ब्राह्मोस Brahmos

 




पुस्तक - ब्राह्मोस (Brahmos)
लेखक - ए. शिवतनू पिल्लई (A. Sivathanu Pillai)
भाषा - मराठी (Marathi)
अनुवादक - अभय सदावर्ते (Abhay Sadavarte)
पाने - ३२३
मूळ पुस्तक - Brahmos
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी
ISBN - 978-93-90324-29-3


"ब्राह्मोस" हे भारतात तयार झालेलं अतिशय आधुनिक क्षेपणास्त्र आहे. आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे, जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र ! ह्या क्षेपणास्त्रापेक्षा चांगलं क्षेपणास्त्र कुठल्याही देशात नाही. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पातून हे विकसित झालं. ह्या प्रकल्पाचे प्रमुख ए. शिवतनू पिल्लई यांनी ह्या "ब्राह्मोस" च्या जन्माची आणि त्याच्या विकासाची अतिशय सविस्तर माहिती देणारं हे पुस्तक लिहिलं आहे. इंग्रजीमध्ये म्हणतात तसं "फ्रॉम हॉर्स'स माऊथ" ही थरारक तंत्रकहाणी आपल्याला वाचायला मिळते. लेखक आपल्या मनोगतात म्हणतात की, भारताला हजारो वर्षांपासून विज्ञान-तंत्रज्ञान मोठी परंपरा आहे. पण दस्तऐवजीकरण न करण्याची प्रवृत्ती, त्यात झालेली हयगय आणि परकीय आक्रमणांमुळे झालेला विध्वंस, लूट यामुळे आपल्या हातात त्या सुवर्णकाळाचे तपशीलवार ज्ञान नाही. यापुढे तरी भारतीयांनी अशी हयगय करू नये. ह्यादिशेने एक पाऊल म्हणून "ब्राह्मोस" सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल त्यांनी स्वतः सविस्तर लिहिले आहे. श्री. अभय सदावर्ते आणि राजहंस प्रकाशन यांनी हे ज्ञान मराठीत आणून लेखकाच्या प्रामाणिक प्रयत्नांना बळ दिलं आहे.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


अनुक्रमणिका




मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील अंश. ब्राह्मोसचं सामरिक आणि भावनिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे.


पुस्तकात सुरवातीला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांत आपल्याला सामोरे जावे लागलेल्या युद्धांचा गोषवारा घेतलाय. एकूणच जगात चालणारी युद्ध, त्यात होणारा क्षेपणास्त्रांचा वापर, भारताची पिछाडी आणि आयातीवर अवलंबित्त्व, काही फसलेले संशोधन प्रकल्प ह्याचा आढावा घेतलाय. त्यातून एका अद्ययावत क्षेपणास्त्राची गरज अधोरेखित केली आहे.

उदा.  अमेरिकेने तंत्रज्ञान द्यायला नकार दिल्याने भारताला स्वतःला एक महासंगणक बनवावा लागला तो प्रसंग 




पिल्लई ह्यांच्या रशियन शास्त्रज्ञांशी संवादात, आपल्याला ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे त्याचा काहीभाग रशियाकडून घेता येऊ शकतो अशी शक्यता दिसली. तिथून ह्या प्रकल्पाचे बीजारोपण झाले. मग दोन्हीकडचे शास्त्रज्ञ, राजकारणी, नोकरशहा आणि कायदेकानू ह्यांच्या चर्चांच्या अनेक फैरी झाडल्या. एक नवीन कंपनी रजिस्टर झाली ब्राह्मोस नावाने. भारतीय सरकारी गुंतवणुकीतून तरीही ५०.५०% ठेवून ही "खासगी" कंपनी वर्गात मोडली जाते. ज्यातून "सरकारी कंपनी"मधला बोजडपणा टाळता आला. ही प्रक्रिया, त्यावेळच्या राजकारण्यांचा सकारात्मक प्रतिसाद, ब्राह्मोस हे नाव कसं आलं, गोपनीयता कशी पाळली गेली हा रोचक इतिहास ह्यात आहे.

आत्ता पर्यंत आपण पुस्तकाच्या विषयवस्तूच्या इतिहास, भूगोलात होतो. पुढच्या प्रकरणांत आपण खऱ्या अर्थाने ब्राह्मोसच्या अंतरंगात प्रवेश करतो. ब्राह्मोस मध्ये काय तंत्रज्ञान वापरलं आहे, कुठल्या वैज्ञानिक तत्वांवर ते चालतं, त्यातलं इंजिन कसं चालतं, सेन्सर वापरून क्षेपणास्त्राचा मार्ग कसा निश्चित केला जातो, अत्युच्च तापमान सहन करण्यासाठी कुठले पदार्थ वापरले आहेत इ. बरंच ह्या पुस्तकात आहे.

उदा. ब्राह्मोसच्या अंतर्गत रचनेबद्दल 




ब्राह्मोसच्या वैशिष्ट्यांबद्दल 





पुढे ब्राह्मोसच्या चाचण्या घेतल्या गेल्या त्यात आलेलं यशापयश, झालेली टीका त्यातून ह्या टीमचं सावरणं, चाचण्या घेताना निसर्गसुद्धा कशी परीक्षा घेत होता ह्याचे थरारक अनुभव आहेत.





ब्राह्मोस मुळे अत्याधुनिक क्षेपणास्त्र तर मिळालंच पण दोन देशांमधल्या सहकार्याचे नवे प्रारूप जगासमोर आले. भारताला नवे तंत्रज्ञान मिळाले. एकमेकांची कार्यपद्धती शिकता आली. 
सरकारी कंपनी नसल्यामुळे इतर खासगी उद्योजकांकडून आवश्यक ते सुटे भाग आणि पदार्थ घेणं सोपं झालं ज्यामुळे उद्योगांची मोठी परिसंस्था तयार झाली. प्रकल्पाचे हे अप्रत्यक्ष फायदे सुद्धा समजावून सांगितले आहेत.

सहकार्य दोन देशांमधलं म्हणजे शेवटी दोन माणसांमधलं. भाषा, संस्कृती, खानपान आणि हवामान भिन्न असणाऱ्या लोकांमधलं. त्यामुळे काही अडचणी निर्माण होणारच, त्याच्या दोनतीन गमतीजमती दिल्या आहेत. उदा. 
       



इतकं सगळं वाचल्यावर जिज्ञासू वाचकाच्या मनात, आता पुढे काय? हा प्रश्न नक्कीच येईल हे ताडून ब्राह्मोस मध्ये काय तंत्रसुधारण होणं अपेक्षित किंवा कल्पित आहे हे शेवटच्या प्रकरणात आहे.

अश्याप्रकारे ब्राह्मोसपूर्वी, ब्राह्मोस तयार होताना आणि इथून पुढे असा भूत-वर्तमान-भविष्य काळांत आपण सफर करतो. 

एखादी गोष्ट खूप कठीण नाही असं सांगायचं असेल तर आपण म्हणतो, "It is not that difficult. It is not a rocket science !" थोडक्यात "रॉकेट सायन्स" म्हणजे क्लिष्टतेची परमावधी. आता पुस्तकाचा विषयच तो आहे म्हटल्यावर त्यातले तपशील क्लिष्ट असणारच. लेखकाने तो सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे. पण कुठल्याही आकृत्या, तक्ते नसल्यामुळे ते समजणं कठीणच जातं. पुस्तकात खूप तांत्रिक संज्ञा, लघुरूपे, आराखडे येतात. त्याच्या भडिमारामुळे तपशील लक्षात राहत नाही. केवळ गोषवारा लक्षात राहतो. हा भाग थोडा कमी आणि आकृत्यांच्या आधारे थोडा सोपा करायला हवा होता. 

पुस्तकात एकही फोटो नाही. ना लेखकाचा ना ब्राह्मोसचा. प्रकल्पाचा इतिहास मांडताना तेव्हाचे फोटो असणं आवश्यक होतं. ही मोठी उणीव आहे. 

पुस्तकात रशिया-भारत ह्यांच्यातील सहकार्य, ब्राह्मोसची वैशिष्टये आणि काही तांत्रिक तपशील इ. मुद्द्यांची पुनरुक्ती फार वेळा आहे. तो भाग जरा छाटायला हवा होता. 

पुस्तक खूप महत्त्वाचं आहे पण त्याची सोपी, सचित्र पण संक्षिप्त आवृत्ती यायला हवी असं वाटतं. जेणेकरून तंत्रज्ञानाशी फार संबंध नसलेल्या वाचकांना पचायला सोपं तरी महत्त्व अधोरेखित करणारं पुस्तक ठरेल. 

सध्यातरी जिज्ञासू वाचकांनी हे पुस्तक नक्की वाचावं. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)

पुस्तक - सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara) लेखक - बेन्यामिन (Benyamin) अनुवादक - ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Th...