त्यांना कोणी कोणी भेटलं आणि त्यांनी केलेली मदत किंवा जाता जाता ते काय बोलून गेले हे अनुभव देखील आहेत.

लेखकाच्या ठिकाणांच्या निवडीतूनच लक्षात येईल की लेखक हा संवेदनशील, चिंतनशील, तत्त्वज्ञानाची आवड असणारा असा आहे. त्यामुळे त्याला दिसलेल्या दृश्यांनी, भेटलेल्या व्यक्तींनी त्याला विचारप्रवृत्त केलं. त्याला एकीकडे जीवनाचं व्यामिश्रपण जाणवलं तर दुसरीकडे साधू, फकीर, भिक्खू यांच्यामुळे जीवनाचं साधेपण जाणवलं. हेच विचार पुस्तकात पुन्हा पुन्हा येतात. त्यामुळे स्थळ बदललं तरी अनुभवात बदल झालेला दिसत नाही. त्यादृष्टीने पुस्तक एकसुरी होतं.

लेखकाचा जास्त भर त्याच्या मनातल्या अनुभववर्णनावर आहे. स्थळांबद्दल माहिती (कुठे आहे, कसं पोचायचं) इ. दिलेलं नाही. स्थळांचे फोटो नाहीत आणि लेखकाची वर्णनशैली चित्रमय नाही. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर काही कल्पनाचित्र सुद्धा उभे राहत नाही. ही पुस्तकाची उणीव जाणवते.

काही कमीपरिचित जागांची तोंडओळख होण्यासाठी पुस्तक चांगलं आहे. १२५ पानी कॉफीटेबल पुस्तक वाचायला कंटाळा येत नाही. पटकन वाचून होतं.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

The bestseller she wrote (द बेस्टसेलर शी रोट )

 



पुस्तक - The bestseller she wrote (द बेस्टसेलर शी रोट )
लेखक - Ravi Subramanian (रवी सुब्रमण्यन )
भाषा - English (इंग्रजी )
पाने - 391
ISBN - 978-93-85152-38-2


कादंबरीचं कथा सूत्र साधारण असं आहे ->
आदित्य कपूर नावाचा प्रथितयश सर्वाधिक खपाचा लेखकाची एका तरुण मुलीशी ओळख होते. ती मुलगीही भरपूर वाचणारी, काही लिहू पाहणारी आणि विशेष म्हणजे सुंदर आकर्षक. आदित्य लग्न झालेला, एक मुलगा असेलेला असला तरी तिच्याकडे ओढला जातो. त्या मुलीची सुद्धा आदित्यसारखं "बेस्ट सेलर" व्हायची तीव्र इचछा असते. आदित्यशी सलगी वाढवून त्याच्या ओळखीने ह्या क्षेत्रात झटक्यात यश पदरात पाडून घेण्याच्या दिशेने तिची पावले पडू लागतात. वाहवत जातात. त्याचे बरे वाईट परिणाम होतात. त्यांच्या या प्रेमप्रकरणाचा परिणाम त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींवरही होतो आणि इतरांच्या वागणायचा परिणाम ह्या प्रेम प्रकरणावर. त्यामुळे जितकं वरवर दिसतं तितकंच घडत नाही. काही अनपेक्षित घटना घडतात. 

मग श्रेयाचं पाहिलं पुस्तक प्रकाशित होतं का ? श्रेया-आदित्यच्या संबंधांचा परिणाम आदित्यच्या वैवाहिक आयुष्यावर काय होतो ? हे संबंध लपून नाही राहिले तर त्याचा परिणाम आदित्यच्या "मोठा लेखक" या प्रतिमेवर काय होतो ? दुसरे कोणी याचा फायदा उचलतात का ?
हे सगळं मी सांगून रसभंग करत नाही. त्यासाठी कादंबरी वाचा 


कादंबरीची भाषा सोपी इंग्रजी आहे. पात्रांची नावं आणि त्यांची थेट ओळख करून दिलेली आहे. हे मला बरं वाटलं. नाहीतर भारतीय इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात किचकट शब्द वापरुंन पांडित्यदर्शन असतं. बऱ्याचवेळा पात्र परिचय करून देतच नाहीत. नक्की बाई आहे का पुरुष; लहान आहे का मोठा; ह्याचा आपणच अंदाज करत बसायचा. एक असं पुस्तक मी नुकतंच अर्ध्यावर सोडलं. पण त्याबाबतीत हे पुस्तक चांगलं आहे. 


आदित्य आणि श्रेयाचा एक प्रसंग 






मुख्य पात्र लेखक असल्यामुळे लेखन-प्रकाशन व्यवसायातील व्यावसायिक गणितं आणि "आतल्या गोष्टीं"बद्दल ओघात काही लिहिलं गेलं आहे. असाच एक प्रसंग. 





आदित्य या पात्राच्या मनात चालणारे विचार कादंबरीत थोडेफार येतात पण इतर पात्रांबद्दल फारसं चित्रण नाही. कादंबरीचा भर प्रसंगावर आणि कथानक वेगात पुढे जाण्यावर आहे. त्यामुळे त्यातलं रहस्य किंवा पात्रांचं वागणं लेखक सांगेल तसं गृहीत धरून पुढे जावं लागतं.

कादंबरी छोट्या छोट्या प्रसांगातून पुढे जाते. पुढे काय घडेल काय घडेल याचा अंदाज येतो तरी ने नक्की कसं घडलं असेल हे वाचत राहावंसं वाटतं. शेवटी शेवटी प्रसंग अनपेक्षित वळणं घेतात. त्यामुळे कधी नव्हे ते ४०० पानी इंग्रजी पुस्तक इतक्या लवकर वाचून संपलं. तुम्हालाही सहज विरंगुळा म्हणून वाचायला आवडू शकेल.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

Chakravyuvh of Corona (चक्रव्यूह ऑफ कोरोना)

 



पुस्तक - Chakravyuvh of Corona (चक्रव्यूह ऑफ कोरोना)
लेखिका - Madhuri Lele (माधुरी लेले)
भाषा - English (इंग्रजी )
पाने - १३६
ISBN - 978-81-950875-6-3

माझी आत्या माधुरी लेले हिने लिहिलेलं हे पुस्तक आहे. पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या ८२ पानांमध्ये एक दीर्घकथा आहे. एका उद्योग घराण्यातली व्यक्तीला कोरोनाची लक्षणं दिसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागतं. आणि त्या साताठ दिवसात हॉस्पिटलमध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती बघून त्याचं मन संवेदनशील होतं. असं कथाबीज आहे. त्यातली ही एकदोन पानं. 





उरलेल्या पानांमध्ये वेगवेगळ्या लोकांचे कोरोनाबद्दलचे लेख आहेत. छोट्यामोठ्या कंपन्यांचे सीईओ, डॉकटर, समाजसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, शालेय विद्यार्थी  यांचे १-२ पानी लेख आहेत. 
उदा. 





गोष्ट ठीक आहे पण ती खूप उत्कंठावर्धक अशी नाही. विवेक या पात्रात झालेला बदल खूपच पटकन झालेला वाटतो. ते अजून रंगवता आलं असतं तर त्याचा परिणाम जाणवला असता. आणि हॉस्पिटल मधून त्याने पुढे मोठं काम करायचं ठरवलं आणि माहिती गोळा केली वगैरे कळतं पण पुढे त्याचे नक्की काय झालं काही समजत नाही त्यामुळे गोष्ट अर्धवट सोडल्यासारखी वाटते.

दुसऱ्या भागात वेगवेळ्या लोकांचे लेख आहेत. पण बहुतांश लेखांमध्ये तेच तेच मुद्दे आले आहेत उदा. लॉकडाऊन कसं झालं, कामाची पद्धत कशी बदली, स्वच्छतेची पद्धत कशी बदलली, ऑनलाईन शिक्षण इत्यादी इत्यादी. पुस्तकाचे वाचक सुद्धा सध्या या गोष्टी स्वतः अनुभवत आहेत. आजूबाजूला बघत आहेत. त्यामुळे पुन्हा त्या लोकांच्या तोंडून हे वाचण्याचं प्रयोजन कळत नाही.
त्याऐवजी एकच लेख केला असता आणि त्यात मध्ये मध्ये लोकांची वक्तव्ये घातली असती तर एक मुद्देसूद लेख तयार झाला असता आणि 2020 ची परिस्थिती काय होती याचा सारांश मांडला असं तरी वाटलं असतं.  आता पुढे काय करता येईल याचे मुद्दे घालता आले असते, काही नव्या कल्पना मांडता आल्या असत्या तर काही वेगळेपणा आला असता. 

पुस्तकाचं नाव आणि उपशीर्षक यातून वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता हे पुस्तक करत नाही

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

लडाख : एक उत्तुंग स्वप्न (Ladakh : Ek Uttunga Swapna)



पुस्तक - लडाख : एक उत्तुंग स्वप्न (Ladakh : Ek Uttunga Swapna)
लेखक - सागर रायकर (Sagar Raykar) 
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ९०
ISBN - दिलेला नाही 


माझा नातेवाईक - सागर रायकर - काही वर्षांपूर्वी लडाखच्या बाईकराईडवर गेला होता. ठाणे-लडाख-ठाणे असा प्रवास त्यांनी बाईकवरून अठरा दिवसात केला होता. त्या प्रवासातून आल्यावर प्रवासातल्या काही गमतीजमती आम्हाला सांगितल्या होत्या. खूप मजा आली होती ऐकायला. त्या सगळ्या आठवणी आणि बरंच काही असं आता ई-पुस्तकाच्या रूपात त्याने प्रकाशित केलं आहे. सध्या ॲमेझॉन किंडल वर त्याचं हे ई-पुस्तक उपलब्ध आहे. ते बघण्यासाठी लिंक


पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती 

अनुक्रमणिका 



प्रवासाच्या आधीच्या तयारीपासून कथनाला सुरुवात केली आहे. त्याच्या चमूची ओळख करून दिली आहे आहे. मग पुढचे अठरा दिवस काय काय घडलं याचं धावतं समालोचन आहे. प्रवासाच्या टप्प्यांची माहिती देताना रोजचा तोच तोचचा दिनक्रम टाळून महत्त्वाचे मुद्दे आणि अनुभव सांगितले आहेत. प्रवासात घडलेले धमाल प्रसंग सांगितल्यामुळे हे पुस्तक रुक्ष माहितीपुस्तक राहत नाही, मजेदार प्रवासवर्णन होतं. फक्त धमालच नाही तर आलेल्या अडचणी आणि झालेली फटफजिती सुद्धा त्याने खिलाडूवृत्तीने मांडली आहे. 

हे पुस्तक वाचताना तर आम्हाला आमच्या गप्पांचीच आठवण आली. सागरने जणू त्या मोकळ्याढाकळ्या गप्पा तश्याच साध्यासरळ शब्दात मांडल्या आहेत असं वाटलं. त्रयस्थ वाचकालाही तो आपल्याशी गप्पा मारतोय असंच वाटेल. ही थोडी पाने वाचून बघा. 

चारपाच जणांनी एकत्र जायचं तर परस्पर संवाद राहिला पाहिजे. उन्हातान्हात तापल्या रस्त्यांवरून जाताना पाणी पाहिजे. त्याची तयारी कशी केली याबद्दलची एक झलक 



होता होता टळललेला अपघात 


प्रवास प्रत्येकवेळी नीटच होईल असं नाही. कधी गाडी बिघडू शकते नाहीतर कधी तब्येत बिघडू शकते. त्यावर उपचार तर केलाच पाहिजे पण मनालाही उभारी दिली पाहिजे. तरच प्रवास सुरु ठेवता येईल. सश्रद्ध लेखकाचा हा एक अनुभव 



त्यांच्या सहलीत प्रत्यक्ष स्थलदर्शनाला जास्त वेळ ठेवला नव्हता. जातायेता बघणं झालं तेच. ह्या प्रवाश्यांना आजूबाजूला काय दिसलं असेल ह्याची कल्पना फोटोंमधून येते. पुस्तकात फोटो पण भरपूर आहेत. युटूयुब व्हीडीओच्या लिंक्स आहेत.  
छायाचित्रांना शीर्षकं देतानासुद्धा सागरची धमाल शैली दिसेल तुम्हाला. 


पुस्तकाच्या शेवटच्या भागात सागरने आपल्या अनुभवातून काही सल्ले दिले आहेत. सहलीचं नियोजन कसं करावं; काय करावं काय टाळावं;कोणत्या वस्तू बरोबर घ्याव्यात हे अगदी तपशीलवार दिलं आहे. सहलीसाठी तब्येतीची कशी तयार केली आणि प्रत्यक्ष प्रवासांच्या दिवसात काय व्यायाम करावे हे सुद्धा दिलं आहे. 



उदा. 


होतकरू रायडर्स ना हा अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आपल्याला अशी रस्तेसहल झेपेल ना हे चाचपून बघायला सागरचे हे सल्ले कसोटी म्हणून वापरता येतील. मी त्यात नापास झालो :) म्हटलं, इतका त्रास घेण्यापेक्षा थेट विमान, ट्रेन, चारचाकीनेच तिथपर्यंत जावं आणि तिथे फिरावं. उगाच का त्रास घ्या रायडिंगचा. पण ज्यांना हा प्रवास "त्रास" वाटत नाही तेच तर रायडर्स ना !! म्हणून तुम्ही तुमचं ठरवा.

पाहिलंच पुस्तक प्रकाशित होत असताना देखिल सागरचा लिखाणातला आत्मविश्वास आणि शैली तुम्हाला आवडेल. पुस्तक १०० पानी असलं तरी मोठ्या टाइपातलं असल्यामुळे छापील पुस्तकाच्या तुलनेत तितका मजकूर नाही. ही छोटी पुस्तिका पटकन वाचून होईल. 


सध्या ॲमेझॉन किंडल वर त्याचं हे पुस्तक उपलब्ध आहे. ते बघण्यासाठी लिंक


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

खेळिया - कथा नरेंद्र मोदी नामक झंझावाताची (Kheliya - Katha Narendra Modi Namak Jhanjhavatachi)

 



पुस्तक : खेळिया - कथा नरेंद्र मोदी नामक झंझावाताची (Kheliya - Katha Narendra Modi Namak Jhanjhavatachi)
लेखक - सुदेश वर्मा 
अनुवादक - सुधीर जोगळेकर
भाषा - मराठी 
पाने - ४२०
मूळ पुस्तक - Narendra Modi : The game changer 
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी 
ISBN - 978-93-80549-93-4
प्रकाशक - मैत्रेय प्रकाशन

भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी ह्या व्यक्तिमत्त्वाने गेल्या काही वर्षांपासून भारतीय समाजाला आकर्षित केलं आहे. सामाजिक जीवनात वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. प्रेम आणि द्वेष; विश्वास आणि भीती अश्या टोकाच्या भावना त्यांच्याबद्दल समाजात आहेत. भावना कुठल्याही असोत त्या जितक्या सत्यावर आधारित किमान पक्षी उपलब्ध माहितीच्या आधारावर असतील तितक्या चांगल्या. त्यामुळे मोदीयुगात वावरताना आपल्याला मोदींबद्दल अधिक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यादृष्टीने हे पुस्तक वाचनीय आहे. 
हे पुस्तक(पहिली आवृत्ती) २०१३ साली प्रकाशित झाली आहे. त्यावेळी भाजप ने पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून मोदींचं नाव पुढे आणलं होतं. गुजरात मॉडेल राबवणारे मोदी, विकासाचं राजकारण करणारे मोदी, २००२ गुजरात दंगलींबद्दल टीका झेलणारे मोदी  असा मतामतांचा गलबला झालेला असताना माहिती, सत्य, तथ्य लोकांसमोर आणावं ह्या उद्देशाने लेखकाने हे पुस्तक लिहिलं आहे. 
त्या मनोगतातला हा भाग 






२०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुढच्या आवृत्तीत निवडणुकांमधल्या अभूतपूर्व विजयाबद्दलचं एक प्रकरण जोडण्यात आलं. मोदींच्या जन्मापासून २०१४ पर्यंतच्या जीवनातले महत्त्वाचे टप्पे यात सविस्तर सांगितले आहेत. 

अनुक्रमणिका 



नरेंद्र मोदींचा मूळचा पिंड सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होण्याकडे कल असलेला. पण तरुण वयात संपर्कात आलेल्या अधिकारी व्यक्तींकडून त्यांना आपले जीवन समाजाभिमुख करण्याचा सल्ला मिळाला.  त्याबद्दलचा पुस्तकातला एक प्रसंग




आधी संघ स्वयंसेवक, संघ अधिकारी मग भाजप मध्ये कार्यकर्ता असा मोदींचा प्रवास सुरु झाला. आणीबाणीच्या काळात त्याविरुद्धच्या चळवळीत झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता दाखवणारा एक प्रसंग



स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाने, समर्पणाने गुजराथ राज्यातल्या भाजप संघटनेत त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. निवडणुका जिंकण्यामध्ये त्यांच्या व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. तरीही केशूभाई पटेल आणि शंकरसिंग वाघेला या बड्या प्रस्थांच्या गटबाजीत मोदींचा बळी गेला. दोन्ही बाजूंना ते आपले विरोधी आणि प्रतिस्पर्धी वाटत होते. आणि आज आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही अशी घटना घडली होती. मोदींची गुजराथ भाजप मधून दूर करण्यात आलं. त्यावेळच्या मोदींच्या भावना दाखवणारा हा प्रसंग 




मोदींना थेट उत्तरेत हरियाणा, हिमाचल, पंजाब इ. राज्यांत जबाबदारी देण्यात आली. तिथे सुद्धा त्यांनी चमकदार कामगिरी केली. पुढे गुजराथेतली राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी पक्षाला मोदींनाच पाचारण करावं लागलं. हा घटनाक्रम पुस्तकात सविस्तर आला आहे. 

मुख्यमंत्री झाल्यावर "गुजरात मॉडेल" आकार घेऊ लागलं. शेती, उद्योग, कौशल्य विकास, पर्यटन, ऊर्जा पुरवठा, दळणवळण प्रत्येक क्षेत्रात गुजराथ मध्ये नवनव्या योजना त्यांनी सुरू केल्या. नोकरशाहीला कामाला लावलं. तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल सेवा, ऑनलाईन माहिती, एक खिडकी योजनांतून सामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांचं "सरकारी काम" सोपं केलं. "गुजरात विकास प्रारूपा"च्या प्रत्येक पैलूवर स्वतंत्र प्रकरण आहे. योजना, त्यांचं स्वरूप, दिसलेले परिणाम हे सगळं सविस्तर समजावून दिलं आहे. 

नोकरशाहीची मानसिकता बदलली. प्रामाणिक अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या. निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं. त्याबद्दलच्या प्रकरणातला हा भाग 


जुनाट पद्धतीने विचार करून शेती व्यवसायाची जुनाट दुखणी दूर होणार होणार नाहीत हे ओळखून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी कल्पक कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याची एक झलक 



कमी चर्चिला जाणारा आणि दाखवायला आकर्षक नसणारा असा सामाजिक आरोग्याचा, स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराचा मुद्दा सुद्धा मोदींच्या नजरेतून सुटला नाही. त्यात खूप प्रगती बाकी असली तरी सुधारणेला सुरुवात झाली आहे. ती आकडेवारी एका प्रकरणात आहे. त्याबद्दल 

ह्या सगळ्या विकासकामांमधून गुजराथ मधल्या मुस्लिम समाजाचा सुद्धा विकास झाला. पुन्हा पुन्हा मोदी निवडणुका जिंकत राहिले. मुस्लिम बहुल भागातून सुद्धा भाजप जिंकू लागला. तरीही मोदी म्हणजे मुस्लिम विरोधी हे टुमणं चालूच. पण ज्यांनी खरंच मोदींचं काम बघितलं, प्रत्यक्ष संपर्क साधला त्या मुस्लिम व्यक्तींचं सुद्धा मतपरिवर्तन झाल्याचे कितीतरी किस्से या पुस्तकात दिले आहेत. त्यातली ही दोन पानं 



"बोलणाऱ्याची माती खपते पण न बोलणाऱ्याचे सोनेही खपत नाही" हा आपला अनुभव. मोदी मात्र सोनेरी काम करण्यात हुशार तितकेच बोलण्यात आणि कामाची जाहिरात करण्यात सुद्धा हुशार. त्या पैलूवर - मोदींचं गुजराथेतल्या आणि २०१४ च्या निवडणूक प्रचाराचं प्लॅनिंग , लोकांची नस ओळखून मुद्द्यांची निवड, प्रचाराची पद्धत - याबद्दल सुद्धा प्रकरणं आहेत. 

पुस्तक बारीक टायपातलं भलं मोठं आहे. पण माहितीने भरलेलं आहे. सुधीर जोगळेकरांनी केलेलं भाषांतर सुद्धा सोपं, सहज आहे. 

मोदी किती सांगोपांग विचार करू शकतात, नव्या कल्पना पुढे आणणाऱ्या लोकांना कशी मदत करतात आणि राज्याचा शब्दशः सर्वांगीण विकास कसा साधतात हे वाचून आपण थक्क होतो. इतक्या काय काय गोष्टी सुरु झाल्या होत्या की त्याची वरवर माहिती वाचताना सुद्धा आपण दमतो. तर हे सगळं घडवण्याचं किचकट काम सर्वाना बरोबर घेऊन, विरोध व टीका झेलून, अपयशाची शक्यता गृहीत धरून करताना मोदींची किती दमछाक झाली असेल !!  ह्या माहितीने मोदी विरोधी सुद्धा आपल्या विरोधाचा पुन्हा विचार करतील. गेला बाजार "मोदींचं सगळंच वाईट" ह्या मातापासून ढळून "त्यांचं बरंच चांगलं सुद्धा आहे" इतपत तरी येतील असं वाटतं.  सजग वाचकाला नक्की आवडेल.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


राशोमोन आणि जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha)

पुस्तक - राशोमोन आणि इतर जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha) लेखक - ऱ्युनोसुके अकुतागावा (Ryunosuke Akutagawa) अनुवाद - निसीम बेडेकर ...