पुस्तक - काफ्काचं 'मेटॅमॉर्फोसिस' - न संपणारं गारुड (Kafkacha 'metamorphosis' na sampanara garud)
लेखक - डॉ. सुहास भास्कर जोशी (Dr. Suhas Bhaskar Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३५
प्रकाशन - डिसेंबर २०२३, राजहंस प्रकाशन
ISBN - 978-81-91469-02-03
छापील किंमत -रु. २०० /-
जागतिक साहित्य, प्रभाव टाकणारं साहित्य, स्वतःची शैली निर्माण करणारा लेखक, नवीन तत्वचिंतनात्मक मांडणी करणारा लेखक अशा संदर्भातल्या साहित्यिक लेखांमध्ये "काफ्का" हे नाव बऱ्याच वेळा वाचलं होतं. पण अजूनपर्यंत मी त्याचं लिखाण काही वाचलं नव्हतं. उत्सुकता होतीच. त्यामुळे वाचनालयात नवीन पुस्तकांच्या विभागात हे ताजं, कोरं आणि आकर्षक पुस्तक बघितल्यावर लगेच घेतलं. पुस्तक वाचताना कळलं की फ्रान्झ काफ्का हा जर्मन भाषेत लिखाण करणारा लेखक होता. आणि "मेटॅमॉर्फोसिस" ही त्याची अतिशय गाजलेली लघुकादंबरी किंवा दीर्घकथा. तिचं मूळ जर्मन नाव Die Verwandlung. १९१२ मध्ये काफ्काने लिहिली. १९१५ मध्ये प्रकाशित झाली. त्याची अनेक इंग्रजी भाषांतरं झाली आहेत. त्यापैकी इयन जॉनस्टन ह्यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद ह्या पुस्तकात आहे.
ही कादंबरी पहिल्या वाक्यापासून खिळवून ठेवते. "एके दिवशी सकाळी अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नातून ग्रेगॉर सॅम्सा त्याच्या अंथरुणात जागा होत होता, तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं रूपांतर एका राक्षसी आकाराच्या किड्यात झालं आहे. आपल्या चिलखतासारख्या पाठीवर तो पडून राहिला .." अशा एका चमत्कृतीपूर्ण प्रसंगासमोर लेखक आपल्याला उभे करतो. ग्रेगोर आपल्या नव्या शरीराचा काहीही खळखळ न करता स्वीकार करतो. पण ह्या किड्याच्या शरीराशी जुळवून घेणं जरा कठीण जातं. मग त्याच्या घरच्यांना हे भयानक वास्तव कसं कळतं, त्यांच्या प्रतिक्रिया कशा होतात ह्याचं चित्रमय वर्णन पुस्तकात आहे. सुरुवातीला कुतूहल, मग भीती, मग काळजी आणि मग वास्तवाचा स्वीकार अशा टप्प्यावरून ग्रेगोर आणि त्याचं कुटुंबीय चालत राहतं. घरातला "कमावता हात" असणारा ग्रेगोर ह्या अवस्थेत सापडल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा थोडी खालावते. त्याचा परिणाम त्यांच्या संबंधांवरही होतो. भाऊ म्हणून , मुलगा म्हणून त्याच्याकडे बघायचं का "अजस्त्र ओंगळ प्राणी" म्हणून बघायचं ? त्याच्याशी जखडून घ्यायचं का त्याला सोडून द्यायचं ? इतरांना कळून द्यायचं का लपवायचं ? असे कितीतरी प्रश्न इथे उभे राहतात. त्यातून पुढे काय होतं? ग्रेगोरला घरी ठेवतील का घराबाहेर काढतील ? तो असाच जगेल का मरेल ? तो पुन्हा माणूस होईल का? आणि मुळात तो किडा किंवा प्राणी झालाच का ? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचा !
"मेटॅमॉर्फोसिस" अर्थात रूपांतर मध्ये, पहिला प्रसंग हाच चमत्कृतीपूर्ण आहे. बाकी पुढचं कथानक अगदी बुद्धिगम्य पटणारं असं आहे. कल्पनारंजनाचा अतिरेक झाला नाही. त्यामुळे आपण सुद्धा "खरंच असं झालं तर काय होईल" ह्या मानसिक खेळात रममाण होतो. त्यामुळे पुढे वाचायची उत्सुकता टिकून राहते. भाषांतर सुद्धा चांगलं आणि प्रवाही झालं आहे. मूळ कथानकात फक्त "पाश्चात्त्य" पार्श्वभूमीतच घडू शकेल असा भाग फार नाही. त्यामुळे तिकडचे संदर्भ मराठीत आणतानाची ओढाताण नाही. आपण त्या गोष्टीशी लगेच "रिलेट" करू शकतो.
ह्या पुस्तकात ५५ पानी भाषांतर आहे. त्यानंतर नंतर काफ्काचं आयुष्य, व्यक्तिमत्त्व, लेखन ह्याची माहिती दिली आहे. तर त्यानंतर ह्या साहित्यकृतीचं आस्वादात्मक विश्लेषण आहे. काफ्काने कथेत किड्याचं/प्राण्याचं नाव सांगितलेलं नाही. तर मोघम वर्णन आहे. असं का असावं? माणसाचा किडा झाला ह्यात प्रतीकात्मकता असेल तर त्याचा काय अर्थ असेल ? ज्या व्यक्तिरेखा त्यात आहेत त्यातून कुठले मानवी स्वभाव लेखकाला दाखवायचे आहेत ? ह्याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न आहे.
शंभर वर्ष होऊन गेली तरी "मेटॅमॉर्फोसिस"चं गारूड कायम आहे. देशोदेशीच्या लेखकांनी "माणसाचं अचानक प्राण्यात रूपांतर झालं आणि पुढे काय घडलं" ह्या धर्तीवर कथा, कादंबऱ्या , नाटकं लिहिली आहेत. प्रत्येकात प्राणी वेगळे. कधी गेंडे, कधी झुरळ तर कधी कोल्हे. त्यातून साधलेली प्रतीकात्मकता वेगळी आणि सुचवलेला सामाजिक, राजकीय अर्थ सुद्धा वेगळा. काफ्काच्या वेळीच ब्रिटिश लेखकाने "तरुणीचं रूपांतर कोल्हीमध्ये" ह्या धर्तीवर कथा लिहिली ती कथा थोडक्यात आहे. विशेष म्हणजे काफ्काने स्वतः ती कथा वाचली होती. आणि "ती माझं अनुकरण नसून वेगळी कलाकृती आहे" असं म्हटलं होतं. अशी आठवण पुस्तकात सांगितली आहे. अजून काही पाश्चात्य उदाहरणे आहेत. सध्याचा जपानी लेखक हारुकी मुराकामीने उलट कथा लिहिली आहे की "एका प्राण्याचं ग्रेगोर सॅम्सा मध्ये रूपांतर झालं आहे. विलास सारंग, जी.ए. कुलकर्णी ह्या भारतीय लेखकांच्या पण भन्नाट कथा ह्याच प्रकारात मोडतात त्याची सविस्तर चर्चा आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुद्धा वसंत आबाजी डहाके ह्यांनी काफ्काचं असं रसग्रहण केलं आहे.
भारतीय पुराणकथांमध्ये असे चमत्कार, विचित्र प्राणी, शाप-उ:शाप ह्यांच्या खूप कथा आहेत. त्यातल्या काही कथासुद्धा ह्या साच्यात बसणाऱ्या असतील असं मला वाटतं. पण अशा पौराणिक किंवा लोकसाहित्यातील गोष्टींचा उल्लेख पुस्तकात नाहीये. काफ्काचे पूर्वसुरी त्यातून शोधता आले असते. पण कदाचित लेखकाला ही चर्चा आधुनिक काळातील साहित्या पुरतीच करायची असावी.
काही पाने उदाहरणादाखल
लेखकाची माहिती
अनुक्रमणिका
मेटॅमॉर्फोसिस मधील एक प्रसंग. किड्याच्या शरीराशी जुळवून घ्यायचा प्रयत्न आणि ग्रेगोरची बहीण भीत भीत त्याची कशी काळजी घेते त्याबद्दल
मेटॅमॉर्फोसिस मधून काय सूचित करायचं असेल ह्याबाद्दल लेखकाचं विश्लेषण
काफ्काएस्क इतर कथा ... माणसांचे झाले गेंडे; तसेच जी.एं ची एक कथा ह्याबद्दल
हे पुस्तक वाचून फक्त "मेटॅमॉर्फोसिस"च वाचायला मिळालं नाही तर, काफ्का बद्दल कळलं. एखाद्या कलाकृतीचे वेगवेगळे अर्थ कसे काढता येऊ शकतात हा विश्लेषणाचा भाग समजला. एकाच सूत्रावर आधारित पण तरीही भिन्न साहित्यकृती गोळा करण्याचा लेखकाचा प्रयत्न भावाला. त्यातून "माणूसपण", त्याच्या भावना, समस्या ह्या जगभर किती सारख्या आहेत हे यथार्थ चित्र उभं राहील. असं हे "फुल पॅकेज" पुस्तक माझ्या सारख्या "काफ्का"ला अपरिचित व्यक्तीला भावलं नाही तरच नवल. त्यातून काफ्काचं अजून वाचायची इच्छा तर होतेच पण लेखक सुहास जोशी ह्यांचं इतर लेखन वाचायची उत्सुकता सुद्धा तयार होते !
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
काही पाने उदाहरणादाखल
लेखकाची माहिती
अनुक्रमणिका
मेटॅमॉर्फोसिस मधील एक प्रसंग. किड्याच्या शरीराशी जुळवून घ्यायचा प्रयत्न आणि ग्रेगोरची बहीण भीत भीत त्याची कशी काळजी घेते त्याबद्दल
मेटॅमॉर्फोसिस मधून काय सूचित करायचं असेल ह्याबाद्दल लेखकाचं विश्लेषण
काफ्काएस्क इतर कथा ... माणसांचे झाले गेंडे; तसेच जी.एं ची एक कथा ह्याबद्दल
हे पुस्तक वाचून फक्त "मेटॅमॉर्फोसिस"च वाचायला मिळालं नाही तर, काफ्का बद्दल कळलं. एखाद्या कलाकृतीचे वेगवेगळे अर्थ कसे काढता येऊ शकतात हा विश्लेषणाचा भाग समजला. एकाच सूत्रावर आधारित पण तरीही भिन्न साहित्यकृती गोळा करण्याचा लेखकाचा प्रयत्न भावाला. त्यातून "माणूसपण", त्याच्या भावना, समस्या ह्या जगभर किती सारख्या आहेत हे यथार्थ चित्र उभं राहील. असं हे "फुल पॅकेज" पुस्तक माझ्या सारख्या "काफ्का"ला अपरिचित व्यक्तीला भावलं नाही तरच नवल. त्यातून काफ्काचं अजून वाचायची इच्छा तर होतेच पण लेखक सुहास जोशी ह्यांचं इतर लेखन वाचायची उत्सुकता सुद्धा तयार होते !
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————