लडाख : एक उत्तुंग स्वप्न (Ladakh : Ek Uttunga Swapna)पुस्तक - लडाख : एक उत्तुंग स्वप्न (Ladakh : Ek Uttunga Swapna)
लेखक - सागर रायकर (Sagar Raykar) 
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ९०
ISBN - दिलेला नाही 


माझा नातेवाईक - सागर रायकर - काही वर्षांपूर्वी लडाखच्या बाईकराईडवर गेला होता. ठाणे-लडाख-ठाणे असा प्रवास त्यांनी बाईकवरून अठरा दिवसात केला होता. त्या प्रवासातून आल्यावर प्रवासातल्या काही गमतीजमती आम्हाला सांगितल्या होत्या. खूप मजा आली होती ऐकायला. त्या सगळ्या आठवणी आणि बरंच काही असं आता ई-पुस्तकाच्या रूपात त्याने प्रकाशित केलं आहे. सध्या ॲमेझॉन किंडल वर त्याचं हे ई-पुस्तक उपलब्ध आहे. ते बघण्यासाठी लिंक


पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती 

अनुक्रमणिका प्रवासाच्या आधीच्या तयारीपासून कथनाला सुरुवात केली आहे. त्याच्या चमूची ओळख करून दिली आहे आहे. मग पुढचे अठरा दिवस काय काय घडलं याचं धावतं समालोचन आहे. प्रवासाच्या टप्प्यांची माहिती देताना रोजचा तोच तोचचा दिनक्रम टाळून महत्त्वाचे मुद्दे आणि अनुभव सांगितले आहेत. प्रवासात घडलेले धमाल प्रसंग सांगितल्यामुळे हे पुस्तक रुक्ष माहितीपुस्तक राहत नाही, मजेदार प्रवासवर्णन होतं. फक्त धमालच नाही तर आलेल्या अडचणी आणि झालेली फटफजिती सुद्धा त्याने खिलाडूवृत्तीने मांडली आहे. 

हे पुस्तक वाचताना तर आम्हाला आमच्या गप्पांचीच आठवण आली. सागरने जणू त्या मोकळ्याढाकळ्या गप्पा तश्याच साध्यासरळ शब्दात मांडल्या आहेत असं वाटलं. त्रयस्थ वाचकालाही तो आपल्याशी गप्पा मारतोय असंच वाटेल. ही थोडी पाने वाचून बघा. 

चारपाच जणांनी एकत्र जायचं तर परस्पर संवाद राहिला पाहिजे. उन्हातान्हात तापल्या रस्त्यांवरून जाताना पाणी पाहिजे. त्याची तयारी कशी केली याबद्दलची एक झलक होता होता टळललेला अपघात 


प्रवास प्रत्येकवेळी नीटच होईल असं नाही. कधी गाडी बिघडू शकते नाहीतर कधी तब्येत बिघडू शकते. त्यावर उपचार तर केलाच पाहिजे पण मनालाही उभारी दिली पाहिजे. तरच प्रवास सुरु ठेवता येईल. सश्रद्ध लेखकाचा हा एक अनुभव त्यांच्या सहलीत प्रत्यक्ष स्थलदर्शनाला जास्त वेळ ठेवला नव्हता. जातायेता बघणं झालं तेच. ह्या प्रवाश्यांना आजूबाजूला काय दिसलं असेल ह्याची कल्पना फोटोंमधून येते. पुस्तकात फोटो पण भरपूर आहेत. युटूयुब व्हीडीओच्या लिंक्स आहेत.  
छायाचित्रांना शीर्षकं देतानासुद्धा सागरची धमाल शैली दिसेल तुम्हाला. 


पुस्तकाच्या शेवटच्या भागात सागरने आपल्या अनुभवातून काही सल्ले दिले आहेत. सहलीचं नियोजन कसं करावं; काय करावं काय टाळावं;कोणत्या वस्तू बरोबर घ्याव्यात हे अगदी तपशीलवार दिलं आहे. सहलीसाठी तब्येतीची कशी तयार केली आणि प्रत्यक्ष प्रवासांच्या दिवसात काय व्यायाम करावे हे सुद्धा दिलं आहे. उदा. 


होतकरू रायडर्स ना हा अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आपल्याला अशी रस्तेसहल झेपेल ना हे चाचपून बघायला सागरचे हे सल्ले कसोटी म्हणून वापरता येतील. मी त्यात नापास झालो :) म्हटलं, इतका त्रास घेण्यापेक्षा थेट विमान, ट्रेन, चारचाकीनेच तिथपर्यंत जावं आणि तिथे फिरावं. उगाच का त्रास घ्या रायडिंगचा. पण ज्यांना हा प्रवास "त्रास" वाटत नाही तेच तर रायडर्स ना !! म्हणून तुम्ही तुमचं ठरवा.

पाहिलंच पुस्तक प्रकाशित होत असताना देखिल सागरचा लिखाणातला आत्मविश्वास आणि शैली तुम्हाला आवडेल. पुस्तक १०० पानी असलं तरी मोठ्या टाइपातलं असल्यामुळे छापील पुस्तकाच्या तुलनेत तितका मजकूर नाही. ही छोटी पुस्तिका पटकन वाचून होईल. 


सध्या ॲमेझॉन किंडल वर त्याचं हे पुस्तक उपलब्ध आहे. ते बघण्यासाठी लिंक


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...