सेर सिवराज है (Ser Sivaraj hai)





पुस्तक - सेर सिवराज है (Ser Sivaraj hai)
लेखक - प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar) 
भाषा - मराठी  (Marathi)
पाने - १३६
ISBN - 978-81-947875-3-2 

"इंद्र जिमि जंभ पार बाडव सुअंब पर .... सेर सिवराज है" हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचं वर्णन करणारं कवन खूप प्रसिद्ध आहे. हे कवन कवी भूषण यांनी लिहिलेलं आहे. जे शिवाजी महाराजांच्या पदरी कवी म्हणून उपस्थित होते. त्यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांवरच्या कवनांवरचं यांच्यावरचं हे पुस्तक आहे.  त्या कवनांतली भाषा जुनी मैथिली/व्रज बोली अर्थात जुनी उत्तर हिंदुस्थानी बोली आहे. त्यामुळे सर्वसाधारण मराठी माणसाला त्या कविता आता समजणं फार कठीण आहे. लेखकाने त्या कवितांचे  मराठीत भाषांतर दिलं आहे. 


लेखक हे हिंदी आणि मराठी भाषा तज्ज्ञ आहेत. त्यांनी "छावा", "श्रीमान योगी" या कादंबऱ्यांचे हिंदी भाषांतर केले आहे. पुस्तकात दिलेला त्यांचा परिचय. 


कवी भूषण यांच्या कवितांबद्दल पुस्तकात दिलेली पूर्वपीठिका वाचली की या कवनांचा अंदाज येईल 



वर दिल्याप्रमाणे प्रत्येक कविता रचताना काव्यरचनेसाठी कुठलातरी छंद किंवा अलंकार निश्चित करून त्यानुसार कवीने शब्दांची निवड केलेली आहे. त्यामुळे या पुस्तकात प्रत्येक कवितेच्या अलंकाराचं व्याकरणाच्या परिभाषेतलं नाव त्याचा अर्थ दिलेला आहे. मग मूळ कविता व त्यांनतर मराठी भाषांतर दिलं आहे. तो अलंकार कसा साधला गेला आहे हे स्पष्ट केलं आहे. शाळेत असताना शिकलेल्या उपमा, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, वक्रोक्ती ह्या कल्पना आठवतायत का ? त्यांची उजळणी होईल व बऱ्याच नव्या संज्ञा कळतील. 

कवितांमधल्या वर्णनानुसार मला तीन प्रकारच्या कविता वाटल्या. 

एखाद्या घटनेचा संदर्भ घेऊन शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे कौतुक करणाऱ्या कविता. उदा. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले ह्यातून त्यांचे चातुर्य दिसले; औरंगजेबाच्या भर दरबारात शिवाजी महाराजांनी त्याला खडे बोल सुनावले हे त्यांचे धैर्य, साल्हेर च्या लढाईत तुंबळ युद्ध झाले इ. 
उदा.  


दुसऱ्या प्रकारात शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे शत्रू सैन्य, सरदार कसे भयभीत झाले आहेत, दख्खनेत लढाईला यायला नाही म्हणतात, त्यांचे कुटुंबीय पराभवामुळे भयभीत झाले आहेत ह्या अर्थाच्या कविता 
उदा.   



तिसरा प्रकार म्हणजे कुठलीही एकच घटना न घेता "in general" शब्दांच्या फुलोऱ्यातून शिवाजी महाराजांचे कौतुक करणाऱ्या कविता 
उदा. 



कवी भूषण शिवाजी महाराजांच्या पदरी, दरबारात होते. त्यामुळे मला असं वाटलं होतं की महाराज प्रत्यक्ष कसे दिसत, कसे वागत याचं खरंखुरं वर्णन कवितांमध्ये असेल. एखाद्या प्रसंगाचा "आँखो देखा हाल" असेल. पण त्या बाबतीत ह्या कवितांनी निराशा केली. अतिशयोक्त वर्णनं, उपमांचे फुलोरे आणि शब्दांचे खुळखुळे असंच कवितांच स्वरूप वाटलं. वर्णन सुद्धा खूप साचेबद्ध. जसं की - राजा म्हटला की तो पाण्यासारखा पैसा दानधर्मात घालवणार. हत्ती दानात देणार. राजाची राजधानी म्हटलं की स्वर्गाला लाजवेल अशी. हिऱ्यामाणकांनी सववलेले महाल आणि रूपवान स्त्रियांचा वावर असणारी. पण हे वर्णन  "श्रीमान योगी" असणाऱ्या राजांचं, त्यांच्या "दुर्गदुर्गेश्वर" रायगडाचं असेल असं पटत नाही. त्यांची जनतेच्या सेवेची आस बघता पैशाची उधळपट्टी झाली असेल हे पटत नाही. तसंच, शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे घाबरून शत्रूचे सरदार कुटुंबकबिल्यासह डोंगरदऱ्यात राहतायत असं वर्णन आहे. असे कोण राहिले होते ? किती राहिले होते ? शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार बघता, स्वाऱ्या बघता असं खरंच झालं होतं का ही उगीच हवेत पतंगबाजी ? पोवाड्यांप्रमाणे एका एका घटनेचं सविस्तर वर्णन असा प्रकारही नाही. त्यामुळे पोवड्यांमध्ये थोडीफार कल्पनिकता असली, घटना जरा चढवून सांगितलेल्या तरी ते जास्त आकर्षक वाटतात.

खरं बघितलं तर "अफजखानाचा कोथळा काढला", "लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं तोडली", "बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटले", "रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली" ही तथ्य सांगणारी साधी वाक्यसुद्धा रोमांचकारी आहेत. त्यांना कवीच्या बेगडाची गरज नाही असं वाटलं. चारपाच कविता वाचल्या की तोचतोचपणाचा खूप कंटाळा येतो. 

त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून कविता वाचण्यात अर्थ नाही. केवळ शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पण शब्दचमत्कृती दाखवणाऱ्या, कवीचं शब्दसामर्थ्य दाखवणाऱ्या, जुन्या भाषेची गंमत दाखवणाऱ्या कविता म्हणून निखळ साहित्यिक हेतूने कविता वाचल्या तर काव्यशास्त्रविनोदाचा आनंद घेता येईल. ".. सेर सिवराज है" , "अगर न होता शिवाजी तो सुन्नत होती सबकी" ह्या गाजलेल्या ओळींच्या मूळ कविता वाचता येतील. तसंच हा ऐतिहासिक दस्तऐवज मराठीत आणून लेखकाने मोठं काम केलं आहे ते ही वयाच्या नव्वदीत. ज्ञानतपस्वीच्या परिश्रमाला दाद दिली पाहिजे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...