The bestseller she wrote (द बेस्टसेलर शी रोट )

 



पुस्तक - The bestseller she wrote (द बेस्टसेलर शी रोट )
लेखक - Ravi Subramanian (रवी सुब्रमण्यन )
भाषा - English (इंग्रजी )
पाने - 391
ISBN - 978-93-85152-38-2


कादंबरीचं कथा सूत्र साधारण असं आहे ->
आदित्य कपूर नावाचा प्रथितयश सर्वाधिक खपाचा लेखकाची एका तरुण मुलीशी ओळख होते. ती मुलगीही भरपूर वाचणारी, काही लिहू पाहणारी आणि विशेष म्हणजे सुंदर आकर्षक. आदित्य लग्न झालेला, एक मुलगा असेलेला असला तरी तिच्याकडे ओढला जातो. त्या मुलीची सुद्धा आदित्यसारखं "बेस्ट सेलर" व्हायची तीव्र इचछा असते. आदित्यशी सलगी वाढवून त्याच्या ओळखीने ह्या क्षेत्रात झटक्यात यश पदरात पाडून घेण्याच्या दिशेने तिची पावले पडू लागतात. वाहवत जातात. त्याचे बरे वाईट परिणाम होतात. त्यांच्या या प्रेमप्रकरणाचा परिणाम त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींवरही होतो आणि इतरांच्या वागणायचा परिणाम ह्या प्रेम प्रकरणावर. त्यामुळे जितकं वरवर दिसतं तितकंच घडत नाही. काही अनपेक्षित घटना घडतात. 

मग श्रेयाचं पाहिलं पुस्तक प्रकाशित होतं का ? श्रेया-आदित्यच्या संबंधांचा परिणाम आदित्यच्या वैवाहिक आयुष्यावर काय होतो ? हे संबंध लपून नाही राहिले तर त्याचा परिणाम आदित्यच्या "मोठा लेखक" या प्रतिमेवर काय होतो ? दुसरे कोणी याचा फायदा उचलतात का ?
हे सगळं मी सांगून रसभंग करत नाही. त्यासाठी कादंबरी वाचा 


कादंबरीची भाषा सोपी इंग्रजी आहे. पात्रांची नावं आणि त्यांची थेट ओळख करून दिलेली आहे. हे मला बरं वाटलं. नाहीतर भारतीय इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात किचकट शब्द वापरुंन पांडित्यदर्शन असतं. बऱ्याचवेळा पात्र परिचय करून देतच नाहीत. नक्की बाई आहे का पुरुष; लहान आहे का मोठा; ह्याचा आपणच अंदाज करत बसायचा. एक असं पुस्तक मी नुकतंच अर्ध्यावर सोडलं. पण त्याबाबतीत हे पुस्तक चांगलं आहे. 


आदित्य आणि श्रेयाचा एक प्रसंग 






मुख्य पात्र लेखक असल्यामुळे लेखन-प्रकाशन व्यवसायातील व्यावसायिक गणितं आणि "आतल्या गोष्टीं"बद्दल ओघात काही लिहिलं गेलं आहे. असाच एक प्रसंग. 





आदित्य या पात्राच्या मनात चालणारे विचार कादंबरीत थोडेफार येतात पण इतर पात्रांबद्दल फारसं चित्रण नाही. कादंबरीचा भर प्रसंगावर आणि कथानक वेगात पुढे जाण्यावर आहे. त्यामुळे त्यातलं रहस्य किंवा पात्रांचं वागणं लेखक सांगेल तसं गृहीत धरून पुढे जावं लागतं.

कादंबरी छोट्या छोट्या प्रसांगातून पुढे जाते. पुढे काय घडेल काय घडेल याचा अंदाज येतो तरी ने नक्की कसं घडलं असेल हे वाचत राहावंसं वाटतं. शेवटी शेवटी प्रसंग अनपेक्षित वळणं घेतात. त्यामुळे कधी नव्हे ते ४०० पानी इंग्रजी पुस्तक इतक्या लवकर वाचून संपलं. तुम्हालाही सहज विरंगुळा म्हणून वाचायला आवडू शकेल.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)

पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी पाने - २३९ प्रकाशन - मेहता पब...