मी, मनु आणि संघ (Mi, manu ani Sangh)




पुस्तक - मी, मनु आणि संघ(Mi, manu ani Sangh)
लेखक - रमेश पतंगे (Ramesh Patange)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४३
प्रकाशन - मोरया प्रकाशन (वर्ष १९९६)

ISBN - दिलेला नाही


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या देशव्यापी संस्थेवर असे आरोप नेहमी केले जातात की ती जातीयवादी आहे, मनुवादी, दलितविरोधी आहे इ. पण ह्या टीकेमागे वस्तुस्थितीचं भान आहे; का केवळ आकस आणि संघाची प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश ? प्रत्यक्ष संघाच्या कामात हिंदूंमधील उच्चनीचतेला स्थान आहे का ? भेदभाव केला जातो का ? कनिष्ठ जातीतल्या किंवा मागास जातीतल्या स्वयंसेवकांचा खरा अनुभव काय आहे ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर "मी मनु आणि संघ" हे एक वाचनीय पुस्तक. आहे पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे हे बहुजन समाजातले; झोपडपट्टीत, गरीबीत वाढलेले. पण लहानपणीच त्यांची शाखेशी ओळख झाली. शाखा त्यांना आवडू लागली. ते शाखेत जात राहिले. मनोभावे काम करत राहिले. त्यातून संघ पदाधिकारी म्हणून त्यांची वाटचाल झाली. "सामाजिक समरसता मंच" ह्या संघपरिवारातल्या संस्थेच्या स्थापनेत व ती वाढवण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. ह्या मंचाच्या माध्यमातून संघकामाला दलितप्रश्नाशी अजून संमुख करण्याचं काम त्यांनी केलं. १९९६ साली प्रकशित झालेल्या ह्या पुस्तकात पतंगे ह्यांच्या तोवरच्या वाटचालीचा मागोवा त्यांनी घेतला आहे. इतक्या वर्षांत त्यांना संघकामात कधीही न आलेला जातीयतेचा अनुभव त्यांनी अधोरेखित करून संघ मनुवादी, जातीयवा
दी कसा नाही हे स्पष्ट केले आहे. त्याच बरोबरीने; स्वतःला पुरोगामी म्हणवणारी मंडळी; समाजवादी आणि कम्युनिस्ट हे संघाला, स्वयंसेवकांना कसे अस्पृश्य समजत ह्याचे त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य ह्यांचा घोष करणारे विचारवंत आणि पत्रकार तेव्हाच्या काँग्रेस-पवार सरकारच्या कृपेसाठी जातीयवादाला कसे खतपाणी घालत होते ह्याचेही अनुभव सांगितले आहेत.

आज २०२२ मध्ये चित्र पूर्ण बदललं आहे. छद्म-पुरोगामी आज केंद्रीय सत्तावर्तुळाच्या बाहेर आहेत. एकेकाळी समाजवादी आणि कम्युनिस्टांची मक्तेदारी असलेल्या संस्थांमध्ये आज आज संघविचारांचा प्रभाव वाढतो आहे. भारतीय व्यवस्थांचा लंबक आज दुसऱ्या बाजूला झुकला आहे. हे सत्ता परिवर्तन आणि त्याहून महत्त्वाचं व्यवस्था परिवर्तन घडण्यासाठी रा.स्व.संघ किती दूरदृष्टीने आणि संयमाने काम करत होता हे पतंगे ह्यांचे ८०-९० च्या दशकातले अनुभव वाचताना आपल्याला जाणवते.

काही पाने उदाहरणादाखल बघूया.

इतर स्वयंसेवकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे लहानपणच्या लेखकाशी प्रेमळ व्यवहार. मोठेपणी कळलं की ते वेगळ्या जातीचे, सवर्ण समाजातले. आणि मग जाणवलं की ती गोष्ट किती मोठी सामाजिक क्रांतिकारी होती.






लेखकाने हेही निरीक्षण नोंदवलं आहे की त्याकाळात आंबेडकरांचं नाव; त्यांचे विचार हे संघाच्या बौद्धिक चर्चांमध्ये येत नसे. मोठेपणी मग आंबेडकरांच्या लेखनाशी ओळख झाली. सुरुवातीला सर्वसामान्य स्वयंसेवकांचं आंबेडकरवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि बाबासाहेबांच्या कार्याची हिंदू हितकर्ते म्हणून मांडणी करायला कशी सुरुवात झाली त्याची एक झलक




मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचं नाव द्यावं ह्या नामांतराच्या प्रश्नाला शिवसेना आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारी मंडळी ह्यांचा विरोध होता. हिंदूंमध्ये दलित-सवर्ण अशा दंगली घडू लागल्या. त्यावेळी समरसता मंच आणि संघाने घेतलेली निर्णायक भूमिका.




पुरोगामी वैचारिक असहिष्णुता आणि पत्रकार-नेते-राज्यकर्ते ह्यांचं साटंलोटं.



हे पुस्तक म्हणजे संघावरील आरोपांना मुद्देसूद, साधार आणि संयत भाषेत दिलेलं उत्तर आहे. संघाच्या विरोधकांनी आणि संघप्रेमींनी संघासारख्या इतक्या महत्त्वाच्या संघटनेबद्दलची आपली माहिती वाढवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावं.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...