महाराष्ट्राचा चिंतामणी लोकसत्ता विशेषांक (Maharashtracha Chintamani Loksatta Special edition)


पुस्तक -महाराष्ट्राचा चिंतामणी लोकसत्ता विशेषांक (Maharashtracha Chintamani Loksatta Special edition)
भाषा - मराठी (Marathi)
संपादक - गिरीष कुबेर (Girish Kuber)
पाने - १३०
ISBN - दिलेला नाही 

चिंतामण द्वारकानाथ देशमुख अर्थात सी.डी. देशमुख हे भारताचे थोर सुपुत्र. आज साठ-सत्तरीत असलेल्या मराठी व्यक्तींना हे नाव आणि त्यांचं कर्तृत्व थोडं बहुत माहिती असेल पण त्यांनंतरच्या पिढीला हे नाव माहीत असण्याची शक्यता फार कमी. त्यामुळे आधी ते कोण होते हे थोडक्यात सांगतो म्हणजे वाचकांना पुढे दिलेल्या परीक्षणाचा योग्य संदर्भ कळेल.

सी.डी. देशमुख म्हणजे...
मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावे यामागणीला
 पाठिंबा म्हणून आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन जवाहरलाल नेहरूंचा जाहीर निषेध करणारे बाणेदार व्यक्तिमत्व
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर 
प्रजासत्ताक भारताचे (एकोणीसशे पन्नास नंतरचे) पहिले अर्थमंत्री (१९५०-५६)
नियोजन आयोगाचे संस्थापक सदस्य
वर्ल्ड बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थावरचे भारतीय प्रतिनिधी
विद्यापीठ अनुदान आयोगाचे(UGC) माजी अध्यक्ष
नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया इंटरनॅशनल सेंटर सारख्या प्रथितयश संस्थांचे संस्थापक अध्यक्ष
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू
संस्कृत भाषा प्रेमी भाषांतरकार

.... 
अगदी जुजबी ओळख करून द्यायची म्हटले तरी इतकं लिहिल्याशिवाय पर्याय नाही. हे फक्त हिमनगाचं टोक आहे. अशा सीडी देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त लोकसत्ताने हा विशेषांक प्रकाशित केला आहे. सीडींची बहु अंगाने ओळख करून देण्याचा हा लोकसत्ताचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहेच आणि तो झालाही आहे तसाच अर्थपूर्ण व सुंदर. त्याबद्दल संपादक गिरीश कुबेर आणि सर्व लोकसत्ता चमूचे एक वाचक म्हणून सर्वप्रथम आभार मानतो.

आता या विशेषांका बद्दल सांगतो 
सीडींवर च्या लेखांचा हा संग्रह आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया


यातल्या काही महत्वाच्या लेखांबद्दल सांगतो.
सीडींच्या आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती देणारे लेख
- "द्रष्टे अर्थशास्त्री" प्राध्यापक नीळकंठ रथ
- " समन्यायी प्रशासक" राहुल बजोरिया
- "उत्क्रांतीवादी अर्थ प्रशासक" एस एल एन सिम्हा
- "भारताचे अस्सल प्रबोधन पुरुष" अजित रानडे
- " धोरण संशोधनाचे मेरूमणी" डॉ विजय केळकर

रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून बँकेच्या कामाला आकार देणे, त्यात संशोधनात्मक कामाला प्रोत्साहन देणे, वर्ल्ड बँक आणि आयएमएफच्या कामातील योगदान, रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण, एलआयसी चे राष्ट्रीयीकरण, बँकिंग कंपनी ची निर्मिती, IFCI, ICICI ची स्थापनेतील सहभाग इत्यादी अनेक तपशील या लेखात आहेत इत्यादींची माहिती आहे

"द्रष्टे अर्थशास्त्री" लेखातील एक पान

" समन्यायी प्रशासक" लेखातील एक पान


अर्थमंत्री असताना आणिअर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर ते सक्रीय राजकारणातून दूर गेले असले तरी आयुष्यात त्यांनी कितीतरी संस्था उभारल्या नावारूपाला आणल्या. त्यांच्या या रचनात्मक कामाबद्दल माहिती देणारे लेख
"संस्थात्मक स्वातंत्र्याचे सर्जनशील संवर्धक" निरंजन राजाध्यक्ष
"विद्वान सर्वत्र पूज्यते" डॉ. रूपा रेगे नित्सुरे

राजाध्यक्ष यांच्या लेखातील काही भाग


चिंतामणरावांशी भेट झालेल्या, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेल्या लोकांनी जागवलेल्या 
त्यांच्या आठवणी
"बुद्धिमान अर्थमंत्री" - आय जी पटेल
"जीवनाला दिशा देणारी भेट" - एन. एन. व्होरा
"सी.डीं. ची विलोभनीय रूपे" - डॉ. न. गो. राजूरकर
"आमचे सहजीवन" - दुर्गाबाई देशमुख (देशमुखांच्या पत्नी)
" अर्थमंत्री यांबरोबर याची दोन वर्षे" - पी.डी. कसबेकर
"चिंतामणी देशाचा कंठमणी" - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे 

ह्यात त्यांची चिकित्सक वृत्ती, निसर्गप्रेम, भाषाप्रेम, समर्पित वृत्तीने काम करणे, खोलात जाऊन संशोधन करणे असे अनेक गुण दिसतात.

"चिंतामणी देशाचा कंठमणी" आचार्य प्रल्हाद केशव अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी देशमुख यांनी दिलेला राजीनामा यामुळे चळवळीला वेगळेच बळ आणि नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले सीडींची मुक्तकंठाने स्तुती करणारा आचार्य अत्रे यांचा हा लेख तसेच त्या वेळी दिल्लीत मोठा सत्याग्रह करण्यात आला त्याचे वर्णन या लेखात आहे.

देशमुखांच्या पत्नी दुर्गाबाई स्वतः विद्वान, सामाजिक कार्यकर्त्या, संसद सदस्या, नियोजन आयोगाच्या सदस्या होत्या. कामानिमत्ताने त्यांची ओळख झाली आणि देशमुखांनी त्यांना मागणी घातली. दुर्गाबाईंच्या दीर्घ लेखात अनेक आठवणींना उजाळा दिलेला आहे. दोघांच्या सामाजिक, राजकिय कामाबाबद्दल आहेच आणि घरगुती सुद्धा. उदाहरणादाखल ही दोन पाने.चिंतामणरावांच्या भाषा प्रेम साहित्य प्रेम निसर्गप्रेम याबद्दलचे लेख
"विदग्ध संस्कृत प्रेमी" प्रा डॉ मंजुषा गोखले
"बालपणात हरवलेले चिंतामणराव" डॉक्टर श्रीनिवास वेदक
"चिंतामणी रावांची ग्रंथसंपदा" दुर्गाबाई देशमुख
चिंतामणराव संस्कृत फ्रेंच जर्मन जाणत होते त्यांनी स्वतः संस्कृत मध्ये काव्यरचना केली आहे. संस्कृत काव्यांचे मराठी व इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. मेघदूताचे मराठी भाषांतर गांधीजींच्या विचारांवर शंभर संस्कृत सुभाषितांची रचना इत्यादी कितीतरी साहित्य आहे आपल्या भाषणांमध्ये हि संस्कृत वचनांचा खुबीने वापर करत आपल्या पत्नीला मागणीसुद्धा त्यांनी संस्कृत मध्ये घातली होती. मंजूषा गोखले यांनी त्यांच्या लेखात देशमुख यांच्या संस्कृत साहित्याचा आढावा घेतला आहे आणि त्याच्या उणीवा आणि बलस्थाने यांचा ऊहापोह केला आहे त्यातली
 ही पाने


चिंतामणराव यांचे स्वतःचे लेखन किंवा वक्तृत्व
"पाकिस्तानचा न्याय्य वाटा मुंबईचे अलगीकरण वगैरे वगैरे" 
"आर्थिक धोरणातील नियंत्रणाची भूमिका"
"विद्यापीठे व राज्यसंस्था"

"पाकिस्तानचा न्याय्य वाटा मुंबईचे अलगीकरण वगैरे वगैरे" लेखात देशमुखांच्या मुलाखतीतील काही भाग आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर रिझर्व बँकेचे विभाजन झाले. काही काळ पाकिस्तान रिझर्व बँक आणि भारताचे रिझर्व बँक दोन्हीचे ते प्रमुख होते. त्या कर्तव्यानुसार पाकिस्तानला पंचावन्न कोटी देणे होते, ते दिले गेले पाहिजे असा देशमुखांचा आग्रह होता. त्याबद्दल आणि राजीनामा प्रसंगाबद्दल त्यांची बाजू लेखात आले आहे.
सी.डी. गौरव पर लेख
"सी डी विरळा तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व" - उद्धव ठाकरे
" निसर्ग आणि पुस्तकप्रेमी" - देवेंद्र फडवणीस
"चिंतामणराव चुकलेच" गिरीश कुबेर 
" विस्मरण महाराष्ट्राचे" माधव गोडबोले
यांचेही आहेत

चिंतामणराव चुकलेच" लेखात  गिरीश कुबेर चिंतामणरावांचे बहुअंगी कर्तृत्व महाराष्ट्र विसरला ही खंत मांडतात.

हा गौरव ग्रंथ स्वतंत्र लेखांचा संग्रह आहे. प्रत्येक लेखकाने थोडक्यात का होईना देशमुखांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अर्थमंत्री पदावरची मुख्य कामे, राजीनामा प्रकरण, संस्था उभारणी यांची माहिती पुन्हा पुन्हा आली आहे. ते टाळून त्याऐवजी अजुन लेख, जास्तीची माहिती मिळाली असती का असा
 वाचक म्हणून माझ्या मनात विचार आला.

दुसरे म्हणजे अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांनी संसदेत सडेतोड भाषण केलं आणि नेहरू हे एकाधिकारशाही पद्धतीने वागत आहेत असा जाहीर आरोप केला. आपली भूमिका महाराष्ट्र किंवा गुजरात यातल्या एकाच्या बाजूने नाही तर मुंबई केंद्रशासित करण्याच्या नेहरूंच्या एकतर्फी निर्णयाच्या विरुद्ध आहे हे त्यांनी मांडले. या भाषणाचा आणि त्याच्या प्रभावाचा उल्लेख बऱ्याच वेळा लेखांमध्ये आला आहे. त्यामुळे ते भाषण संक्षिप्त स्वरूपात का होईना या अंकात यायला हवे होते.

सीडींच्या जीवनाचे महत्त्वाचे टप्पे मांडणारी कालसूची/कालानुक्रम द्यायला हवा होता. म्हणजे पूर्ण कार्य एका नजरेत बघता आलं असतं त्यांनी किती वर्ष देशसेवा केली आणि एका वेळी किती वेगवेगळी कामं ते करत होते ते अजून परिणामकारकरित्या मांडलं गेलं असतं.

त्यांच्या नावाने अस्तित्वात असलेल्या संस्था, सार्वजनिक ठिकाणे, पुरस्कार किंवा व्याख्यानमालादी उपक्रम हे थोडक्यात देता आले असते तर त्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे आपण सध्या किती छोट्या स्वरूपात स्मरण करतो आहे अजून प्रकर्षाने जाणवले असते.

असो. लोकसत्ताने या महत्त्वाच्या तरीही विस्मृतीत गेलेल्या विषयाला हात घातला हेच महत्वाचं आणि इतका सुंदर विशेषांक तयार केला हेच कौतुकास्पद. अंकात बरेच जुने फोटो सुद्धा आहेत त्यामुळे तो प्रेक्षणीय देखील आहे. उदा. रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून देशमुखांची सही असलेली जुनी नोट


या विशेष अंकाची कल्पना आपल्याला आली असेलच अतिशय वाचनीय आणि संग्राह्य असा हा विशेषांक आहे लोकसत्ता परिवाराने हा आगळावेगळा उपक्रम राबवून वाचकांना मोठी भेट दिली आहे अनेक वाचक हा विशेषांक वाचून चिंतामणरावाबद्दल अजून वाचायला उद्युक्त होतील आणि प्रेरणा घेतील हीच सदिच्छा.

हा अंक कुठे मिळेल ? 
मला तर आमच्या नेहमीच्या पेपरवाल्यांच्या स्टोलवर मिळाला. तुम्ही सुद्धा तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे चौकशी करा. अन्यथा लोकसतात दिलेल्या पुढील क्रमांकांवर संपर्क साधून बघा ———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-No comments:

Post a Comment

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...